'परवडत नव्हतं म्हणून अनोळखी कुटुंबासोबत मिळून घेतलं घर'; असे वाचवले हजारो डॉलर्स

फोटो स्रोत, Elizabeth Wilcox
- Author, डेव्हिड सिल्व्हरबर्ग
- Role, बिझनेस रिपोर्टर
- Reporting from, टोरंटो
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
एलिझाबेथ आणि टॉम विलकॉक्स यांना जेव्हा स्वतःचं हक्काचं आणि मनासारखं घर खरेदी करणं आवाक्याबाहेरचं आहे हे समजलं, तेव्हा त्यांनी एक धाडसी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
आपल्यासारखीच लहान मुलं असलेलं आणि पूर्णपणे अनोळखी असलेलं दुसरं एखादं जोडपं शोधायचं, त्यांच्याकडे अर्ध्या-अर्ध्या पैशांत मिळून घर विकत घेण्याची आणि सगळ्यांनी एकत्र राहण्याची कल्पना मांडायची, असं त्यांनी ठरवलं.
कॅनडामध्ये घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या शहरांपैकी एक व्हँकुव्हरमध्ये राहणाऱ्या विलकॉक्स दाम्पत्याला आपल्या मुलांना खेळण्यासाठी मागे अंगण असलेलं घर हवं होतं.
आरोग्य क्षेत्रात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एलिझाबेथ सांगतात की, "आम्हाला चालता फिरता येईल अशा चांगल्या परिसरात एक असं घर हवं होतं जिथं अंगणात मुलांसाठी ट्रॅम्पोलिन मावेल. पण ते आम्हाला परवडणारं नव्हतं."
10 लाख कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे 6.45 कोटी रुपये इतकं बजेट असूनही त्यांना जास्तीत जास्त एखादा छोटासा फ्लॅट आणि त्याला छोटीशी बाल्कनी एवढ्यावरच समाधान मानावं लागणार होतं.
तेव्हा एलिझाबेथ यांना दुसऱ्या एका कुटुंबासोबत मिळून घर खरेदी करण्याची ही भन्नाट कल्पना सुचली.
'हजारो डॉलर्स वाचवले'
त्यांनी एका स्थानिक रिअल इस्टेट एजंटच्या ई-न्यूजलेटरमध्ये यासंदर्भात जाहिरात दिली. मात्र ज्यांच्याशी त्यांचे विचार जुळतील असं कुटुंब भेटायला त्यांना तब्बल दोन वर्षं लागली आणि हे कुटुंब होते ॲश्ले पुलमन, त्यांचे पती आणि त्यांच्या दोन मुलांचं.
2023 मध्ये विलकॉक्स आणि पुलमन या दोन्ही कुटुंबांनी मिळून 18.5 लाख कॅनेडियन डॉलर्सना (सुमारे 12 कोटी रुपये) सहा बेडरूम्सचं एक स्वतंत्र घर खरेदी केलं आणि तेही त्यांना हवं तसं प्रशस्त अंगण असलेलं.
दोन्ही कुटुंबांनी 2.5 लाख कॅनेडियन डॉलर्सचं (सुमारे 1.6 कोटी रुपये) डाउन पेमेंट निम्मं-निम्मं वाटून घेतलं आणि दरमहा भराव्या लागणाऱ्या 3,900 कॅनेडियन डॉलर्सच्या सुमारे 2.5 लाख रुपये गृहकर्जाच्या हप्त्यातही ते निम्मा वाटा उचलतात.
इतकंच नाही तर घराची बिलं आणि दुरुस्तीसारखा इतर कोणताही खर्चही ते समसमान वाटून घेतात. एलिझाबेथ सांगतात की, या भन्नाट व्यवस्थेमुळे दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपये वाचले आहेत.

फोटो स्रोत, Elizabeth Wilcox
End of podcast promotion
अनोळखी लोकांसोबत मिळून घर विकत घेणाऱ्यांची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे टोरोंटोमध्ये या संकल्पनेबद्दल लोकांची आवड खूप वाढल्याचं परिमल गोसाई यांचं म्हणणं आहे.
गोसाई हे 'हसमेट्स' (Husmates) या ॲप आणि वेबसाइटचे संस्थापक आणि सीईओ आहेत. कॅनडातील या सर्वात मोठ्या शहरात अनोळखी व्यक्तीसोबत मिळून घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम हे प्लॅटफॉर्म करतं.
ते म्हणतात याकडे "एक आर्थिक व्यवहार किंवा नाते म्हणून पाहता येऊ शकतं, ज्यामुळे यात भावनांना जागा राहत नाही."
जगातील इतर देशांमध्ये हा ट्रेंड किती प्रचलित आहे याबाबत स्पष्टता नाही. ब्रिटिश मॉरगेज ब्रोकर 'L&C' चे डेव्हिड हॉलिंगवर्थ सांगतात की, त्यांच्या पाहण्यात असं काही आलं नसलं तरी ब्रिटनमध्येही हे घडत असावं. पण हे प्रमाण "मोजक्या लोकांपुरतं" आहे.
ते म्हणतात, "मला आठवतंय की कोविड-19 आधी लंडनच्या एका पबमध्ये अनोळखी व्यक्तीसोबत मिळून घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी 'स्पीड डेटिंग'सारखाच एक जोडीदार शोधण्याचा मेळावा भरवण्यात आला होता. पण तो किती यशस्वी झाला, हे मला माहीत नाही."
विलकॉक्स आणि पुलमन दोन्ही कुटुंबांनी एकत्र पैसे गोळा करून व्हँकुव्हरमध्ये एक स्वतंत्र घर खरेदी केलं.

फोटो स्रोत, Elizabeth Wilcox
तीन वर्षं उलटून गेल्यानंतरही विलकॉक्स आणि पुलमन या दोन्ही कुटुंबांचं म्हणणं आहे की, त्यांचं हे एकत्र राहण्याचं समीकरण अगदी मस्त जुळून आलं आहे आणि आजही कायम आहे.
दोन्ही कुटुंबांसाठी स्वयंपाकघरासारख्या काही खासगी जागा वेगळ्या असल्या, तरी तळमजल्यावरची मोठी लिव्हिंग रूम ते मिळून वापरतात. या खोलीच्या एका कोपऱ्यात होम जिम आहे आणि तिथे एक सामायिक फ्रीजरही ठेवला आहे.
एलिझाबेथ सांगतात की, "जर कोणी व्यायाम करण्यासाठी बेसमेंटमध्ये जातोय असं सांगितलं, तर आम्हाला समजतं की थोडा वेळ तिकडे जायचं नाही. यावरून आमच्यात कधीच काही वाद किंवा अडचण आलेली नाही."
अॅश्लेही त्यांच्याशी सहमत होत सांगतात की यामध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्या म्हणतात, "कदाचित हा आमचा अतिआत्मविश्वास वाटू शकेल, पण मी आणि माझ्या पतीला नेहमीच वाटायचं की आम्ही अनोळखी लोकांसोबतही सहज जुळवून घेऊन राहू शकणारे लोक आहोत."
'हाऊस मीटिंग्ज'
टोरंटोमध्ये फ्रीलान्स बिझनेस कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या सबरीना बोमन 2018 पासून इतर दोन रूममेट्ससोबत एका घराच्या सह-मालक आहेत. जेव्हा त्यांनी घराच्या करारावर सही केली आणि राहायला आल्या तेव्हा त्या दोघांपैकी एका व्यक्तीला त्या अजिबात ओळखतही नव्हत्या.
आर्थिक व्यवहारांचे अचूक आकडे सांगायला सबरीना तयार नसल्या तरी त्यांनी सांगितलं की त्या तिघांनी आपापल्या उत्पन्नानुसार घराचं डाउन पेमेंट आणि गृहकर्जाचे हप्ते वाटून घेण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या मते घरातले कोणतेही छोटे-मोठे वाद मोकळेपणाने चर्चा करून सुरुवातीलाच मिटवता येतात. त्या सांगतात, "घरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर संवाद साधण्यासाठी एक ठोस व्यवस्था असणं आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे."
घरातील कामं, आर्थिक व्यवहार, वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि काही मतभेद असल्यास त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरात नियमित बैठका 'हाऊस मिटिंग्ज' होतात.
सबरीना सांगतात, "एखादी गोष्टी खटकत असेल किंवा जे पटत नाही त्याबद्दल ते मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे बोलतात आणि आम्ही सगळे मिळून त्यावर तोडगा काढतो, हे पाहून खूप छान वाटतं."

फोटो स्रोत, Sabrina Bowman
टोरोंटोमधील सबरीना यांचं घर असो किंवा व्हँकुव्हरमधील विलकॉक्स आणि पुलमन कुटुंबाचं घर, जर कोणाला आपला वाटा विकून घर सोडायचं असेल तर त्यासाठी दोन्ही ठिकाणी कायदेशीर करार केलेले आहेत.
दोन्ही घरांच्या करारात घर सोडण्याआधी विशिष्ट कालावधीची नोटीस देण्याची अट घालण्यात आली आहे.
याशिवाय सबरीना यांच्या घराच्या करारानुसार, घर सोडणाऱ्या व्यक्तीला आपला हिस्सा विकत घेण्याची पहिली संधी तिथे राहणाऱ्या इतर सदस्यांना देणं बंधनकारक आहे.
टोरोंटोच्या रिअल इस्टेट वकील तान्या वॉकर यांच्या मते, अशा प्रकारची कायदेशीर खात्री असणं खूप गरजेचं आहे. वॉकर सांगतात, "भविष्यात काही वाद निर्माण झाल्यास अनेक ईमेल्स आणि फेसबुक मेसेजेस शोधून पुरावे गोळा करणं खूप त्रासदायक आणि गोंधळाचं ठरू शकतं. त्याऐवजी तुमच्याकडे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असलेला पक्का करार असायला हवा."
इकडे व्हँकुव्हरमध्ये एलिझाबेथ सांगतात की, या घरात किती वर्षे राहायचं याचं कोणतंही बंधन दोन्ही कुटुंबांनी ठरवलेलं नाही. त्या म्हणतात, "आम्ही सगळेच या व्यवस्थेवर आणि परिसरावर खूप खूश आहोत, त्यामुळे हे घर सोडून जाणं आमच्यासाठी कठीण असेल.
"मुलांना पहिल्यांदा ट्रॅम्पोलिनवर उड्या मारताना किंवा अंगणातील हिरव्यागार गवतावर मनसोक्त पळताना पाहून मला काय वाटलं, तो आनंद पैशांत मोजता येण्यासारखा नाही."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन



























