बड्या शक्तींनी आपसांतच निर्णय घेतले, तर भारतासारख्या देशांची भूमिका मर्यादित होईल का?

चीनच्या शेन्झेनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन और चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग.
फोटो कॅप्शन, चीनच्या शेन्झेनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन और चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग.
Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

फेब्रुवारी 1945 ची गोष्ट आहे. तीन मोठे जागतिक नेते जगाचं भवितव्य ठरवण्यासाठी क्रिमियामधील एका रिसॉर्टमध्ये भेटले होते.

त्यावेळी नाझींच्या जर्मनीची पिछेहाट सुरू होती.

सोव्हिएतचं सैन्य बर्लिनच्या दिशेनं येत होतं आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्यानं जर्मनीची पश्चिम सीमा ओलांडली होती.

पॅसिफिक भागात अमेरिकेच्या सैन्याची जपानच्या दिशेने कूच सुरुच होती.

त्याच वेळी तत्कालीन तथाकथित तीन मोठे नेते म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट, ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि सोव्हिएतचे नेते जोसेफ स्टॅलिन हे याल्टा नावाच्या ठिकाणी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये भेटायला तयार झाले.

दुसरं महायुद्ध संपत असताना भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यावर चर्चा व्हावी असं सगळ्यांचं मत होतं.

मग आज त्या याल्टाची आठवण का काढली जात आहे?

याचं कारण म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनमधील शेन्झेन इथं नुकतीच भेट झाली. त्यानंतर विश्लेषक या त्रिपक्षीय बैठकीला याल्टा 2.0 म्हणजेच याल्टाची दुसरी बैठक म्हणत आहेत.

चिनी प्रसारमाध्यमं आणि विश्लेषकांनी मात्र ही तुलना चुकीची ठरवली आहे. तेव्हाची भेट शीतयुद्धाच्या काळातली एक जुनी गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही एका नवीन जागतिक सत्ता समीकरणाची नांदी आहे का? आणि या बदलत्या समीकरणात भारताचं स्थान काय असेल? असे प्रश्न समोर येत आहेत.

भारत 'क्वाड'चा वापर करून एक स्वतंत्र सामरिक शक्ती म्हणून आपलं स्थान बळकट करू शकेल का? की जागतिक महासत्तांमध्ये संतुलन साधण्याच्या अडचणीत भारत हळूहळू आणखी अडकत जाईल? अशाही शंका समोर येत आहेत.

या सगळ्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी 'कलेक्टिव्ह न्यूजरूम'चे डायरेक्टर ऑफ जर्नलिझम मुकेश शर्मा यांनी अंतर्गत सुरक्षा तसंच चीन-संबंधित विषयांच्या लेखिका आणि 'फोर्स' मासिकाच्या संपादिका गझाला वहाब आणि जर्मनी, इंडोनेशिया, इथिओपिया तसंच आसियानमध्ये भारताचे राजदूत राहिलेले गुरजीत सिंग यांच्याशी संवाद साधला.

तीन महासत्तांच्या बैठकीमागचं कारण काय?

गझाला वहाब यांच्या मते, सध्या अमेरिका, रशिया आणि चीनसाठी मध्यपूर्वेत सुरू असलेले युद्ध संपवून त्या प्रदेशात स्थिरता आणणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.

इंधनाच्या वाढत्या किमती आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद असणं हे तिन्ही देशांसाठी चिंतेचे विषय असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

"शेन्झेनमधील बैठक केवळ प्रतिकात्मक समजू नये. हा फक्त संदेश देण्याचा प्रकार नाही, असं मला वाटतं. कारण, सध्या या तिघांचे हितसंबंध आणि आणि पणाला असलेल्या गोष्टी खूप मोठ्या आहेत," असंही ते म्हणाले.

गझाला यांच्या मते, ही पहिली बैठक असून पुढे आणखी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम सकारात्मक आले, तर डिसेंबरमध्ये अमेरिकेत आणखी एक बैठक होऊ शकते.

तीन देशांमधील चर्चेतून मध्यपूर्वेतील समस्येवर तोडगा निघण्याची आशा निर्माण होऊ शकते, असंही त्यांना वाटतं.

तिन्ही देश प्रामुख्याने आपापल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गुरजीत सिंग यांचा विश्वास आहे.
फोटो कॅप्शन, तिन्ही देश प्रामुख्याने आपापल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गुरजीत सिंग यांचा विश्वास आहे.

पण, माजी राजदूत गुरजित सिंग यांनी या बैठकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, हे तीन देश स्वतःला महासत्ता समजत असले तरी, जगाच्या समस्या सोडवण्यासाठी ते एकत्रितपणे प्रयत्न करत असल्याचं दिसत नाही.

"हे तीन देश प्रामुख्यानं त्यांच्यात समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेला व्यापारातील असंतुलन आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्याबद्दल चिंता आहे. चीनला त्यांच्यावर लादलेल्या निर्बंधांची आणि अर्थव्यवस्थेवरील त्यांच्या परिणामाची चिंता आहे. रशियासाठी बैठकीला उपस्थित राहून आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आपलं स्थान पुन्हा मिळवणं गरजेचं आहे," असं सिंग यांना वाटतं.

"या तीन देशांनी एकत्र येऊन आम्हाला काय करायचं ते सांगावं, असं आम्हाला अपेक्षित नाही," असंही ते म्हणाले.

भारत, आसियान आणि जगाच्या दक्षिणेकडील इतर देशांनी अशा चर्चांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. जगातील प्रमुख शक्तींमधील निर्णयांमध्ये इतर देशांचा सहभाग आवश्यक आहे, असंही सिंग यांना वाटतं.

'क्वाड'चे महत्त्व कमी होत आहे का?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शेन्झेनमधील बैठकीमुळं क्वाडच्या भवितव्याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे. क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक भागात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठीचं व्यासपीठ म्हणून या गटाकडं पाहिले जातं.

पण, क्वाड गट आता पूर्वीइतका प्रभावी राहिलेला नाही, असं गझाला यांचं स्पष्ट मत आहे. त्याचं कारण देताना त्यांनी काही घडामोडींचा उल्लेख केला.

भारताला यंदा क्वाड शिखर परिषदेचं आयोजन करायचं होतं. पण ती बैठक झाली नाही, असं त्या सांगतात.

त्याऐवजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय पंतप्रधानांना फिलीपिन्सची राजधानी मनिलात भेटीचा प्रस्ताव दिला. यावरून ट्रम्प प्रशासनाच्या नजरेत क्वाडचं महत्त्व कमी झालं आहे हे दिसत असल्याचं गझाला यांना वाटतं.

क्वाडच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकाचाही त्यांनी उल्लेख केला. आधीच्या निवेदनांपेक्षा ते खूपच छोटं होतं, असंही त्यांनी म्हटलं.

त्यात सीमापार दहशतवादाचा निषेध करण्यात आला होता. पण चीनचा काहीही उल्लेख नव्हता. तसंच निवेदनात व्यापाराला प्राधान्य देण्यात आलं होतं.

क्वाडचा मूळ उद्देश चार देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय वाढवणे आणि चीनच्या प्रभावाला रोखणे हा होता,असं गझाला वहाब सांगतात.

गझाला वहाब

शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण आणि लष्करी सरावांच्या माध्यमातून हे चारही देश तसं सहकार्य वाढवत होते. पण आता या गटाचा लष्करी सहकार्याचा पैलू कमकुवत होत असल्याचं दिसतंय.

गझाला यांच्या मते, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका चीनसोबतच्या व्यापाराला अधिक महत्त्व देत आहे. ट्रम्प यांना चीनसोबत लष्करी संघर्षाऐवजी व्यापार आणि व्यवसायात स्पर्धा हवी आहे.

"स्पर्धा असेल, पण ती व्यापारात, व्यवसायात असेल. सध्या त्यांना त्यांच्याशी लष्करी स्पर्धा नको आहे," असं गझाला सांगतात.

त्याचवेळी क्वाड पूर्णपणे विसर्जित होणार नाही, असा विश्वासही गझाला यांना आहे. भारताचा नौदल मलबार सराव (जो क्वाडची स्थापना होण्यापूर्वीपासूनच सुरू होता) आणि हिंद महासागर क्षेत्रातील निगराणीशी संबंधित सहकार्य सुरूच राहील.

गुरजीत सिंग यांच्या मते, क्वाडचे उपक्रम सुरुच आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षांत परराष्ट्र मंत्री, शेरपा आणि कार्यकारी गटांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये अजेंडा हळूहळू पुढे सरकत आहे, असं ते सांगतात.

त्यांच्या मते, "क्वाडला जे काही करायचं आहे, ते क्वाड शांतपणे करत आहे."

गुरजीत सिंग यांच्या मते, क्वाड ही एक काम करणारी संघटना असून तिचे उपक्रम अविरतपणे सुरू आहेत. एखाद्या गटाचं यश केवळ नेत्यांच्या शिखर बैठकीवरच अवलंबून असतं असं नाही.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शिखर बैठकांमध्ये रस कमी होणं म्हणजे, क्वाड'नं काम करणं थांबवलं आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.

भारताला चीनविरोधी संतुलन साधणारा देश समजणं कितपत योग्य?

भारताचे अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत वाढणारे संबंध हे अनेकदा चीनच्या प्रभावाला संतुलित करण्याची रणनीती म्हणून पाहिले जातात.

भारताकडे चीनच्या विरोधात सामरिक भागीदार किंवा संतुलन साधणारा देश म्हणून पाहिले जावे, या कल्पनेशी गुरजीत सिंग सहमत नाहीत.

त्यांच्या मते, "भारत आणि चीन शेजारी देश आहेत आणि त्यांच्यात व्यापारही खूप मोठा आहे. भारत चीनपासून स्वतःला पूर्णपणे वेगळं ठेवू शकत नाही. त्यामुळं भारताला हितानुसार संबंध सांभाळावे लागतील."

भारत आणि चीन हे शेजारी देश आहेत आणि त्यांच्यासोबतचा आमचा व्यापार सर्वात मोठा आहे. आपण त्यांच्यापासून स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही.
फोटो कॅप्शन, भारत आणि चीन हे शेजारी देश आहेत आणि त्यांच्यासोबतचा आमचा व्यापार सर्वात मोठा आहे. आपण त्यांच्यापासून स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही.

"भारत आणि चीन शेजारी आहेत आणि आमचा व्यापार सर्वात मोठा आहे. आपण त्यापासून स्वतःला वेगळे ठेवू शकत नाही. आपल्याला आपले संबंध सांभाळावे लागतील," असं ते म्हणतात.

भारतानं कधीही स्वतःसाठी चीनला संतुलित करण्याची भूमिका स्वीकारायचं ठरवलं नाही, असंही ते म्हणाले.

भारत चीनच्या प्रभावाला संतुलित करू शकतो, असं अमेरिका आणि काही आसियान देशांना वाटत असलं तरी भारताची विचारसरणी यापेक्षा वेगळी आहे.

भारत-चीन संबंधांतील आर्थिक हितसंबंध आणि अविश्वास

भारत आणि चीनमधील संबंध पाहता दोन्ही देशांत आर्थिक सहकार्य आणि सामरिक अविश्वास एकत्रच जाणवतो. गुरजीत सिंग यांच्या मते, भारताचे अनेक देशांशी संबंध सुधारले आहेत, पण सीमा तणावामुळं 2020 ते 2024 दरम्यान चीनसोबतचे संबंध स्थिर राहिले.

भारताला चीनसोबतचे संबंध पुढे न्यायचे आहेत, परंतु काही अडचणींमुळं चीन समान अटींवर व्यापार करण्यास तयार दिसत नाही, असं सिंग सांगतात.

ग्राफिक्स

दोन्ही देशांच्या विचारसरणीतील एक मूलभूत फरकही सिंग निदर्शनास आणून देतात. भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान 21 व्या शतकाला आशियाई शतक म्हणून पाहतात, तर चीन त्याला चिनी शतक म्हणून पाहतं, असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी शेन्झेन, ग्वांगझो, हाँगकाँग आणि मकाऊच्या आसपासचा परिसर आर्थिक सहकार्याचं नवीन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या शी जिनपिंग यांच्या प्रस्तावाचाही उल्लेख केला.

चीन आशियाच्या आर्थिक भूमिकेला महत्त्व देतो, परंतु त्या व्यवस्थेत भारतासारख्या दुसऱ्या महाशक्तीला समान स्थान देण्यास तयार दिसत नाही, असं ते सांगतात.

आसियान आणि ग्लोबल साउथसाठी भारताची भूमिका

माजी राजदूत गुरजित सिंग यांनीही भारत-आसियान संबंध महत्त्वाचे असल्याचं म्हटलं आहे. 1990 च्या दशकात सुरू झालेल्या भारताच्या 'लूक ईस्ट पॉलिसी'चं रुपांत 2014 मध्ये 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' असं करण्यात आलं.

आसियान देशांचे चीनसोबत घनिष्ठ आर्थिक संबंध आहेत, पण, दक्षिण चीनच्या समुद्रातील चीनच्या हालचालींबद्दल त्यांना सामरिक चिंताही आहे, असंही ते सांगतात.

चीनचे दावे आणि प्रादेशिक वादांमुळं अनेक आसियान देश त्यांच्या सुरक्षेबद्दल आणि सागरी हक्कांबाबत चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत, ते भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांसोबत सहकार्य करणे याकडं एक पर्याय म्हणून पाहतात.

भारताने 'लुक ईस्ट पॉलिसी' 1990 च्या दशकात सुरू केली होती. त्याचे 2014 मध्ये 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' मध्ये रूपांतर झाले.
फोटो कॅप्शन, भारताने 'लुक ईस्ट पॉलिसी' 1990 च्या दशकात सुरू केली होती. त्याचे 2014 मध्ये 'अॅक्ट ईस्ट पॉलिसी' मध्ये रूपांतर झाले.

गुरजीत सिंग यांच्या मते, महासत्तांमधील या वाढत्या स्पर्धेत आसियान देशांना एकटं पडायचे नाही.

त्यांच्यासाठी भारत हा असा भागीदार ठरू शकतो, ज्याच्या मदतीनं ते ग्लोबल साऊथच्या हितांसाठी काम करू शकतील.

त्यामुळंच शेन्झेन बैठकीबाबत त्यांना चिंता आहे. बड्या जगातील शक्तींनी आपसांत निर्णय घेण्यास सुरुवात केली, तर भारत, आसियान, आफ्रिका आणि युरोपियन युनियन यांसारख्या इतर महत्त्वाच्या पक्षांची भूमिका मर्यादित होऊ शकते, असं त्यांना वाटतं.

भारताचे परराष्ट्र धोरण: तटस्थता नव्हे, सामरिक स्वायत्तता

भारताच्या परराष्ट्र धोरणाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय गटांचा भाग असूनही भारताला स्वातंत्र्य टिकवून ठेवायचं आहे.

भारत क्वाडबरोबरच ब्रिक्स, एससीओ आणि जी20 सारख्या गटांतही सक्रिय आहे. तसंच आसियान, आफ्रिका, मध्य आशिया, दक्षिण पॅसिफिक आणि कॅरेबियन यांच्याशीही भारत संबंध अधिक दृढ करत आहे.

गुरजीत सिंग यांच्या मते, भारताचं हे धोरण तटस्थतेऐवजी 'बहुपक्षीय' समजायला हवं. म्हणजे हितसंबंधांनुसार अनेक देश आणि गटांशी संबंध राखण्याचे धोरण.

"भारत तटस्थ नाही. अलिप्ततावादाच्या काळातही भारत तटस्थ नव्हता, आणि आता सामरिक स्वायत्तताही तटस्थ नाही. भारत प्रत्येक निर्णय आमच्या स्वतःच्या हितानुसार घेतो," असं त्यांनी स्पष्ट केलं.

संयुक्त राष्ट्र, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना यांसारख्या बहुपक्षीय संस्था प्रभावीपणे कार्यरत नसल्याचंही, त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

अशा परिस्थितीत, मर्यादित देशांमधील सहकार्यासाठी व्यासपीठ म्हणून अनेक छोटे गट उदयास येत आहेत. भारतानं बहुपक्षीय प्रणालीपासून स्वतःला दूर केलेले नाही, परंतु या संस्थांची भूमिका कमकुवत होत असल्यामुळं, ते इतर व्यासपीठांचाही वापर करत आहे.

कलेक्टिव्ह न्यूजरूमतर्फे बीबीसीसाठी प्रकाशित.