मानवी विष्ठेच्या गोळ्यांनी उपचार? ऐकून विचित्र वाटेल, पण विज्ञान काय सांगतं?

Caption- मल प्रत्यारोपणाच्या उपचारांची संख्या वाढत आहे. परंतु, मलदान करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या लोकांचं प्रमाण 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
फोटो कॅप्शन, मल प्रत्यारोपणाच्या उपचारांची संख्या वाढत आहे. परंतु, मलदान करण्यासाठी पात्र ठरणाऱ्या लोकांचं प्रमाण 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
    • Author, सोफिया क्वाग्लिया
  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

2013 मध्ये ॲडम फे यांच्या मनात एक प्रश्न आला. कोणत्या प्रकारचं अन्न खाल्ल्याने चांगल्या दर्जाची विष्ठा किंवा मल तयार होतो?

त्यावेळी ॲडम फे वैद्यकीय शिक्षणाच्या चौथ्या वर्षात होते. क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइल या नावाच्या जिवाणूमुळे होणाऱ्या संसर्गावर उपचार कसे करायचे, हे ते शिकत होते.

हा संसर्ग पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करतो. या जिवाणूवर अनेक प्रकारच्या अँटिबायोटिक औषधांचा परिणाम होत नाही. त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं कठीण होतं.

त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला या गंभीर संसर्गाचा वारंवार त्रास होत होता. त्यामुळे त्यांना मल प्रत्यारोपणाची (फिकल ट्रान्सप्लांटेशन) गरज होती.

या उपचारपद्धतीत दुसऱ्या व्यक्तीच्या मलातील घटक रुग्णाच्या मोठ्या आतड्यात पोहोचवले जातात. यामुळे चांगले सूक्ष्मजीव रुग्णाच्या आतड्यात जातात.

हे सूक्ष्मजीव (मायक्रोऑर्गेनिज्म) क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइल या हानिकारक जिवाणूशी लढतात आणि आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचा बिघडलेला समतोल पुन्हा सुधारण्यासाठी मदत करतात.

पण यासाठी मल कुठून आणायचा? त्यावेळी मल गोळा करून ठेवणाऱ्या बँकांची संख्या खूपच कमी होती.

रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रही मलदान करण्यास असमर्थ होते किंवा त्यासाठी तयार नव्हते.

शेवटी, ॲडम फे यांनी स्वतःहून पुढाकार घेत मलदान करण्याचा निर्णय घेतला.

त्या महत्त्वाच्या दिवसाच्या आदल्या रात्री ॲडम फे यांनी जेवणात बरिटो (मेक्सिकन रोल) खाण्याचं ठरवलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी विद्यार्थी वसतिगृहातील आपल्या खोलीत वैद्यकीय दर्जाच्या म्हणजेच वैद्यकीय वापरासाठी असलेल्या गुलाबी रंगाच्या एका भांड्यात शौच केलं.

त्यानंतर त्यांनी मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या सुती कापडातून मल गाळून घेतला. त्यातून मिळालेला द्रव एका बाटलीत जमा केला.

ते सांगतात, "मला आठवतंय, मी ती बाटली कागदी पिशवीत ठेवली होती. कारण मलापासून तयार केलेल्या द्रवाची बाटली हातात घेऊन मी फिरत होतो."

काही तासांनंतर कोलोनोस्कोपीच्या प्रक्रियेदरम्यान ॲडम फे यांचा मल एका रुग्णाच्या आतड्यात सोडण्यात आला.

आता न्यूयॉर्कमधील एनवाययू लँगोन हेल्थमध्ये पचनसंस्थेचे तज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) म्हणून काम करणाऱ्या ॲडम फे यांना नंतर कळलं की हे उपचार यशस्वी झाले होते.

त्यानंतर त्या रुग्णाला क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइसचा संसर्ग पुन्हा कधीच झाला नाही.

'सुपर पूपर्स'

अलीकडच्या काही वर्षांत आतड्यांमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांच्या समूहाला म्हणजेच 'गट मायक्रोबायोम'ला आरोग्यासाठी किती महत्त्व आहे, यावर संशोधन मोठ्याप्रमाणात वाढलं आहे.

त्याचबरोबर मल प्रत्यारोपणाच्या उपचारपद्धतीतही रुची वाढली आहे. या उपचाराला 'फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट' असं म्हणतात.

क्लोस्ट्रीडिओइड्स डिफिसाइलच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी मल प्रत्यारोपणाला आधीच मान्यता मिळाली आहे.

जगभरात इरिटेबल बाउल सिंड्रोम, मधुमेह, ऑटिझम आणि हाडं ठिसूळ होण्याचा आजार (ऑस्टिओपोरोसिस) यांसारख्या आजारांवर मल प्रत्यारोपण उपयोगी ठरू शकेल का, यासाठी संशोधन आणि चाचण्या घेतल्या जात आहेत.

इतकंच नाही, तर स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होणे, तसेच मानसिक आजारांवर उपचारासाठीही मल प्रत्यारोपणाचा उपयोग होऊ शकतो का, याचाही अभ्यास केला जात आहे.

मल प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमध्ये एका व्यक्तीच्या मलातील घटक दुसऱ्या व्यक्तीच्या आतड्यात पोहोचवले जातात. हे घटक कॅप्सूलमध्ये भरून गोळीच्या स्वरूपातही दिले जाऊ शकते.

मल

परंतु, या उपचारासाठी योग्य ठरेल असं मलदान करणारी व्यक्ती शोधणं सोपं नाही.

यासाठी दान करणाऱ्या व्यक्तींची अतिशय काळजीपूर्वक तपासणी केली जाते. त्यानंतर केवळ सर्वाधिक निरोगी व्यक्तींची दाता म्हणून निवड केली जाते.

सर्वोत्तम दर्जाचा मल दान करणारे लोक तर त्याहूनही कमी मिळतात. अशा दात्यांना अनौपचारिकपणे 'सुपर पूपर्स' असं म्हटलं जातं.

या लेखासाठी मी 6 स्टूल बँका आणि प्रयोगशाळांना त्यांच्या मलदान करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची विनंती केली. पण, सर्वांनीच त्यासाठी नकार दिला.

त्यांचं म्हणणं होतं की, विश्वासार्ह दाता शोधणं खूप कठीण आहे. त्यामुळे त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप केल्यास ते मलदान करणं बंद करू शकतात.

मग सर्वोत्तम दर्जाचा मल दान करणारे हे खास लोक नेमके कोण आहेत? आणि सर्वात योग्य मल कोणता, हे विज्ञान कसं ठरवू शकतं?

मलदान करणाऱ्यांची निवड

मलदान करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्याची प्रक्रिया सर्व ठिकाणी सारखी नसते. कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी या मलाचा वापर करायचा आहे, यावरुन ही प्रक्रिया ठरते.

परंतु, या प्रक्रियेत प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाते.

न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनचे पचनसंस्थेचे (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) तज्ज्ञ कार्ल क्रॉफर्ड सांगतात, "आम्ही अशा व्यक्तीचा शोध घेतो, जी सर्वाधिक निरोगी असेल. एखाद्या व्यक्तीच्या अवयवदानापूर्वी जशी तपासणी केली जाते, तशीच तपासणी या व्यक्तीचीही केली जाते."

Caption- मलदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आधी आरोग्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरं आणि मुलाखतीही द्याव्या लागतात.
फोटो कॅप्शन, मलदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आधी आरोग्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरं आणि मुलाखतीही द्याव्या लागतात.

त्यांच्या मते, मलदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीची किडनी किंवा रक्तदान करणाऱ्या व्यक्तीप्रमाणेच सखोल तपासणी केली जाते.

मलदान करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना आधी आरोग्यविषयक अनेक प्रश्नांची उत्तरं आणि मुलाखतीही द्याव्या लागतात.

यानंतर संसर्गजन्य आजार आहेत का, हे तपासण्यासाठी रक्त आणि मलाच्या नमुन्यांची सविस्तर तपासणी म्हणजेच चाचणी केली जाते.

यात 30 हून अधिक प्रकारचे जंतू, परजीवी आणि औषधांचा परिणाम न होणारे सूक्ष्मजीव आहेत का, याची चाचणी केली जाते.

काही क्लिनिकमध्ये कोविड-19 आणि फ्लूची तपासणीही बंधनकारक केली जाते. कारण अनेक संसर्गजन्य आजार मलाच्या माध्यमातूनही पसरू शकतात.

काही प्रकरणांमध्ये मल प्रत्यारोपणामुळे नकळतपणे ई-कोलाय या जिवाणूचा संसर्गही पसरला आहे.

कोविड-19 सह श्वसनसंस्थेचे काही संसर्ग मलाच्या अतिशय सूक्ष्म कणांमधूनही पसरू शकतात.

मलाचा वापर करून आजारांवर उपचार कसे होतात? काय आहे मल प्रत्यारोपण?
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टॉयलेट फ्लश केल्यावर हे सूक्ष्म कण हवेत पसरू शकतात.

मलदान करणाऱ्या व्यक्तीला यापूर्वी काही आजार झाले आहेत का, याचीही तपासणी केली जाते. यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच पेशींवर हल्ला करते असे काही आजार आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचाही समावेश असतो.

काही प्रयोगशाळांमध्ये मलदान करू इच्छिणाऱ्या व्यक्ती कोणती औषधं आणि पूरक आहार घेतात, याचीही बारकाईने तपासणी करतात. यात मल्टिव्हिटॅमिन आणि लोहाच्या गोळ्यांचाही समावेश असतो.

टोरंटो विद्यापीठातील वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मायक्रोबायोलॉजिस्ट) सुसान पाउटेनेन सांगतात, "आम्ही याबद्दल सविस्तर माहिती घेतो आणि त्यांना ही औषधं किंवा गोळ्या घेणं बंद करता येईल का, हे पाहतो."

मल दात्यांना गेल्या आठवड्यात कोणते पदार्थ खाल्ले, ज्यामुळे ॲलर्जी होऊ शकते, याचीही माहिती द्यावी लागते.

त्या सांगतात, "काही वेळा आम्हाला अशा मलाची गरज असते, ज्यात सुकामेव्याचे (नट्सचे) अंशही नसतील."

साधारणपणे 18 ते 48 वर्षे वयोगटातील व्यक्तींची मलदानासाठी निवड केली जाते. परंतु, मल प्रत्यारोपणाचा उपचार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला देता येतो.

टोरंटो विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांच्या तज्ज्ञ आणि मल प्रत्यारोपण करणाऱ्या सुजी होटा सांगतात, "आम्ही 17 वर्षांच्या मुलांपासून ते 96 वर्षांच्या वृद्धांवरही उपचार केले आहेत."

Caption- दात्याच्या मलापासून तयार केलेले घटक रुग्णाला कॅप्सूलमधून दिले जातात किंवा थेट त्याच्या आतड्यांमध्ये पोहोचवले जाऊ शकतात. (प्रतीकात्मक फोटो)
फोटो कॅप्शन, दात्याच्या मलापासून तयार केलेले घटक रुग्णाला कॅप्सूलमधून दिले जातात किंवा थेट त्याच्या आतड्यांमध्ये पोहोचवले जाऊ शकतात. (प्रतीकात्मक फोटो)

मल प्रत्यारोपणाच्या बहुतांश कार्यक्रमांमध्ये दात्यांच्या खाण्यापिण्याच्या म्हणजेच आहाराच्या सवयींची विशेष पद्धतीने तपासणी केली जात नाही.

परंतु, दात्यांचा आहार संतुलित आणि भरपूर तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबरयुक्त असावा, अशी अपेक्षा असते.

फळं, भाज्या आणि संपूर्ण धान्यांमधून आतड्यांतील सूक्ष्मजीव निरोगी राहण्यासाठी आणि त्यांची वाढ किंवा विकास होण्यासाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.

क्रॉफर्ड सांगतात, "मलदान करणाऱ्या व्यक्ती शाकाहारी असाव्यात, असं कुणाला वाटू शकतं. परंतु, शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ खाणाऱ्या लोकांच्या आतड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव जास्त प्रमाणात आढळून येतात."

होटा आणि पाउटेनेन यांच्या मते, शक्यतो मलदान करणाऱ्या व्यक्तींची शरीरयष्टीही सडपातळ असली पाहिजे.

एका प्रकरणात, 32 वर्षांच्या एका महिलेला मल प्रत्यारोपणानंतर लठ्ठपणाचा त्रास सुरू झाला. यापूर्वी त्या सडपातळ होत्या. परंतु, त्यांना निरोगी पण जास्त वजन असलेल्या व्यक्तीच्या मलापासून तयार केलेले घटक देण्यात आले होते.

याशिवाय, मद्यपानाची सवय, व्यायाम आणि झोप अशा अनेक गोष्टींचाही विचार यात केला जातो.

मलदान करणाऱ्या व्यक्तींना प्रवास करण्यावरही निर्बंध असू शकतात. कारण प्रवासादरम्यान त्यांच्या आतड्यांमध्ये औषधांचा परिणाम न होणारे जिवाणू जाऊ शकतात.

क्रॉफर्ड आता मल प्रत्यारोपणासाठी दात्यांकडून स्वतः मल गोळा करत नाहीत.

मात्र, त्यांच्या अनुभवावरून सुरुवातीच्या तपासणीत केवळ 3 टक्के लोकच मलदानासाठी योग्य ठरतात.

यापैकीही केवळ निम्म्या लोकांच्या आतड्यांमध्ये नियमितपणे मलदान करण्यासाठी आवश्यक असलेलं जिवाणूंचं (बॅक्टेरिया) योग्य संतुलन आढळून येतं.

केवळ 0.6 टक्के लोकांची नियमित मलदान करणारे दाता म्हणून निवड केली जाते.

टोरंटोमध्ये होटा यांच्याकडे मलदानासाठी येणाऱ्या लोकांपैकी केवळ 1.6 टक्के लोकच सुरुवातीच्या तपासणीत पात्र ठरतात.

यापैकीही केवळ 0.6 टक्के लोकांची नियमित मलदान करणारे दाता म्हणून निवड केली जाते.

मात्र, स्टूल बँक (मल बँक) चालवणारे आणि या विषयावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ सांगतात की, मलदान करताना व्यावहारिक आणि इतर अनेक अडचणी येतात. या अडचणींकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

ॲडम फे यांचं प्रकरण सामान्य नाही. त्यांनी आपल्या ओळखीच्या एका रुग्णासाठी केवळ एकदाच मलदान केलं होतं.

जर तुम्ही मलदानासाठी आवश्यक असलेल्या तपासणी चाचण्यांत पात्र ठरलात, तर तुम्हाला नियमितपणे मलदान करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं.

या व्यवस्थेनुसार, तुम्हाला जवळपास दररोज प्रयोगशाळेत जावं लागतं. तिथे मलदान करणाऱ्या व्यक्तींसाठी खास तयार केलेल्या स्वच्छतागृहात मलविसर्जन करावं लागतं.

अनेक स्टूल बँका मलदान करणाऱ्या व्यक्तींना यासाठी पैसेही देतात.

उदाहरणार्थ, अमेरिकेत प्रत्येक वेळी मलदान केल्यावर 25 ते 100 डॉलर (सुमारे 2300 ते 9300 रुपये) दिले जाऊ शकतात.

प्रत्येक वेळी नवीन दाता शोधण्यापेक्षा काही ठराविक व्यक्तींकडून वारंवार मल गोळा करणं स्टूल बँकांना अधिक सोयीचं असतं. त्यामुळे त्या त्याच दात्यांकडून पुन्हा पुन्हा मल गोळा करणं त्यांच्यासाठी सोयीस्कर असतं.

टोरंटो विद्यापीठातील सुजी होटा सांगतात, "मलदान करणाऱ्या व्यक्तींशी चांगले संबंध निर्माण करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं."

त्या सांगतात की, या प्रक्रियेत दात्यांशी विश्वासाचं नातं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या इच्छेचा आणि स्वातंत्र्याचाही आदर करावा लागतो.

उदाहरणार्थ, दात्यांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये काही छोटे-मोठे बदल झाले असतील, तर त्याची माहिती देण्यासही सांगितलं जातं.

उत्तम मलदान करणारे दाता

सुरुवातीच्या तपासण्या आणि चाचण्या करूनही दात्याच्या मलाची गुणवत्ता नेमकी कशी आहे, हे पूर्णपणे समजत नाही.

तपासणीत योग्य ठरलेल्या सर्व दात्यांच्या मलापासून क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल या जिवाणूमुळे वारंवार होणाऱ्या संसर्गावर यशस्वी उपचार होण्याची शक्यता जवळपास समानच असते.

परंतु, काही विशिष्ट आजारांमध्ये काही मोजक्या दात्यांच्या मलामुळे इतर दात्यांच्या मलाच्या तुलनेत रुग्णांना अधिक चांगला फायदा होतो. म्हणजेच, आजाराची लक्षणं कमी होण्याचं प्रमाण त्यांच्याबाबतीत जास्त असतं.

Caption- 'सुपर पूपर्स'च्या मलामध्ये आतड्यांतील जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं. तसेच, त्यात विविधप्रकारचे जिवाणूही मोठ्या संख्येने असतात.
फोटो कॅप्शन, 'सुपर पूपर्स'च्या मलामध्ये आतड्यांतील जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं. तसेच, त्यात विविधप्रकारचे जिवाणूही मोठ्या संख्येने असतात.

उदाहरणार्थ, 2015 मध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस या आजारावर मल प्रत्यारोपणाच्या उपचारांबाबत एक अभ्यास करण्यात आला. त्यात सहभागी झालेल्या 38 रुग्णांपैकी केवळ 9 जणांच्या आजाराची लक्षणं कमी झाली.

यापैकी 7 रुग्णांना एकाच दात्याचं मल देण्यात आलं होतं.

2017 मध्ये झालेल्या आणखी एका अभ्यासात मल प्रत्यारोपणासाठी 7 वेगवेगळ्या दात्यांचा मल एकत्र करून वापरण्यात आला.

ज्या रुग्णांना दिलेल्या मिश्रणात एका विशिष्ट दात्याचा मल होता, त्यांना इतर रुग्णांच्या तुलनेत जवळपास दुप्पट फायदा झाला. कारण इतर रुग्णांना दिलेल्या मिश्रणात त्या दात्याचा मल नव्हता.

परंतु, या मलाची गुणवत्ता इतकी चांगली असण्यामागचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मलदान करताना मलातील सर्व सूक्ष्मजीवांची (मायक्रोबायोमची) नियमितपणे तपासणी केली जात नाही.

परंतु, संशोधनातून असं दिसून आलं आहे की, 'सुपर पूपर्स'च्या मलामध्ये आतड्यांतील जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं. तसेच, त्यात विविध प्रकारचे जिवाणूही मोठ्या संख्येने असतात.

त्यांच्या मलामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाणारे काही जिवाणूही आढळून येतात. त्यापैकी एक म्हणजे फिकलीबॅक्टेरियम प्रॉस्निट्झी.

हा जिवाणू ब्यूटिरेट नावाचं फॅटी अॅसिड तयार करतो. त्याचे अनेक फायदे होतात. उदाहरणार्थ, शरीरातील सूज कमी करण्यास आणि आतड्यांच्या आतील आवरणाचं संरक्षण करण्यास ते मदत करतं.

तरीही, एखाद्या एका व्यक्तीचा मल सर्वच आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोगी किंवा प्रभावी ठरेल असं नाही.

फे यांच्या मते, क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल संसर्गावर उपचार करण्यासाठी योग्य ठरलेल्या दात्याच्या मलाचा इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा नैराश्याने ग्रस्त असलेल्या रुग्णाला कदाचित काहीच फायदा होणार नाही.

ते म्हणतात, "या मलामध्ये नेमकं असं काय आहे, ज्यामुळे तो इतका प्रभावी ठरतो, हे समजून घेण्याचा आम्ही अजूनही प्रयत्न करत आहोत."

मलापासून औषधाच्या गोळीपर्यंत

सर्वात प्रभावी मानल्या जाणाऱ्या 'सुपर पूपर्स'चा मल वापरला तरी मल प्रत्यारोपण ही पूर्णपणे अचूक आणि खात्रीशीर उपचारपद्धती ठरत नाही.

लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठाच्या सारा बेंतेर्किया म्हणतात, "मल प्रत्यारोपणाच्या उपचारांचे परिणाम काय असतील, याबाबतची अनिश्चितता ही माझी सर्वात मोठी चिंता आहे. या उपचारांमध्ये सूक्ष्मजीवांचा संपूर्ण समूह एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचवला जातो. त्यामुळे विविध गोष्टींचा विचार करावा लागतो."

वेगवेगळे दाता, मल तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि मल प्रत्यारोपण करून घेणारे रुग्ण यांमुळे त्यांच्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांमध्येही वेगवेगळे बदल होऊ शकतात.

Caption- मलदान करणाऱ्यांच्या मलापासून औषधाच्या गोळ्याही बनवल्या जातात.
फोटो कॅप्शन, Caption- मलदान करणाऱ्यांच्या मलापासून औषधाच्या गोळ्याही बनवल्या जातात.

परंतु क्रॉफर्ड यांच्या मते, भविष्यात मल प्रत्यारोपणाच्या मदतीने अधिक ठराविक आणि एकसारखी उपचारपद्धती विकसित करता येऊ शकते. त्यादृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

उदाहरणार्थ, फेरिंग फार्मास्युटिकल्स ही औषध कंपनी 'रेब्योटा' नावाचं एनिमा औषध तयार करते.

हे औषध अशा दात्यांच्या मलापासून तयार केलं जातं, ज्यांच्या आतड्यांमध्ये फायदेशीर जिवाणूंचं प्रमाण जास्त असतं.

त्याचप्रमाणे, सेरेस थेराप्युटिक्स ही कंपनी 'वॉस्ट' (VOWST) नावाच्या गोळ्या तयार करते. या गोळ्यांमध्ये काही विशिष्ट जिवाणूंचे बीजाणू असतात. हे बीजाणू मानवी मलापासून तयार केले जातात.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) या दोन्ही उत्पादनांना वारंवार होणाऱ्या सी. डिफिसाइलच्या संसर्गावर उपचार म्हणून वापरण्याची मंजुरी दिली आहे.

क्रॉफर्ड यांच्या मते, भविष्यात सी. डिफिसाइल संसर्गावर उपचार करण्यासाठी अशा गोळ्यांचा वापर वाढू शकतो. या गोळ्यांमध्ये चांगल्या दात्यांच्या मलातून निवडलेले सूक्ष्मजीव प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणात विकसित करून वापरले जातील.

ते म्हणतात, "मला वाटतं, मायक्रोबायोमवर आधारित उपचारपद्धती भविष्यातील वैद्यकीय उपचारांचा महत्त्वाचा भाग बनू शकते."

मायक्रोबायोमचा वापर करून उपचार करण्याच्या अनेक शक्यता असल्या, तरी क्रॉफर्ड यांना त्याच्या भविष्याची चिंताही वाटते. कारण आधुनिक जीवनशैलीचा आपल्या शरीरातील नैसर्गिक सूक्ष्मजीवांवर म्हणजेच मायक्रोबायोमवर मोठा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ, अतिप्रक्रिया केलेले (अल्ट्रा-प्रोसेस्ड) पदार्थ खाल्ल्यामुळे आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कमी होतात.

क्रॉफर्ड यांनी म्हटलं, "आपल्या पचनसंस्थेत असलेले अनेक सूक्ष्मजीव भविष्यात येणाऱ्या आजारांशी लढण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. पण त्यांचे फायदेच आपण गमावून बसू, अशी मला चिंता वाटते."

ते आतड्यांतील सूक्ष्मजीवांच्या उपचार करण्याच्या क्षमतेची तुलना उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींमधील उपयुक्त रासायनिक घटकांच्या विविधतेबरोबर करतात.

"आपल्या पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांचं जगही तितकंच मोठं आहे आणि ते आपल्याला अनेक प्रकारे मदत करू शकतं. पण, आपण अनेकदा त्याचं महत्त्व लक्षात घेत नाही म्हणजेच त्याकडे दुर्लक्ष करतो", असं त्यांनी सांगितलं.

(या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ सर्वसाधारण माहितीसाठी दिली आहे. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याला पर्याय मानली जाऊ नये.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)