शरद कपूर : एकेकाळी शाहरुखबरोबर झळकलेला अभिनेता सध्या यामुळं आहे आर्थिक अडचणीत

फोटो स्रोत, dreamzproductionhouse Instagram/the_sharadkapoor Instagram
- Author, यासीर उस्मान
- Role, वरिष्ठ चित्रपट पत्रकार, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
नव्वदच्या दशकातील काही अत्यंत लोकप्रिय चित्रपटांचा भाग असलेला अभिनेता शरद कपूर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळामुळे चर्चेत आहे.
अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हीडिओ समोर आला आहे. त्यामध्ये शरद कपूर अत्यंत अशक्त आणि व्यथित दिसत आहे. या व्हीडिओवरून कळतं की, तो आपल्या चार पाळीव कुत्र्यांना आपल्या मुलांप्रमाणे मानतो आणि आता त्याला काही काळासाठी त्यांना प्राणी निवारागृहात पाठवावं लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून, खासकरून हा व्हीडिओ समोर आल्यानंतर त्याच्या आर्थिक आणि मानसिक अडचणींबद्दल बरीच चर्चा सुरू आहे.
'दस्तक' आणि 'जोश' यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांमधून एके काळी आपली ओळख निर्माण केलेल्या तसेच चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याचा प्रवास कसा होता, आणि चित्रपटाच्या रुपेरी पडद्यापासून तो कशामुळे दूर गेला, हे आपण पाहणार आहोत.
'स्वाभिमान'च्या ग्रोव्हरपासून ते बॉलीवूडपर्यंत
अभिनेता शरद कपूर याच्याबद्दलची माझी पहिली आठवण ही 1991 सालच्या दूरदर्शनवरील 'स्वाभिमान' या मालिकेपासून आहे.
महेश भट्ट दिग्दर्शित हा शो त्याच्या काळातील एक ट्रेंडसेटर होता. या शोनं अशा अनेक अद्भुत चेहऱ्यांना व्यासपीठ दिलं होतं, ज्यांनी पुढे जाऊन मोठ्या आणि छोट्या पडद्यावर आपली छाप सोडली.
यात मनोज बाजपेयी, आशुतोष राणा, रोहित रॉय, हर्ष छाया आणि अर्थातच, 'ग्रोव्हर'च्या भूमिकेत तरुण शरद कपूर होता. त्यानं त्याच्या प्रखर आत्मविश्वासानं आणि दमदार आवाजानं प्रेक्षकांना खूप प्रभावित केलं.
कोलकात्यातील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या शरद कपूर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. पण, चित्रपटांबद्दलच्या प्रचंड आवडीनं त्याला मायानगरीमध्ये म्हणजेच मुंबईत खेचून आणलं.
पण त्याच्यासाठी हा मार्ग सोपा नव्हता. त्यानं अनेक वर्षे प्रसिद्ध दिग्दर्शक शशीलाल नायर आणि सुनील सिकंद यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.
टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका आणि काही चित्रपटांमध्ये त्याला अभिनयाची संधी मिळाली, पण त्या लगेचच विस्मरणात गेल्या.
या सगळ्या स्ट्रगलमुळे भयभीत होऊन तो कोलकात्याला परत गेला होता. पण, नंतर 1994 मध्ये काहीतरी करून दाखवण्याच्या निर्धारानं तो पुन्हा मुंबईला परत आला. या वेळी मात्र त्याच्या नशिबानं वेगळंच वळण घेतलं.

फोटो स्रोत, dreamzproductionhouse Instagram
बॉलीवूडमध्ये मोठी संधी
End of podcast promotion
'स्वाभिमान'च्या माध्यमातून त्याला पडद्यावर आणणाऱ्या महेश भट्ट यांनी कदाचित शरद कपूरमधील सुप्त प्रतिभा ओळखली असावी.
त्यांनी शरद कपूरवर लावलेला दावा अत्यंत योग्य ठरला, आणि तिथूनच त्याचं नशीब फळफळलं.
'दस्तक' (1996) हाच तो चित्रपट होता. या चित्रपटाची घोषणा होताच तो चर्चेचा विषय ठरला. कारण, या चित्रपटातून 1994 सालची 'मिस युनिव्हर्स' अर्थात सुष्मिता सेन पदार्पण करत होती.
मोठ्या स्टार्सना घेण्याऐवजी, मुकुल देव यांना नायकाच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं तर शरद कपूर यांना एका विक्षिप्त मनोरुग्ण अशा प्रकारच्या खलनायकी भूमिकेसाठी निवडण्यात आलं.
या चित्रपटात सुष्मितानं 'मिस युनिव्हर्स'ची भूमिका साकारली होती. तिच्याबद्दल शरदच्या खलनायकी पात्राला वेड लागण्याइतकं आकर्षण निर्माण होतं. चित्रपटाचं संगीत प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झालं होतं.
विशेषतः शरद कपूरवर चित्रित केलेलं 'जादू भरी आँखों वाली सुनो' हे गाणं आणि 'तुम्हें कैसे में बताऊं' हे गाणं चार्टबस्टर ठरलं होतं.
पण, प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. अनेक प्रेक्षकांना तो यश चोप्रा यांच्या 'डर' चित्रपटाची एक अत्यंत कमकुवत अशी नक्कल वाटला.
शरद कपूरच्या भूमिकेची थेट तुलना 'डर' (1993) मधील शाहरुख खानच्या भूमिकेशी करण्यात आली होती. असं असूनही, चित्रपटात शरद कपूरची भूमिका नायकाच्या भूमिकेपेक्षा खूपच सशक्त आणि अधिक प्रभावी ठरली होती.

फोटो स्रोत, the_sharadkapoor Instagram
चित्रपटाचं परीक्षण करताना, चित्रपट पत्रकार अनुपमा चोप्रा यांनी लिहिलंय की, "नकारात्मक पण अधिक रंजक आणि आव्हानात्मक भूमिकेत शरद कपूरनं बाजी मारली आहे. त्याचं पात्र एका बाजूला धोकादायक तर दुसऱ्या बाजूला संवेदनशील आहे. तो वेडेपणाने भारलेला आणि तरीही आकर्षक आहे. आतापर्यंत पडद्यावर दिसलेल्या सर्व 'बॅड बॉय' पात्रांपेक्षा वेगळं असं हे पात्र आहे. शरद कपूरनं आपल्या अभिनयानं एक नवीन ठसा उमटवला आहे."
असं असूनही, 'दस्तक'चा सर्वात मोठा फायदा एकट्या सुस्मिता सेनलाच झाला. कारण, या चित्रपटानंतर तिला मोठ्या बॅनर्सचे आणि मोठ्या स्टार्ससोबतचे अनेक चित्रपट मिळत गेले आणि तिची कारकीर्द यशस्वी ठरली.
या चित्रपटातील नायक मुकुल देव (ज्यांचं गेल्या वर्षी निधन झालं) आणि खलनायक शरद कपूर यांना मिळालेली मोठी संधी टिकवता आली नाही.
पहिल्या चित्रपटाच्या अपयशानंतर, मोठे चित्रपट निर्माते शरद कपूरसारख्या 'बाहेरच्या' कलाकारावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. तरीही, 'दस्तक'ने त्याच्यासाठी नक्कीच काही संधींची दारे उघडली होती.
त्यानं अनेक चित्रपट साइन केले. जॅकी श्रॉफसोबतच्या 'विश्वविधाता' (1996) मधील ए. आर. रहमानचं संगीत हिट ठरलं, पण चित्रपट चालला नाही.
यानंतर, 'आँखों में तुम हो' (1997), ज्यामध्ये शरद कपूरने मुख्य भूमिका साकारली होती. 'इसकी टोपी उसके सर' (1998) आणि मधुर भांडारकरचा 'त्रिशक्ति' (1999) देखील एकापाठोपाठ एक अपयशी ठरले.
मोठी संधी मिळाली पण स्टारडम नाही
त्यानंतर असा एक चित्रपट आला, ज्याला शरदच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट म्हटलं तर वावगं ठरू नये.
मन्सूर खान यांच्या 'जोश' (2000) या चित्रपटात शाहरुख खाननं नायकाची आणि शरद कपूरनं खलनायकाची भूमिका साकारली होती.
तेव्हा आजच्यासारखं मीम्स आणि सोशल मीडियाचं युग नव्हतं. पण, शाहरुख आणि शरद यांच्यातील पडद्यावरील संघर्षाची बरीच चर्चा झाली होती.
त्या वेळी शाहरुख विरुद्ध शरद कपूर यांच्या पडद्यावरील स्पर्धेची बातमी खूप चर्चेत होती. शरदला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या.
शाहरुखसोबतची त्याचे सीनदेखील प्रभावी होते. पण, ह्या वेळीसुद्धा नशिबानं त्याची साथ दिली नाही.
खरं तर, 'जोश' प्रदर्शित होईपर्यंत बॉलीवूडमधील सर्वात मोठी चर्चा 'शाहरुख विरुद्ध शरद' ही नव्हती, तर 'शाहरुख विरुद्ध हृतिक रोशन' ही होती.
वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटानं यशाचे असे विक्रम रचले होते की हृतिक सर्वत्र दिसत होता.
दरम्यान, शाहरुखचा 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.

फोटो स्रोत, the_sharadkapoor Instagram
अचानक, शाहरुखच्या स्टारडमसाठी हृतिकला सर्वात मोठा स्पर्धक मानलं जाऊ लागलं. याच कारणामुळेही सर्वांच्या नजरा 'जोश'वर होत्या.
'जोश'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली, पण 'कहो ना प्यार है'च्या ऐतिहासिक यशापुढे तो फिका पडला.
फिल्म अवॉर्ड्समध्ये शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी आणि शरद कपूरला सर्वोत्कृष्ट खलनायकासाठी नामांकन मिळालं होतं. पण, ते वर्ष पूर्णपणे हृतिक रोशन आणि 'कहो ना प्यार है' यांच्या पदरात पडलं.
यानंतर शरद कपूरला कोणतीही मोठी आणि मुख्य भूमिका मिळाली नाही.
'दस्तक' आणि 'जोश'मध्ये आपली उपस्थिती दर्शविणाऱ्या या अभिनेत्याला 'क्योंकी मैं झूठ नहीं बोलता', 'हथियार', 'जानी दुश्मन', 'एलओसी कारगिल', 'लक्ष्य' आणि 'वॉन्टेड' सारख्या चित्रपटांमध्ये किरकोळ किंवा नकारात्मक भूमिकांचं काम मिळालं.
हळूहळू शरद कपूर पडद्यावरून आणि नंतर प्रेक्षकांच्या स्मृतीतून पुसट होऊ लागला.
2014 मध्ये सलमान खानच्या 'जय हो' या चित्रपटात 'दस्तक'मधील मुकुल देव आणि शरद कपूर ही जोडी दिसली होती. पण, त्या दोघांना पडद्यावर बिनमहत्त्वाच्या किंवा किरकोळ भूमिकांमध्ये पाहणं दुःखदायक होतं.
वाद आणि लैंगिक छळाच्या आरोपांचा काळ
नोव्हेंबर 2024 मध्ये, एका 32 वर्षीय महिलेनं शरद कपूरवर विनयभंग आणि लैंगिक छळाचा आरोप करत मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
त्यावेळी शरद कपूर यांनी या प्रकरणी कोणतंही निवेदन दिलं नाही.

फोटो स्रोत, the_sharadkapoor Instagram
या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. पण, अलीकडेच शरद कपूर म्हणाले की, जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण आरोप करतो, तेव्हा साहजिकच दुःख होतं.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एका महिलेला घरी बोलावून तिचं शोषण केल्याप्रकरणी शरद कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद कपूरनं असाही दावा केला आहे की, या घटनेनंतर तो नैराश्यात गेला होता.
आर्थिक परिस्थितीबद्दल चर्चा
मुंबई मिररमधील एका वृत्तानुसार, शरद कपूरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
या वृत्तानुसार, 2019 मध्ये खार येथील आपला फ्लॅट विकल्यानंतर त्यानं लखनौमधील जमिनीच्या व्यवहारांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. परंतु, तो फसवणुकीला बळी पडला.
असंही म्हटलं जात आहे की, आर्थिक अडचणींमुळे शरदने आपल्या गाड्याही विकल्या आहेत.

फोटो स्रोत, the_sharadkapoor Instagram
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शरद कपूर म्हणाले की, "मी माझ्या गाड्या विकल्या कारण मला त्यांची आता गरज नव्हती."
त्याच मुलाखतीत तो म्हणतो, "माझी आर्थिक परिस्थिती ठीक आहे. पण मला कामाची गरज आहे."
वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती
या चर्चांच्या दरम्यान, शरद कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांची उत्सुकताही वाढली आहे.
कोलकातामधील पंजाबी कुटुंबातून आलेला शरद कपूर हा कोयल बसू यांच्यासोबत नात्यात आहे. कोयल बसू या पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री असलेल्या ज्योती बसू यांच्या नात आहेत.
4 डिसेंबर 2006 रोजी मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत शरद म्हणाला होता की, "हे खरं आहे की, काल संध्याकाळी माझा कोयलसोबत साखरपुडा झाला. मी याला प्रेम आणि कौटुंबिक संमतीनं ठरलेलं नातं म्हणेन. मी कोयलला सहा महिन्यांपूर्वी कोलकात्यातील ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटलो होतो. तिथे ती काम करते. यानंतर लगेचच आमच्या कुटुंबांनी एकमेकांशी संपर्क साधला."
शरदनं आपलं आयुष्य नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, कोयल बसू सोबतच्या त्याच्या नात्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

फोटो स्रोत, the_sharadkapoor Instagram
शरद कपूरची मैत्रीण हेमा चौधरीनं शरद कपूरची सध्याची परिस्थिती जगासमोर आणली आणि त्याच्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना आपल्याजवळ ठेवलं आहे. तिनं एका पॉडकास्टमध्ये सांगितलंय की, शरद कपूर आणि कोयल बसू यांचा फक्त साखरपुडा झाला होता, लग्न कधीच झालेलं नव्हतं.
शरद कपूरच्या सद्यस्थितीबद्दल आणि नात्यांबद्दल कोयल बसूकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना शरद कपूरनं सांगितलं की, गेल्या महिन्यात त्यानं आणि त्याच्या 33 वर्षीय जोडीदारानं त्यांच्या बाळाचं स्वागत केलं आहे.
तो म्हणाला की, "आम्ही चार वर्षांपूर्वी भेटलो आणि ती गेल्या दोन वर्षांपासून माझ्यासोबत राहत आहे. तिनं मला खूप पाठिंबा दिला आहे आणि आमचं नातं खूप आनंदी व सुसंवादी आहे. माझ्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे. ते माझ्या आयुष्याला एक विशेष चकाकी आणतं."
सलमान, सोनू सूद आणि रोहित शेट्टी मदतीसाठी सरसावले
शरदच्या आवाहनाचा परिणाम झाला आणि चित्रपटसृष्टीकडून मदतीचा ओघ सुरू झाला. 'वॉन्टेड' आणि 'जय हो' मध्ये त्याच्यासोबत काम केलेल्या सलमान खानने आर्थिक मदत देऊ केली.
सोनू सूदनं त्याच्या वैद्यकीय उपचारांची जबाबदारी घेणार असल्याचं सांगितलं आणि त्याच्याशी वैयक्तिकरित्या संपर्कही साधला. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अहमद खान यांनीही फोन करून त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शरद कपूर यांनी असंही कळवलं आहे की, शाहरुख खाननंही त्याला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं आहे.

फोटो स्रोत, ANI
अनेक वर्षांची मेहनत, कौशल्य आणि अधूनमधून मिळणारी प्रसिद्धीसुद्धा नेहमीच चांगल्या काळाची हमी देत नाही, हे मनोरंजन विश्वातील एक कटू सत्य आहे.
मात्र, चित्रपटसृष्टीतील लोक ज्या प्रकारे शरद कपूरला मदत करण्यासाठी पुढे आले आहेत, त्यामुळे त्याच्या चित्रपट कारकिर्दीवर अजून पूर्ण पडदा पडलेला नाही, अशी एक आशा कायम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























