'माझे दोन पती' : भीषण अपघात झाल्यानंतर तिने पतीला घटस्फोट दिला; तिच्या दुसऱ्या लग्नानंतर तो बनला नव्या कुटुंबाचा भाग

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
क्रिस आर्मस्ट्राँग तिच्या विशीच्या अगदीच सुरुवातीच्या टप्प्यात होती.
तिचं लग्न होऊनही अवघी दोन वर्षे झाली होती. एके दिवशी तिचा फोन वाजला.
एका पोलीस अधिकाऱ्यानं तिला सांगितलं की, तिच्या पतीच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.
"हा माझ्यासाठी एक फारच विचित्र असा अनुभव होता. जसं एखाद्या चित्रपटांत पाहायला मिळतं. जेव्हा एखाद्याला असा फोन येतो आणि हा फोन त्या व्यक्तीचं आयुष्यच बदलून टाकतो."
क्रिस आर्मस्ट्राँगनं वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी ब्रँडनशी लग्न केलं होतं. तो उत्साही आणि प्रचंड स्फूर्ती असलेला शारीरिकदृष्ट्या सक्रिय असा तरुण होता. तो एक ब्रेकडान्सर आणि स्नोबोर्डपटू होता. सर्वांचं लक्ष वेधून घेईल, अशा पद्धतीनं प्रेम व्यक्त करण्यात आणि मनाला भावतील असे रोमँटिक हावभाव दाखवण्यात तो पटाईत होता.
पण त्या दोघांनी सुंदर भविष्यासाठी रचलेलं स्वप्न आणि आयुष्याची सगळी नियोजनं त्या एका फोन कॉलमुळे कोलमडून गेली.
रुग्णालयाकडे जात असताना, क्रिसनं तिच्या आईला विचारलं की, जर ब्रँडनचा मृत्यू झाला असेल तर ती काय करेल?
तिला माहीत नव्हतं की, ती त्याच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शवगृहात जात आहे, की त्याला जिवंत पाहण्यासाठी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर जात आहे.

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
'आशा दुधारी तलवार बनली'
ब्रँडनच्या मेंदूला गंभीर इजा झाली होती आणि तो कोमात होता.
अपघातानंतर दोन आठवड्यांनी जेव्हा त्यानं पहिल्यांदा डोळे उघडले, तेव्हा त्याच्या नजरेत प्रचंड अनभिज्ञता होती. जणू त्याला कशाचीच समज नव्हती.
"तो तुमच्याकडे बघत नसे," ख्रिस सांगते.
"तो फक्त डोळे उघडायचा आणि रात्री पुन्हा मिटून घ्यायचा. असं तो वारंवार करायचा, पण त्याव्यतिरिक्त तो दुसरी कोणतीही हालचाल करत नसे."
त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. एकदा त्यानं त्यांच्या लग्नाच्या फोटोतील ख्रिसकडे बोट दाखवलं. दुसऱ्या एका प्रसंगी त्यानं तिला 'आय लव्ह यू' असं म्हटलं.
"मी ऐकलेली ती सर्वात सुंदर गोष्ट होती."

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
End of podcast promotion
कधीकधी तिला त्याच्या जुन्या विनोदबुद्धीची झलक पाहायला मिळायची.
पण, या अपघातामुळे ब्रँडनला गंभीर स्वरूपाची बौद्धिक कमतरता निर्माण झाली होती. एखादी गोष्टी घडून अगदी काही मिनिटं उलटल्यानंतर देखील त्याला ती गोष्ट आठवण्यास त्रास व्हायचा. तो स्वतः जेवू शकत नव्हता, स्वतःचे कपडे घालू शकत नव्हता आणि चालूही शकत नव्हता.
त्याला आठवड्याचा कोणता दिवस आहे किंवा कोणता महिना सुरू आहे, हेदेखील माहीत नसायचं. कधीकधी तर आम्ही कुठे आहोत, हेही त्याला कळत नसे. त्यामुळे मला गोष्टी वारंवार, पुन्हा पुन्हा सांगाव्या लागायच्या.
सुरुवातीला काही आशा निर्माण झाली होती. तरीही, ब्रँडनची स्वतःहून व्हीलचेअर चालवण्याची, बोलण्याची आणि साध्या संभाषणांमधील आशय समजून घेण्याची क्षमता हळूहळू नष्ट होत गेली.
क्रिसला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. तिला जाणीव झाली की, तिची भूमिका आता पत्नीवरून पूर्णवेळ काळजी घेणाऱ्या व्यक्तीमध्ये बदलत गेली आहे.
त्यानं माझ्याकडे अशा नजरेनं पाहिलं, जसं एखादं लहान मूल आपल्या पालकांकडे पाहतं. तो कदाचित घाबरलेला असे किंवा त्याला काहीतरी हवं असे. आणि अचानक मला मी त्याची आई आहे, असंच वाटू लागलं.

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
ब्रँडन पुन्हा कधीही काम करू शकणार नाही, असं नमूद केलेलं आणि डॉक्टरांची स्वाक्षरी असलेले एक पत्र मिळाल्यामुळे, ही अवस्था आता कायमचीच झाली आहे, याची जाणीव तीव्रतेनं झाली.
पण क्रिस ठाम होती की ती ही परिस्थिती हाताळू शकेल, आणि तिनं त्याला घरी आणलं.
ब्रँडनची पूर्ण वेळ काळजी घेणं अत्यंत थकवणारं होतं. कधीकधी तर घराबाहेर पडण्यापूर्वीच तिला त्याचे कपडे अनेकदा बदलावे लागत असत. तिचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणी चिंतेनं हे सर्व पाहत होते. आणि एके रात्री तिची अवस्था अगदीच बिकट झाली.
मी अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे मी पूर्णपणे खचून गेले. मी खूप मद्यपान केलं, मला नशा चढली आणि मी एका बादलीत उलट्या करत होते. तेव्हा तिथे माझे मित्र होते. चर्चमधील माझे मित्र.
"मी विचारलं, 'जर मला हे नीट जमत नसेल, तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहाल का?'"
शेवटी, ब्रँडनला नर्सिंग होममध्ये ठेवण्यासाठी ती सहमत झाली.
पहिल्या दिवशी, कर्मचाऱ्यांनी त्याचं दुपारचं जेवण अनेक छोट्या डब्यांतून आणून दिलं. "त्याला हे खूप आवडलं; जणू तो विमानात बसला आहे असं त्याला वाटलं. त्याला असं वाटत होतं की, 'हे छोटे-छोटे डबे तर पाहा, किती गोंडस आहेत!'"
"आणि तो अगदी ठीक होता."
असा घटस्फोट ज्यानं 'काहीही बदललं नाही'
शेवटी, तिने ब्रँडनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्याच वेळी त्याची कायदेशीर पालक म्हणून राहण्याचा अधिकार मिळवण्यासाठी लढा देण्याचंही ठरवलं.
"मी फक्त त्याला हे खात्रीशीरपणे सांगितलं की, मी नेहमी इथंच असेन," ख्रिस सांगते.
"काहीही बदललं नाही. मी त्याला तितक्याच वेळा भेटले. मी त्याच्यासोबत तितकाच वेळ घालवला. माझं त्याच्यावरचं प्रेमही तितकंच होतं."

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
हे सोपं नव्हतं. घटस्फोट घेऊ इच्छिणारी स्त्री आपल्या आधीच्या पतीची कायदेशीर जबाबदारीही का स्वीकारू इच्छिते, हे समजून घेताना अनेक वकिलांची दमछाक होत होती.
पण क्रिसनं चिकाटी सोडली नाही. जवळजवळ वर्षभर, तिनं ब्रँडनची काळजी घेण्यामध्ये आपला सहभाग कायम ठेवला. भेटींना हजर राहिली आणि रोज त्याला भेटायला गेली, यातून तिनं हे दाखवून दिलं की घटस्फोटामुळे त्याच्याप्रती असलेली तिची बांधिलकी बदलणार नाही.
जेव्हा अखेर पालकत्वाच्या सुनावणीची वेळ आली, तेव्हा ब्रँडनच्या इतर कोणत्याही नातेवाईकानं तिच्या अर्जाला आव्हान दिलं नाही.
"मला आठवतंय, तेव्हा खूप मोठा दिलासा मिळाला होता," ती सांगते.
'मला वाटतं हे सुंदर आहे'
अनेक वर्षांत पहिल्यांदाच, क्रिसनं स्वतःला भविष्याची कल्पना करण्याची मुभा दिली. तिला नेहमीच कुटुंब आणि मुलं हवी होती आणि तिला एकटेपणा जाणवत होता.
तिनं एका ऑनलाइन डेटिंग ॲपवर आपली प्रोफाइल अपलोड केली आणि सुरुवातीपासूनच ब्रँडनबद्दल पूर्णपणे प्रामाणिक राहण्याचा निश्चय केला.

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
जेव्हा तिची जेम्सशी भेट झाली, तेव्हा तिनं त्याला सर्व काही सांगितलं. तिचा पहिला पती जिवंत आहे, त्याला मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे आणि ती अजूनही त्याची कायदेशीर पालक आहे.
घाबरण्याऐवजी, जेम्स भारावून गेला.
"तो म्हणाला, 'मला वाटतं, हे सुंदर आहे," क्रिसनं तिची आठवण सांगताना म्हटलं.
त्यांचे संबंध सुरू झाल्यानंतर काही काळाने, जेव्हा ती ब्रँडनला चर्चमध्ये घेऊन गेली तेव्हा जेम्स तिच्यासोबत आला. क्रिस थोड्या वेळासाठी बाजूला गेली आणि परत आली तेव्हा तिनं पाहिलं की जेम्स त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्या बाजूला बसला होता. ब्रँडन हसत बसला होता.

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
"मी अगदी सहज म्हणाले, 'मस्तच, मला वाटतं हे आता पूर्ण झालंय,'" ती हसून म्हणते.
कालांतरानं, जेम्सचं ब्रँडनसोबत स्वतःचं एक नातं निर्माण झालं. तो त्याला स्वतंत्रपणे भेटायला जाऊ लागला आणि त्याच्यासाठी त्याचे आवडते 'स्टारबक्स' ड्रींकही घेऊन जाऊ लागला.
क्रिस आणि जेम्स यांनी मिळून एक नवीन आयुष्य उभारलं आणि त्यांना दोन मुली झाल्या. तरीही ब्रँडन कुटुंबाचा एक भाग राहिला आहे आणि क्रिस गेल्या सुमारे 18 वर्षांपासून त्याची काळजी घेत आहे.
आमच्या कुटुंबात माझ्या मुली, माझा सावत्र मुलगा आणि ब्रँडन यांचा समावेश आहे. जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबाबद्दल बोलतो, तेव्हा ब्रँडन त्याचा एक भाग असतो.
मुलांना तो कोण आहे आणि काय घडलं होतं, हे अगदी नीट माहीत आहे. मुलं त्याला 'अंकल ब्रँडन' म्हणतात, त्याला नियमितपणे भेटायला जातात आणि कौटुंबिक उत्सवांमध्येही त्याला सामील करून घेतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका फोटो-सेशनमध्ये, तो किती सहजपणे या कुटुंबाचा एक भाग बनलेला आहे, हे दिसून आलं.

फोटो स्रोत, Courtesy of Kris Armstrong
जेव्हा क्रिसनं जेम्सला विचारलं की, ब्रँडनला वगळून प्रोफेशनल फॅमिली फोटो काढायचे आहेत का, तेव्हा त्याचं उत्तर त्वरित आलं.
"'नाही,' तो तिला म्हणाला. 'ब्रँडन आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे. तो सर्व फोटोंमध्ये असायला हवा.'"
(बीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी एमिली नैलर यांनी तयार केलेल्या 'लाइव्हज लेस ऑर्डिनरी: लव्ह स्टोरीज' या मालिकेतील 'माय टू हसबंड्स' या भागावर आधारित.)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























