'मी ब्लॅक आहे, हे कुटुंबाने मला का सांगितले नाही?'; एका क्षणाने संपूर्ण आयुष्यच बदलून गेलेल्या मुलीची गोष्ट

लेसीचे कुटुंब
फोटो कॅप्शन, लॅसी तेझिनोसाठी ही गोष्ट अंगावर आभाळ कोसळण्यासारखी होती.
    • Author, ग्लोबल जर्नालिझम
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"तुला माहीत आहे ना की तू ब्लॅक आहेस?"

ज्या मुलीने हा प्रश्न विचारला तिला सुरुवातीला वाटलं की, ही फक्त एक मस्करी आहे. तिला हे अगदीच स्वाभाविक वाटलं की, लॅसीला स्वतःबद्दल हे माहीत असणारच. कारण तिला पाहता क्षणीच कोणालाही सहज कळण्यासारखं होतं की, ती कृष्णवर्णीय (ब्लॅक) आहे.

"तुझे ओठ बघ, तुझे केस बघ. तू ब्लॅक आहेस. तुझ्या आई-वडिलांपैकी कोणीतरी एक ब्लॅक आहे. कोण आहे ते?" त्या मुलीने आग्रहाने विचारलं.

पण लॅसी तेझिनोसाठी ही गोष्ट अंगावर आभाळ कोसळण्यासारखी होती.

तिला आजवर याचा पुसटसा अंदाजही नव्हता की ती ब्लॅक आहे. तिचं बालपण गेलं होतं टेक्सासमधल्या 'विडोर' नावाच्या शहरात. एक असं शहर आपल्या कट्टर वर्णद्वेषी इतिहासासाठी ओळखलं जायचं.

भविष्याची स्वप्ने पाहत, भूतकाळाचा विचार न करता युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल ठेवलेल्या एका निरागस तरुणीसाठी हा संपूर्ण आयुष्यच कायमचं बदलून टाकणारा निर्णायक क्षण होता.

एका प्रश्नाने बदलले संपूर्ण आयुष्य

लॅसीने कधीच तिच्या आईला पाहिलं नव्हतं. घरच्यांकडून तिला असं सांगण्यात आलं होतं की, तिची आई अमली पदार्थांचं सेवन करायची आणि लॅसी लहान असतानाच एड्ससारख्या कोणत्यातरी आजाराने तिचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी असंही सांगितलं होतं की, तिची आई हवाई या अमेरिकेतील बेटावरची होती. त्यामुळेच लॅसी तिच्या चुलत भावंडांपेक्षा वेगळी का दिसते याचं कारणही तिला स्पष्ट झालं होतं.

"जेव्हाही मी माझ्या आईचं चित्र काढायचे तेव्हा तिच्या केसांमध्ये एक फूल नक्की काढायचे कारण हवाई या ठिकाणाबद्दल माझ्या मनात तशीच प्रतिमा होती."

लॅसीचे वडील रॉनी यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतर ती लहान असतानाच ते तिला ह्यूस्टनहून विडोरला घेऊन आले होते, जेणेकरून तिला तिच्या आजी-आजोबांसोबत राहता येईल. लॅसी 6 वर्षांची असताना रॉनी यांचं निधन झालं.

लॅसीकडे तिचे वडील रॉनी यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांच्या गोड आठवणी आहेत.
फोटो कॅप्शन, लॅसीकडे तिचे वडील रॉनी यांच्यासोबत घालवलेल्या दिवसांच्या गोड आठवणी आहेत.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आई-वडिलांचे छत्र हरपूनही आणि 'वर्णद्वेषासाठी कुप्रसिद्ध' असलेल्या शहरात वाढूनही आपल्या श्वेतवर्णीय कुटुंबाने आपल्याला आपलेसे केले आहे, अशीच लॅसीची भावना होती. तिला आपल्या चुलत भावंडांसोबत खेळण्यात खूप आनंद मिळायचा.

"मी एका घरातून दुसऱ्या घरात बागडत राहायचे. प्रत्येकाला माझ्यासोबत खेळायचे असायचे. मला खूप भेटवस्तू मिळायच्या आणि सगळे माझे खूप कौतुक आणि लाड करायचे. तरीही मनात कुठेतरी एक प्रकारची अस्वस्थता नेहमीच जाणवत राहायची."

लॅसी 17 वर्षांची असताना 'एक उंच, धिप्पाड आणि टक्कल असलेला कृष्णवर्णीय रंगाचा माणूस' तिच्या घराच्या दाराशी आला होता आणि त्याने दावा केला की, लॅसीची आई अजूनही जिवंत आहे.

लॅसीच्या आजी-आजोबांनी तिला सांगितलं की, तो माणूस खोटं बोलतोय. या घटनेमुळे लॅसी खूप दुःखी झाली आणि खूप गोंधळात पडली. असं असूनही तिने ती गोष्ट आपल्या मनातून काढून टाकली.

पण जेव्हा ती आपल्या ग्रामीण बोलीभाषेसह ह्यूस्टनमधील विद्यापीठात पोहोचली, तेव्हा स्वतःच्या ओळखीबद्दलची तिची समज पूर्णपणे बदलून गेली. तिच्यासोबत खोलीत राहणाऱ्या 3 आफ्रिकन-अमेरिकन तरुणी तिची ही गोष्ट मानायला अजिबात तयार नव्हत्या की तिचे वडील गोरे होते आणि आई हवाई बेटावरची होती.

लॅसी सांगते, "मी या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे हे कळल्यावर त्या तिन्ही मुलींना राग तर आलाच, पण त्यासोबतच त्या खूप दुःखीही झाल्या. नक्की काय घडलंय याचा शोध घेण्यासाठी मला मदत करणं, हेच जणू त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं."

कॉलेजच्या दिवसांपासून लॅसी तिच्या या मित्रमंडळींच्या सतत संपर्कात राहिली आहे.
फोटो कॅप्शन, कॉलेजच्या दिवसांपासून लॅसी तिच्या या मित्रमंडळींच्या सतत संपर्कात राहिली आहे.

लॅसी सुट्ट्यांमध्ये घरी आली तेव्हा तिला काहीतरी बदलल्यासारखं जाणवलं. तेव्हापासूनच तिला आपल्या आजूबाजूला असलेला वर्णद्वेष दिसू लागला.

तिने घरच्यांना विचारलं की, त्यांनी तिला तिच्या खऱ्या ओळखीबद्दल कधीच का सांगितलं नाही. तेव्हा ते म्हणाले, "तू तर आमच्याच कुटुंबातली आहेस. आम्ही तुला कधीच वेगळं मानलं नाही."

तिला हेदेखील कळले की, कित्येकदा तर तिच्या चुलत भावंडांनी तिच्याबद्दल वर्णद्वेषी अपशब्द वापरणाऱ्या लोकांशी भांडणेही केली होती.

आता लॅसीला वाटते की, तिला त्रास होऊ नये आणि ती सुरक्षित राहावी, याच विचाराने आजी-आजोबांनी तिच्यापासून खरे काय ते लपवले होते.

एके दिवशी बोलता-बोलता आजी लॅसीला म्हणाली की, जर तिला एखाद्या ब्लॅक मुलाला आपला जोडीदार म्हणून घरी आणायचे असेल, तर त्याचे नक्कीच स्वागत आहे.

लॅसी सांगते, "आजी खरेतर खूप प्रेमाने वागण्याचा आणि तिचं मन खुलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत होती."

पण जेव्हा तिच्या आजोबांनी वर्तमानपत्र वाचताना वर्णद्वेषी अपशब्द वापरला तेव्हा लॅसीला खूप राग आला. तिने आजोबांना सुनावलं, "माझ्यासमोर तुम्ही अशा भाषेत बोलणार नाही."

इतकं बोलून लॅसी रडत-रडत खोलीबाहेर निघून गेली, तेव्हा आजोबा तिच्या मागे आले आणि त्यांनी तिची माफी मागितली.

"हे तेच आजोबा होते ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं होतं आणि आयुष्यभर माझी काळजी घेतली होती. ते म्हणाले, 'मला खरोखर माफ कर. असं पुन्हा कधीही होणार नाही.' त्यानंतर खरंच असं पुन्हा कधीही घडलं नाही."

आजी-आजोबांकडून संगोपन

लॅसी 6 वर्षांची असल्यापासून तिच्या आजी-आजोबांनीच तिला लहानाचे मोठे केले होते.

तिची आई या जगात नाही, असं तिला सांगितलं गेलं होतं. पण तरीही आपल्या आईविषयी अधिक जाणून घेण्याची तिची खूप इच्छा होती.

कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना नेमक्या मातृदिनाच्या दिवशी तिने टेलिफोन डिरेक्टरी सेवेला फोन केला आणि तिच्या आईच्या नावावर कोणाचा फोन नंबर नोंदवलेला आहे का, याची चौकशी केली.

कोणतीही पूर्वकल्पना न देता तिचा फोन थेट एका महिलेला जोडला गेला. लॅसीने त्या महिलेला विचारलं, "मी तुमची मुलगी असू शकते असं तुम्हाला वाटतं का?" त्यावर त्या महिलेने दिलेलं उत्तरच लॅसीच्या शंकेची खात्री पटवून देण्यासाठी पुरेसं होतं त्या महिलेने विचारलं, "लॅसी?"

ती महिला अवघ्या 1 तासाहून थोड्या अधिक अंतरावर राहत होती.

लेसीचा सांभाळ तिच्या आजी-आजोबांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून केला.
फोटो कॅप्शन, लेसीचा सांभाळ तिच्या आजी-आजोबांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून केला.

त्याच दिवशी जेव्हा लॅसी तिला भेटण्यासाठी पोहोचली, तेव्हा तिला दिसले की तिच्यासोबत तोच माणूस उभा आहे, जो काही वर्षांपूर्वी लॅसीच्या घरी आला होता. तो तिच्या आईचा जोडीदार होता.

पण लॅसीची नजर तर फक्त तिची आई एलिझाबेथवरच स्थिरावली होती.

"मी माझ्या उभ्या आयुष्यात तिच्याइतकी सुंदर व्यक्ती पाहिली नव्हती. आम्ही एकमेकींना 'हॅलो' सुद्धा म्हटले नाही, एक शब्दही बोललो नाही. फक्त एकमेकींच्या गळ्यात पडून मनसोक्त रडत राहिलो."

यानंतर झालेल्या गप्पांमधून लॅसीला कळले की, रॉनी हे खरेतर तिचे दत्तक वडील होते, तिचे खरे वडील नव्हते.

लेसी
फोटो कॅप्शन, लॅसीला तर आपण दत्तक आहोत, याची साधी कल्पनाही नव्हती.

रॉनी ह्युस्टनमध्ये एक गे बार चालवायचे. एलिझाबेथ तिथे ड्रिंक्स घेण्यासाठी यायची आणि त्यातूनच त्यांची ओळख झाली. एलिझाबेथने रॉनी यांना सांगितलं की, एका आफ्रिकन-अमेरिकन ट्रक ड्रायव्हरपासून ती गरोदर राहिली आहे आणि ती गर्भपात करणार आहे. तेव्हा रॉनी तिला म्हणाले की, त्यांना नेहमीपासूनच एक मूल दत्तक घ्यायचे होते.

यातूनच दोघांनी मिळून एक निर्णय घेतला की, रॉनी एलिझाबेथला नशा सोडवण्यात आणि दारूपासून दूर राहण्यात मदत करतील. तसेच तिची काळजी घेतील. त्यानंतर ते तिच्या बाळाला दत्तक घेतील.

लॅसीला तर आपण दत्तक आहोत, याची साधी कल्पनाही नव्हती.

लॅसी आणि एलिझाबेथ यांनी एकमेकींना जाणून घेण्यात आणि समजून घेण्यात अनेक वर्षे व्यतीत केली.
फोटो कॅप्शन, लॅसी आणि एलिझाबेथ यांनी एकमेकींना जाणून घेण्यात आणि समजून घेण्यात अनेक वर्षे व्यतीत केली.

पुढच्या काही वर्षांत लॅसीने हळूहळू आपल्या आईशी असलेले नाते पुन्हा घट्ट केले. पुढे एलिझाबेथ आजारी पडल्या आणि नऊ वर्षांनंतर कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळेबद्दल लॅसी सांगते की ती "शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या सोबत होती."

तोपर्यंत तिने आपल्या कुटुंबालाही मनापासून माफ केले होते. ती म्हणते, "आपण आपल्या आई-वडिलांप्रती कमालीचा समजूतदारपणा आणि क्षमाभाव बाळगायला हवा, कारण तेसुद्धा आपल्यासारखेच तरुण होते, जे जीवन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होते."

आता लॅसी व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर माय-लेकीच्या नात्यातील अडचणी दूर करण्यात लोकांना मदत करते, तसेच लोकांमधील मतभेद आणि दुरावा मिटवण्यासाठी काम करत आहे.

रंग आणि वंशाची विविधता जपणारा परिवार

लेसीचे कुटुंब, ज्यात वेगवेगळ्या वांशिक पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या पिढ्यांचे सदस्य आहेत.
फोटो कॅप्शन, लेसीच्या कुटुंबात वेगवेगळ्या वांशिक पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या पिढ्यांचे सदस्य आहेत.

ज्या आजीने एकेकाळी लॅसीला केवळ गोऱ्या लोकांचीच वस्ती असलेल्या भागात लहानाचं मोठं केलं होतं, त्याच आजीच्या घराचं वादळामुळे नुकसान झाल्यानंतर त्या ह्यूस्टनमध्ये लॅसीच्या ब्लॅक कुटुंबासोबत राहायला आल्या.

लॅसी सांगते की, सुरुवातीच्या काळात त्यांच्यात मतभेद आणि वाद व्हायचे, कारण त्या वेळी अमेरिकेत वंशभेदाच्या मुद्द्यावरून माध्यमांमध्ये "खूप काही सुरू होते."

आजीचे वय पाहता लॅसी त्यांच्या विचारांकडे थोडे दुर्लक्ष करायची. पण त्याच वेळी तिला आपल्या मुलांना हेही शिकवायचं होतं की, "आपल्याला आपल्या अस्तित्वाचा अभिमान आहे आणि आपण स्वतःसाठी ठामपणे उभे राहतो."

पण काही 'मोकळ्या आणि सुंदर गप्पांनंतर', वयाच्या 86 व्या वर्षी आजी तिच्या परिवाराचा एक अविभाज्य हिस्सा बनून गेल्या होत्या.

"माझी लेक सहा वर्षांची आहे आणि तिची सर्वात जवळची मैत्रीण माझी आजी आहे.. दोघी सोफ्यावर एकत्र बसतात, आईस्क्रीम खातात, घरामागच्या अंगणातील झाडांना पाणी घालतात."

"हे सगळे पाहणे खूपच सुंदर आहे."

हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'लाइव्हज लेस ऑर्डिनरी' पॉडकास्टमधील 'व्हाय डिडंट दे टेल मी आय वॉज ब्लॅक?' यावर आधारित आहे. हा कार्यक्रम रेकॉर्ड झाल्यानंतर, 2026 मध्ये लेसीच्या आजीचे निधन झाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)