जेन्सेन हुआंग यांची पुन्हा एनव्हिडियाच्या सीईओपदी नियुक्ती, संचालक मंडळानं काय म्हटलं?

फोटो स्रोत, Reuters
एनव्हिडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार संचालक मंडळाने एकमताने जेन्सेन हुआंग यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
संचालक मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले, "जेन्सेन हे एनव्हिडियाचे नेतृत्व करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत आणि त्यांची पुनर्नियुक्ती ही आमच्या भागधारक, कर्मचारी, भागीदार आणि ग्राहकांच्या सर्वोत्तम हिताची आहे, असा संचालक मंडळाचा विश्वास आहे."
एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने तत्काळ प्रभावाने जेन्सेन हुआंग यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.
'माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ', हुआंग यांनी जारी केले निवेदन
एनव्हिडियाच्या संकेतस्थळावरून जेन्सेन हुआंग यांचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे, "नव्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात जगातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एका कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी एनव्हिडियामध्ये परत येणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी ही जबाबदारी अत्यंत नम्रतेने आणि नव्या बांधिलकीसह स्वीकारत आहे."

फोटो स्रोत, AFP
"या प्रक्रियेदरम्यान दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि सखोल विचारांबद्दल मी एनव्हिडियाच्या संचालक मंडळाचे आभार मानतो. विशेषतः अध्यक्ष हार्वी जोन्स यांच्या नेतृत्वाबद्दल, या काळात एनव्हिडियाचे नेतृत्व करणाऱ्या कोलेट क्रेस आणि आमच्या कार्यकारी मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानतो."
"आमचे कर्मचारी, भागधारक, उद्योगक्षेत्रातील नेते आणि जगभरातील भागीदार यांनी दिलेल्या असामान्य पाठिंब्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी मी उत्सुक आहे", असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेन्सन हुआंग यांच्या एनव्हिडियामधील पुनरागमनाचे स्वागत केले आणि याला 'योग्य आणि रास्त निर्णय' म्हटले आहे.
'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प म्हणाले, "कंपनीचे यश आणि समृद्धी, तसेच अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी देशाला एनव्हिडियामध्ये जेन्सन यांच्या नेतृत्वाची गरज आहे."

फोटो स्रोत, Reuters
हुआंगच्या परतण्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होईल असे मानण्याचे अमेरिकन सरकारकडे कारण नाही, असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांनी हुआंग यांना 'देशभक्त आणि राष्ट्रीय संपत्ती' म्हटलं.
एनव्हिडियाने यापूर्वी हुआंग यांच्या पुनरागमनाची शक्यता फेटाळली होती
गेल्या आठवड्यात एनव्हिडियाने जेन्सेन हुआंग यांना पुन्हा पदावर आणण्याची शक्यता ठामपणे नाकारली होती.
हुआंग यांच्या नाट्यमय राजीनाम्यानंतरच्या कंपनीच्या पहिल्याच आर्थिक निकालांमध्ये अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी कोलेट क्रेस यांनी सांगितलं होतं की, कंपनीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते, "आम्ही हे सांभाळू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
हुआंग यांनी असे म्हटले होते की, एनव्हिडियामध्ये परत येऊन कंपनीचे नेतृत्व करणे हा त्यांच्यासाठी सन्मान असेल. कथित विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांनंतर त्यांनी पद सोडले होते. या आरोपांमध्ये चीनसाठी हेरगिरीचा संशय असलेल्या एका महिलेबरोबरच्या संबंधांचाही समावेश होता.
त्यावेळी एनव्हिडियाचे अध्यक्ष हार्वी जोन्स यांनी म्हटले होते, "त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करण्याचा संचालक मंडळाचा कोणताही विचार नाही."
नेमकं प्रकरण काय?
End of podcast promotion
जेन्सन हुआंग यांच्या अफेयर प्रकरणाने चीन आणि अमेरिकेसह जगभरात अक्षरश: खळबळ उडवली होती.
हुआंग यांचा एका संशयित चिनी महिला गुप्तहेराशी अफेयर असल्याचा आरोप करण्यात आला होता.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, चीनमधील बिझनेसवुमन असलेल्या ॲलिस हुआंग या चीनसाठी हेरगिरी करत होत्या, असं अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचं मत होतं.
अधिकाऱ्यांचं असंही मत होतं की, ॲलिस यांचे एनव्हीडियाचे सीईओ आणि सह-संस्थापक जेन्सन हुआंग यांच्याशी जवळचे संबंध होते.
यानंतर हुआंग यांनी पत्नीचा विश्वासघात केल्याचं कबूल करत आपल्या कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली होती.
एनव्हीडियानं या सगळ्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केल्याचं म्हटलं होतं. तसंच, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका पोहोचला आहे, असं आपल्याला वाटत नसल्याचं म्हटलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही एफबीआयदेखील या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगितलं होतं.
न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, अमेरिकन अधिकाऱ्यांना असं वाटतं होतं की, चीनच्या सर्वोच्च गुप्तचर संस्थेनं ॲलिस हुआंग यांना हेरगिरीसाठी भरती केलं होतं.
ॲलिस हुआंग यांचे जेन्सेन हुआंग यांच्याशी कोणत्याही प्रकारचे कौटुंबिक संबंध नाहीयेत.
त्यांनी मार्च ते नोव्हेंबर 2023 दरम्यान सिंगापूरमधील डेटा सेंटर कंपनी असलेल्या 'मेगास्पीड'मध्ये एका वरिष्ठ पदावर काम केलं होतं.
या कंपनीवर एनव्हीडियाच्या चिप्स चीनला पाठवण्यासाठी मदत केल्याचा संशय होता. मात्र, एनव्हीडियाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि हे आरोप खोटे असल्याचं सिद्ध झालं होतं.
चीनने हेरगिरीचे हे आरोप फेटाळून लावले होते.
"आम्ही यावर आधीच उत्तर दिलं आहे. चिनी गुप्तहेरांबद्दलचे हे आरोप पूर्णपणे निराधार, केवळ अटकळींवर आधारित आणि चीनला बदनाम करण्याच्या उद्देशानं करण्यात आलेले आहेत," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी एका नियमित पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























