बाळ मेलं समजून आईनं आशा सोडली, त्याच मुलानं 42 वर्षांनी ई-मेल कसा केला? वाचा

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
- Author, आउटलुक प्रोग्राम, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
डिसेंबर 2018 मधली ती एक उष्ण रात्र होती. 63 वर्षीय डायने शीहान ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधल्या आपल्या घरी परतल्या होत्या. त्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जेवायला गेल्या होत्या. घरी आल्यानंतर त्या सोफ्यावर बसल्या होत्या, इतक्यात त्यांच्या फोनवर एक ई-मेल आला.
हा ई-मेल एका अनोळखी व्यक्तीनं पाठवला होता. त्याने त्याच्या जन्माचं वर्ष आणि ज्या रुग्णालयात त्याचा जन्म झाला, त्या रुग्णालयाचं नावही सांगितलं होतं. त्यानंतर त्यानं असं काही लिहिलं, ज्यामुळे डायने यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यानं लिहिलं होतं की, 'तुम्ही माझ्या आई आहात, असं मला वाटतं.'
डायने यांनी बीबीसीच्या 'आउटलुक' या कार्यक्रमात सांगितलं, "ते वाचून माझं डोकंच सुन्न झालं होतं. मला काय करावं हेच समजत नव्हतं. मला धड श्वासही घेता येत नव्हता. अनेक तास माझी अशीच अवस्था होती. आपण स्वतःपासून दूर गेलो आहोत, असं मला वाटत होतं."
ई-मेलमध्ये दिलेली सर्व माहिती खरी होती. 1976 मध्ये डायने यांनी त्याच तारखेला आणि त्याच रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला होता. परंतु, जन्मानंतर त्यांचं बाळ दगावल्याचं त्यांना त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांना हेच सांगितलं होतं.
'लैंगिक शिक्षणाची माहिती नव्हती'
डायने यांचा जन्म 1950 च्या दशकात न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे झाला. त्यांचं संगोपन एका कॅथलिक कुटुंबात झालं. त्यांचं शालेय शिक्षण नन्सकडून चालवल्या जाणाऱ्या शाळेत झालं होतं.
डायने सांगतात की, शाळेत त्यांना लैंगिक शिक्षण दिलं जात नव्हतं. त्यांना केवळ मुलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जायचा.
त्या सांगतात, "आम्हाला केवळ इतकंच सांगितलं जायचं की, बसमध्ये मुलांच्या शेजारी बसू नका, नाहीतर तुम्ही गरोदर राहाल."
लैंगिक संबंध आणि गर्भधारणा टाळण्याच्या उपायांची योग्य माहिती नसल्यामुळे, गर्भनिरोधक साधनांचा वापर करायला हवा, असा विचारही डायने यांच्या मनात कधी आला नाही.

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
कॅनडामध्ये आया म्हणून काम करत असताना त्यांची रिक नावाच्या एका तरुण घोडेस्वाराशी ओळख झाली. दोघांनाही घोड्यांची आवड होती. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट झाली आणि दोघे एकमेकांच्या जवळ आले.
डायने सांगतात, "तो माझं पहिलं प्रेम होतं. तो माझी खूप काळजी घ्यायचा आणि स्वभावाने खूप प्रेमळ, दयाळू होता. आमच्या आवडीनिवडीही सारख्याच होत्या. त्याला घोड्यांबद्दल चांगली माहिती होती, तो उत्तम घोडेस्वारही होता."
दोघांची पहिली भेट 'मॅकडोनाल्ड्स'मध्ये झाली होती.
डायने सांगतात, "आम्ही तिथे बर्गर आणि फ्रेंच फ्राईज खाल्ले. यापूर्वी मी असं ठिकाण कधीच पाहिलं नव्हतं. रिक खूप आत्मविश्वास असलेला आणि जगाची चांगली समज असलेला माणूस होता. मी तर त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेले होते."
काही दिवसांनी रिक कॅलिफोर्नियाला गेला. डायने त्याला भेटण्यासाठी तिथे गेल्या. परंतु, कॅनडाला परतण्यासाठी त्यांची विमानाची वेळ चुकली. त्यामुळे त्यांना लगेचच नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
नोकरी गेल्यामुळे कॅनडामध्ये राहण्याची परवानगीही त्यांना गमवावी लागली. त्यामुळे त्यांना कॅनडा सोडावं लागलं आणि त्या ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाल्या.
तोपर्यंत डायने गरोदर राहिल्या होत्या, मात्र त्यांना याची कल्पनाही नव्हती.
'गरोदर असल्याचं कळताच घाबरल्या'
त्या काळात मोबाईल फोन किंवा सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळे डायने आणि रिक यांचा एकमेकांशी संपर्क तुटला.
डायने यांना सिडनीतील एका घोड्यांच्या फार्मवर काम मिळालं. हा फार्म एक डॉक्टर आणि त्यांची पत्नी चालवत होते. या दोघांचे विचारही डायने यांच्या आई-वडिलांप्रमाणेच पारंपरिक आणि कॅथलिक धर्मासारखेच होते.
डायने यांना आपण गरोदर असल्याचं पहिल्यांदा कळलं, तेव्हा त्या खूप घाबरल्या.
त्या सांगतात, "मला स्वतःलाच ही गोष्ट मान्य होत नव्हती. मला याबद्दल बोलताही येत नव्हतं."
ही गोष्ट स्वीकारायला त्यांना जवळपास 6 महिने लागले. या काळात त्यांनी आपण गरोदर असल्याची बातमी सर्वांपासून लपवून ठेवली.
आपण गरोदर असल्याचं कोणाला कळू नये, म्हणून त्या सैल कपडे घालायच्या.
त्या सांगतात, "मी खूप बारीक म्हणजे सडपातळ होते. फार्मवर काम करत असल्यामुळे तिथे कामाचे सैल कपडे घालायचे. त्यामुळे मला माझं पोट सहज लपवता येत होतं."
डायनेंच्या मते, त्या काळात समाजाचे नियम खूप कडक होते. लोकांची विचारसरणीही खूप जुन्या आणि पारंपरिक पद्धतीची होती.
त्या सांगतात, "तो काळ खूप कठीण होता. अविवाहित महिलेनं आई होणं ही त्या काळात खूप मोठी गोष्ट मानली जायची. अशा महिलांकडे लोक वाईट नजरेनं पाहायचे. त्यांना समाजापासून जवळजवळ दूर ठेवलं जायचं."
प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी एकट्यानंच त्या सहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना उलट्या होऊ लागल्यानं रुग्णालयात नेण्यात आलं.
'बाळाला जन्म दिला, पण जवळही घेऊ दिलं नाही'
रुग्णालयात बाळाला जन्म देण्याचा अनुभव डायने यांच्यासाठी खूप वेदनादायक होता.
त्या सांगतात, "मला आठवतंय, तिथे कोणीही माझ्याशी व्यवस्थित बोलत नव्हतं. माझं बाळ माझ्यापासून दूर नेल्यानंतर मला एका टेबलवर तसंच विवस्त्र अवस्थेत सोडून दिलं. माझ्या शरीरातून रक्त वाहत होतं, हे मला आठवतंय. मला प्रचंड थंडी वाजत होती."
त्यांना आपल्या बाळाला जवळ घेऊ दिलं नाही. इतकंच नाही, तर जन्मलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी, हेही त्यांना सांगितलं गेलं नाही.
यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं बाळ दगावल्याचं त्यांना सांगितलं.

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
डायने यांनी पुढची अनेक दशकं या घटनेबद्दल कोणालाही काहीही सांगितलं नाही. त्यांनी रिकला किंवा आपल्या आई-वडिलांनाही याबद्दल सांगितलं नाही. इतकंच नाही, तर अनेक वर्षांनी ज्यांच्याशी त्यांनी लग्न केलं, त्यांनाही ही गोष्ट सांगितली नाही. लग्नानंतर त्यांना 2 मुलं झाली, परंतु त्यांच्यापासूनही त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवली.
डायने सांगतात, "कदाचित हा प्रसंग विसरून आयुष्यात पुढे जायचं, असं मला वाटत होतं. त्याबद्दल विचार करून काहीच उपयोग नाही, असं मी स्वतःला समजावत होते. आता त्याबद्दल बोलून काय फायदा, असाही विचार मनात यायचा. तोपर्यंत मी मनातून खूप खचून गेले होते."
त्यांनी स्वतःला काम आणि शिक्षणात गुंतवून घेतलं. त्या पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करत होत्या.
त्या सांगतात, "माझ्याकडे एक काम असेल, तर मी आणखी 2-3 कामं स्वतःहून घ्यायचे. स्वतःला इतकं थकवायचे की, रात्री अंथरुणावर पडताच झोप लागावी. मला त्या घटनेचा विचार करायचा नव्हता. त्यामुळे शक्य तितकं स्वतःला कामात गुंतवून ठेवायचे."
ऑस्ट्रेलिया सरकारने मागितली माफी
परंतु, 42 वर्षांनंतर आलेल्या एका ई-मेलमुळे त्यांना पुन्हा एकदा भूतकाळातील त्या कटू आठवणींना सामोरं जावं लागलं.
ई-मेल पाठवणारा दुसरा कोणी नसून त्यांचाच मुलगा होता. ज्या मुलाचा मृत्यू झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं, तो प्रत्यक्षात जिवंत होता. त्याला दुसऱ्याच एका कुटुंबानं दत्तक घेतलं होतं. पण, त्यांच्या मुलाला आपली ओळख सार्वजनिक करायची नाही.
नंतर डायने यांना समजलं की, 1950 ते 1970 या काळात ऑस्ट्रेलियातील हजारो महिलांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. डायनेही त्यापैकीच एक होत्या.
त्यावेळी कॅथलिक चर्च आणि इतर संस्था लग्न न झालेल्या महिलांवर मुलांना दुसऱ्या कुटुंबाकडे दत्तक देण्यासाठी दबाव टाकत असत. यासाठी त्यांचा मानसिक छळही केला जायचा. बाळाचा जन्म होताच आई आणि बाळाला एकमेकांपासून दूर केलं जायचं. काही प्रकरणांमध्ये मुलांना दत्तक देताना नियमही पाळले गेले नव्हते.

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
2013 मध्ये ऑस्ट्रेलिया सरकारने अधिकृतपणे मान्य केलं की, या धोरणांमुळे हजारो कुटुंबांचं नुकसान झालं होतं. याबद्दल सरकारने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफीही मागितली होती.
डायने यांच्या मुलानं ई-मेलमध्ये लिहिलं की, त्यांना डायने यांच्याकडून काहीही नकोय. त्याला फक्त आपल्या आईला भेटायचं होतं. भविष्यात दोघांमध्ये आई-मुलाचं नातं निर्माण होऊ शकतं का, हेही त्याला जाणून घ्यायचं होतं.
त्यानं सांगितलं की, त्याचं आयुष्य चांगलं राहिलं आहे. ज्या आई-वडिलांनी त्याला दत्तक घेतलं, त्यांनी त्याच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि त्याला जे जे हवं ते सर्व दिलं.
त्या ई-मेलमध्ये त्यानं आणखी एक गोष्ट सांगितली होती. त्याने लिहिलं होतं, "आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, तुम्ही आजीही झाला आहात."
त्यासोबत त्याने एका लहान मुलीचा फोटोही पाठवला होता. त्या मुलीचे केस कुरळे होते.
डायने सांगतात की, तो फोटो पाहताच ई-मेल पाठवणारा आपलाच मुलगा आहे, याची त्यांना खात्री पटली.
त्या सांगतात, "मी अडीच ते तीन वर्षांची असताना काढलेला माझा एक फोटो आहे. माझी नातही त्याच वयाची आहे. आम्हा दोघींचे चेहरे इतके सारखे दिसतात की, जणू आम्ही जुळ्या बहिणीच आहोत, असं वाटतं. हे सगळं पाहून माझं डोकंच गरगरू लागलं होतं."
42 वर्षांनंतर आई-मुलाची भेट झाली
इतकी वर्षं लपवून ठेवलेलं हे सत्य समोर आल्यावर आपल्या कुटुंबावर काय परिणाम होईल, याची डायने यांना भीती वाटत होती. परंतु, त्यांचे पती आणि मुलं त्यांच्या पाठीशी उभी राहिली. डायने यांनी आपल्या पहिल्या मुलाला भेटावं, असंच त्या सर्वांना वाटत होतं.
यानंतर डायने आपल्या मुलाला भेटण्यासाठी सिडनीला गेल्या. त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी विमानतळावर आला होता.
डायने सांगतात, "तो हातात पांढऱ्या फुलांचा छोटासा गुच्छ घेऊन उभा होता. त्याने मला मिठी मारली. मला त्यावेळी त्याला सोडावंसंच वाटत नव्हतं."
यानंतर ते मुलाच्या घरी गेले. तिथे डायने मुलाची पत्नी आणि त्याच्या मुलांना भेटल्या.
हळूहळू त्यांना हेही कळलं की, त्यांच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या आई-वडिलांनाही सत्य सांगण्यात आलं नव्हतं.

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
डायने सांगतात, "मुलाची आई त्याचा सांभाळ करू शकत नाही, असं त्यांना सांगण्यात आलं होतं. तिला हे बाळ एखाद्या धार्मिक कुटुंबाने दत्तक घ्यावं, अशी तिची इच्छा असल्याचंही सांगितलं होतं. तसंच, मुलाचं एक विशिष्ट नाव ठेवावं आणि त्याचे फोटो एका ठरलेल्या पत्त्यावर पाठवावेत, अशीही तिची इच्छा असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं."
नंतर डायने यांना कळलं की, त्यांच्या मुलाला दत्तक घेणाऱ्या आईने अनेक वर्षे त्यांना पत्रं लिहिली होती.
एकदा त्यांच्या नातवाच्या शाळेत एका कार्यक्रमाच्या वेळी दोघींची भेट झाली. त्यावेळी मुलाला दत्तक घेणाऱ्या आईनं डायने यांच्याकडे बोट दाखवलं आणि त्यांच्या मुलाकडे, सुनेकडे आणि नातवंडांकडे पाहिलं. त्यानंतर त्या म्हणाल्या, "मला हे सर्व दिल्याबद्दल तुमचे खूप आभार."
डायने यांच्यासाठी हा क्षण अत्यंत भावूक करणारा होता. त्या सांगतात की, त्यावेळी त्यांच्या मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या. हे असं सत्य होतं, जे त्यांना आयुष्यभर मनात ठेवून जगावं लागणार होतं.

फोटो स्रोत, Courtesy of Diane Sheehan
त्या सांगतात, "माझा मुलगा प्रेमाच्या नात्यातून जन्माला आला होता. आता जेव्हा मला सत्य कळलं आहे, तेव्हा माझं दुःख आणखी वाढलं आहे. पण ज्या लोकांनी माझ्या मुलाला दत्तक घेतलं, त्यांनी त्याला मोठं केलं, त्याला प्रेम दिलं. त्याच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. त्यांचं नातं खूप छान होतं. ते खूप चांगले आणि सरळ लोक होते."
आज डायने आपल्या मुलासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत नातं पुढे नेत आहे. या घटनेबद्दल मनात राग ठेवून जगायचं नाही, असं त्या सांगतात.
त्यांच्या मते, "जे काही घडलं ते मी आता बदलू शकत नाही. त्या काळात या घटनेशी संबंधित लोक, समाजाचे नियम आणि लोकांची विचार करण्याची पद्धत सर्वच वेगळं होतं. आता त्या जुन्या गोष्टींचा विचार करून राग आणि ऊर्जा वाया घालवायची नाही. उलट, 40 वर्षांहून अधिक काळ ज्या मुलाला आपण गमावलं आहे, असं मला वाटत होतं, त्याच्यासोबतचं नातं अधिक दृढ करायचं आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























