महाराष्ट्रातील भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

राजस्थानमध्ये भीषण अपघात
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत.

कोटा येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी एनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कोटा येथील शंभूपुरा परिसरात शनिवारी (21 नोव्हेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. यावेळी वाहनातून 16 जण प्रवास करत होते.

एएनआयच्या माहितीनुसार, हे सर्वजण खाटू श्याम यांचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात परतत होते, त्यावेळी अपघात घडला. या घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

"मृतांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांची प्रकृती सुधारावी, हे सुनिश्चित करण्याला आमचं प्राधान्य आहे", असं अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सांगितलं.

16 जणांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाची मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकशी धडक झाली.
फोटो कॅप्शन, 16 जणांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाची मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकशी धडक झाली.

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या अपघातासंदर्भात निवेदन जारी करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती बीबीसी हिंदीचे राजस्थानमधील सहयोगी वार्ताहर मोहर सिंग मीना यांनी दिली.

जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत आणि अपघातग्रस्त कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत पुरवावी, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचंही मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितलं.

राष्ट्रपतींनी व्यक्त केलं दु:ख

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "राजस्थानच्या कोटा येथे रस्ते अपघाताची घटना अत्यंत दु:खद आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना आहेत. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी मी प्रार्थना करते."

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच कुटुंबातील अनेक भाविकांचा कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH-52) शंभूपुरा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं गेहलोत भावना व्यक्त करताना म्हणाले.

त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो. तसेच अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

(बातमी सातत्यानं अपडेट होत आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)