जिऱ्याच्या या शीतपेयानं भारतात काय कमाल केली? कोला कंपन्यांंसमोर असं उभं केलं आव्हान

फोटो स्रोत, Chitral Khambhati/BBC
- Author, निखिल इनामदार
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
जिऱ्याची चव असलेली कार्बोनेटेड शीतपेयं भारतात कोला क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमोर मोठी स्पर्धा तयार करत आहेत. याची सुरुवात स्वयंपाकघरातील एका अचानक सुचलेल्या प्रयोगातून झाली होती.
पंजाबमधले सौरभ मुंजाल, निखिल डोडा आणि सौरभ भुटना हे तीन चुलत भाऊ एका रात्री जेवणानंतर घरी गप्पा मारत बसले होते. तेव्हा डोडानं स्वयंपाकघरातील नेहमीच्या साहित्याचा वापर करून आंबट-तिखट चवीचं आणि जीरं घातलेलं कार्बोनेटेड म्हणजे बुडबुडे येणारं पेय आणलं.
त्या पेयाची नैसर्गिक अशी तिखटसर चव त्यांना इतकी आवडली की ते व्यावसायिक स्तरावर विकण्याचा पर्याय त्यांनी तपासायला सुरुवात केली.
भारतामध्ये जिऱ्याची चव असलेली शीतपेयं यापूर्वीही रस्त्याकडच्या स्टॉलवर विकली जायची. मात्र त्याचा धंदा स्थानिक कंपन्यांमध्ये विखुरलेला होता.
या चवीभोवती कार्बोनेटेड पेयांचा मोठा ब्रँड उभारण्याचा प्रयत्न फारशा कंपन्यांनी केला नव्हता.
या तिघांनी आपल्या कुटुंबीयांना गुंतवणुकीसाठी तयार केलं आणि 2017 मध्ये 'लाहोरी झीरा' हा ब्रँड सुरू केला. 'झीरा' हा जिऱ्यावर बेतलेला शब्द आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुमारे दशकभरानंतर हे पेय भारतात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं आहे. विशेषतः 10 रुपये किमतीच्या महत्त्वाच्या जनसामान्यांच्या शीतपेय बाजारात ते जागतिक कोला कंपन्यांच्या दीर्घकाळच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे. यावर्षी कंपनीचं उत्पन्न 115 ते 120 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
विश्लेषकांच्या मते, या पेयाची लोकप्रियता भारतीय ग्राहकांच्या अशा चवींना वाढत्या पसंतीचं प्रतीक आहे. ही चव अस्सल भारतीय आहेच आणि तुलनेनं अधिक आरोग्यदायी मानली जाते.
गेल्या दशकात देशभरात जिऱ्याची चव असलेल्या अनेक सोडा ब्रँड्सची भर पडली आहे.
यामध्ये मुंबईस्थित झोटिक फ्रुजसचा 'जीरू', उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कॅम्पा कोलाचा 'कॅम्पा जीरा' आणि 'हाऊस ऑफ बिंदू'च्या 'फिझ जीरा मसाला'सह इतर प्रादेशिक कंपन्यांचे किमान अर्धा डझन प्रकार समाविष्ट आहेत.
'हाऊस ऑफ बिंदू'ने जवळपास 25 वर्षांपूर्वी जिऱ्याचा सोडा बाजारात आणला होता. मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याची विक्री स्थिर होती, असं कंपनीच्या संचालिका मेघा शंकर सांगतात.
त्या बीबीसीला म्हणाल्या, "आता कार्बोनेटेड पेयांच्या श्रेणीत हा सर्वाधिक वेगानं वाढणारा विभाग आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्या महसुलातील त्याचा वाटा 20% वरून 40% पर्यंत दुप्पट झाला आहे."
मागणी झपाट्यानं वाढल्यामुळे 'हाऊस ऑफ बिंदू'नं देशभरात आपलं जाळं विस्तारायला सुरुवात केली आहे. यापूर्वी दोन दशकांहून अधिक काळ कंपनीचा मुख्य भर दक्षिण भारतावर होता.
कोला कंपन्यांचा हिस्सा घटला
भारतातील सर्वात जुन्या ग्राहक ब्रँडपैकी एक असलेल्या 'पार्ले ॲग्रो'नेही 'ढिशूम' नावाचा स्वतःचा जिऱ्याचा सोडा गेल्या वर्षी देशभरात लाँच केला. त्याआधी 2012 पासून तो केवळ ग्रामीण बाजारात विकला जात होता.
दरम्यान, भारतातील एका ऑनलाइन वितरण कंपनीच्या अहवालानुसार, यावर्षीच्या उन्हाळ्यात या कार्बोनेटेड शीतपेयांच्या ऑनलाइन ऑर्डर्समध्ये 900% वाढ झाली.
जिऱ्याच्या चवीच्या पेयांबाबतची ही वाढती आवड भारतातील अल्कोहोलमुक्त पेयांच्या बाजारात मोठा बदल घडवत आहे. 2024 मध्ये या बाजाराची किंमत 32 अब्ज डॉलर इतकी होती आणि 2033 पर्यंत ती दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या कोटक म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, 'लाहोरी झीरा', 'कॅम्पा' आणि इतर लहान स्पर्धक, ज्यांना आता भारताचं "एथनिक बेव्हरेजेस मार्केट" म्हटलं जातं, यांनी मिळून भारताच्या कार्बोनेटेड शीतपेय बाजारातील आपला हिस्सा सप्टेंबरपर्यंत सुमारे 15% पर्यंत दुप्पट केला. त्याच काळात कोका-कोला आणि पेप्सीको यांचा एकत्रित बाजारहिस्सा सुमारे 93% वरून 85% वर आला.

फोटो स्रोत, NurPhoto via Getty Images
कोटकच्या अहवालात म्हटलंय की, "हे पेय उद्योगासाठीचं 'जिओ मोमेंट' आहे. जसं 2016 मध्ये रिलायन्सच्या मालकीच्या जिओच्या आगमनानंतर दूरसंचार क्षेत्रातील जुन्या कंपन्यांचा बाजारहिस्सा कमी झाला, तसंच पेय उद्योगातील स्थापित कंपन्यांचं विक्रीचं प्रमाण घटत आहे."
अहवालात पुढे म्हटलं आहे "सहसा मोठ्या कंपन्या इतका बाजारहिस्सा गमावत नाहीत. पण भारतात एका वर्षापेक्षा कमी कालावधीत कोला कंपन्यांचा हिस्सा 8% ने कमी झाला, त्यामुळे हा मोठा बदल मानला जात आहे."
'लाहोरी झीरा'चं उत्पादन करणाऱ्या आर्कियन फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ मुंजाल यांनी बीबीसीला सांगितलं, "आमची परिस्थिती नेहमीच अशी राहिली आहे की आमच्याकडील उत्पादन लगेच संपून जातं. गेल्या वर्षी आम्ही उत्पादन क्षमता दुप्पट करून दररोज 12 लाख बाटल्यांपर्यंत नेली, तरीही मागणी पूर्ण करू शकत नाही."
'अत्यंत आक्रमक स्पर्धा'
दशकानुदशकं कोला पेयांचं भारतात प्रबळ वर्चस्व राहिलं. या पेयांनी आधुनिक, आकर्षक जीवनशैलीचं प्रतीक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती.
जाहिरातींसाठी अब्जावधी रुपये खर्च करून, होर्डिंग्ज, बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी भारतात तहान भागवण्याची एक पाश्चिमात्य कल्पना लोकप्रिय केली, असं मुंजाल म्हणतात.
मात्र आता देशी ब्रँड्स स्मार्ट वितरण व्यवस्था, आकर्षक किंमत आणि जिरं, कच्ची कैरी, कोकम आणि चिंच यांसारख्या पारंपरिक भारतीय चवींच्या जोरावर त्यांना गंभीर आव्हान देत आहेत.
मुंजाल म्हणतात की, भारतातील ग्राहक उत्पादन क्षेत्रात भारतीय उत्पादनांचं पाश्चिमात्यीकरण किंवा पाश्चिमात्य उत्पादनांचं भारतीयीकरण करण्याची प्रवृत्ती दीर्घकाळ दिसून आली आहे. मात्र "अपना देसी ठंडा" हे घोषवाक्य वापरणाऱ्या 'लाहोरी झीरा'च्या माध्यमातून ते ही प्रवृत्ती बदलू इच्छितात.
शंकर सांगतात की, अधिक आरोग्यदायी आणि कोलाला पर्याय मानल्या जाणाऱ्या पेयांच्या वाढत्या बाजाराला लक्ष्य करण्यासाठी त्यांच्या ब्रँडने अलीकडेच जिऱ्याच्या सोड्याची साखरविरहित आवृत्तीही बाजारात आणली आहे.
मात्र या यशानंतरही या एथनिक पेय ब्रँड्ससाठी सध्याची वाढ कायम ठेवणं सोपं नसेल, असं विश्लेषकांचं मत आहे. ज्या घटकांमुळे त्यांची झपाट्यानं वाढ झाली, तेच घटक भविष्यात वाढीवर मर्यादा आणू शकतात.
मुंबईस्थित एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील प्राध्यापक आणि कौटुंबिक उद्योगांना बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करण्याबाबत सल्ला देणारे राजीव अग्रवाल बीबीसीला म्हणाले, "खरा प्रश्न असा आहे की जिऱ्याच्या चवीच्या पेयांचा बाजार किती मोठा होऊ शकतो. आणि माझ्या मते तो कोला पेयांच्या बाजाराएवढा मोठा होणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील जिऱ्याच्या चवीच्या कार्बोनेटेड पेयांच्या बाजारात विक्रीच्या बहुतांश प्रमाणाचा आधार असलेला 10 रुपये किंमतीचा बिंदू हा दुसरीकडे आव्हानही ठरू शकतो.
एका बाजूला या किंमतीमुळे विक्री वाढली असली, तरी जागतिक ऊर्जा धक्क्यानंतर वाढलेल्या प्लास्टिक, पॅकेजिंग, साखर आणि इतर कच्च्या मालाच्या किंमतींमुळे नफ्यावर दबाव येऊ शकतो. आधीच या व्यवसायातील नफा खूपच कमी आहे.
दुसरीकडे, किंमती वाढवल्यास विक्रीचं प्रमाण कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे कंपन्यांना बाटल्यांचा आकार आणखी लहान करावा लागू शकतो. काही वर्षांपूर्वी कोला कंपन्यांनीही असाच मार्ग स्वीकारला होता.
याशिवाय अधिक भांडवलशक्ती असलेल्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात प्रवेश करून स्पर्धा तीव्र करण्याची शक्यता कायम आहे.
अग्रवाल म्हणतात, "स्पर्धा अत्यंत आक्रमक आहे." तसेच जागतिक कंपन्या व्यवस्थापन व्यवस्था, प्रक्रिया, वितरण जाळं आणि बॉटलिंग व्यवस्थांमध्ये अधिक संघटित आहेत.
कोका-कोलानं 1990 च्या दशकात 'रिमझिम' हा जिऱ्याच्या चवीचा ब्रँड विकत घेतला होता. आता कंपनी या विभागात आपली उपस्थिती अधिक मजबूत करत असून, अहवालांनुसार तिने गेल्या वर्षी उत्पादन दुप्पट केलं आहे.
तरीही या आव्हानांमुळे देशी कंपन्यांच्या महत्त्वाकांक्षांवर परिणाम झालेला नाही.
मुंजाल म्हणतात, "भारतीय चवींना जागतिक स्तरावर ओळख मिळणं गरजेचं आहे." ते येत्या काही वर्षांत जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करत आहेत.
ते पुढं म्हणाले, "पिढ्यान्पिढ्या आपण जगातील विविध कोला पेयांचं सेवन करत आलो आहोत. पण मला आशा आहे की पुढील पिढ्या भारतातील जिऱ्याची पेयं पिताना दिसतील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























