वाढत्या प्रदूषणात घरात स्नेक प्लांट सारखी झाडं ठेवल्याने खरंच हवा शुद्ध होते का?
![[ photo caption - घरगुती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी घरात लावता येणारी रोपं काही प्रमाणात उपयुक्त ठरतात.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/53ed/live/79e72260-e593-11f1-9ccc-ff5a88abcfc6.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
- Author, अरमान आलम,
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या 'AQI.in' या प्लॅटफॉर्मनुसार 20 नोव्हेंबर रोजी जगातील टॉप 100 प्रदूषित शहरांच्या यादीत तब्बल 92 शहरं एकट्या भारतात आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये घरातील वायू प्रदूषणामुळे जगभरात जवळपास 29 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पाच वर्षांखालील तीन लाखांपेक्षा जास्त लहान मुलांचाही समावेश होता.
2 फेब्रुवारी 2026 ला केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने लोकसभेत सांगितलं की, देशातील बाह्य वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंची अंदाजित आकडेवारी 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल'कडे (NCDC) ठेवली जात नाही.
मात्र याच एनसीडीसीने सप्टेंबर 2022 मध्ये जारी केलेल्या एका हेल्थ ॲडव्हायझरीमध्ये 'आयसीएमआर'च्या (ICMR) हवाल्याने म्हटलं होतं की, 2019 मध्ये भारतात झालेल्या 17 लाख मृत्यूंना वायुप्रदूषण जबाबदार धरलं जाऊ शकतं.
या मृत्यूंमागे फुफ्फुसांचे आजार, हृदयविकार, स्ट्रोक आणि श्वसनाचे संसर्ग यांसारख्या आजारांचा समावेश होता.
![[ photo caption- घराच्या आत प्रदूषण कसं होतं? ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/ceba/live/887b6f20-e593-11f1-99b6-a35a62fa4264.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
दरवर्षी थंडी सुरू होण्याआधी उत्तर भारतातील हवा खूप खराब होऊ लागते. अशा वेळी लोक घराच्या आतील हवा शुद्ध ठेवण्यासाठी निरनिराळे उपाय करायला लागतात.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आणि एअर प्युरिफायर्सची मागणी वाढते. बऱ्याचदा तज्ज्ञ काही घरात लावता येणाऱ्या रोपांचं महत्त्वही सांगतात.
पण ही प्लांट्स म्हणजे रोपं घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी खरोखरच प्रभावी असतात का? याशिवाय घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर्स किती प्रभावी ठरतात?
या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आम्ही जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसचे प्रोफेसर उमेश चंद्र कुलश्रेष्ठ आणि प्रोफेसर अरुण कुमार श्रीवास्तव यांच्यासह आयआयटी दिल्लीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंगचे प्रोफेसर एमेरिटस मुकेश खरे यांच्याशी बातचीत केली.
सर्वात आधी समजून घेऊया की, घराच्या आत प्रदूषण नेमकं कसं होतं?
घराच्या आत प्रदूषण कसं होतं?
आपण दिवसाचा बहुतांश वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये घालवतो. अनेक कारणांमुळे या बंदिस्त जागांमध्येही प्रदूषण असतं.
प्रोफेसर अरुण कुमार श्रीवास्तव सांगतात की, पूर्वी घरांच्या भिंतींना चुन्याने रंगवलं जायचं, पण आता प्लॅस्टिक पेंट, डिस्टेंपर आणि चमकदार पेंट्सचा वापर वाढला आहे. या पेंट्सना चमक आणि इतर वैशिष्ट्ये देण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रकारची केमिकल्स मिसळली जातात.
भारतासारख्या उष्ण देशात जास्त तापमानामुळे या रंगांमधील काही केमिकल्स वाफेच्या स्वरूपात हवेत मिसळू शकतात आणि घरातील प्रदूषण वाढवू शकतात.
प्रोफेसर मुकेश खरे सांगतात, "आधुनिक फर्निचर, फ्लोअरिंग आणि इंटिरिअरसाठी वापरलं जाणारं साहित्यही इनडोअर एअर पॉल्यूशनचं कारण बनू शकतं. या वस्तू बनवताना आणि जोडताना वापरल्या जाणाऱ्या गममधून हवेत विरघळणारी रासायनिक संयुगे (व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाउंड्स) बाहेर पडतात. यातील काही घटक कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात."
"घरातील कुत्रे आणि मांजरांसारख्या पाळीव प्राण्यांचे केस आणि त्वचेचे बारीक कण सतत गळत राहतात. हे कण हवेत पसरून ॲलर्जीला कारणीभूत ठरू शकतात. इतकंच नाही, तर या कणांवर व्हायरस आणि बॅक्टेरिया देखील असू शकतात," असंही ते सांगतात.
प्रोफेसर उमेश चंद्र कुलश्रेष्ठ यांच्या मते, अगरबत्ती, धूप, कापूर जाळणं आणि मच्छर पळवणाऱ्या कॉइलचा वापर करणं यामुळेही घराच्या आतील हवा प्रदूषित होते.
घरात रोपं, एअर प्युरिफायर्स किती परिणामकारक?
प्रोफेसर खरे यांच्या मते, एअर प्युरिफायर्स आणि घरात लावता येणारी रोपं यांची काम करण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते.
एअर प्युरिफायर्स हवेत असलेले पार्टिक्युलेट मॅटर म्हणजेच पीएम 2.5 आणि पीएम 10 सारखे सूक्ष्म कण फिल्टर करतात. पण वायू स्वरूपातील प्रदूषक घटक हटवण्याची त्यांची क्षमता मर्यादित असते.
![[ photo कॅप्शन: एअर प्युरिफायर ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/b8cc/live/8edda680-e593-11f1-a094-5fdc692f3e33.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते एअर प्युरिफायर हा केवळ एक तात्पुरता उपाय आहे. त्यामुळे घरातील वायुप्रदूषणावर हा कायमस्वरूपी उपाय मानला जाऊ शकत नाही.
मात्र काही रोपं अशी असतात जी व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाउंड्स (VOCs) सारख्या हानिकारक वायूंना शोषून घेतात. अशी रोपं घराच्या आत लावता येतात, असं त्यांनी सांगितलं.
घरात लावण्यासारखी रोपं कोणती?
वायुप्रदूषण आणि घरातील हवेच्या गुणवत्तेवर संशोधन करणारे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर उमेश चंद्र कुलश्रेष्ठ यांनी घरामध्ये लावता येणाऱ्या अनेक रोपांची उदाहरणे दिली आहेत.
ही रोपं वातावरणातील काही विषारी आणि प्रदूषित वायू शोषून घेण्यास मदत करतात.
ज्या खोल्यांमध्ये बाहेरील हवा खेळती राहण्याचं प्रमाण खूप कमी असतं, तिथे ही रोपं तुलनेने अधिक चांगलं काम करू शकतात. याचं कारण म्हणजे खिडक्या उघड्या असल्यास बाहेरील हवेसोबतच प्रदूषणाचे कण आणि विषारी वायूही खोलीत शिरू शकतात.
घरात लावली जाणारी रोपं हवा नेमकी किती प्रमाणात स्वच्छ करू शकतात, या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, "ही रोपं स्वतःही काही प्रमाणात 'व्होलाटाइल ऑरगॅनिक कंपाउंड्स' बाहेर सोडतात. शिवाय तुम्ही आज रोप लावलं आणि ते लगेच हवा स्वच्छ करायला सुरुवात करेल, असंही होत नाही.
ही रोपं हवा 100 टक्के स्वच्छ करतात असं आपण म्हणू शकत नाही, पण हवेची गुणवत्ता सुधारण्यात त्यांचा काही प्रमाणात नक्कीच हातभार लागू शकतो."
या रोपांची वेगवेगळी वैशिष्ट्यं आहेत. यातील काही रोपं कमी उजेडातही सहजपणे दीर्घकाळ टिकून राहू शकतात, तर काही रोपांना खूपच कमी पाण्याची गरज असते.
![[ photo कॅप्शन: घरात लावल्या येणाऱ्या रोपांना खूप कमी पाण्याची गरज असते.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/3e25/live/a8b89ba0-e593-11f1-a094-5fdc692f3e33.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
स्नेक प्लांट: हे रोप बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि झायलीन यांसारखे प्रदूषक घटकांना फिल्टर करण्यास मदत करतं. हे रात्रीच्या वेळीही ऑक्सिजन सोडतं आणि कमी उजेडातही सहज वाढू शकतं. याला पाण्याची गरजही खूप कमी असते.
अरेका पाम: हे फॉर्मल्डिहाइड आणि टोल्यून यांसारख्या प्रदूषकांचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं. सोबतच, नैसर्गिक ह्युमिडिफायरप्रमाणे हवेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठीही हे उपयुक्त ठरतं.
पीस लिली: हे रोप अमोनिया, बेंझिन, फॉर्मल्डिहाइड आणि ट्रायक्लोरोएथिलीन यांसारखे प्रदूषक घटक शोषून घेण्यास मदत करतं. मात्र पाळीव प्राण्यांनी हे रोप खाल्ल्यास त्यांच्यासाठी ते विषारी ठरू शकतं.
स्पायडर प्लांट: हे सहजपणे वाढणारं रोप आहे. हे फॉर्मल्डिहाइड, कार्बन मोनॉक्साइड आणि झायलीन यांसारख्या प्रदूषकांचं प्रमाण कमी करण्यास मदत करतं.
मनी प्लांट: ही वेगाने वाढणारी वेल आहे. कमी-जास्त उजेड असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी ही सहज वाढू शकते आणि फॉर्मल्डिहाइड, बेंझिन तसंच झायलीन यांसारखे प्रदूषक घटक कमी करण्यास मदत करते.
या रोपांची काळजी कशी घ्यावी?
1. मातीतील ओलावा पाहून दर 2-3 आठवड्यांनी पाणी द्या.
2. ही रोपं कमी किंवा चांगल्या अप्रत्यक्ष उजेडात (थेट ऊन न लागणाऱ्या जागी) ठेवा.
3. दर दोन आठवड्यांनी ओल्या कापडाने रोपांची पानं पुसून स्वच्छ करा.
4. कुंड्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी साचू देऊ नका
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























