एआयसज्ज हॅकर्स आणि बँकांच्या आयटी टीम्समध्ये 'सायबर' युद्ध सुरू झालं आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, इमरान कुरैशी
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, बंगळुरू
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
ही परिस्थिती एखाद्या काऊबॉय चित्रपटातील दृश्यासारखी आहे. त्यात 2 व्यक्ती एकमेकांसमोर उभे आहेत आणि आधी बंदूक कोण काढणार, याची उत्सुकता आहे.
एका बाजूला हॅकर्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला बँकांच्या आयटी टीम्स आहेत.
या दोघांमधील लढाई किंवा संघर्ष हा एआयच्या वापरावरून सुरू आहे. हॅकर्स बँकांमध्ये सायबर चोरी करण्यासाठी एआयचा कसा वापर करतात आणि त्यांना रोखण्यासाठी बँका स्वतःची एआय साधनं किती वेगाने आणि प्रभावीपणे वापरतात, यावर या लढाईचा निकाल अवलंबून आहे.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, आज बँकिंग व्यवस्थेसमोर हेच सर्वात मोठं आव्हान आहे.
यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एआयमुळे कामं मशीनच्या म्हणजेच यंत्रासारख्या वेगाने होऊ शकतात.
सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, आयटी यंत्रणेत आढळलेल्या एका नव्या त्रुटीचा परिणाम जुन्या तंत्रज्ञानावर चालणाऱ्या यंत्रणांवर होऊ शकतो. विशेषतः भारताच्या बँकिंग व्यवस्थेला याचा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, सायबर हल्ले पुढच्या महिन्यात किंवा त्याआधीही सुरू होऊ शकतात.
गुप्तपणे होणारे सायबर हल्ले
क्लाउडसेकचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल सासी यांनी सोशल मीडियावर लिहिलं, "जावामधील 'जावा टू शेल' नावाची एक नवीन त्रुटी समोर आली आहे. त्यामुळे या महिन्यात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात."
"याचा सर्वाधिक फटका जुन्या तंत्रज्ञानावर चालणाऱ्या यंत्रणांना बसू शकतो. यामध्ये बँकिंग व्यवस्थेचाही समावेश आहे. कारण बँकांच्या बहुतांश यंत्रणा जावा तंत्रज्ञानावर चालतात."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
राहुल सासी यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "सायबर हल्ले करण्याचे अनेक नवीन मार्ग समोर येत आहेत. ज्या त्रुटी याआधी माणसांना किंवा संगणकांना शोधता आल्या नव्हत्या, त्या आता एआय शोधून काढत आहे."
"या त्रुटींचा फायदा घेऊन कोणत्याही संगणक किंवा सर्व्हरमध्ये प्रवेश मिळवता येऊ शकतो. जवळपास कोणत्याही प्रकारच्या संगणक यंत्रणेत शिरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो."
पण, असा इशारा देणारे राहुल सासी हे एकटेच नाहीत.
ब्रीचएक्सचे संस्थापक राजशेखर पुल्लाबतला यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "राहुल सासी जे सांगत आहेत ते बरोबर आहे. अनेकदा एखादी सेवा अचानक बंद पडते, त्याला साधी तांत्रिक अडचण समजून दुर्लक्ष केलं जातं."
"खरं तर, यातील अनेक घटना सायबर हल्ल्यांमुळे घडतात. अशा हल्ल्यांमध्ये हॅकर्सना यंत्रणेत शिरता आले नाही, पण ते ती यंत्रणा बंद पाडण्यात यशस्वी झाले."
"आपल्याला दिसतं ते या घटनांचं केवळ एक रूप आहे. हॅकर्स यशस्वी होतात, तेव्हा त्यांचे सायबर हल्ले अगदी गुपचूप, शांतपणे होतात, कोणाच्याही लक्षात येत नाहीत."
सिक्युअर आयटी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस एलएलपीचे संस्थापक शशीधर सी.एन. हे देखील या दोन्ही तज्ज्ञांशी सहमत आहेत.
परंतु, इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) प्रवक्त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
"सध्या आम्ही यावर काही बोलू शकत नाही," असं त्यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं.
तांत्रिक बिघाड की अयशस्वी सायबर हल्ला?
राजशेखर यांनी ज्या सेवा बंद पडल्याचं नमूद केलं आहे, त्याचा उल्लेख राहुल सासी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्येही होता.
राहुल सासी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "सावधान! जगभरात विविध सेवा बंद पडण्याच्या घटना अचानक किंवा विनाकारण घडत नाहीत. या सर्व घटनांचा संबंध सायबर हल्ल्यांशी आहे. इंटरनेटची यंत्रणा किती कमकुवत आहे, हेच अशा घटनांमधून दिसून येतं."
त्यांच्या मते, नुकसान करण्यासाठी हॅकर्सना एखाद्या संगणक यंत्रणेत प्रवेश मिळवण्यात यशस्वी होणं नेहमीच गरजेचं नसतं.
अनेकदा हॅकर्सचा हल्ला यशस्वी झाला नाही, तरी एखादं ॲप बंद पडू शकतं किंवा संपूर्ण सेवा ठप्प होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
यासाठी राहुल सासी यांनी 'पीएचपी2शेल' म्हणजेच 'सीव्हीई-2026-109618' या त्रुटीचं उदाहरण दिलं.
त्यांनी लिहिलं, "या त्रुटीचा फायदा घेऊन हल्ला करण्याच्या ज्या पद्धती सार्वजनिक झाल्या होत्या, त्यापैकी अनेक पद्धतींनी दूरवरून सर्व्हरमध्ये प्रवेश करून आपल्या इच्छेनुसार कोड चालवता येत नव्हता. परंतु, या पद्धतींमुळे सर्व्हर बंद पडू शकत होते."
सासी यांच्या मते, या त्रुटींचा फायदा घेऊन हल्ले करण्याचे प्रयत्न वाढत आहेत. त्यामुळे एखादी घटना वरवर पाहता साधा तांत्रिक बिघाड वाटू शकते. परंतु, प्रत्यक्षात तो अयशस्वी सायबर हल्ला असू शकतो.
ते म्हणतात, "हॅकरला संगणक यंत्रणेत शिरता आलं नाही, तरीही ती यंत्रणा बंद पडली."
राहुल सासी यांना परिस्थिती आणखी कठीण का होणार, असं विचारलं असता ते म्हणाले, "यापुढे अशा अनेक त्रुटी समोर येतील, ज्या याआधी कधीच आढळल्या नव्हत्या. या सर्व त्रुटी एकाच वेळी समोर येतील."
एआय इतकं धोकादायक का ठरतंय?
शशिधर सांगतात की, यापू्र्वी एखादी गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी 24 तासांचा वेळ घेतला जात असत.
धोका मध्यम स्वरूपाचा असेल, तर ती त्रुटी दूर करण्यासाठी 1 महिन्यापर्यंतचा वेळ मिळू शकत होता.
कमी धोका असलेल्या त्रुटींबाबत, पुढच्या वेळी सॉफ्टवेअर अपडेट करताना त्या दूर केल्या जातील, असं सांगितलं जात असे.
पण, आता परिस्थिती बदलली आहे.
शशिधर सांगतात, "आता मध्यम स्वरूपाचा धोका असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 24 तासांचा वेळही खूप जास्त आहे. कारण या काळात आपली संगणक यंत्रणा सायबर हल्ल्यांसाठी असुरक्षित होऊ शकते."
"एखादी व्यक्ती एआयच्या मदतीने या त्रुटीचा फायदा घेऊन हल्ला करू शकते."
राजशेखर पुल्लाबतला सांगतात की, गेल्या 20 वर्षांपासून सायबर हल्ले ओळखण्यावरच अधिक भर दिला जात आहे.
या पद्धतीमध्ये आधी सायबर हल्ला होण्याची वाट पाहिली जाते. त्यानंतर तो हल्ला ओळखून त्याला रोखण्यासाठी पावलं उचलली जातात.
पण, अशा प्रकारचा धोका आधीही निर्माण झाला असेल, तरच ही पद्धत उपयोगी ठरते.

फोटो स्रोत, Getty Images
राजशेखर सांगतात की, एआयचा वापर करणारे हॅकर्स अशा त्रुटी शोधू शकतात, ज्या याआधी कधीच आढळून आलेल्या नव्हत्या.
अशा वेळी, हा धोका ओळखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेकडे पूर्वीची कोणतीही माहिती उपलब्ध नसते.
ते म्हणतात, "सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात आता केवळ हल्ला झाल्यानंतर तो ओळखण्यावर भर देऊन चालणार नाही. तर हॅकर्सच्या आधीच त्रुटी शोधून त्या दूर कराव्या लागतील."
हल्ला रोखण्यासाठी वेग वाढवणं हेच मोठं आव्हान
शशिधर यांच्या मते, बँका आपल्या संगणक यंत्रणा किती वेगाने सुरक्षित करू शकतात आणि हॅकर्स त्यात किती वेगाने घुसू शकतात, यावरच खरी लढाई अवलंबून आहे.
यापूर्वी बँका आणि हॅकर्स यांच्यात वेळेचा बराच फरक असायचा. पण, एआयमुळे हा फरकही खूप कमी झाला आहे. कारण आता अनेक कामं आपोआप आणि खूप कमी वेळात होऊ शकतात.
पण, बँकांच्या संगणक यंत्रणेतील त्रुटी आपोआप दूर करणंही सोपं नाही.
शशिधर यासाठी बँका आपल्या ग्राहकांना पाठवत असलेल्या संदेशांचं उदाहरण देतात.
या संदेशांमधून ग्राहकांना कळवलं जातं की, रात्री उशिरा देखभालीच्या कामासाठी बँकेच्या सेवा अर्धा किंवा एक तास बंद राहतील.
ते म्हणतात, "एखादी त्रुटी दूर करायची असेल, तर संपूर्ण यंत्रणा बंद करावी लागते. ॲपही बंद करावं लागतं. त्यानंतरच ती त्रुटी दूर करता येते."
या प्रक्रियेमुळे यंत्रणेतील त्रुटी दूर करण्याचं काम संथ होतं.

फोटो स्रोत, Ishant Chauhan/Hindustan Times via Getty Images
शशिधर म्हणतात, "या प्रत्यक्षात येणाऱ्या अडचणी आहेत. हॅकर्सना कोणतेही नियम नसतात. तुमची एक छोटीशी चूकही त्यांच्यासाठी पुरेशी असते."
"पण, संगणक यंत्रणा सुरक्षित ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी छोटीशी गोष्टही मोठी अडचण ठरू शकते. हेच खरं आव्हान आहे. एआय आता एक प्रकारचं अवाढव्य असं संकट बनलं आहे."
राजशेखर यापुढे जाऊन आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात.
ते म्हणतात, "एआयच्या मदतीने हे काम अवघ्या एका तासात होताना आम्ही पाहिलं आहे."
"आता सायबर हल्ले मशीनच्या वेगाने होतात. त्यामुळे एखादी त्रुटी समोर येताच त्यापासून बचाव करण्याची तयारी करणं आवश्यक आहे."
राजशेखर यांच्या मते, आजही अनेक बँका 20 वर्षांपूर्वी तयार केलेल्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
एआयचा वापर करून हल्ले करणारे हॅकर्स अशाच जुन्या संगणक यंत्रणांना लक्ष्य करतात.
पुढचा सायबर हल्ला कुठे होऊ शकतो?
राजशेखर म्हणतात, "हल्ला ओळखणारी यंत्रणा आपल्याला सांगते की, आपल्यावर हल्ला झाला आहे. तर त्रुटी शोधणारी यंत्रणा आपल्यावर कुठे हल्ला होऊ शकतो, हे आधीच सांगते."
"या दोन्हींपैकी दुसरी पद्धत हल्ला होण्याआधी बचावासाठी पावलं उचलण्याची संधी मिळते."
त्यांचं म्हणणं आहे की, आपल्या संगणक यंत्रणेतून हॅकर्स कुठे घुसखोरी करू शकतात, हे समजण्यासाठी कंपनीच्या सुरक्षा टीमने सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीच्या इशाऱ्याची वाट पाहू नये.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
एखादी त्रुटी दूर करण्यासाठी किती वेळ लागतो?
राजशेखर आपल्या कंपनीचं उदाहरण देऊन 'झिरो-डे' त्रुटीबद्दल सांगतात.
'झिरो-डे' म्हणजे अशी त्रुटी, जी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपनीलाही माहीत नसते. त्यामुळे ती दूर करण्यासाठी कोणताही उपायही उपलब्ध नसतो.
या त्रुटीचा फायदा घेऊन केलेला सायबर हल्ला, पूर्वीपासून माहीत असलेले धोके रोखण्यासाठी तयार केलेली सुरक्षा यंत्रणा सहज चुकवू शकतो.
राजशेखर यांच्या म्हणण्यानुसार, ब्रीचएक्स झिरो-डे लॅब्सने मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील 1700 हून अधिक अशा त्रुटी शोधल्या आहेत.
यापैकी केवळ काही त्रुटींची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
याचं कारण असं की, एखादी त्रुटी दूर करण्याआधीच तिची माहिती सार्वजनिक झाली, तर हॅकर्स तिचा फायदा घेऊ शकतात.
राजशेखर म्हणतात, "आता त्रुटी शोधण्याचा वेग त्या दूर करण्याच्या वेगापेक्षा जास्त झाला आहे."
"आम्ही 1700 हून अधिक झिरो-डे त्रुटी शोधल्या आहेत. परंतु, गेल्या 4 महिन्यांत त्यापैकी केवळ 11 त्रुटी दूर करता आल्या आहेत."
"एआय मशीनच्या वेगाने त्रुटी शोधत आहे, पण त्या दूर करण्याचं काम अजूनही मानवी वेगानेच सुरू आहे."
खरी दुरुस्ती होईपर्यंत तात्पुरता उपाय
एखादी त्रुटी दूर करण्यासाठी सॉफ्टवेअर कंपनीला अनेक आठवडे लागू शकतात.
मात्र, बँक आपली संगणक यंत्रणा दीर्घ काळासाठी बंद ठेवू शकत नाही.
अशा परिस्थितीत राजशेखर यांची कंपनी 'व्हर्च्युअल पॅच'चा वापर करते.
ती त्रुटी कायमची दूर होईपर्यंत, हा तात्पुरता उपाय तिचा फायदा घेऊन होणारे हल्ले रोखतो.

फोटो स्रोत, Getty Images
एआयच खरा दोषी आहे का?
राजशेखर यावर सहमत नाहीत.
ते म्हणतात, "एआय हा काही खरा दोषी किंवा खलनायक नाही. ज्या वेगाने तो त्रुटी शोधू शकतो, त्याच वेगाने त्या दूरही करू शकतो."
"परंतु, केवळ माणसांची टीम एआयच्या मदतीने होणाऱ्या हल्ल्यांचा वेग रोखू शकत नाही. त्यामुळे बचावाची तयारीही मशीनच्या वेगानेच करावी लागेल."
राजशेखर पुन्हा एकदा लक्षात आणून देतात की, आजही अनेक बँका 20 वर्षांपूर्वी तयार केलेल्या सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
त्यांच्या मते, एआयच्या मदतीने हल्ले करणारे हॅकर्स अशाच जुन्या संगणक यंत्रणा शोधत असतात.
ग्राहकांच्या संरक्षणासाठी बँकांनी काय करायला हवं?
राहुल सासी म्हणतात, "सुरक्षा व्यवस्था आणि तंत्रज्ञानाची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याची हीच योग्य वेळ आहे."
त्यांच्या मते, बँकांना त्रुटी आता अधिक वेगाने दूर कराव्या लागतील आणि आपल्या संगणक यंत्रणेची सुरक्षा आणखी मजबूत करावी लागेल.
ते म्हणतात, "सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे."
बँक खातेधारकांनी काय काळजी घ्यावी?
राजशेखर म्हणतात, "केवळ एका बँक खात्यावर आणि एका डेबिट कार्डवर अवलंबून राहू नका."
"एखाद्या तपासादरम्यान तुमचं बँक खातं गोठवलं गेलं, तर ते काही काळासाठी बंद राहू शकतं."
त्यांनी दुसऱ्या बँकेतही खातं उघडण्याचा आणि एक-दोन महिन्यांचा खर्च भागेल इतके पैसे त्यात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
राजशेखर यांच्या मते, वर्षाच्या शेवटी सुट्ट्यांचा काळ हा अधिक धोकादायक असतो. त्यामुळे दुसऱ्या बँकेमध्ये खातं उघडण्याची हीच योग्य वेळ आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























