स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी आशेचा किरण; 'गेम चेंजर' ठरू शकतं नवं औषध?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
या उपचारपद्धतीला तज्ज्ञ स्वादुपिंडाच्या (पॅन्क्रियाटिक) कॅन्सरच्या उपचारातील अनेक दशकांतील सर्वात मोठं यश मानत आहेत.
ही एक दररोज घेतली जाणारी गोळी असून, उपचार करणं अत्यंत कठीण आणि जीवघेण्या मानल्या जाणाऱ्या या कॅन्सरच्या काही रुग्णांमध्ये ती कॅन्सरच्या गाठींचा आकार कमी करण्यास आणि कदाचित त्या स्कॅनमध्ये पूर्णपणे दिसेनाशा करण्यास मदत करत असल्याचं दिसून आलं आहे.
सुरुवातीच्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये केमोथेरपीसोबत डारॅक्सोनरासिब (Daraxonrasib) घेतलेल्या प्रत्येक 12 रुग्णांपैकी एका रुग्णाच्या स्कॅनमध्ये कॅन्सरची कोणतीही चिन्हं आढळली नाहीत.
या चाचणीत सहभागी झालेल्या 61 रुग्णांपैकी जवळपास सर्वांच्या कॅन्सरच्या गाठींची वाढ थांबली होती. या सर्व रुग्णांना नुकताच शरीरात पसरलेल्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं.
तथापि, ही उपचारपद्धती हा आजार किती काळ नियंत्रणात ठेवू शकते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाकडे कॅन्सरवरील कायमस्वरूपी उपचार किंवा पूर्णपणे बरं करणारं औषध म्हणून पाहता येणार नाही.
'दशकांतील सर्वात मोठी प्रगती'
कॅन्सर रिसर्च यूकेनं याला स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांसाठी "दशकांतील सर्वात मोठी प्रगती" म्हटलं आहे.
संस्थेचे डॉक्टर सॅम गॉडफ्रे यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं की, हे निष्कर्ष अत्यंत उत्साहवर्धक आहेत.
ते म्हणाले, "या नव्या औषधाने अशा गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग शोधला आहे, ज्यावर औषधांद्वारे नियंत्रण मिळवणं आतापर्यंत अशक्य मानलं जात होतं."

फोटो स्रोत, Dr Michael May/Dr Wungki Park/Memorial Sloan Kettering Cancer Center/Press Association
ते पुढं म्हणाले, "अखेर आपण स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये प्रगती होताना पाहत आहोत, ज्याची बराच काळ गरज होती."
स्वादुपिंडाचा कॅन्सर उपचारासाठी अत्यंत कठीण मानला जातो. ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या सर्वसाधारण कॅन्सरपैकी या कॅन्सरमधील जगण्याचा दर सर्वांत कमी आहे.
केमोथेरपीमुळे गाठींचा आकार काही प्रमाणात कमी करता येतो. मात्र अनेकदा काही काळानंतर कॅन्सर पुन्हा वाढू लागतो.
शरीरात कॅन्सर पसरलेले बहुतेक रुग्ण काही महिनेच जगतात, अनेक वर्षे नव्हे.
या नव्या उपचारामुळे कॅन्सर पूर्णपणे आणि कायमस्वरूपी नाहीसा होईलच असं नसलं, तरी रुग्णांना अधिक काळ जगता येऊ शकतं, अशी डॉक्टरांना आशा आहे.
या चाचणीत रुग्णांचं सरासरी दीड वर्षं निरीक्षण करण्यात आलं. या काळात काही रुग्णांमध्ये कॅन्सर पुन्हा परतला नाही.
कॅन्सर दीर्घकाळ नियंत्रणात राहण्याची अवस्था निर्माण होऊ शकते का आणि ती किती काळ टिकू शकते, हे समजून घेण्यासाठी अधिक दीर्घकालीन अभ्यासाची गरज आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधील निष्कर्ष असे होते:
- 90% रुग्णांमध्ये गाठींची वाढ थांबली.
- 60% हून अधिक रुग्णांमध्ये गाठींचा आकार कमी झाला किंवा त्या स्कॅनमध्ये दिसेनाशा झाल्या.
- सुमारे 8% रुग्णांमध्ये, म्हणजे प्रत्येक 12 पैकी एका रुग्णाच्या सीटी स्कॅनमध्ये कॅन्सरची कोणतीही चिन्हं आढळली नाहीत.
नवी आशा
अमेरिकेतील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉक्टर वुंगकी पार्क हे देखील या चाचणीशी संबंधित आहेत. त्यांनी सांगितलं की, आतापर्यंतचे निष्कर्ष अत्यंत उत्साहवर्धक आहेत.
ते म्हणाले, "उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं आम्ही पाहत आहोत. त्याचबरोबर उपचारांचा परिणामही पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी होताना दिसतो आहे. आजार नियंत्रणात ठेवण्याचा कालावधीही जवळपास दुप्पट झाला आहे. त्यामुळे भविष्यात रुग्ण अधिक काळ जगू शकतील अशी आशा निर्माण झाली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
डारॅक्सोनरासिब हे कॅन्सर वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या काही विशिष्ट जनुकीय बदलांवर परिणाम करणारं औषध आहे.
या औषधाला अमेरिकेत काही वापरांसाठी आधीच अधिकृत मंजुरी मिळाली आहे. हे औषध आरएएस (RAS) नावाच्या जनुकांमधील काही बदलांवर परिणाम करतं आणि त्यांना सक्रिय होण्यापासून रोखतं.
हे जनुकीय बदल बहुतांश स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये आढळतात आणि गाठी वाढण्यामागचं एक प्रमुख कारण मानले जातात.
फुफ्फुसांचा आणि अंडाशयाचा कॅन्सर यांसह इतर अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्येही अशाच प्रकारचे जनुकीय बदल आढळू शकतात. त्यामुळे हे औषध इतर कॅन्सरच्या रुग्णांसाठीही उपयुक्त ठरू शकतं.
डॉक्टर गॉडफ्रे म्हणाले, "स्वादुपिंडाच्या कॅन्सरमध्ये दिसत असलेलं हे सुरुवातीचं यश इतर कॅन्सरच्या उपचारांमध्येही वापरता येईल, अशी मला आशा आहे."
त्यांनी यावर भर दिला की, दीर्घकालीन चाचण्या आणि त्यांचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे असतील.
ते म्हणाले, "कॅन्सर पुन्हा परत येऊ शकतो. स्कॅनमध्ये कॅन्सरची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत, याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाला आहात, असा होत नाही. त्यासाठी आणखी वेळ जावा लागेल."
स्वादुपिंडाचा कॅन्सर किती गंभीर आहे?
युरोपमधील कॅन्सर परिषद EORTC-NCI-AACR Symposium 2026 च्या अध्यक्षा प्राध्यापक एलेना गैराल्डा म्हणाल्या, "हे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत, कारण त्यातून असं सूचित होतं की, या दोन्ही उपचारांचा एकत्रित वापर रुग्णांच्या एकूण आयुष्यमानात वाढ करू शकतो. तसंच गाठी पुन्हा वाढेपर्यंतचा कालावधीही वाढवू शकतो."
या परिषदेत संशोधनाचे निष्कर्ष डॉक्टरांसमोर सादर केले जात आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत होणाऱ्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी सुमारे 3 टक्के प्रकरणं स्वादुपिंडाच्या कॅन्सरची असतात. मात्र कॅन्सरमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी सुमारे 8 टक्के मृत्यू या आजारामुळे होतात. दरवर्षी सुमारे 53,000 लोकांचा या आजारामुळे मृत्यू होतो.
कॅन्सर रिसर्च यूकेच्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये दरवर्षी स्वादुपिंडाच्या कॅन्सरची सुमारे 11,500 प्रकरणं समोर येतात आणि जवळपास 10,200 लोकांचा या आजारामुळे मृत्यू होतो.
अभिनेते अॅलन रिकमन यांचंही 2016 मध्ये याच आजारामुळे निधन झालं होतं. या आजाराचं निदान झाल्यानंतर 5 महिन्यांनी त्यांचा मृत्यू झाला होता.
स्वादुपिंडाच्या कॅन्सरच्या लक्षणांमध्ये कावीळ, त्वचेला खाज सुटणं, लघवीचा रंग गडद होणं, शौचाचा रंग फिकट होणं, कोणतंही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणं आणि तीव्र ताप यांचा समावेश होतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























