महाराष्ट्राच्या दुर्गम आदिवासी पाड्यात गेल्या 10 वर्षात घडले 11 डॉक्टर; 'गुर्हाळपाणी'तल्या स्वप्नांची गोष्ट

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर, सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेल्या धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा आदिवासी पाड्यात गेल्या दहा तब्बल 11 जण डॉक्टर झालेत.
अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत रस्ते, वीज आणि शिक्षणाच्या मर्यादित सुविधा असलेल्या या गावात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणंही कठीण होतं. मात्र, जगदीश पावरा यांनी ते स्वप्न पूर्ण केलं आणि त्यांच्याकडे पाहून गावातील अनेक मुलांनीही वैद्यकीय शिक्षणाची वाट धरली.
आश्रमशाळा, शिक्षकांचं मार्गदर्शन, पालकांचे कष्ट आणि गावात निर्माण झालेला आत्मविश्वास यामुळे गुऱ्हाळपाणीची ओळख आता डॉक्टरांचं गाव अशी होऊ लागली आहे.
सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर गुऱ्हाळपाणी हा पावरा आदिवासी समाजाचा छोटासा पाडा आहे. साधारण 70 ते 80 घरं आणि चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावाची ओळख काही वर्षांपूर्वी वेगळी होती. महाराष्ट्रातलं शेवटचं गाव, जिथे रस्ते नाहीत, वीज नाही आणि मूलभूत सुविधांचाही अभाव आहे, अशी या गावाची चर्चा व्हायची.
यंग फाउंडेशनचे संदीप देवरे सांगतात, "आता काही काळापूर्वी हे गाव याच्यासाठी चर्चेत असायचं की महाराष्ट्रातलं हे शेवटचं गाव आहे. इथे लाईट नाही, रस्ते नाहीत, वीज नाही."
आज गावात रस्ते आणि वीज यांसारख्या सुविधा काही प्रमाणात पोहोचल्या आहेत. मात्र, जगदीश पावरा यांच्या लहानपणी परिस्थिती वेगळी होती.
डॉ. जगदीश सांगतात, "ज्यावेळेस लहान होतो, त्यावेळेस पूर्ण अंधार होता. आम्ही रॉकेलच्या चिमणीवर अभ्यास करायचो. कुठे जायचं म्हटलं की आधी बोराडी पर्यंत चालत जावं लागायचं. मला अजूनही आठवतंय ते अंतर किमान पंधरा ते सतरा किलोमीटरचं होतं."
आश्रमशाळेने दिली शिक्षणाची वाट
गुऱ्हाळपाणीतील जगदीश पावरा हे गावचे पहिले डॉक्टर. पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण त्यांनी निमजरी येथील आश्रमशाळेत घेतलं. त्यानंतर शिरपूरमध्ये अकरावी-बारावी आणि पुण्यातील विजय मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केलं.
पुढे मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधून त्यांनी एमडी रेडिओलॉजीचं शिक्षण घेतलं. 2017 मध्ये एमडी प्रवेशासाठी दिलेल्या परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून अखिल भारतीय स्तरावर पहिला क्रमांक मिळाल्याचं ते सांगतात.
मात्र, डॉक्टर होण्याचं स्वप्न सुरुवातीपासूनच होतं असं नाही. दहावीपर्यंत गणित चांगलं असल्यामुळे इंजिनिअरिंगचा विचार होता. अकरावी-बारावीला जीवशास्त्राचा अभ्यास अवघड जायचा. मराठी माध्यमातून शिकून अचानक इंग्रजीतील वैद्यकीय संज्ञा समोर आल्याने अडचणी येत होत्या. अशा वेळी त्यांच्या जीवशास्त्राच्या शिक्षिका नीलिमा पाटील यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं.
जगदीश सांगतात, "आश्रमशाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांनीच माझ्या मनात डॉक्टरचं स्वप्न टाकलं आणि माझ्यात डॉक्टर होण्याची क्षमता आहे त्यांनीच पहिल्यांदा ओळखलं होतं."
डॉक्टरकी निवडण्यामागे आणखी एक विचार होता. इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात गेल्यास मोठ्या शहरात राहावं लागू शकतं; पण डॉक्टर झाल्यास आपल्या गावाच्या परिसरात राहून लोकांसाठी काम करता येईल, असं त्यांना वाटत होतं.

या प्रवासात आश्रमशाळेची भूमिका महत्त्वाची होती. ते म्हणतात, "मला मनापासून वाटतं की आश्रमशाळा राहिली नसती तर कदाचित आम्ही आज गुरं चारत असलो किंवा शेतीकाम करत राहिलो असतो."
"आश्रमशाळा म्हटली की खर्च काहीच लागत नाही. तिथे फक्त मुलाला ठेवून यायचं. बाकी सर्व गोष्टी तिकडूनच केल्या जातात. त्याच्यामुळे आश्रमशाळेशिवाय हे शक्यच नव्हतं," असं जगदीश म्हणतात.
शिक्षणाच्या या प्रवासात भाषेचं आव्हानही होतं. घरात पावरी भाषा, शाळेत मराठी आणि पुढे महाविद्यालयात इंग्रजी. जगदीश सांगतात की पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर मराठी शिकायला तीन-चार, कधी पाच वर्षं लागायची.
इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांशी तुलना झाल्याने अकरावी-बारावीत आणि वैद्यकीय महाविद्यालयात सुरुवातीला आत्मविश्वास कमी व्हायचा. ते म्हणतात, "इंग्रजी मला अजूनही कठीण जातं. बाकीचे विद्यार्थी इंग्रजीत बोलायचे. मग आपण बोललो तर काय म्हणतील, असं वाटायचं. त्यामुळे आपण मराठीतच बोलायचो."
जगदीश यांच्या आई-वडिलांचं शिक्षण झालेलं नव्हतं. ते दोघेही शेती करायचे. मात्र मुलांनी शिकावं, अशी वडिलांची इच्छा होती. बसवरील पाटी वाचता न आल्यामुळे दुसऱ्याला विचारावं लागायचं, कागदपत्रं समजून घेण्यासाठी शिकलेल्या व्यक्तीची मदत घ्यावी लागायची. अशा अनुभवांमुळे मुलांना शिक्षण द्यायचं, असं त्यांनी ठरवलं होतं.
एका डॉक्टरच्या यशाने गावात निर्माण झाला आत्मविश्वास
जगदीश पावरा यांनी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर गुऱ्हाळपाणीतून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली. गेल्या दहा वर्षांत गावातून वैद्यकीय क्षेत्रात अकरा जण पुढे आले आहेत. यामध्ये एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांचा समावेश आहे. यातील काहींनी शिक्षण पूर्ण केलं आहे, तर काहींचं शिक्षण सुरू आहे.
या बदलाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर रणजित पावरा. त्यांनी पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून बीएएमएसचं शिक्षण पूर्ण केलं. 2022 पासून ते गावापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या बोराडीमध्ये प्रॅक्टिस करतात.
रणजित सांगतात, "आमचे पहिले डॉक्टर जगदीश पावरा सर. ते एमडी रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही शिकत गेलो. ते आमच्या संपर्कात राहायचे. अभ्यास करायला सांगायचे."
आज गावातील लोकांवर उपचार करता येतात, याचा त्यांना अभिमान वाटतो. "आता खूप अभिमान वाटतो. कारण माझ्याकडे जे उपचार घेतायत ते सगळे गावातलेच लोक आहेत. त्यांच्यासमोर मोठा झालो आणि आता त्यांच्यामध्येच राहून त्यांनाच उपचार करणं, हे खूप समाधान देतं," असं रणजित सांगतात.

यंग फाउंडेशनचे संदीप देवरे यांच्या मते, जगदीश पावरा एमबीबीएस आणि एमडी झाल्यानंतर गावात येऊ-जाऊ लागले, तेव्हा इतर मुलांनाही आपण डॉक्टर होऊ शकतो, असा विश्वास वाटू लागला.
ते म्हणतात, "जर दुर्गम पाड्यातला, आपल्याच गावातला एक मुलगा डॉक्टर होऊ शकतो, तर आपण पण होऊ शकतो, असं इतर मुलांनाही वाटू लागलं आणि एक प्रेरणादायी वातावरण तयार झालं."
देवरे सांगतात की एका मुलानंतर दुसरं, मग तिसरं मूल वैद्यकीय शिक्षणाकडे वळलं. आज दरवर्षी आठ ते दहा मुलं-मुली नीट परीक्षेचा अभ्यास करतात. पहिल्या वर्षी प्रवेश मिळाला नाही तर पुन्हा तयारी करायची, असा त्यांचा प्रयत्न असतो.
ते म्हणतात, "पहिल्या वर्षी नंबर नाही लागला, हरकत नाही. पुन्हा अभ्यास करू. दुसऱ्या वर्षी नाही लागला, तरी पुन्हा अभ्यास करू. एमबीबीएसला नाही लागलं तर बीएएमएस करू, नाहीतर डेंटिस्ट, व्हेटरनरी. पण डॉक्टर मात्र व्हायचं."
राजेंद्र पावरा यांचा मुलगाही वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. आज गावातील मुलांनी शिक्षण घ्यावं, नीटची परीक्षा द्यावी आणि अपयश आलं तरी प्रयत्न सोडू नयेत, असं ते सांगतात. "जंगलात राहून पण आमचे एवढे डॉक्टर झालेले आहेत, तर अजून झाले पाहिजेत आणि अजून शिकवायचं," असं त्यांना वाटतं.
मुलांना नोकरी लागल्यानंतर गावात घर बांधून परत यावं, अशीही त्यांची इच्छा आहे.

या प्रक्रियेला मदत करण्यासाठी यंग फाउंडेशन गेल्या सात-आठ वर्षांपासून या भागात काम करत आहे. मोबाईल नेटवर्क उपलब्ध असलेल्या ठिकाणी बांबूची शाळा, अभ्यासिका आणि छोटंसं वाचनालय उभारण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना वाचनालय, नीट परीक्षेची पुस्तकं, संगणक आणि झेरॉक्स मशीन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. सरकारी योजनांची माहिती देणं आणि मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना मदत करणं, हेही या कामाचा भाग आहे.
आपल्या भाषेत उपचार; गावाशी नातं जपणारे डॉक्टर
गुऱ्हाळपाणीतील या बदलाचा परिणाम केवळ शिक्षणापुरता मर्यादित नाही. त्याचा गावातील आरोग्यसेवेवरही परिणाम दिसतो. पूर्वी गावात आजारपण आलं की जडीबुटी, वनस्पतींची औषधं किंवा पारंपरिक उपचारांवर अवलंबून राहावं लागायचं. काही वेळा आजारी व्यक्तीला बोराडी किंवा शिरपूरला न्यावं लागायचं. गंभीर परिस्थितीत रुग्णाला बांबूला कापड बांधून केलेल्या झोळीतून वाहून नेण्याची वेळही यायची.
राजेंद्र पावरा सांगतात, "पूर्वी आजारी पडल्यावर भगतांकडे जाण्याची पद्धत होती. लिंबाची पानं फिरवणं किंवा राख लावणं असे उपचार केले जायचे."
आजही गावात स्वतंत्र दवाखाना नाही. सरकारी रुग्णालय वाकवड येथे आहे, तर बोराडीमध्ये डॉक्टर उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना शिरपूरला न्यावं लागतं. मात्र गावातून डॉक्टर झालेली मुलं उपलब्ध असल्यामुळे मार्गदर्शन मिळण्याचा एक आधार निर्माण झाला आहे. गावात कोणी आजारी पडलं तर त्यांच्या मुलांना फोन केला जातो. कोणत्या रुग्णालयात जावं, कोणत्या डॉक्टरकडे दाखवावं, याबाबत ते मार्गदर्शन करतात.
जगदीश पावरा शिरपूरमध्ये सोनोग्राफी सेंटर चालवतात. गावातील लोक त्यांच्याकडे आले तर ते पावरी भाषेत त्यांच्याशी संवाद साधतात. काही वेळा सोनोग्राफीची गरज नसल्यास ते रुग्णांना योग्य डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला देतात. गावातून आलेल्या रुग्णांना ते शुल्कातही सवलत देतात.

डॉ. जगदीश सांगतात की आपल्या गावातून आणि समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीने केवळ स्वतःसाठी काम करू नये. "आपण ज्या गावातून आलो, त्या गावाबद्दल आपलं काहीतरी ऋण आहे. आपण ज्या समाजामधून आलो, त्या लोकांसाठीही काहीतरी करायला पाहिजे," असं त्यांना वाटतं.
गावातील डॉक्टर झालेल्या मुलांमुळे रुग्णांना आपल्या भाषेत बोलता येतं, हा मोठा बदल असल्याचं राजेंद्र पावरा सांगतात. "आम्ही लहान होतो तेव्हा कोणत्याही दवाखान्यात गेलो, पण आदिवासी डॉक्टर भेटला नाही. ना नर्स होती, ना आरोग्य क्षेत्रात आमचा कोणी होता. आता आम्हाला असं वाटतं की कुठेही गेलो, मुंबईला गेलो, तरी आमच्यातला कोणी भेटेल. आम्हाला मराठी येत नाही, तर आम्ही आमच्या भाषेत थेट बोलू शकतो. आम्हाला काय त्रास होतोय, हे आम्ही पावरी भाषेत सांगू शकतो. त्यामुळे डॉक्टरांना त्रास समजायला आणि चांगला इलाज करायला मदत होते."

गुर्हाळपाणीतील बदल मात्र पूर्ण झालेला नाही. संदीप देवरे सांगतात की आजूबाजूच्या काही पाड्यांमध्ये अजूनही पिण्याचं शुद्ध पाणी, नियमित वीज आणि पक्के रस्ते उपलब्ध नाहीत. रस्ते नसल्यामुळे शिक्षक वेळेवर पोहोचू शकत नाहीत, रुग्णवाहिकाही वेळेवर पोहोचणं कठीण होतं. वीज नियमित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतात. त्यामुळे मूलभूत सुविधांचा प्रश्न अजूनही कायम आहे.
डॉ. जगदीश पावरा यांना आता पुढच्या पिढीने डॉक्टर होण्यापलीकडची स्वप्नं पाहावीत असं वाटतं. ते म्हणतात, "आम्ही झालो म्हणजे कोणी पण होऊ शकतं. फक्त प्रयत्न करायला पाहिजे. आता एवढ्या छोट्याशा गावातून कोणीतरी जिल्हाधिकारी व्हायला पाहिजे, आयएएस व्हायला पाहिजे, आयुक्त व्हायला पाहिजे."
कधीकाळी जिथे डॉक्टर होण्याचं स्वप्नही दूरचं वाटत होतं, तिथे आज मुलं वैद्यकीय शिक्षणाबरोबरच आयआयटी आणि नागरी सेवांसारख्या क्षेत्रांचाही विचार करत आहेत.
काही मुलांनी आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आहे, तर अनेक जण नीटची तयारी करत आहेत. गावात अजूनही रस्ते, वीज आणि आरोग्यसेवेच्या सुविधा वाढण्याची गरज आहे. पण शिक्षणाची इच्छा, पालकांचा पाठिंबा आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी उदाहरणं आता गावात आहेत. गुर्हाळपाणीची गोष्ट एका डॉक्टरच्या यशावर थांबत नाही; त्या यशामुळे पुढच्या पिढीला स्वतःसाठी अधिक मोठी स्वप्नं पाहण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























