ब्रेस्ट कॅन्सर झाला तर स्तन काढावाच लागतो? डॉक्टर काय सांगतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, व्ही. शारदा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
स्तनाचा कर्करोग (ब्रेस्ट कॅन्सर) झाल्याचं कळताच महिलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वात आधी एकच भीती वाटते, ती म्हणजे आता संपूर्ण स्तन काढावा लागणार का?
परंतु, आता वैद्यकीय क्षेत्रात यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध झाले आहेत. स्तनाचा कॅन्सर झालेल्या प्रत्येक महिलेला संपूर्ण स्तन काढण्याची गरज भासत नाही.
कॅन्सर कोणत्या टप्प्यात आहे, त्याचा आकार किती आहे आणि तो स्तनाच्या कोणत्या भागात आहे, यावर उपचार ठरतात. अनेक महिलांमध्ये संपूर्ण स्तन न काढताही उपचार करता येतात, असं डॉक्टर सांगतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅन्सर संशोधन विभागाने (आयएआरसी) प्रसिद्ध केलेल्या ग्लोबोकॅन 2024 च्या अहवालानुसार, भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर हा सर्वाधिक आढळणारा कॅन्सरचा प्रकार आहे.
भारतामध्ये 2024 या एकाच वर्षात स्तनाच्या कॅन्सरचे 2 लाख 37 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी 30 टक्के प्रकरणं स्तनाच्या कॅन्सरची होती.
स्तन न काढता उपचार कधी करता येतात?
कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला, तर अनेक महिलांना संपूर्ण स्तन काढण्याची गरज नसते, असं कॅन्सर सर्जन डॉ. सेल्वी राधाकृष्णन यांनी सांगितलं.
"कॅन्सर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असताना त्याचं निदान झालं, तर स्तनाचा कॅन्सरग्रस्त भाग काढून उरलेला स्तन तसाच ठेवता येतो. या शस्त्रक्रियेला 'ब्रेस्ट कन्झर्व्हेशन सर्जरी' म्हणतात. परंतु, ही शस्त्रक्रिया प्रत्येक महिलेसाठी योग्य असेलच असं नाही," असं डॉ. सेल्वी राधाकृष्णन यांनी सांगितलं.
स्तनाचा आकार किती आहे, कॅन्सरच्या गाठीचा आकार म्हणजेच ती गाठ किती मोठी आहे, ती स्तनाच्या कोणत्या भागात आहे आणि स्तनाच्या ऊतींची रचना कशी आहे, या गोष्टी उपचार ठरवताना महत्त्वाच्या असतात. स्तनांचे आकार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच अशा प्रकारांत विभागले जातात, असं डॉ. सेल्वी राधाकृष्णन यांनी नमूद केलं.
"उदाहरणार्थ, स्तनाचा आकार लहान असेल, तर 2 ते 3 सेंटीमीटरची गाठही स्तनाच्या मोठ्या भागावर परिणाम करू शकते. परंतु, तेवढ्याच आकाराची गाठ मोठ्या स्तनात असेल, तर ती काढणं तुलनेने सोपं असतं," असं त्यांनी स्पष्ट केलं.
कॅन्सरची गाठ स्तनाग्राजवळ असेल तर...
"कॅन्सरची गाठ स्तनाग्राजवळ आहे की स्तनाच्या बाहेरील भागात, हेही महत्त्वाचं असतं. गाठ काखेजवळ, स्तनाच्या बाहेरील बाजूस असेल, तर ती काढून स्तनाचा उरलेला भाग तसाच ठेवणं तुलनेने सोपं असतं. परंतु, गाठ स्तनाग्राच्या मागे किंवा स्तनाच्या मध्यभागी असेल, तर उपचार करणं अधिक कठीण होऊ शकतं," असं डॉ. सेल्वी राधाकृष्णन यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
"काही रुग्णांमध्ये कॅन्सरची गाठ (ट्यूमर) लहान करण्यासाठी शस्त्रक्रियेपूर्वीच केमोथेरपी दिली जाते. त्यामुळे संपूर्ण स्तन न काढता उपचार करता येण्याची शक्यता वाढते," असं डॉ. सेल्वी राधाकृष्णन म्हणाल्या.
आता जगभरात स्तन न काढता, उपचार करण्याच्या शस्त्रक्रियेला मान्यता दिली जात आहे. स्तनाचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर रेडिएशन थेरपी म्हणजेच विकिरण उपचार देण्यासह स्तन वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्था करतात.
अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट यांच्या मते, स्तनाचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांमध्ये स्तन न काढता उपचार करणे आणि संपूर्ण स्तन काढण्याची शस्त्रक्रिया (मॅस्टेक्टॉमी) करणे, या दोन्ही उपचारांनंतर दीर्घकाळ जगण्याच्या शक्यतेत लक्षणीय फरक नसतो.
रुग्णाची प्रकृती आणि कॅन्सरचं स्वरूप यानुसार योग्य ठरत असेल, तर स्तन न काढता उपचार करण्याचा पर्याय निवडता येतो. वैद्यकीयदृष्ट्याही या उपचारपद्धतीला मान्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे "स्तनाचा कॅन्सर झाला की संपूर्ण स्तन काढावाच लागतो, हा समज आता योग्य नाही. कॅन्सरचं निदान किती लवकर होतं, हे महत्त्वाचं आहे. कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला, तर त्यावर मात करण्यासोबतच स्तन वाचवणंही शक्य होऊ शकतं".
शस्त्रक्रियेनंतरही स्तनाचा आकार कसा टिकवता येईल?
"स्तन वाचवणं म्हणजे केवळ कॅन्सरची गाठ काढणं नव्हे," असं स्तनाच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये काम करणाऱ्या प्लास्टिक सर्जन डॉ. मंजुला राव यांनी सांगितलं.
"कॅन्सरची गाठ काढल्यानंतर स्तनात जी पोकळी निर्माण होते, ती पुनर्रचना शस्त्रक्रियेने (रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी) भरून काढता येते. यासाठी स्तनात उरलेल्या ऊतींचा वापर करता येतो किंवा पोटासारख्या शरीराच्या इतर भागांतील ऊती काढून त्या स्तनातील गाठ काढलेल्या जागी बसवता येतात," असं त्यांनी सांगितलं.
डॉ. मंजुला राव यांनी सांगितलं की, ही उपचारपद्धती सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्णांनाच नव्हे, तर तिसऱ्या टप्प्यातील काही रुग्णांनाही उपयोगी ठरू शकते. कॅन्सरची गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळीच स्तनाची पुनर्रचना (ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन) करण्याची शस्त्रक्रियाही करता येऊ शकते.
"या उपचारांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे महिलांच्या शारीरिक स्वरूपात फारसा बदल होत नाही. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, स्वाभिमान आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होते," असं डॉ. मंजुला यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)































