परसोत्तम सोलंकी : मुंबईत 9 गुन्हे दाखल, 'टाडा'अंतर्गत अटक ते गुजरातमधील कोळी समाजाचे 'भाई' बनण्यापर्यंतचा प्रवास

- Author, अर्जुन परमार
- Role, बीबीसी न्यूज गुजरात
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
भाजपचे नेते पबुभा माणेक यांनी अलीकडेच 'गुजरातचा मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने कोळी समाजाचाच असायला हवा' असं विधान केलं. त्यानंतर राज्यात कोळी समाज आणि या समाजातील प्रमुख नेत्यांविषयी चर्चा सुरू झाली आहे.
या चर्चेत सौराष्ट्रातील कोळी समाजाच्या मोठ्या वर्गात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये 'भाई' म्हणून ओळखले जाणारे परसोत्तम सोलंकी यांचे नावही चर्चेत आले आहे.
या निमित्ताने परसोत्तम सोलंकी यांचा कथित गुन्हेगारी भूतकाळ, त्यांचे 'मुंबई कनेक्शन' आणि गुजरातमध्ये कोळी समाजाच्या राजकीय संघटनाचे निमित्त ठरण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास यावरही चर्चा होत आहे.
मुंबईतील कथित गुन्हेगारी भूतकाळ ते गुजरातमधील कोळी समाजाचे 'भाई' बनून सलग सहा वेळा आमदार होण्यापर्यंतचा परसोत्तम सोलंकी यांचा प्रवास जाणून घेऊ.
मुंबईत 'टाडा'अंतर्गत अटक आणि हत्या, खंडणीसह गुन्ह्यांचे आरोप
1995 ते 1999 या काळात 'इंडियन एक्स्प्रेस' समूहाच्या मुंबईस्थित 'समकालीन' या गुजराती दैनिकाचे संपादक म्हणून काम केलेले आणि मुंबईत अनेक वर्षे पत्रकारिता केलेले डॉ. हरी देसाई यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना परसोत्तम सोलंकी यांच्या मुंबईतील वास्तव्याच्या काळातील इतिहासाविषयी माहिती दिली.
ते सांगतात, "समकालीनमध्ये संपादक म्हणून काम करत असताना परसोत्तम सोलंकी यांच्याबद्दल जाणून घेण्याची आणि त्यांच्याविषयी वार्तांकन करण्याची संधी मिळाली.
परसोत्तम यांचे वडील ओधवजी यांचे मुंबईत कॅसेटचे दुकान होते. मात्र, हे दुकान केवळ दाखवण्यासाठी होते, असे म्हणता येईल. हे दुकान ओल्ड नागरदास रोडवर, चिनॉय कॉलेजच्या बाजूला होते. त्याच ठिकाणी त्यांचे घरही होते."

फोटो स्रोत, PARSHOTTAMSOLANKI/FB
1990 च्या दशकाच्या मध्यातील एक प्रसंग आठवून डॉ. हरी देसाई सांगतात, "मी भावनगरमध्ये 'सौराष्ट्र समाचार'च्या तत्कालीन मालकाच्या मुलासोबत बसलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, आज तुमच्या मित्राला भाजप लोकसभेची उमेदवारी देणार आहे. त्यावर मी विचारले, कोण माझा मित्र? त्यावर त्यांनी उत्तर दिले, परसोत्तम सोलंकी."
End of podcast promotion
"हे ऐकून मी आश्चर्याने विचारले, काय सांगता? परसोत्तम तुरुंगातून बाहेर आला? कारण परसोत्तम टेररिस्ट अँड डिसरप्टिव्ह अॅक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) अॅक्ट अर्थात 'टाडा'अंतर्गत दोन वेळा नाशिकच्या तुरुंगात होता. त्यामुळे त्याची प्रतिमा गँगस्टर अशी होती."
"ही बातमी समजल्यानंतर मी स्वतः परसोत्तम यांना फोन केला. बातमीची खातरजमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समकालीनमध्ये पहिल्या पानावर आठ कॉलमची बातमी प्रसिद्ध झाली. तिचे शीर्षक साधारण असे होते, 'मुंबईच्या गँगस्टर परसोत्तमला भाजप आता लोकसभेत पाठवणार.'
डॉ. हरी देसाई पुढे सांगतात, "ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपकडून असा दावा करण्यात आला की, परसोत्तम सोलंकी यांच्याविरोधात कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत. त्यानंतर मी स्वतः परसोत्तम सोलंकी यांना फोन करून त्यांच्याविरोधात किती गुन्हे दाखल आहेत, असे विचारले.
त्यांनी मुंबईत आपल्याविरोधात नऊ गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. त्यांची यादी आम्ही दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली."
डॉ. हरी देसाई सांगतात की, या संपूर्ण प्रकरणानंतर परसोत्तम सोलंकी यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांच्या आठवणीनुसार, या गुन्ह्यांमध्ये हत्येसह गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा समावेश होता.
बीबीसी गुजरातीशी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना मुंबईत अनेक वर्षे काम केलेल्या एका निवृत्त पत्रकाराने सांगितले, "त्या काळात परसोत्तम मुंबईतील आपल्या भागातून नगरसेवकही झाले होते."
हे निवृत्त पत्रकार पुढे सांगतात, "या भागात परसोत्तम सोलंकी यांचा दबदबा होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्यावर दंगलीशी संबंधित गुन्हा दाखल झाला होता. टाडाअंतर्गत त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. मात्र, नंतर त्यांची त्या प्रकरणातून सुटका करण्यात आली."
बीबीसी गुजरातीशी बोलताना परसोत्तम सोलंकी यांचे मित्र चंदुभाई चुडासमा यांनी यापूर्वी सांगितले होते की, "मुंबईत वडिलांच्या हत्येच्या घटनेनंतर परसोत्तम सोलंकी यांना 'भाई' म्हणून ओळखले जाऊ लागले."

फोटो स्रोत, PARSHOTTAMBHAIOSOLANKI/FB
डॉ. हरी देसाई सांगतात, "त्या काळात ओल्ड नागरदास रोडच्या परिसरात एका समाजकंटकाची दहशत होती. तो महिलांचे अपहरण करायचा. परसोत्तम यांनी सहा फूट उंचीच्या या गुंडाला सर्वांसमोर मारहाण केली होती. या घटनेनंतर ते त्या परिसरातील 'हिरो' बनले. पुढे त्यांनी अंधेरी पूर्वमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि नगरसेवकही झाले."
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका वृत्तानुसार, "गुजरातमध्ये येण्यापूर्वीच या 'भाई'ला 'टाडा'अंतर्गत अटक झाली होती. त्यांच्यावर हत्या आणि दंगलीसह सुमारे अर्धा डझन गुन्हे दाखल होते. यापैकी बहुतांश गुन्हे मुंबईत दाखल झाले होते. हे गुन्हे बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेल्या दंगलींशी संबंधित होते."
'इकॉनॉमिक टाइम्स'च्या एका वृत्तात म्हटले आहे की, "मुंबईत परसोत्तम सोलंकी यांच्याविरोधात आठ गुन्हे दाखल होते. त्यामध्ये हत्येचा प्रयत्न आणि दंगलीशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश होता. मात्र, नंतर हे गुन्हे मागे घेण्यात आले."
परसोत्तम सोलंकी यांच्या भूतकाळाविषयी सांगताना ते पुढे म्हणतात, "त्या काळात परसोत्तम सोलंकी यांच्यावर हत्या, दंगल आणि खंडणी वसूल करण्याचे गुन्हेही दाखल होते. मात्र, या परिसरात त्यांची प्रतिमा रॉबिनहूडसारखी होती. पण माझ्या मते, अशी प्रतिमा टिकवून ठेवणे ही त्यांच्यासाठी एक प्रकारची अपरिहार्य बाब होती."
डॉ. हरी देसाई सांगतात की, 1992-93 मधील मुंबई दंगलींच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती बी. एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या आयोगाने 1998 मध्ये सादर केलेल्या 'श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालातही सोलंकी यांचे नाव आले होते.'
जेव्हा मुंबईतून गुजरातला आले...
1996 च्या लोकसभा निवडणुकीत परसोत्तम सोलंकी यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले माजी खासदार आणि गुजरात भाजपचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंह राणा त्यांच्या मुंबईतील इतिहासाविषयी सांगतात, "जोगेश्वरी येथे झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये ते 'भाई' म्हणून प्रस्थापित झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रात श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल आल्यानंतर तेथील परिस्थिती पाहता आपले कार्यक्षेत्र बदलण्याची गरज असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे ते भावनगरला आले."
परसोत्तम सोलंकी यांच्यासोबत 15 वर्षे खजिनदार म्हणून काम केलेले मनालाल सोलंकी सांगतात, "परसोत्तमभाई सुरुवातीला मुंबईतून गुजरातमध्ये आले, तेव्हा लोकांच्या मनात अशी प्रतिमा होती की मुंबईतून एखादा मोठा गुंड आला आहे. मात्र, हळूहळू लोकांशी त्यांचा संपर्क वाढला आणि हा गैरसमज दूर झाला."
"भावनगरच्या ग्रामीण भागात परसोत्तमभाई येण्यापूर्वी कोळी समाजातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या आगमनानंतर या अडचणी दूर झाल्या. त्यामुळे आजही येथील लोक परसोत्तमभाई यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी प्रचार केला किंवा नाही, सभा घेतली किंवा नाही, तरीही येथील लोक त्यांच्यासोबत आहेत."
चंदुभाई चुडासमा पुढे सांगतात, "टाडाच्या प्रकरणात त्यांना चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले होते. ते मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. गरिबांना आर्थिक मदत करताना मी त्यांना स्वतः पाहिले आहे."
डॉ. हरी देसाई आठवण सांगतात, "परसोत्तम यांच्याविरोधात ज्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते, तिथे जाऊन प्रकरणांची माहिती पडताळण्याचे काम मी एका वार्ताहराला दिले होते. त्याची भीती दूर करण्यासाठी मी त्याला सांगितले होते की, परसोत्तम स्वभावाने खूप चांगला माणूस आहे. त्यांची बाहुबली अशी प्रतिमा असली तरी ते काही करणार नाहीत."
परसोत्तम सोलंकी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू सांगताना ते म्हणतात, "परसोत्तम स्वभावाने साधे माणूस आहेत. ते सामाजिक कामेही करतात. चमारडी गावात ते सर्व समाजांसाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करत असत. त्यांचा एक विशेष गुण आहे. त्यांच्यासोबत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला ते स्पष्ट धमकी देतात की, कोणत्याही मुलीची छेड काढायची नाही."
परसोत्तम सोलंकी यांची राजकीय कारकीर्द
परसोत्तम सोलंकी यांनी 1996 मध्ये भावनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तानुसार, 1997 मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले.
1998 मध्ये ते घोघा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. (भावनगर ग्रामीण मतदारसंघाला यापूर्वी घोघा मतदारसंघ म्हणून ओळखले जात असे.) मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी 2012, 2017 आणि 2022 मध्ये भावनगर ग्रामीणमधून निवडणूक जिंकली. 2022 ची निवडणूक जिंकल्यानंतर ते सहाव्यांदा विधानसभेचे सदस्य बनले.
2007 मध्ये परसोत्तम सोलंकी यांना पहिल्यांदा मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले.
केशुभाई पटेल, नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल, विजय रुपाणी आणि भूपेंद्र पटेल यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळात परसोत्तम सोलंकी यांना स्थान मिळाले.
भावनगर, अमरेली आणि सौराष्ट्रातील समुद्रकिनारी असलेल्या कोळीबहुल भागांतील मतदारांवर परसोत्तम सोलंकी यांचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे, 2012 मध्ये भावनगर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून प्रत्येक निवडणुकीत परसोत्तम सोलंकी विजयी झाले आहेत.
राजेंद्रसिंह राणा बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगतात, "1996 च्या लोकसभा निवडणुकीत मी भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. माझ्याविरोधात परसोत्तमभाई सोलंकी अपक्ष उमेदवार म्हणून 'फावडे' या निवडणूक चिन्हावर मुंबईच्या शैलीत प्रचार करत होते. त्यावेळी ते मुंबईहून आले होते."
"घोघा, तळाजा, सिहोर यांसारख्या भागांत कोळी समाजावर त्यांचे मजबूत वर्चस्व होते. त्यावेळी काँग्रेसचे दिलीपसिंहजी गोहिल आमदार होते. त्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार म्हणून मी विजयी झालो. मात्र, परसोत्तमभाई दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना माझ्यापेक्षा केवळ 7,500 मते कमी मिळाली होती."
'सौराष्ट्र समाचार'चे कार्यकारी संपादक तारक शाह सांगतात, "परसोत्तम सोलंकी मुंबईहून भावनगरला आले, त्या काळात एका वर्षभरात मी पत्रकार म्हणून त्यांचे निरीक्षण केले होते. त्यावेळी भावनगरच्या गोहिलवाड परिसरात काही लोकांची दादागिरी चालत असे. त्यांच्या विरोधात कोळी समाजाला संरक्षण देण्याचे काम परसोत्तम सोलंकी यांनी केले. कोळी समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी आणि समस्यांसाठी ते पुढे आले. पोलीस प्रकरण असो किंवा न्यायालयाशी संबंधित कोणतीही बाब असो, ते कोळी समाजाच्या मदतीला धावून जात असत."
राजुलाचे ज्येष्ठ पत्रकार जयदेव वरू सांगतात की, परसोत्तम सोलंकी यांना दिव्येश आणि हिरन अशी दोन मुले आणि एक मुलगी आहे. आगामी निवडणुकीत ते दिव्येश यांना पुढे आणू शकतात.
त्यांच्या मते, "भाजपने परसोत्तम आणि हिरा सोलंकी यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नेत्यांइतकी लोकप्रियता अन्य कोणालाही मिळवता आलेली नाही."
'मुंबई स्टाइल'ने निवडणूक प्रचार
माजी खासदार राजेंद्रसिंह राणा बीबीसीशी बोलताना सांगतात, "1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी केलेला प्रचार अनोखा होता. प्रचारादरम्यान 'रूपक चौक' नावाच्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली होती की, जो कोणी डोक्यावरील केस काढून टक्कल करेल आणि त्या टक्कलावर फावड्याचे चित्र काढेल, त्याला त्या काळात 500 रुपये बक्षीस दिले जाईल. याचे कारण म्हणजे त्यांचे निवडणूक चिन्ह 'फावडे' होते. अखेरीस आम्ही पाहिले की, प्रचारादरम्यान गावोगावी लोकांनी टक्कल करून त्यावर फावड्याचे चित्र काढले होते. अशा प्रकारे स्थानिक भागात प्रचाराची ही एक नवी शैली बनली होती."
याशिवाय राजेंद्रसिंह सांगतात, "आम्ही अत्यंत चांगल्या वातावरणात निवडणूक लढवली होती. कधीही वाद किंवा बाचाबाची झाली नाही. प्रतिस्पर्धी असूनही आमचे संबंध खूप चांगले होते आणि आजही आहेत."

फोटो स्रोत, PARSHOTTAMBHAISOLANKI/FB
राजेंद्रसिंह राणा सांगतात, "परसोत्तमभाई आल्यानंतर कोळी समाजाचे राजकीय संघटन झाले. 1998 मध्ये केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना भाजपच्या संघटनेच्या एका बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती. राजकीय समीकरणांच्या दृष्टीने भाजपची कोळी समाजावर जवळजवळ कोणतीही पकड नव्हती. त्यावेळी कोळी समाजाची ओळख प्रामुख्याने शेतमजूर अशी होती. परसोत्तम सोलंकी आल्यानंतर समाजात राजकीय जागृती निर्माण झाली."
"परसोत्तम सोलंकी यांच्या माध्यमातून कोळी समाजाच्या राजकीय समीकरणांचा भाजपला फायदा होईल, या उद्देशाने त्यांना पक्षात सामील करून घेण्यात आले. त्यांच्या आगमनानंतर कोळी समाजाची मते भाजपकडे वळली. या बैठकीत घेतलेला निर्णय यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले. विशेषतः सौराष्ट्राच्या संदर्भात आम्ही एक राजकीय संदेश देऊ शकलो. त्यानंतरच्या निवडणुकांमध्येही त्यांच्या नावाचा प्रभाव कायम राहिला, जो आजही दिसून येतो."
उल्लेखनीय म्हणजे, 2013 मध्ये परसोत्तम सोलंकी यांच्यावर 400 कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय घोटाळ्याचा आरोप झाला होता. मात्र, परसोत्तम सोलंकी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका वृत्तानुसार, या प्रकरणात परसोत्तम सोलंकी यांच्याशिवाय माजी कृषिमंत्री दिलीप संघानी आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे माजी अधिकारी व्हिक्टर खराडी, कमलेश टाबियार, चंद्रिका शाह आणि प्रद्युम्न भट्ट यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप होते.
सोलंकी यांच्यावर निर्धारित प्रक्रियेचे पालन न करता 58 जलाशयांमध्ये मासेमारीचे कंत्राट दिल्याचा आरोप होता. हे सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























