'मुली 18 वर्षांच्या होण्याची वाट पाहत होते'; मॅकडोनाल्ड्समधील कर्मचाऱ्यांनी सांगितला धक्कादायक अनुभव

- Author, नूर नानजी आणि झो कॉनवे
- Role, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
मॅकडोनाल्ड्सच्या एका माजी कर्मचाऱ्याने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. ग्राहक तिच्याबद्दल अश्लील बोलत असताना मॅनेजरने तिची मदत केली नाही, असं तिने म्हटलं आहे.
"कमी वयाच्या कर्मचाऱ्यांशी वागण्याची पद्धत कंपनीने बदलावी", अशी मागणीही तिने केली आहे.
होपने 2023 मध्ये वेस्ट मिडलँड्समधील मॅकडोनाल्ड्सच्या एका शाखेत काम केलं होतं.
तिने बीबीसी न्यूजला सांगितलं की, तिथे काम करणारे काही वरिष्ठ सहकारी 16 आणि 17 वर्षांच्या मुलींकडे वाईट नजरेनं पाहत असत.
त्या मुली 18 वर्षांच्या झाल्यावर त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त करताना ऐकलं होतं.
मॅकडोनाल्ड्सविरोधात भेदभावाचा खटला दाखल करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांमध्ये होपचाही समावेश आहे.
या आठवड्यात एका न्यायाधीशांनी कंपनीची याचिका फेटाळली. हे आरोप सुरुवातीलाच फेटाळून लावावेत, अशी मागणी मॅकडोनाल्ड्सने या याचिकेमध्ये केली होती.
होपने न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मॅकडोनाल्ड्सने म्हटलं आहे की, आमच्या रेस्टॉरंट्स आणि कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानाने वागणूक मिळेल, असं वातावरण निर्माण करणं ही आमची प्राथमिकता आहे.
'मॅनेजर म्हणाला, सहन कर'
2023 मध्ये बीबीसीनच्या एका तपासानंतर या प्रकरणाला पुन्हा उजाळा मिळाला आहे. या तपासात मॅकडोनाल्ड्समध्ये काम करणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या काही कर्मचाऱ्यांना लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं.
गेल्या वर्षीही मॅकडोनाल्ड्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना अजूनही लैंगिक छळ आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागत असल्याचे आम्हाला सांगितलं होतं.
22 वर्षीय होपने सांगितलं की, ती मॅकडोनाल्ड्सच्या ज्या शाखेत काम करत होती, तिथे अनेकदा अश्लील शेरेबाजी केली जायची. तिच्या मते, तिथलं वातावरण 'अत्यंत वाईट' होतं.
तिने एका घटनेबद्दल सांगितलं. एकदा एक मॅनेजर तिच्या मागून आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
होपने सांगितलं की, त्यानंतर तो मॅनेजर दिसला की ती लगेच तिथून दुसरीकडे निघून जात असत. त्याच्यापासून दूर राहण्याचा ती प्रयत्न करत असत.
होप म्हणाली, "तिथून निघून जाणंच मला माझ्यासाठी योग्य वाटलं."
होपने आणखी एका घटनेबद्दल सांगितलं. तिच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या शिफ्टमध्ये दोन ग्राहकांनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली. ते तिच्याशी एखाद्या वस्तूप्रमाणे वागत होते. यावेळी एकही मॅनेजर तिला यापासून वाचवू शकला नाही.
होपने सांगितलं की, तिने मॅनेजरला घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण त्यावर मॅनेजरने, "हे सहन कर आणि त्याचा सामना कर," असं उत्तर दिलं.
मात्र, होपला सर्वाधिक चिंता तरुण कर्मचाऱ्यांची होती. तिच्या म्हणण्यानुसार, कामाच्या ठिकाणी या कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली जात नव्हती आणि त्यांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष दिलं जात नव्हतं.
होप म्हणाली, "तिथे इतर काही कर्मचारी या अल्पवयीन मुली 18 वर्षांच्या होण्याची वाट पाहत होते. तिथलं वातावरण खूपच वाईट होतं. काही जण म्हणायचे, 'ती 18 वर्षांची झाल्यावर हे बेकायदा ठरणार नाही.' तिथल्या अनेक कर्मचाऱ्यांची अशीच मानसिकता होती."
ती म्हणते, "तुम्हाला असं का करावंसं वाटतं? 18 वर्षांचं झाल्यानंतरही ते मुलंच असतात."
कायदेशीर कारवाई
मॅकडोनाल्ड्सचे शेकडो आजी-माजी कर्मचारी कंपनीविरोधात भेदभावाचा खटला लढत आहेत.
फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्ड्सने या तक्रारी फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला होता.
परंतु, या आठवड्यात लंडन सेंट्रल एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलचे न्यायाधीश ग्लेनी यांनी 450 प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
या सर्व प्रकरणांची सुनावणी आता एप्रिल महिन्यामध्ये एम्प्लॉयमेंट ट्रिब्युनलमध्ये होण्याची अपेक्षा आहे.
बीबीसीला समजलं आहे की, ही प्रकरणं लैंगिक छळाची नसून अप्रत्यक्ष भेदभावाशी संबंधित आहेत.
होपने बीबीसीला सांगितलं की, पैशांसाठी ती या कायदेशीर लढाईत सहभागी झालेली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
या प्रकरणात आपल्याला कोणती नुकसानभरपाई मिळेल की नाही, हेही माहीत नसल्याचं तिने सांगितलं.
"कंपनीने कमी वयाच्या कर्मचाऱ्यांशी वागण्याची पद्धत बदलावी", हा त्यामागचा तिचा उद्देश आहे.
होप म्हणाली, "यामुळे कंपनी तक्रारींकडे पाहण्याचा आणि त्यावर कारवाई करण्याचा दृष्टिकोन बदलेल. कंपनीच्या अंतर्गत कामकाजातही बदल होतील. त्यामुळे पहिली नोकरी करणाऱ्या मुला-मुलींना काम करणं अधिक सोपं होईल. कामाचं ठिकाणही अधिक सुरक्षित बनेल. आजच्या काळात तरुणांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तिची पैशांत किंमत करता येणार नाही."
तक्रारी फेटाळून लावून मॅकडोनाल्ड्स 'महत्त्वाचा निर्णय टाळण्याचा' प्रयत्न करत होती, असा आरोप होपने केला.
होप म्हणाली, "न्यायाधीशांनी योग्य निर्णय दिला. त्यांनी कंपनीला स्पष्टपणे सांगितलं की, 'नाही, आम्ही असं होऊ देणार नाही.'"
हे दावे ली डे या कायदेविषयक संस्थेनं केले आहेत. ही संस्था मॅकडोनाल्ड्सच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढा देत आहे.
या प्रकरणांमध्ये कामाच्या ठिकाणी तरुण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
ब्रिटनमधील मॅकडोनाल्ड्सच्या अनेक रेस्टॉरंटमध्ये छळ आणि भेदभाव होत असल्याचे आरोप झाल्यानंतर ही प्रकरणं समोर आली आहेत.
ली डे या कायदेविषयक संस्थेतील भागीदार किरण डौरका यांनी बीबीसीला सांगितलं, "न्यायाधीशांनी या सर्व प्रकरणांची सविस्तर सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा केला आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणांची सुनावणी होणं अत्यंत गरजेचं आहे."
मॅकडोनाल्ड्सच्या प्रवक्त्याने सांगितलं की, कंपनीविरोधात न्यायालयात खटला सुरू असल्याने ते कोणत्याही विशिष्ट प्रकरणावर भाष्य करू शकत नाही.
एका निवेदनात कंपनीने म्हटलं आहे की, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची पावलं उचलली आहेत. कर्मचाऱ्यांप्रती असलेली बांधिलकी जपण्यासाठी हे प्रयत्न सुरूच राहतील.
प्रवक्त्याने सांगितलं, "कोणत्याही प्रकारचा छळ, भेदभाव किंवा अयोग्य वर्तणूक खपवून घेतली जात नाही. आमच्या रेस्टॉरंट्स आणि कार्यालयांमध्ये अशा गोष्टींना जागा नाही. बाहेरील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आम्ही आणि आमच्या फ्रँचायझी भागीदारांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत, असा आम्हाला विश्वास आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























