कुत्र्यांच्या पिंजऱ्यात जिवंत पुरले 11 महिन्यांचे बाळ; रडण्याचा आवाज ऐकताच बचाव पथकाची धावपळ

Caption- अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या वडिलांनी त्याला कुत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिंजऱ्यात जिवंत पुरलं होतं.
फोटो कॅप्शन, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाळाच्या वडिलांनी त्याला कुत्र्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या पिंजऱ्यात जिवंत पुरलं होतं.
    • Author, मॅडेलिन हॅल्पर्ट
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे एका 11 महिन्यांच्या बाळाला त्याच्याच वडिलांनी पेटीत (क्रेट) घालून जिवंत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या या बाळाला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

लेक्सिंग्टन काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोआ शार्प हा मुलगा सोमवारपासून (9 नोव्हेंबर) बेपत्ता होता.

त्याचे वडील 25 वर्षीय मायकेल कोमर त्याला सोबत घेऊन गेले होते. सोमवारी सायंकाळी चोरीच्या आरोपाखाली कोमरला अटक करण्यात आली. परंतु, त्यावेळी त्याचा मुलगा त्याच्यासोबत नव्हता.

लेक्सिंग्टन काउंटीचे शेरीफ जे कून यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मंगळवारी हे बाळ त्याच्या वडिलांच्या घरापासून काही अंतरावर जिवंत पुरलेल्या अवस्थेत आढळून आलं. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. ते 11 महिन्यांचं बाळ 24 तासांपासून त्याच ठिकाणी असावं, असा अंदाज आहे.

शेरीफ कून यांनी सांगितलं की, सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते लवकरच पूर्णपणे बरं होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

वडिलांवर आणखी कोणते गुन्हे दाखल करायचे, याचा निर्णय पोलीस घेत आहेत. कोआच्या वडिलांनी त्याला आईच्या घरातून नेलं. त्यानंतर सोमवारी त्याचा शोध सुरू झाला.

शेरीफ कून यांनी सांगितलं की, कोमरची आई बाळाची काळजी घेत होती. त्यावेळी तिने काही वेळासाठी बाळाला त्याच्याकडे सोपवलं होतं. मात्र, संधी मिळताच कोमर बाळाला घेऊन अचानक तिथून निघून गेला.

जंगलात असे सापडले बाळ

कोमर अनेक ठिकाणी बाळाशिवाय फिरताना दिसला. त्यानंतर लेक्सिंग्टन काउंटीमध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यावेळीही कोआ त्याच्यासोबत नव्हता. यानंतर बाळाचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 100 कर्मचाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले, अशी माहिती शेरीफ यांनी दिली.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शेरीफ यांनी सांगितलं की, मुलगा कुठे आहे, असं कोमरला विचारलं असता त्याने याबाबत काहीच सांगितलं नाही.

शेरीफ कोन यांनी सांगितलं की, बचाव पथकाने कोमरच्या घराजवळील जंगलात शोध घेतला. तिथे त्यांना 'नुकतीच खोदलेली (उकरलेली) माती' दिसली. त्यांनी ती माती बाजूला करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. शेरीफ यांनी सांगितलं की, 'तो आवाज ऐकून सर्वांना खूप आनंद झाला'.

कून म्हणाले, "त्यानंतर बाळाला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सर्वांनी धावपळ सुरू केली. प्रत्येक जण त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता."

ते पुढे म्हणाले की, त्या पिंजऱ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता. त्यामुळे पिंजऱ्यात हवा खेळती राहिली असावी आणि त्यामुळेच कोआ इतका वेळ जिवंत राहू शकला. तसेच, थंड हवेमुळे त्याला जास्त उकडलं नसेल.

कून यांनी सांगितलं की, तो कुत्र्यांचा पिंजरा साधारण 2 फूट बाय 2 फूट आकाराचा असावा. तो जमिनीत ठेवल्यानंतर त्यावर किमान एक फूट माती टाकण्यात आली असावी, असा त्यांचा अंदाज आहे.

'बाळाच्या आई-वडिलांमध्ये काही वाद होते', असे शेरीफ यांनी सांगितलं. न्यायालयातील नोंदीनुसार, कोमरने यापूर्वी घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात आपला गुन्हा कबूल केला होता.

कोमरची आई पॅट्रिशिया कोमर यांनी एनबीसी न्यूजला सांगितलं की, कोआचा ताबा त्याच्या आईकडे होता. परंतु, मुलगा बाळाची काळजी घेत असताना त्या स्वतःही तिथे लक्ष ठेवून होत्या. यापूर्वीही त्यांचा मुलगा कोणाच्याही देखरेखीशिवाय कोआची काळजी घेत होता. त्यावेळी कोणतीही अडचण आली नव्हती, असे त्यांनी सांगितलं.

पॅट्रिशिया कोमर म्हणाल्या, "खरं सांगायचं तर, मी त्याची आई आहे. पण तो असं काही करेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)