'हातात बेड्या घाला, तोंडाला पट्टी बांधा, पण माझ्या देशात पाठवा'; 3 वर्षांपासून 'कुक आयलंड्स'वर अडकलेल्या महिलेची गोष्ट

रुचिरा रणसिंघा
    • Author, आयेशा परेरा
    • Role, एशिया डिजिटल एडिटर
    • Author, दिनुक हेवाविथरणा
    • Role, बीबीसी सिंहला
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

रुचिरा रणसिंघा यांनी जवळपास 10 वर्षांपूर्वी श्रीलंका सोडलं. त्यावेळी आपल्याला दक्षिण पॅसिफिक महासागरातल्या एका छोट्याशा बेटावर अडकून पडावं लागेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.

50 वर्षांच्या रणसिंघा गेल्या 3 वर्षांपासून कुक आयलंड्समध्ये अडकून पडल्या आहेत,

आपल्याला काहीही करून श्रीलंकेला परत जायचं असल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं. त्यासाठी अगदी हातात बेड्या घालून, तोंडाला पट्टी बांधून जाण्याचीही त्यांची तयारी आहे.

रणसिंघा यांना न्यूझीलंडमध्ये स्थायिक व्हायचे होते.

त्यांनी तिथे आश्रय मागितला. त्यानंतर एका इमिग्रेशन सल्लागाराने त्यांना 'वर्क व्हिसा'साठी अर्ज करण्याच्या उद्देशाने काही काळ देशाबाहेर जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्या कुक आयलंड्सला गेल्या. मात्र, तिथं त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याच वेळी, न्यूझीलंड सोडल्यामुळे त्यांच्या सध्याच्या आश्रयाशी संबंधित व्हिसाच्या अटींचंही उल्लंघन झालं.

श्रीलंकेला विमान प्रवास करून जाण्यासाठी त्यांना ट्रान्झिट व्हिसा गरजेचा आहे. पण न्यूझीलंड त्यांना तो देत नाहीये.

ऑस्ट्रेलियानेही त्यांना व्हिसा द्यायला नकार दिला आहे. कुक आयलंड्समधून आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करून त्या जाऊ शकतील अशी इतर दोनच ठिकाणं आहेत – ताहिती आणि हवाई. मात्र, या ठिकाणांसाठी व्हिसाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांना न्यूझीलंडमध्ये जाऊन बायोमेट्रिक माहिती द्यावी लागेल.

त्यामुळे सध्या तरी कुक आयलंड्समधून बाहेर पडण्याचा कोणताही व्यवहार्य मार्ग त्यांच्याकडे उरलेला नाही.

"माझ्या एकुलत्या एका मुलाचं लग्न नोव्हेंबरमध्ये आहे. त्याच्या लग्नाला मला जायचं आहे. माझ्यासोबत जे काही घडलंय, त्यामुळे माझी आई काळजीत आहे. तिला सतत रुग्णालयात दाखल करावं लागत आहे," हे सांगताना त्यांना अश्रू अनावर होत होते.

'मी ते जे सांगतील ते करेन, मला फक्त घरी जायचं आहे', त्या म्हणतात.

नेमकं काय घडलं?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

व्यवसायात नुकसान झाल्यामुळे रणसिंघा यांना आपला छोटासा टी-शर्टचा कारखाना बंद करावा लागला. कर्जाची परतफेड करणं कठीण झाल्यामुळे 2018 मध्ये त्या श्रीलंकेतून बाहेर पडल्या. त्या हाँगकाँगला गेल्या. तिथे त्या वृद्ध व्यक्ती तसंच लहान मुलांच्या केअरटेकर म्हणून काम करायला लागल्या.

त्यांच्यावर प्रचंड आर्थिक ताण असल्याचं त्यांच्या भावाने बीबीसी सिंहलाला सांगितले. त्यांचे पती अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. 7 वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितले.

डिसेंबर 2022 मध्ये रणसिंघा न्यूझीलंडला गेल्या. तिथे 2 महिन्यांच्या व्हिजिट व्हिसावर त्या आपल्या चुलत भावासोबत राहत होत्या, असे त्या सांगतात. त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्याची वेळ जवळ आली तेव्हा एका इमिग्रेशन सल्लागाराने त्यांना न्यूझीलंडमध्येच राहण्याचा मार्ग सांगितला, त्यासाठी मदत केली. श्रीलंकेतील कर्जदारांकडून आपल्याला धमक्या मिळत असल्याचे कारण देत त्यांनी न्यूझीलंडमध्ये आश्रयासाठी अर्ज केला.

त्यांना आश्रय मागणाऱ्या व्यक्तींसाठी असलेला 'ओपन वर्क व्हिसा' मंजूर करण्यात आला. या व्हिसामुळे त्यांना वर्षभरासाठी काम करता येणार होतं. त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. या रेस्टॉरंटने त्यांना रोजगाराच्या आधारावर व्हिसा (Employment Visa) मिळवून देण्यासाठी स्पॉन्सरशिपची तयारी दर्शवली. त्यामुळे आपल्याला आता स्थैर्य मिळेल, असं त्यांना वाटलं होतं.

मात्र, न्यूझीलंडमध्ये आश्रयासाठीच्या अर्जावर प्रक्रिया सुरू असताना आश्रय मागणाऱ्या व्यक्तिंना इतर व्हिसासाठी अर्ज करता येत नाही. त्यामुळे त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आला.

नकाशा

त्याच वेळी त्यांनी इमिग्रेशन अँड सेक्रेटरियल सर्व्हिसेस या कंपनीशी संपर्क साधला. परदेशात गेल्यानंतर रोजगाराच्या व्हिसासाठी नव्याने अर्ज करता येईल, असं या कंपनीने आपल्याला सांगितल्याचा दावा रणसिंघा करतात. बीबीसीला त्यांनी यासंबंधी कंपनीसोबतचं ईमेलद्वारे झालेलं संभाषणही दाखवलं. रणसिंघा यांनी देश सोडल्यानंतर लगेचच व्हिसाची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं या कंपनीच्या व्यवस्थापिका सिल्व्हियान गॅलंट यांनी सांगितलं होतं.

त्यामुळे व्हिसाच्या अर्जाची प्रक्रिया सुरू असताना काही काळासाठी त्यांनी कुक आयलंड्सला जाण्याचे ठरवले.

मात्र, त्यांचा हा निर्णय अतिशय चुकीचा आणि अंगलट येणारा ठरला.

कुक आयलंड्स हे सुंदर समुद्रकिनारे आणि ज्वालामुखीच्या शिखरांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, रुचिरा रणसिंघा यांना नाईलाजाने तिथे राहावं लागत आहे.

त्यांचा रोजगाराच्या व्हिसासाठीचा अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. तसंच न्यूझीलंड सोडल्यामुळे त्यांनी त्यांच्या सध्याच्या व्हिसाच्या (आश्रयासाठीचा व्हिसा) अटींचे उल्लंघन केले होते. यापुढे त्यांना कोणताही व्हिसा दिला जाणार नाही, असं न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

कुक आयलंड्स

रणसिंघा यांच्या वतीने अनेक प्रयत्न केल्याचा दावा गॅलंट यांनी केला. न्यूझीलंडचे तत्कालीन इमिग्रेशन मंत्री ख्रिस पेंक यांच्यासह काही राजकारण्यांना त्यांनी पत्रही लिहिलं होतं. मात्र, ही परिस्थिती आपल्याच चुकीमुळे उद्भवल्याचंही त्यांनी मान्य केलं.

आता आपण यापुढे काहीही करू शकत नसल्याचं गॅलंय यांनी सांगितल्याचं रणसिंघा यांनी म्हटलं आहे.

"घरी परत जाणेच तुमच्यासाठी योग्य ठरेल, असं त्यांनी मला सांगितलं. तिथं (कुक आयलंड्समध्ये) राहण्याचं आता काहीच कारण नव्हतं. त्यामुळे मीही घरी जायला तयार झाले."

मात्र, श्रीलंकेला जाण्याचे एअर न्यूझीलंडचे तिकीट हातात घेऊन त्या विमानतळावर पोहोचल्या, तेव्हा न्यूझीलंडचा ट्रान्झिट व्हिसा असल्याशिवाय त्यांना विमानात चढता येणार नसल्याचं सांगण्यात आलं.

न्यूझीलंडच्या ट्रान्झिट व्हिसासाठी त्यांनी केलेले तीनही अर्ज फेटाळण्यात आले. आपण न्यूझीलंडमधून निघून जाऊ, याबाबत खात्री वाटत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियाच्या ट्रान्झिट व्हिसासाठी केलेले 4 अर्जही फेटाळण्यात आले.

एका अर्जाला नकार देताना न्यूझीलंडने त्यांना प्रवासाचे अन्य मार्ग शोधण्याचा सल्ला दिला. मात्र, हवाई आणि फ्रेंच पॉलिनेशियातील ताहितीने व्हिसाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी बायोमेट्रिक माहिती देणं आवश्यक असल्याचं त्यांना सांगितले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष न्यूझीलंडमध्येच जावे लागणार होते.

प्रवासाचे पर्यायी मार्ग शोधण्यासाठी केलेले प्रयत्न, मुलाचं लग्न आणि आईची खालावलेली प्रकृती या सर्व गोष्टींचा तपशील देऊन त्यांनी न्यूझीलंडकडे केलेला सर्वात अलीकडचा अर्जही फेटाळण्यात आला आहे.

"तिकिटांवर माझे खूप पैसे खर्च झाले आहेत. 4 वर्षांपासून मी व्हिसासाठी एकापाठोपाठ एक अर्ज करत आहे. पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही," हे सांगताना त्यांना रडू कोसळलं.

ऑकलंडपासून अवघ्या 4 तासांच्या अंतरावर असलेल्या या बेटावर वाळूचे विस्तीर्ण किनारे आणि ज्वालामुखी शिखरं आहेत. रणसिंघा मात्र या ठिकाणी अनिच्छेनेच राहात आहेत.

आपल्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या इतरांपेक्षा आपलं नशीब चांगलं असल्याचं त्या सांगतात. हॉटेलने त्यांना कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानात मोफत राहण्याची परवानगी दिली आहे. तसंच, स्थानिक लोक त्यांना अन्न आणि कपडे देऊन मदत करत आहेत.

हॉटेलच्या एका संचालकाने तर त्यांना शिवणयंत्रही भेट दिले. त्यामुळे त्यांना थोडेफार पैसे कमावता येत असल्याचं त्या सांगतात.

"मी काहीतरी चांगलं कामं केलं असेल, असं माझी आई मला नेहमीच सांगते. त्यामुळेच लोक माझ्याशी इतक्या चांगुलपणाने वागतात अशा ठिकाणी मला राहायला मिळतंय," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

मात्र, या मदतीमुळेही आपण एका ठिकाणी अडकून पडलो आहोत, ही भावना काही कमी होत नाही.

'माझ्या सोबत काही वाईट घडेल अशी भीती'

या परिस्थितीमुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं रणसिंघा सांगतात.

आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल, अशी भीती वाटत असल्याचं त्या सांगतात.

ऑकलंडमधील इमिग्रेशनविषयीच्या कायद्यांचे तज्ज्ञ अॅलिस्टर मॅक्लिमॉन्ट म्हणतात की, त्यांच्या या परिस्थितीवर नेमका काय उपाय आहे, हे मलाही माहीत नाही.

पण त्यांच्या मते रणसिंघा यांना 'अत्यंत चुकीचा सल्ला' देण्यात आला होता. असा सल्ला एखादा खरा इमिग्रेशन वकील देईल याची शक्यता नाही.

लोकांना अर्ज दाखल करण्यासाठी पैसे आकारणाऱ्या, मात्र त्यातील संभाव्य धोक्यांची पूर्ण माहिती नसलेल्या 'तथाकथित इमिग्रेशन सल्लागारां'ची एक मोठी इंडस्ट्रीच तयार झाल्याचं ते सांगतात.

'इमिग्रेशन अँड सेक्रेटरियल सर्व्हिसेस' या संस्थेला फी म्हणून हजारो न्यूझीलंड डॉलर दिल्याचं रणसिंघा सांगतात.

रुचिरा रणसिंघा

बीबीसीने गॅलंट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

न्यूझीलंडचे अधिकारी रणसिंघा यांना ट्रान्झिट व्हिसा देणार नाहीत, असं मॅक्लिमॉन्ट यांचं मत आहे. रणसिंघा यांनी श्रीलंकेत आपला जीव धोक्यात असल्याचं सांगत आश्रयासाठी (Asylum) अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांचा श्रीलंकेत परतण्याचा कोणताही इरादा नसल्याचं न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांना वाटतं, असं मॅक्लिमॉन्ट यांना वाटतं.

न्यूझीलंड ऑस्ट्रेलियासोबत समन्वयाने काम करतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाही त्यांना आपल्या देशातून प्रवास करू देण्याचा धोका पत्करणार नसल्याचं मॅक्लिमॉन्ट म्हणतात. फ्रान्स आणि अमेरिका यांचाही याबाबत असाच दृष्टिकोन असण्याची शक्यता आहे.

ते म्हणतात, "त्यांना इथून बाहेर पडायचे असेल, तर त्यांना कोणत्या ना कोणत्या देशातून ट्रान्झिट करावे लागेल. मात्र, असा धोका पत्करायला कोणताही देश तयार होणार नाही."

इमिग्रेशन न्यूझीलंडने बीबीसीशी बोलताना म्हटलं की, रणसिंघा यांनी ट्रान्झिट व्हिसासाठी अनेकदा अर्ज केले होते. मात्र, न्यूझीलंडमधून ट्रान्झिट करण्याचा त्यांचा हेतू खरा आहे, याबद्दल आमचं समाधान झालं नाही," असं सांगत त्यांचे सर्व अर्ज फेटाळण्यात आले.

हातात बेड्या घालून आणि पोलिसांच्या सुरक्षेत प्रवास करण्याचीही रणसिंघा यांची तयारी होती. तरीही त्यांना ट्रान्झिट व्हिसा का दिला जाऊ शकत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, इमिग्रेशन मंत्र्यांच्या कार्यालयातील एका प्रतिनिधीने सांगितले की, अशा उपाययोजनांमुळे संबंधित व्यक्तीला आश्रयासाठी अर्ज करण्यापासून रोखता येत नाही.

ऑस्ट्रेलियाच्या गृह मंत्रालयाने वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, ऑस्ट्रेलियातून प्रवास करणाऱ्या कोणत्याही परदेशी नागरिकाने 'मायग्रेशन ॲक्ट 1958' आणि 'मायग्रेशन रेग्युलेशन्स 1994' मधील अटींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान, रणसिंघा यांना मदत करता येईल का, हे पाहण्यासाठी त्यांचे कुटुंबीय श्रीलंका सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

"आम्ही शक्य ते सर्व मार्ग वापरून पाहिले आहेत, पण अजून तरी यातून काहीही मार्ग निघालेला नाही," असे त्यांचे भाऊ सांगतात.

श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बीबीसीला सांगितलं, "कुक आयलंड्समधून त्यांना श्रीलंकेत परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. न्यूझीलंडमधील वेलिंग्टन इथं असलेल्या श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयातील अधिकारी तसंच न्यूझीलंडमधील संबंधित अधिकारी या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधून काम करत आहेत."

मात्र, रणसिंघा यांच्या भावांना त्यांच्या प्रकृतीची आणि मानसिक स्थितीची काळजी वाटतीये.

"तिची मानसिक स्थिती ठीक नाही," असं त्यांनी बीबीसी सिंहलाशी बोलताना म्हटलं.

"एकदा आमचं फोनवर बोलणं झालं, तेव्हा ती मला म्हणत होती की, जर तिला जिवंत घरी परत पाठवण्याची त्यांची तयारी नसेल, तर निदान तिचा मृतदेह तरी मायदेशी पाठवतील."

अतिरिक्त वार्तांकन- केथकी मसिलामणि आणि ज्युलियाना खान

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)