विद्यार्थ्यांचा बँकेवर दरोडा, 20 कोटी 20 लाख रुपये लुटले; पाकिस्तानमध्ये उघडकीस आलं प्रकरण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मोहम्मद काजिम
- Role, बीबीसी उर्दू, क्वेटा
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
पाकिस्तानमध्ये युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी बँकेत तब्ब्ल 20 कोटींचा दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सुमारे दीड वर्षांपूर्वी घडली.
या विद्यार्थ्यांनी बँकेत दरोडा टाकण्याची योजना अशाप्रकारे आखली की कोणालाही त्यांच्यावर शंका येणार नाही.
मात्र, पोलिसांनी दीड वर्षांच्या तपासातून अखेर या प्रकरणाचा छडा लावलाच.
ही घटना पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील लसबेला जिल्ह्यातील ओथल परिसरात गेल्या वर्षी घडलेल्या बँक दरोड्याची आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सशस्त्र दरोडेखोरांनी 20 कोटी 20 लाख पाकिस्तानी रुपये लुटून पळ काढला. हा काही सामान्य दरोडा नव्हता. दरोडेखोरांनी आधीपासूनच आपल्याला अटक होणार नाही, याची संपूर्ण योजना आखली होती.
सुरक्षादलाचा गणवेश परिधआन करून ते बँकेत दाखल झाले होते.
लासबेलाचे एसएसपी नजीबुल्ला पंदरानी यांच्या म्हणण्यानुसार, तपासात मुख्य आरोपीच्या बँक खात्यातून पोलिसांनी एक महत्वाचा धागा मिळाला.
ते म्हणाले, "दरोडा टाकण्याआधी त्यांच्या खात्यातून काही हजार रुपयांपर्यंतचा व्यवहार होत होता. मात्र, दरोड्याच्या घटनेनंतर या खात्यातील व्यवहार कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचला."
प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी उर्दूला सांगितलं की, या प्रकरणातील आरोपींपैकी एक व्यक्ती बँकेत नोकरी करत होता. त्यामुळे, बँकेत रोख रक्कम कुठे ठेवली जाते आणि जास्तीत जास्त रकमेपर्यंत कसे पोहोचता येईल, याची त्याला माहिती होती.
घटनेनंतर ओथल पोलीस ठाण्याचे प्रभारी यार मोहम्मद यांनी आरोपींचा पाठलाग केला. मात्र, चकमकीत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, "आरोपींनी या संपूर्ण गुन्ह्याचा कट तर आखलाच, सोबतच गुन्ह्यात वापरलेली गाडीदेखील नंतर जाळून टाकली. जेणेकरून सर्व पुरावे पूर्णपणे नष्ट करता येतील."
दरम्यान, ओथल येथे आयोजित पत्रकार परिषदेत लसबेलाचे एसएसपी यांनी 3 आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी कारवाई सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दीड वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
ओथल येथील 28 फेब्रुवारी 2025 रोजीची ही सकाळ अगदी सर्वसामान्य दिवसाप्रमाणे होती. वेळेनुसार बँकेतील कामकाज सुरू झाले. मात्र, थोड्याच वेळात परिस्थिती बदलून गेली.
सुरक्षा दलाचा गणवेश परिधान करून काही लोक बँकेत घुसले आणि काहीच वेळात तब्बल 20 कोटींच्या रकमेवर हाथ साफ करत ते बँकेतून पसार झाले.
बँकेचे व्यवस्थापक फलक शेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, सुरक्षा दलाचा गणवेश परिधान केलेले 6 सशस्त्र लोक एका गाडीतून आले आणि बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत दाखल झाले.

फोटो स्रोत, Umar Lasi
तक्रारीनुसार, "ऑपरेशन मॅनेजर जहांगीर यांनी फोनवरून सांगितलं की, बँकेत पोहोचताच आरोपींनी मॅनेजर कुठे आहेत, अशी विचारणा केली. एका व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आपण आल्याचं त्यांनी सांगितलं."
बँकेचे व्यवस्थापक फलक शेर यांच्या म्हणण्यानुसार, "जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिलं की विरोध केल्यामुळे आरोपींनी पोलीस कर्मचारी नवाझ अली आणि मोहम्मद दाऊद यांना रायफलच्या बटाने मारहाण करून जखमी केले होते. त्यांनी पोलिसांकडील एक जी-3 रायफलही हिसकावून घेतली होती."
फलक शेर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं, "ऑपरेशन मॅनेजर यांनी सांगितलं की, आरोपींनी त्यांच्यासह बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते."
एफआयआरनुसार, आरोपींनी बँकेत ठेवलेले 20 कोटी 20 लाख रुपये 6 पोत्यांमध्ये भरले आणि ते गाडीच्या डिकीत ठेवले. त्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना रोख रक्कम ठेवण्याच्या तिजोरीत बंद करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांशी चकमक
त्यावेळी यार मोहम्मद हे ओथल पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सकाळी साधारण 9 ते 9:30 च्या सुमारास ओथल येथील नॅशनल बँकेत दरोडा पडल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ पोलीस पथकासह बँकेत पोहोचले, मात्र, आरोपी आधीच तिथून पळून गेले होते.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी जुन्या मॉडेलच्या एका गाडीतून आरसीडी महामार्गाच्या दिशेने गेले होते.

फोटो स्रोत, Umar Lasi
यार मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, नंतर ही गाडी बलुच गोठच्या दिशेने गेल्याचे समजले.
त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. "जेव्हा आम्ही त्यांच्या जवळ पोहोचलो, तेव्हा आरोपींनी गोळीबार सुरू केला. मला 2 गोळ्या लागल्या. त्यातली 1 गोळी पायाला, तर दुसरी डोळ्याजवळ लागली."
यार मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, ते जखमी झाल्यानंतर आरोपी डोंगराच्या दिशेने पळून गेले आणि त्यांनी त्यांचे वाहनही पेटवून दिले.
आरोपींनी गाडीला आग का लावली?
तपास पथकाशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, ही गाडी पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकते, याची आरोपींना जाणीव होती.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गाडीतून बोटांचे ठसे आणि इतर न्यायवैद्यक पुरावे मिळू शकले असते. शिवाय, डोंगराळ भागात ही गाडी घेऊन जाणे आरोपींना शक्य नव्हते.
"गाडी तिथेच सोडली असती, तर पोलिसांनी ती ताब्यात घेतली असती. त्यामुळे बोटांच्या ठशांसहित सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी गाडी जाळून टाकली."
अधिकाऱ्याने सांगितले की, दरोड्यात वापरलेली 2 शस्त्रेदेखील गाडीसोबत जाळण्यात आली होती.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "आरोपींनी सुरुवातीपासूनच असा कट रचला होता की, हा गुन्हा सामान्य दरोड्यापेक्षा वेगळा वाटावा आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी."

फोटो स्रोत, Asim Hafeez/Bloomberg via Getty Images
एसएसपी नजीबुल्लाह पंदरानी यांच्या म्हणण्यानुसार, "दरोड्यात सहभागी असलेले पाचही जण लसबेला युनिव्हर्सिटी ऑफ मरीन सायन्सेसचे विद्यमान आणि माजी विद्यार्थी होते."
त्यांनी सांगितलं की, आता अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी विद्यापीठात शिक्षण घेत होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, उर्वरित आरोपींपैकी काही जण अजूनही विद्यापीठात शिकत आहेत, तर काहींनी शिक्षण पूर्ण केले आहे. या आरोपींचे वय 25 ते 26 वर्षांच्या दरम्यान आहे.
पोलिसांचा दावा आहे की, मुख्य आरोपी या दरोड्याचा सूत्रधार होता. त्याने आपल्या साथीदारांसोबत मिळून संपूर्ण गुन्ह्याचे नियोजन केले आणि दरोडा घातला.
तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या दरोड्यात सहभागी असलेल्या एका आरोपीने यापूर्वी तुरबत येथील एका बँकेत काम केले होते.
त्यामुळे त्याला बँकेच्या कामकाजाची पद्धत आणि रोख रक्कम कुठे ठेवली जाते, याची माहिती होती.
याच माहितीच्या आधारे आरोपींनी अगोदरच योजना आखली आणि बँकेत ठेवलेल्या मोठ्या रकमेपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलं.
दीड वर्षानंतर गुन्ह्याचा छडा कसा लागला?
तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपींना कोणत्याही विरोधाशिवाय बँकेच्या आत प्रवेश करायचा होता. त्यासाठी त्यांनी सुरक्षा दलाचा गणवेश वापरण्याचा निर्णय घेतला. हे गणवेश त्यांनी ऑनलाइन मागवले होते.
आरोपींनी कापड खरेदी करून गणवेश शिवून घेण्याऐवजी एका कंपनीकडून ऑनलाइन गणवेश मागवले होते.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे गणवेश डिसेंबर 2024 मध्ये मागवण्यात आले होते, तर दरोडा फेब्रुवारी 2025 मध्ये टाकण्यात आला.
एसएसपी पंदरानी यांच्या म्हणण्यानुसार, या दरोड्याचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.
त्यांनी सांगितलं की, तपासाच्या सुरुवातीला गुप्त माहिती देणाऱ्या खबऱ्यांकडून माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर आधुनिक तांत्रिक पद्धतींचा वापर करण्यात आला.
त्यांच्या मते, मुख्य आरोपीच्या बँक खात्याने तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. दरोड्यापूर्वी सदर खात्यात छोट्या रकमेचे व्यवहार होत होते. मात्र, त्यानंतर खात्यातील व्यवहार कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचले.

फोटो स्रोत, Getty Images
एसएसपींच्या म्हणण्यानुसार, गेल्या दीड वर्षांत या खात्यात तब्बल 17 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं.
एखाद्या खात्यातून अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर या व्यवहारांची चौकशी करण्यात आली. या तपासानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी 2 आरोपींनाही अटक करण्यात आली.
इतर आरोपींच्या मोबाइल फोनचे न्यायवैद्यक विश्लेषणही करण्यात आले आहे. हे मोबाइल पुढील तपासासाठी पंजाब फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
एसएसपींच्या म्हणण्यानुसार, एका स्थानिक व्यावसायिकाच्या बँक खात्यातही दरोड्यातील रकमेमधील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले. संबंधित व्यावसायिकाने हे व्यवहार केल्याचे मान्य केले असून त्याचा जबाब दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला आहे.
प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लुटलेल्या रकमेतील काही हिस्सा व्यावसायिक कामांमध्येही गुंतवण्यात आला होता.
या पैशांतून 4 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या गाड्या आणि इतर वस्तू खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित रक्कम आणि मालमत्ता जप्त करण्यासाठीची कारवाई सुरू आहे.
एसएसपी नजीबुल्ला पंदरानी यांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींना 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांच्यावरील आरोपांबाबत त्यांची बाजू जाणून घेता आली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























