5,500 मिमी पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरमध्ये दुष्काळ कसा पडला?

- Author, प्राची प्रतिभा शिरीष
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"आम्ही भात लावताना इंजिन लावून लावला. पाऊसच नाही यंदा," बनाबाई कदम सांगत होत्या.
बनाबाई आणि त्यांच्या सोबतीण महिला जळलेल्या नाचणीतून काही शिल्लक राहतंय का ते पाहत बसल्या होत्या.
काढलेलं जळून गेलेलं पीक पाहताना अशी परिस्थिती यापूर्वी कधीच न पाहिल्याचं त्या वारंवार अधोरेखित करत होत्या.
पीक तर जळलंच पण जमिनीलाही यंदा भेगा पडल्या आहेत. पावसाचा आणि थंड हवेचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा कायम दुष्काळी वाटावं असं हे दृश्य दिसतंय.

परिस्थिती काय?
महाबळेश्वरचा पट्टा तसा भातशेतीसह नाचणी आणि स्ट्रॉबेरी उगवणारा. मुळ महाबळेश्वर पाचगणीचा काही परिसर सोडला तर बहुतांश भाग शेतीवर अवलंबून. कोयना प्रकल्पातलं बॅकवॉटर आणि धबधब्यातून वाहणारं पावसाचं पाणी यावर इथली शेती होते.
यंदा मात्र थंडीची चाहुल लागण्याच्या काळात इथून फिरताना उन्हाचा चटका जाणवतोय.
खरंतर या परिसरासाठी ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना पावसाचा. घरांवर जमलेलं शेवाळं आणि हिरवळ आणि शेतातली डोलणारी पिकं काढण्याची तयारी करण्याचा.
पण यंदा बहुतांश शेतकरी शेताकडे फिरकायचंही टाळत असल्याचं स्थानिक सांगतात. कारण जून-जुलैमध्ये ठरल्याप्रमाणे पेरण्या झाल्या. पण पुढे मात्र पावसाने इतकी ओढ दिली की पिक वाचवायचा काहीच मार्ग हाताशी उरला नाही.

यातलंच एक शेत गोपाळ सकपाळ यांचं. त्यांनी डोंगर उतारावर असलेल्या शेतात भात लावला होता. पण पाण्याअभावी पिकाची उंचीही वाढली नाही अशी स्थिती.
लांबवर पसरलेल्या शेतातला एक भाग त्यांनी शेजारच्यांकडून पाणी घेऊन वाचवला. पण उरलेलं पीक मात्र हातचं गेलं. हे पीक त्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार.
सकपाळ सांगतात, "आमच्याकडे वर्षातून एकदाच पीक मिळतं. 12 महिन्यात हे एकच पीक. यात काहीच शिल्लक नाही. इथं 1972 च्या दुष्काळाच्या आठवणी सांगतात. पण त्यावेळी आमचा जन्मही नव्हता. आमच्या आयुष्यातला हा पहिलाच दुष्काळ."

दरवर्षी जूनला येणारा पाऊसच यंदा उशीरा आल्याचं सपकाळ सांगतात. त्यानंतर फक्त 8-10 दिवस पाऊस पडला आणि पुढे मात्र जवळपास 3 महिने पाऊसच आला नसल्याचं ते सांगतात.
त्याचा परिणाम म्हणून इथं रोपं तयार झाली, पण पिक आलं नसल्याचं शेतकरी संजय देसाई मांडतात.
संजय देसाईंच्या शेतापासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर नदी आहे. पण या नदीच्या पाण्याचा त्यांना उपयोग नाही.
आता थोडं शिल्लक असलं तरी महिनाभरात हे पाणी खाली जाईल आणि पुन्हा ते पिणे आणि शेतीसाठी वाटून राखीव ठेवलं जाईल, असं ते सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना देसाई म्हणाले," आमच्याकडे 15 मे नंतर वळवाचा पाऊस सुरू होतो. इथले शेतकरी पूर्वीपासून कात्या रोहिणी नक्षत्र लागलं की पेरण्या करतात. पेरण्या झाल्यावर 21 दिवसांनी रोप तयार करतो."
"तोपर्यंत चिखल झालेला असतो, त्यात पेरणी केली जाते. परंतू माझ्या आठवणीत अशी परिस्थिती कधी आली नव्हती. यंदा पेरण्या चांगल्या झाल्या, रोपं चांगली झाली. पण 7 जूनला रोप लावल्यानंतर पाऊस 3-4 दिवसच आला. परतीचा पाऊसही आला नाही."
आटलेले झरे, कोरडे ओढे
पाऊस सुरू झाला की या परिसरातले झरे, धबधबे पाहण्यासाठी गर्दी होते. हे झरे इथल्या शेतीचा आधार. खाली वाहून येणाऱ्या या झऱ्यांना इथले लोक ग्रॅव्हिटीचे झरे म्हणून ओळखतात. त्यातून वाहणारं पाणी ओढ्यांमधून येतं. ते पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या आधार ठरतं.
पण यंदा पाऊस न आल्याने हे झरे आटले. त्यामुळे ओढेही कोरडे झाले आहेत. साधारण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाण्यासाठी पुरणारे हे झरे, पण सध्या मात्र त्यात डबकं म्हणावं इतकंच पाणी दिसतं.

ओढ्याचं पाणी आटलं आणि नळाला येणारं रोजचं पिण्याचं पाणीही बंद झालं.
सुभद्रा कदम सांगतात, "2 दिवसातून एकदा पाणी येतं. यंदा पेरणी करायलाही पाणी नव्हतं. आम्ही 5 किलो नाचणी पेरली होती. 10 किलो सुद्धा निघेल का शंका आहे."
जीजाबाई कदम म्हणाल्या, " काही राहिलं नाही. खाली तळाकडे जाऊन भार बघितला ना तर अक्षरश: डोळ्यातून पाणी येतं. 12 महिन्यांची मेहनत आमची अशी पार वाळून गेली आहे. आता काय जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत प्यायचं."
बनाबाई कदम म्हणाल्या, " नदीचं पाणी आटायला लागलं आहे. आम्ही 6 महिने हे पाणी प्यायलो."

नुकसान भरपाईतून सुटलेली स्ट्रॉबेरी
भात आणि नाचणीच्या शेतांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी झाली आहे. स्ट्रॉबेरीची पेरणी मात्र यात बसली नाही आणि त्यामुळे खर्च जास्त होऊनही स्ट्रॉबेरीला नुकसानभरपाई मात्र मिळणार नाही.
पाचगणीतल्या सागर कदम यांच्या शेतातली स्ट्रॉबेरी पाहिली तरी झालेल्या नुकसानाचा अंदाज येतो. कदम यांच्या शेतात यंदा त्यांनी स्ट्रॉबेरीची 40 हजार रोपं लावली होती.
भातशेती प्रमाणेच यंदा स्ट्रॉबेरीची रोपं तयार झाली. पण नंतर मात्र रोपं वाळून गेली. स्ट्रॉबेरीच्या पेरण्यांचं चक्र मात्र सरकारने ठरवलेल्या महिन्यांमध्ये न आल्याने पंचनामे करण्याच्या पिकांच्या यादीत त्याचा समावेश नाही.
थंडी नाही आणि पाणी नाही यामुळे पिकांचं नुकसान होत असल्याचं शेतकरी सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना सागर कदम म्हणाले, "पाणी नाही. त्यामुळे स्ट्रॉबेरीवर जी प्रक्रिया केली आहे त्याचं काही होत नाही. विहिरीमध्ये पाणी नाही. प्यायला पाणी नाही. पिक वाचवायचं की पिण्याला पाणी ठेवायचं हा प्रश्न आहे."

कदम सांगतात की, यंदाच्या वर्षी त्यांचा खर्च 4 लाखांच्या वर गेला. पण नुकसानभरपाई मिळणार नसल्याने काय करायचं हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.
मार्केटमध्ये न जाणारी स्ट्रॉबेरी काही कंपन्यांशी बांधलेली असल्याने हक्काचं उत्पन्न होतं. पण ते सुद्धा यंदा गेल्याचं शेतकरी सांगतात.
ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पडणारा पाऊस यंदा ऑगस्टमध्येच थांबला. त्याचा परिणाम म्हणजे सातारा जिल्ह्यातील 11 तालुके यंदा दुष्काळग्रस्त ठरले आहेत.
त्यात महाबळेश्वरचा समावेश यंदा दुष्काळग्रस्त भागात झाला आहे. महाबळेश्वरचा समावेश झाल्यावर अनेकांना हा समावेश कसा असा प्रश्न पडला.

बीबीसी मराठीशी बोलताना साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, "यावर्षी जुलैपर्यंत पाऊस नॉर्मल होता. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस कमी झाला. महाबळेश्वरमध्ये 5.5 हजार मिलिमीटर पाऊस पडतो. तिथे 65 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जमिनीतील पाणी पातळी वाढलेली नाही आणि पिकांवरही परिणाम झाला आहे."
"पिकांच्या वाढीचे वेगवेगळे स्टेज असतात आणि त्या प्रत्येक स्टेजमध्ये त्याला पावसाची आवश्यकता असते किंवा ओलाव्याची आवश्यकता असते. तो ओलावा पावसामधून येईल किंवा इरिगेशनच्या माध्यमातून येईल. पश्चिम घाटातील जमीन पावसावर अवलंबून आहे."

"यंदा पेरणी उशीरा झाली. जूनमध्ये पाऊस नसल्याने जुलैमध्ये पेरणी झाली. त्याला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ग्रेन फॉर्मेशनची स्टेज होती. त्यावेळी खूप काळ कोरडा गेल्यामुळे त्या टप्प्यामध्ये पीकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे."
महाबळेश्वर प्रमाणेच जास्त पावसाचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतांश भागांवर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस पडायचा त्या काळात उन्हाच्या झळा बसतायत. एल निनोचा हा परिणाम असल्याचं हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सांगतात. पीक तर गेलंच. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठी आत्तापासूनच वणवण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























