NEET पेपरफुटीप्रकरणी CBI नं अटक केलेले शिवराज मोटेगावकर कोण आहेत? त्यांच्या RCC क्लासेसची सुरुवात कशी झाली?

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar
लातूरमधील एका प्रसिद्ध क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना आज (18 मे) पुण्यातून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) अटक केली.
मराठवाड्यातील 'लातूर पॅटर्न' म्हटलं की, काही मोजकी नावं सर्वप्रथम घेतली जातात. त्यामध्ये प्रा. शिवराज मोटेगावकर यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक म्हणून ओळख असलेल्या मोटेगावकर यांनी NEET, JEE परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं.
लातूरमधील RCC अर्थात रेणुकाई करिअर सेंटर या कोचिंग संस्थेचे ते संस्थापक आहेत.
2003 साली या संस्थेची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला RCC द्वारे MH-CET साठी कोचिंग दिले जायचे.
दरम्यान, मोटेगावकर यांची 17 मे रोजी जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर 18 मे रोजीही त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) रविवारपर्यंत 9 आरोपींना अटक केली. त्यात आता शिवराज मोटेगावकरांची भर पडल्यानं एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 वर पोहोचलीय.
NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी महाराष्ट्रातील मोठ्या कोचिंग नेटवर्कपैकी RCC एक मानलं जातं.
कोण आहेत शिवराज मोटेगावकर?
RCCच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर यांनी केमिस्ट्री विषयात MSc करताना सुवर्णपदक मिळवलं. मात्र त्याठिकाणी त्यांनी कोणत्याही विद्यापीठाचा उल्लेख केलेला नाही.
त्यांनी SET/NET-JRF, GATE, BARC, DRDO आणि TIFR यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा पात्र केल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.
मोटेगावकर यांनी घरातून शिकवणी सुरू केली आणि त्यानंतर 2003 मध्ये रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसची स्थापना झाली. पुढे ही संस्था RCC Pattern या नावाने विस्तारली.
RCC या संस्थेने मराठवाड्यासह पुणे, नाशिक, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि इतर शहरांमध्ये शाखा सुरू केल्या.

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar
RCCच्या वेबसाईटनुसार, हजारो विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन केल्याचा दावा संस्था करते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्याचाही उल्लेख RCC ने केला आहे.
सोशल मीडियावरही मोटेगावकर यांचा मोठा वावर आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात.
परीक्षा, अभ्यास पद्धती आणि करिअर मार्गदर्शनाशी संबंधित व्हीडिओ आणि पोस्ट नियमितपणे प्रसिद्ध केल्या जातात.

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar
लातूरमध्ये 11वी आणि 12वी NEET आणि JEE ची तयारी करण्यासाठी या क्लासेसला मोठी पसंती दिली जाते. या संस्थांमध्ये मिळून सुमारे 10 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात.
11वीच्या विद्यार्थ्यांकडून अंदाजे 40 हजार रुपये, तर 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 50 हजार रुपये इतकी वार्षिक फी घेतली जाते. परीक्षेपूर्वी दिले जाणारे गेस पेपर आणि प्रॅक्टिस टेस्टमुळे RCC क्लासेसची ओळख लातूर पॅटर्नमध्ये अधिक वाढली.
3 मे रोजी NEET परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी स्वतः त्यांच्या फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्या व्हीडिओमध्ये एका विद्यार्थ्याने सांगितलं की, 42 प्रश्न हे सरांनी दिलेल्या गेस पेपरमधूनच आले.
NEET UG 2026 रद्द झाल्यावर मोटेगावकर काय म्हणाले?
पेपरफुटीनंतर NEET UG 2026 परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर शिवराज मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासेसच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता.
त्यामध्ये त्यांनी मुलांना परीक्षा रद्द झाली म्हणून घाबरून जाऊ नका, असं आवाहन केलं होतं. तसंच, RCC पुन्हा या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाइन क्लासेस सुरू करणार असल्याचं म्हटलं.
फेरपरीक्षेमुळे मेरिट आणखी वाढेल, असं ते म्हणाले. "आम्ही ज्या सराव चाचण्या घेऊ, त्याच्या बाहेरील प्रश्न पडणारच नाही," असा दावाही त्यांनी या व्हीडिओतून केला.

फोटो स्रोत, Shivraj Motegaonkar
याआधी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या सोशल मीडियावरील व्हीडिओंमधूनही 3 मे रोजी घेण्यात आलेल्या NEET UG 2026 परीक्षेत RCC कोचिंग क्लासेसने जे शिकवलं, तेच परीक्षेत आल्याचा दावा त्यांनी आणि त्यांच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी केल्याचं दिसतं.
मोटेगावकरांच्या अटकेविषयी सीबीआयनं काय म्हटलं?
मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर तयार करण्यात आलेल्या मेमोमध्ये अटकेची कारणं नमूद करण्यात आली आहेत.
त्यात म्हटलं आहे, "तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, शिवराज रघुनाथ मोटेगावकर हे NEET UG परीक्षा-2026 ची प्रश्नपत्रिका लीक करणे आणि तिचं वितरण करणे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत."
तसेच, इतर आरोपींशी संगनमत करून त्यांनी NEET UG 2026 परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं परीक्षा होण्यापूर्वीच, म्हणजेच 23 एप्रिल 2026 रोजी मिळवली होती.

फोटो स्रोत, Getty Images
14 मे 2026 रोजी शिवाजीनगर, लातूर येथील आरोपी शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये NEET UG 2026 चे लीक झालेले प्रश्न आढळून आले.
तसंच, शिवराज मोटेगावकर यांनी इतर आरोपींसोबत लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील यांच्यासह अनेकांना पुरवल्या, असंही तपासात पुढे आल्याचं यात म्हटलं आहे.
मोटेगावकर यांनी लीक झालेल्या NEET UG 2026 परीक्षा प्रश्नपत्रिकांच्या हाताने लिहिलेल्या प्रती ज्या व्यक्तींना पुरवल्या, त्या सर्वांची नावं त्यांनी उघड केलेली नाहीत.
तपासादरम्यान आरोपीने परीक्षेनंतर लीक झालेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचं या मेमोमध्ये म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























