UAE च्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; भारतानं व्यक्त केली चिंता, सौदी अरेबियानं काय म्हटलं?

3 मार्च 2026 ली यूएईच्या फुजेरा औद्योगिक वसाहकीक झालेल्या स्फोटानंतरचे दृश्य.

फोटो स्रोत, adel SENNA / AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 3 मार्च 2026 ली यूएईच्या फुजेरा औद्योगिक वसाहकीक झालेल्या स्फोटानंतरचे दृश्य.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) बरकाह अणुकेंद्रावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे.

"अशा कृती अस्वीकार्य आहेत आणि त्यामुळं तणाव वाढतो. आम्ही तत्काळ संयम राखण्याचे आणि संवाद तसंच राजनैतिक संबंधांच्या पर्यायाचा विचार करण्याचं आवाहन करतो," असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.

अबू धाबीच्या सरकारी माध्यम कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी याठिकाणी असलेल्या बरकाह अणुऊर्जा प्रकल्पावर रविवारी (17 मे) रात्री ड्रोन हल्ला झाला.

मात्र, हा हल्ला कोणी केला याबाबत अद्याप संयुक्त अरब अमिरातीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

हल्ल्यानंतर ऊर्जा प्रकल्पात आग लागली होती, पण तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती, अधिकाऱ्यांनी दिली आहे.

"अल दफरा भागातील बरकाह अणुऊर्जा प्रकल्पाच्या हद्दीबाहेर असलेल्या एका वीज जनरेटरला आग लागल्यानंतर अबू धाबी प्रशासनान तत्काळ पावलं उचलली," असं सरकारी माध्यम कार्यालयाने निवेदनात म्हटलं आहे.

"ही आग ड्रोन हल्ल्यामुळं लागली. घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तसंच किरणोत्सर्गासंबंधी सुरक्षिततेबाबतही धोका निर्माण झाला नाही. खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत."

आगीमुळं वीज प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर किंवा त्याच्या महत्त्वाच्या प्रणालींवर परिणाम झालेला नाही तसंच सर्वकाही सुरळीत काम करत आहे, असंही निवेदनात म्हटलं आहे.

सौदी अरेबिया आणि IAEA नं व्यक्त केली चिंता

बीबीसी न्यूज पर्शियनच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं (IAEA) या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

आयएईएचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशी फोनवर चर्चा करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयानंही एका निवेदनात हल्ल्याचा तीव्र निषेध केला. कोणताही धोका किंवा शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे 'राजनैतिक आणि लष्करी अधिकार' आम्ही राखून ठेवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पश्चिम सीमेवरून यूएईमध्ये घुसलेल्या एका ड्रोनने दफरा भागातील बरका अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य केल्याचं यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा हल्ला 'अस्वीकार्य' असून, त्यांच्या सुरक्षेला थेट धोका आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्पष्ट उल्लंघन करणारा असल्याचं म्हटलं आहे.

सौदी अरब क्राऊन प्रिन्स

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, सौदी अरब क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (संग्रहित)

इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात गेल्या काही काळात तणाव वाढला आहे.

अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणनं नागरी सुविधांवर 3000 हून अधिक हल्ले केले असल्याचं संयुक्त अरब अमिरातीनं शुक्रवारी म्हटलं.

तर, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातीनं सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडं इराणनं, त्यांनी अमिरातीमधील केवळ अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित लष्करी तळ आणि संस्थांनाच लक्ष्य केल्याचं म्हटलं आहे.

सौदी अरेबियानंही यूएईच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील ड्रोन हल्ल्याचा निषेध केला आहे.

संयुक्त अरब अमिरातीनं हा ड्रोन हल्ला 'विनाकारण केलेले दहशतवादी कृत्य' असल्याचं म्हटलं असून, त्यामुळं या भागातील तणाव वाढेल असंही म्हटलं आहे.

बरकाह प्रकल्प किती महत्त्वाचा ?

बरकाह अणुऊर्जा प्रकल्प संयुक्त अरब अमिरातीच्या वायव्येकडील वाळवंटी भागात, सौदी अरेबिया आणि कतारच्या सीमेजवळ, अल दफरा इथं आहे.

हा वीज प्रकल्प अमिरात अणुऊर्जा महामंडळाच्या एका गटानं दक्षिण कोरियाच्या एका ऊर्जा कंपनीच्या सहकार्याने बांधला आहे.

संयुक्त अरब अमिरातीच्या 'एमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कंपनी'च्या वेबसाइटनुसार, बरकाह प्रकल्पातील APR1400 डिझाइनच्या चार अणुभट्ट्या दरवर्षी 40 टेरावॉट-तास वीज निर्माण करतात. संयुक्त अरब अमिरातीच्या एकूण विजेच्या गरजेच्या सुमारे 25 टक्के एवढं हे प्रमाण आहे.

बरकाह प्रकल्प हा संयुक्त अरब अमिरातीमधील विजेचा सर्वात मोठा स्रोत असून, इथं निर्माण होणारी प्रत्येक मेगावॅट वीज कार्बनमुक्त असते.

बरकाह अणुऊर्जा प्रकल्प सौदी अरेबिया आणि कतारच्या सीमेजवळ, अल दफरा इथं आहे.

फोटो स्रोत, enec.ae

फोटो कॅप्शन, बरकाह अणुऊर्जा प्रकल्प सौदी अरेबिया आणि कतारच्या सीमेजवळ, अल दफरा इथं आहे.

हा प्रकल्प देशाच्या ऊर्जा स्रोतांमध्ये वैविध्य आणण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, घरे, व्यवसाय आणि सरकारी कार्यालयांना त्याद्वारे स्वच्छ व कार्यक्षम ऊर्जा पुरवली जाते. तसेच देशाचं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासही मदत होते.

वेबसाइटनुसार, बरकाह अणुऊर्जा प्रकल्प दरवर्षी अंदाजे 22.4 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन रोखतो. रस्त्यांवरून 48 लाख गाड्या कमी करण्याइतकं ते आहे.

अलिकडच्या युद्धात मध्य पूर्वेतील अनेक अणुऊर्जा केंद्रांना लक्ष्य करण्यात आलं.

बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर किमान चार क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता, असं इराणनं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला सांगितलं होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)