NEET पेपरफुटीचं प्रकरण : महाराष्ट्रातून आतापर्यंत 'या' 5 जणांना अटक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फोटो स्रोत, Pravin Thackeray
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी न्यूज मराठी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
वैद्यकीय शिक्षणासाठी अनिवार्य असणाऱ्या NEET परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरण देशभर गाजत आहे. या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) आतापर्यंत 9 आरोपींना अटक केलीय. त्यापैकी 5 आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
NEET (UG) 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी पार पडली. मात्र, या परीक्षेतील पेपर लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर 10 मे 2026 रोजी नॅशनल परीक्षा संस्थेने (NTA) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही पुन्हा 21 जून 2026 रोजी नव्याने ही परीक्षा होणार आहे.
वैद्यकीय शिक्षण घेऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भवितव्य ज्या परीक्षेवर अवलंबून होतं, तीच परीक्षा पार पडल्यानंतर रद्द झाल्यानं देशभर गोंधळाचं, चिंतेंचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं. सर्वस्तरातून केंद्र सरकारवर टीका सुरू झाली.
त्यानंतर या पेपरफुटी प्रकरणी 12 मे 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागानं CBI कडे दाखल केलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे गुन्हे दाखल करण्यात आले.
या संदर्भात CBI नं पत्रक काढत सांगितलं की, "गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस), प्रीव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि द पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रीव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) ॲक्ट, 2024 अंतर्गत इतर संबंधित तरतुदींनुसार येणाऱ्या गुन्ह्यांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे."
त्यानंतर CBI नं तपासाचा वेग वाढवत देशभरातून पेपरफुटी प्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
CBI ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यागर येथील हे आरोपी आहेत.
यातल्या 5 आरोपींना कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं त्यांच्या सखोल चौकशीसाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आतापर्यंतच्या तपासात केमिस्ट्री आणि बायोलॉजी या दोन विषयांचे पेपर लीक झाल्याचं उघड झालंय, अशीही माहिती CBI ने दिलीय.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या 9 आरोपींमधील 5 आरोपी महाराष्ट्रातील आहेत.
पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी, मनिषा वाघमारे, मनीषा मांढरे, नाशिकमधून शुभम खैरनार आणि अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे या पाच जणांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आलं आहे.
आतापर्यंत उपलब्ध माहिती, तसंच सीबीआयच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या या 5 जणांबद्दल आपण जाणून घेऊया.
1) शुभम खैरनार
पेपरफुटी प्रकरणात CBI ने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी एक नाव समोर आलं आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण या पेपरफुटी प्रकरणात नावं आलं ते नाशिकच्या 30 वर्षीय शुभम खैरनारचं.
NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी शुभमला 12 मे 2026 रोजी ताब्यात घेतलं आणि त्याला CBI च्या ताब्यात दिलं.
शुभम खैरनारनं धनंजय लोखंडेकडून मिळवलेली प्रश्नपत्रिकेची पीडीएफ यश यादव याला 29 एप्रिल 2026 रोजी पुरवल्याचं सीबीआयनं म्हटलं. शुभम खैरनारनं हे पेपर मांगिलाल खाटीक, विकास बिवल आणि दिनेश बिवल यांनाही दिल्याचं समोर आलं.

फोटो स्रोत, UGC
शुभम खैरनार हा नाशिकमध्ये एका परिसरातील इमारतीत SR एज्युकेशन कन्सल्टन्सी या नावाने व्यवसाय करत होता.
बीबीसी मराठीने शुभमशी संबंधित कार्यालयाला भेट दिली असता, त्याच्या कार्यालयाच्या बोर्डवर 'डॉ. शुभम खैरनार' असा उल्लेख करण्यात आला आहे.
याआधी, पोलिसांनी माहिती दिली होती तेव्हा त्यांनी हा संशयित सीहोर येथील विद्यापीठात BAMS चा विद्यार्थी आहे असे सांगितले होते तर संशयिताच्या वडिलांनी असा दावा केला होता की 'शुभम हा मेडिकल तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून तो नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो.'
दरम्यान, हा संशयित खरंच बीएएमसचा विद्यार्थी आहे का किंवा ज्या प्रमाणे त्याने आपल्या बोर्डवर 'डॉक्टर' असा उल्लेख केला आहे, त्याची पडताळणी बीबीसी मराठीने केली.
'शुभमने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण त्याने कोणत्याही वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला नव्हता,' अशी माहिती सीहोरच्या सत्य साई विद्यापीठाच्या प्रशासनाने बीबीसी मराठीला दिली.
यासंदर्भात बीबीसी मराठीची सविस्तर बातमी तुम्हाला इथे वाचता येईल.
2) मनीषा मांढरे
सीबीआयनं 16 मे 2026 रोजी पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र (Botany) विषयाच्या प्राध्यापिका असलेल्या मनीषा मांढरे यांना अटक केली.
आरोपी मनीषा मांढरे या NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA कडून मनीषा मांढरेंची तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यांना वनस्पतिशास्त्र (Botany) आणि प्राणिशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अॅक्सेस म्हणजे प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचण्याची परवानगी होती असं समोर आलं आहे.
मनीषा मांढरे या पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. वनस्पतिशास्त्र विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत.
पेपरफुटीच्या प्रकरणात नाव आढळल्यानं सीबीआयनं त्यांची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीतल राऊज अव्हेन्यू कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं.

फोटो स्रोत, ANI
एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरेंनी पुण्यातूनच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी मनीषा वाघमारे यांच्या माध्यमातून संभाव्य NEET परीक्षार्थींना गोळा केलं आणि पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी कोचिंगचे विशेष वर्ग घेतले.
या वर्गांमध्ये मनीषा मांढरे यांनी वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांतील विविध प्रश्न समजावून सांगितले आणि त्याबाबत माहिती दिली.
विद्यार्थ्यांना हे प्रश्न वहीत लिहून घेण्यास तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये चिन्हांकित करण्यास सांगण्यात आलं. यापैकी बहुतेक प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET UG 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचं आढळलं आहे.
दरम्यान, मनीषा मांढरे किंवा त्यांच्या वकिलांशी याबाबत अद्याप बोलणं झालेलं नसून त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती याठिकाणी अपडेट केली जाईल.
3) पी. व्ही. कुलकर्णी
पुण्यातूनच सीबीआयनं प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी म्हणजेच पी. व्ही. कुलकर्णी यांना सखोल चौकशीअंती 15 मे 2026 रोजी अटक केली. सीबीआयनं पी. व्ही. कुलकर्णींना पेपरफुटी प्रकरणातील 'मुख्य सूत्रधार' असं संबोधलं आहे.
पी.व्ही कुलकर्णी हे मूळचे लातूरचे आहेत. ते लातुरातील दयानंद महाविद्यालयात केमिस्ट्री विषय शिकवत होते. 27 वर्षांच्या सेवेनंतर 2022 साली ते निवृत्त झाले. नंतर ते पुण्याला स्थायिक झाले.
निवृत्तीनंतर पी. व्ही. कुलकर्णींचा कॉलेजशी संपर्क नव्हता, असं दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी सांगितलं.
महाविद्यालयात अध्यापनानंतर त्यांनी लातूरमध्येच स्वतःचे क्लासेस सुरू केले. तिथून ते विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देत होते.
कुलकर्णी यांचं नाव पुण्यातीलही एका संस्थेशी जोडलेलं आहे. ही संस्था NEET, JEE Main आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मॉक टेस्ट, प्रश्नसंच आणि मार्गदर्शन आयोजित करते. गेल्या दहा–अकरा वर्षांपासून कुलकर्णी हे या संस्थेच्या पेपर सेटिंग कॅम्पमध्ये सहभागी होते.
CBI च्या तपासानुसार, कुलकर्णी यांचा NTA च्या परीक्षासंबंधी प्रक्रियेशी संपर्क होता आणि त्यांनी प्रश्नपत्रिका मिळवली होती, असा आरोप आहे.

फोटो स्रोत, UGC
एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी काही विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग सत्रं आयोजित करण्यात आली होती, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
याशिवाय, कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पैसे घेऊन 'गेस पेपर' दिल्याच्या तक्रारीही स्थानिक पातळीवर समोर आल्या होत्या. त्यांच्या लातूरस्थित ट्यूशन क्लासेस आणि संबंधित शिक्षकांकडून CBI ने चौकशी केली आहे.
आरोपी पी. व्ही. कुलकर्णी यांचे वकील आकाश चौहान यांनी दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात बाजू मांडली. ते म्हणाले की, "सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पी. व्ही. कुलकर्णी हे NTA च्या वतीने परीक्षा पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते आणि त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या. माझे आशिल (पी. व्ही. कुलकर्णी) यांनी जो पेपर सेट केला, तो NTA ने घेतला की नाही हे मला माहीत नाही. पेपर कोणता घ्यायचा हे NTA ठरवत असतं. अनेक शिक्षक पेपर सेट करत असतात. कुठलाही पुरावा नसताना माझ्या आशिलांना अटक केली आहे."
"याशिवाय माझ्या आशिलाची अटक चुकीची झाली आहे. त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी, 14 मे रोजी त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. त्याला दोन दिवस उलटले. अटक केल्यावर 24 तासांच्या आत कोर्टात हजर करणं गरजेचं होतं. त्यांना दोन दिवसानंतर दिल्ली कोर्टात हजर करण्यात आलं आहे."
4) मनिषा वाघमारे
मनीषा वाघमारेंना 14 मे 2026 रोजी अटक करण्यात आली आहे.
ज्या पी. व्ही. कुलकर्णींना सीबीआयनं 'मुख्य सूत्रधार' म्हटलं, त्यांच्याशीही मनीषा वाघमारेचा संबंध आला आहे.
पी. व्ही. कुलकर्णींना अटक केल्यानंतर सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, "पी. व्ही कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर असून एनटीएनं आयोजित केलेल्या परीक्षा प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. त्यामुळं त्यांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं.
एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीषा वाघमारे (त्यांना सीबीआयने 14 मे रोजी अटक केली) यांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष कोचिंग वर्ग घेतले."
"या वर्गांदरम्यान त्यांनी प्रश्न, पर्याय आणि त्यांची योग्य उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न त्यांच्या वहीत लिहून घेतले होते आणि ते प्रश्न NEET-UG 2026 च्या 03.05.2026 रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी पूर्णपणे जुळत असल्याचे आढळले."

फोटो स्रोत, ANI
मनीषा वाघमारे या मनीषा मांढरेंच्या माध्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना ओळखत होत्या, असं सीबीआयनं म्हटलंय.
मनीषा वाघमारेंच्या वकिलांनी असा दावा केला की, माझ्या अशिलाविरोधात (मनीषा वाघमारे) कोणताही थेट पुरावा आढळलेला नाही, त्या केवळ धनंजय लोखंडेच्या संपर्कात असल्यानं त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय.
5) धनंजय लोखंडे
नीट परीक्षेच्या या पेपर लीक प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं ते म्हणजे धनंजय लोखंडे, धनंजयला सीबीआयनं अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली.
सीबीआयच्या माहितीनुसार, धनंजय लोखंडेनं मनिषा वाघमारे यांच्याकडून NEET परीक्षेसंदर्भातील मजकूर मिळवला होता आणि तो शुभम खैरनार याला दिला.
शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे हे एकमेकांना ओळखतात. शुभमनं धनंजय लोखंडेकडून मिळालेले पेपर पुढे इतरांना दिले होते.
दरम्यान महाराष्ट्रातील या 5 आरोपींपैकी काही आरोपी किंवा त्यांच्या वकिलांकडून अद्याप त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. ही प्रतिक्रिया मिळताच इथे अपडेट केली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























