लाहोरच्या महिला कॉलेजचे फुगे थेट 272 किलोमीटर दूर हिमाचलच्या सोलनमध्ये कसे पोहोचले?

फोटो स्रोत, GGCWL
- Author, जाहिर महमूद
- Role, बीबीसी उर्दू
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
"माझ्या घराच्या छतावर फुगे आणि त्याला लावलेला बॅनर पाहून मला आश्चर्य आणि थोडी काळजीही वाटली.
बॅनरवरील मजकूर वाचल्यानंतर हे फुगे पाकिस्तानमधील एका महिला महाविद्यालयातून आल्याचे समजले. तेव्हा तिथल्या लोकांबद्दल आपुलकीची भावना मनात निर्माण झाली."
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात राहणारे जय प्रकाश यांनी 21 नोव्हेंबरच्या रात्री त्यांना त्यांच्या घराच्या छतावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे फुगे लटकलेले पाहिले.
त्या फुग्यांसोबत एक बॅनरही होता. त्यावर 'गव्हर्नमेंट ग्रॅज्युएट कॉलेज फॉर वुमेन, टाउनशिप, लाहोर, वार्षिक क्रीडा दिन 2026' असं लिहिलेलं होतं.
जय प्रकाश यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला घराच्या छतावर हे फुगे पाहून कोणीतरी आपली मस्करी करण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला असावा, असं त्यांना वाटलं. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली.
जय प्रकाश हे सोलन जिल्ह्यातील धाडोगी गावात राहतात. भारतीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फुगे आणि बॅनर ताब्यात घेतले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
दिल्लीतील बीबीसीचे प्रतिनिधी शकील अख्तर यांच्याशी बोलताना सोलन जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणाले, "या फुग्यांमध्ये काहीही सापडलेलं नाही.
हे फुगे हवेमुळे उडत उडत इथंपर्यंत पोहोचले असावेत. सर्व संबंधित यंत्रणा आणि गुप्तचर विभागांनी त्यांची तपासणी केली. परंतु, त्यात काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही."
"अशा प्रकारचे फुगे यापूर्वीही अनेकदा इथं आले आहेत. पण, त्यात कधीही काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही," असंही ते म्हणाले.
272 किलोमीटरहून कसे पोहोचले फुगे?
लाहोरपासून हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्हा हवाई मार्गाने किमान 272 किलोमीटर दूर आहे.
यावरून, या फुग्यांनी 42 तासांत 272 किलोमीटरचा प्रवास केला आणि ते एका भारतीय नागरिकाच्या घराच्या छतावर येऊन अडकले, असं म्हणता येईल.
पोलिसांच्या तपासात त्यांच्या घराच्या छतावर आढळलेले फुगे पाकिस्तानमधील एका महिला महाविद्यालयाच्या क्रीडा दिनानिमित्त सोडण्यात आल्याचे समजले, असं जय प्रकाश यांनी सांगितलं. हे कळल्यावर त्यांना आश्चर्य वाटले.
लाहोरमधील गव्हर्नमेंट ग्रॅज्युएट कॉलेज फॉर वुमेनच्या सोशल मीडिया पेजवरही वार्षिक क्रीडा दिनानिमित्त हवेत सोडलेल्या या फुग्यांचे आणि त्यांना लावलेल्या बॅनरचे फोटो आणि व्हीडिओ पाहायला मिळतात.

फोटो स्रोत, Jay Parkash
जय प्रकाश यांनी सांगितलं की, त्यांनी स्वतः सोशल मीडियावर कॉलेजचं पेज शोधून काढलं.
जय प्रकाश यांनी कॉलेजच्या पेजवर इंग्रजीत एक संदेश लिहिला, "माझ्या प्रिय शेजाऱ्यांनो, तुमचे फुगे माझ्या घराच्या छतावर येऊन पडले आहेत."
कॉलेजच्या पोस्टवर सीमेपलीकडून म्हणजे भारतातून जय प्रकाश यांनी दिलेला हा संदेश पाहून तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.
जय प्रकाश यांच्या संदेशाला उत्तर देताना कॉलेज प्रशासनाने लिहिलं, "या फुग्यांमधून शांतता, प्रेम, मैत्री आणि खिलाडूवृत्तीचा संदेश पोहोचेल, अशी आम्हाला आशा आहे. आम्ही सोडलेले हे फुगे अगदी तसेच आहेत आणि अजूनही मऊ आहेत, हे पाहून आम्हा सर्वांना आश्चर्य वाटलं."
'मैत्रीला सीमा नसते'
कॉलेजच्या उर्दू विभागाच्या प्रमुख डॉ. फौजिया सुलताना यांनी जय प्रकाश यांच्या संदेशाला उत्तर देताना लिहिलं, "खूप खूप धन्यवाद, भाऊ. तुमच्या घरातील वातावरण मैत्रीसाठी योग्य वाटलं असावं, म्हणूनच वाऱ्याने हे फुगे तुमच्या घरापर्यंत आले असावेत."
याला उत्तर देताना जय प्रकाश म्हणाले, "मैत्रीला कोणतीही सीमा नसते. मनं एकमेकांशी आदर, प्रेम आणि सन्मानाच्या नात्याने जोडली जातात. मैत्रीचं हे सुंदर नातं असंच वाढत राहो, अशी मी प्रार्थना करतो."
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांत अनेकवेळा एका देशातून दुसऱ्या देशात फुगे उडून आल्याच्या बातम्या समोर येतात. परंतु, यावेळी या घटनेत एक वेगळीच गोष्ट घडली.
ज्या व्यक्तीच्या घराच्या छतावर हे फुगे येऊन पडले, त्यांनी केवळ सीमापलीकडील लोकांबद्दल आपुलकी व्यक्त केली नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना प्रेम आणि मैत्रीचा संदेशही दिला.

फोटो स्रोत, Jay Parkash
बीबीसी उर्दूशी बोलताना जय प्रकाश म्हणाले, "मानवतेला कोणतीही सीमा नसते. दोन्ही देशांतील सामान्य लोकांना शांतता, प्रगती आणि आनंद हवा आहे."
ते पुढे म्हणाले, "पाकिस्तानशी संबंधित एखादी वस्तू अशा पद्धतीने आपल्या घराच्या छतावर येऊन पडेल, याची मी कल्पनाही केली नव्हती. लाहोरमधून सोडलेले फुगे हिमाचल प्रदेशातील इतक्या दूरच्या डोंगराळ भागात कसे पोहोचले, याचे घरातील लोकांसह आजूबाजूच्या रहिवाशांनाही आश्चर्य वाटत आहे."
जय प्रकाश म्हणाले, "एका छोट्याशा घटनेमुळे दोन्ही देशांतील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आहे. लाहोरमधून आलेले हे फुगे म्हणजे दोन्ही देशांमधील लोकांमधील माणुसकीच्या सुंदर नात्याचं उदाहरण आहे."
ते म्हणाले, "मी आणि माझ्या कुटुंबीयांनी पहिल्यांदा हे फुगे पाहिले, तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. पण, हे फुगे लाहोरमधील एका महिला महाविद्यालयातून सोडण्यात आल्याचे समजल्यावर आमचं आश्चर्य आनंदात बदललं."
सोशल मीडियावरही चर्चा
End of podcast promotion
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं, "खेळातून द्वेष नाही, तर प्रेम शिकायला मिळतं. आज लाहोरचा झेंडा भारतातही त्याच अभिमानाने फडकला. प्रेमालाही अशाच सहजपणे सीमा ओलांडता आल्या असत्या, तर किती छान झालं असतं."
'पंजाब पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, "हे फुगे लाहोरच्या टाउनशिप भागातून सोडण्यात आले होते. ते अमृतसर, जालंधर आणि चंदीगडच्या आकाशातून प्रवास करत अखेर हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अर्की भागात राहणाऱ्या जय प्रकाश यांच्या घराजवळ येऊन पडले."
लाहोरमधील गव्हर्नमेंट वुमेन्स ग्रॅज्युएट कॉलेजच्या प्राचार्या प्रा. डॉ. अंबरीन जावेद खान यांनी बीबीसीला सांगितलं, "खेळांसाठी आमचं कॉलेज संपूर्ण पंजाबमध्ये ओळखलं जातं. खेळांमुळेच मैत्री निर्माण होते. कदाचित त्यामुळेच आमच्या कॉलेजमधून सोडलेल्या फुग्यांनी आजूबाजूच्या परिसरात शांतता आणि मैत्रीचा संदेश पोहोचवला असावा."
त्या पुढे म्हणाल्या की, त्यांच्या कॉलेजमधील खेळाडू संपूर्ण पंजाबमध्ये प्रसिद्ध आहेत.
"2017 पूर्वी हे कॉलेज केवळ शारीरिक शिक्षणासाठी होते. परंतु, त्यानंतर त्याचा समावेश सर्वसाधारण महाविद्यालयांच्या गटात करण्यात आला."
त्या म्हणाल्या, "आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या दिवशी हे फुगे पाकिस्तानातून भारतात पोहोचले, त्याच दिवशी दोन्ही देशांच्या 'अ' संघांमध्ये क्रिकेटचा सामना सुरू होता.
तरीही एकही फुगा फुटला नाही. ज्या स्थितीत हे फुगे आम्ही सोडले होते, त्याच स्थितीत ते भारतात पोहोचले. त्यामुळे हे फुगे आमच्याकडून शांततेचा संदेश देणारे दूत ठरले आहेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























