शिवराज मोटेगावकर यांना CBI नं केली अटक, NEET पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रात मोठी कारवाई

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Facebook/shivrajmotegaonkarofficial

फोटो कॅप्शन, शिवराज मोटेगावकर
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

देशभरात खळबळ उडालेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रात मोठी कारवाई करण्यात आलीय.

लातूरमधील एका प्रसिद्ध क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) अटक केलीय.

मोटेगावकर यांची काल (17 मे) जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आजही (18 मे) त्यांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (CBI) रविवारपर्यंत 9 आरोपींना अटक केली होती. त्यात आता शिवराज मोटेगावकरांची भर पडल्यानं एकूण अटक झालेल्या आरोपींची संख्या 10 वर पोहोचलीय.

NEET (UG) 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी पार पडली. मात्र, या परीक्षेतील पेपर लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर 10 मे 2026 रोजी नॅशनल परीक्षा संस्थेने (NTA) परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ही पुन्हा 21 जून 2026 रोजी नव्याने ही परीक्षा होणार आहे.

'मोबाईलमध्ये आढळले लीक झालेले प्रश्न'

मोटेगावकर यांना अटक करण्यात आल्यानंतरच्या मेमोमध्ये त्यांना अटक करण्यात आल्याची कारणं देण्यात आली आहे.

त्यात असं म्हटलं आहे की, "तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, शिवराज रघुनाथ मोटेगावकर हे NEET UG परीक्षा-2026 ची प्रश्नपत्रिका लीक (गळती) करणे आणि त्यांचे वितरण करणे या गुन्ह्यात गुंतलेल्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत.

तसेच, इतर आरोपींशी संगनमत करून त्यांनी NEET UG परीक्षा, 2026 ची प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे परीक्षा होण्यापूर्वीच, म्हणजेच 23.04.2026 रोजी मिळवली होती.

दिनांक 14.05.2026 रोजी शिवाजी नगर, लातूर येथील आरोपी शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान, आरोपी शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये NEET UG 2026 चे लीक झालेले प्रश्न आढळून आले.

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या (NTA) संबंधित सार्वजनिक सेवकांशी (शासकीय कर्मचाऱ्यांशी) गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून हा गुन्हा करण्यात आला."

शिवराज मोटेगावकर यांनी इतर आरोपींसोबत लीक झालेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील आणि इतरांसह अनेक व्यक्तींना पुरवल्या, असंही तपासात पुढं आल्याचं यात म्हटलं आहे.

मोटेगावकर यांनी लीक झालेल्या NEET UG परीक्षा, 2026 च्या प्रश्नपत्रिकांच्या हाताने लिहिलेल्या प्रती ज्या सर्व व्यक्तींना पुरवल्या होत्या, त्या सर्व व्यक्तींची नावे उघड केलेली नाहीत. तपासादरम्यान असेही समोर आले आहे की, आरोपीने परीक्षेनंतर लीक झालेल्या प्रश्नपत्रिका नष्ट केल्या आणि याद्वारे पुराव्यांचा नाश केला, असंही या मेमोमध्ये म्हटलं आहे.

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Facebook/Shivraj Motegaonkar

फोटो कॅप्शन, शिवराज मोटेगावकर

यानुसार BNS, 2023 मधील कलम 61(2), 238, 303(2), 316(5), 318(4), तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 मधील कलम 13(2) सह 13(1)(a) (2018 मधील सुधारणा अनुसार) आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) अधिनियम, 2024 मधील कलम 10 सह 3, 4, 5 आणि 11 अंतर्गत शिक्षेस पात्र व दखलपात्र गुन्हे ठरतात, असं या अरेस्ट मेमोद्वारे मोटेगावकर यांना सांगण्यात आलं आहे.

शिवराज मोटेगावकर कोण आहेत?

शिवराज मोटेगावकर यांना लातूर पॅटर्नमध्ये कोचिंग क्षेत्रात मोठं नाव समजलं जातं. ते केमिस्ट्रीचे प्राध्यापक असून लातूरसह मराठवाड्यातील अत्यंत मोठ्या कोचिंग नेटवर्कचे संचालक आहेत. RCC Classes या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोचिंग संस्थांचा कारभार ते पाहतात.

लातूरमध्ये 11वी – 12वी NEET आणि JEE ची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये या क्लासेसला मोठी मागणी आहे.

या संस्थांमध्ये एकूण जवळपास 10 हजारपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश घेतात. 11वीच्या विद्यार्थ्यांकडून अंदाजे ₹40,000, तर 12वीच्या विद्यार्थ्यांकडून ₹50,000 इतकी वार्षिक फी घेतली जाते.

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, Facebook/Shivraj Motegaonkar

फोटो कॅप्शन, शिवराज मोटेगावकर

परीक्षेपूर्वी दिले जाणारे गेस पेपर आणि प्रॅक्टिस टेस्टमुळे RCC क्लासेसची ओळख लातूर पॅटर्नमध्ये अधिक बळकट झाली.

3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेनंतर मोटेगावकर यांनी स्वतः त्यांच्या फेसबूकवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, 42 प्रश्न हे सरांनी दिलेल्या गेस पेपरमधूनच आले होते.

हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर एका पालकाने लातूर एसपी कार्यालयात त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर सीबीआयकडून शिवराज मोटेगावकर यांची पेपर लीक कनेक्शन संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

लातूरसोबतच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही त्यांच्या कोचिंगच्या शाखा असून हजारो विद्यार्थी तिथे NEET–JEE ची तयारी करतात.

आता परीक्षा 21 जून रोजी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."

"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं होतं.

तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं होतं.

(या बातमीसाठी बीबीसीचे सहकारी पत्रकार प्रविण ठाकरे यांनी अतिरिक्त वार्तांकन केले आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)