'5 लाख लोक, 151 गाड्या, 6 हेलिपॅड, गर्दीमुळे घोड्यांची शर्यत रद्द'; 'या' आमदाराच्या मुलीचे लग्न चर्चेत

फोटो स्रोत, Ranjita Kumari/BBC
- Author, गीता पांडे
- Role, महिला आणि सामाजिक विषयांच्या संपादक, भारत
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
भारतातील सर्वात गरीब राज्य असलेल्या बिहारमध्ये एका राजकारण्याच्या मुलीच्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सोहळे आणि मोठ्या थाटामाटामुळे हा विवाह प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आला आहे.
बिहारचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचा विवाह बुधवारी (25 नोव्हेंबर) पार पडला. अनेक दिवसांपासून या लग्नाचे भव्य कार्यक्रम सुरू होते. यात घोड्यांची शर्यतही आयोजित करण्याची तयारी होती.
बुधवारी झालेल्या विवाह समारंभाला लाखो लोक उपस्थित होते. यामध्ये बिहार विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यातील तसेच देशातील इतर अनेक बडे नेतेही सहभागी झाले होते.
पाटणा या राजधानीच्या शहरापासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या नदवां गावातील अनंत सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी हा सोहळा पार पडला.
या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत मोकामा मतदारसंघाचे 5 वेळा आमदार राहिलेले अनंत सिंह म्हणाले होते, "केवळ बिहारमधीलच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि पाकिस्तानमधील लोकांनाही लग्नाचं निमंत्रण दिलं आहे."
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नाला सुमारे 5 लाख लोक उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण गावाला जत्रेचं स्वरूप आलं होतं. पाटण्याकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या रस्त्यांवर अनेक तास वाहतूकीची कोंडी झाली होती.
महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी गावात 6 हेलिपॅड उभारण्यात आले होते. शेकडो आचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वयंपाकघरांमध्ये 150 हून अधिक प्रकारचे पदार्थ बनवले होते. यात 80 लाख मिठाईच्या नगांचाही समावेश होता.
बुधवारी झालेल्या लग्नातील सर्वात मोठं आकर्षण घोड्यांची शर्यत होती. त्यासाठी 52 घोडे आणण्यात आले होते. पण, ही शर्यत ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमले होते. अनेकजण थेट शर्यतीच्या मैदानात शिरले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

फोटो स्रोत, Getty Images
End of podcast promotion
लग्नाआधी घोड्यांच्या शर्यतीच्या सरावाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक जमल्याचं या व्हीडिओत दिसत होतं. चांगलं दिसावं म्हणून शेकडो लोक विजेच्या खांबावरही चढून बसले होते.
मागील आठवड्यात आमदार अनंत सिंह यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यात एक पांढरी एसयूव्ही कार दाखवण्यात आली होती. या कारची किंमत 10 ते 20 लाख रुपये होती. घोड्यांच्या शर्यतीतील विजेत्याला ही कार बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला मोटारसायकल, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला स्कूटर देण्यात येणार होती.
नंतर ही शर्यत गुरुवारी घेण्याचं नियोजन करण्यात आलं.
दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतलेली वधू शिवांगी लँड क्रूझर गाडीतून लग्नस्थळी आली. तर अटलांटा येथील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतून एमबीए केलेला वर ऋषिकेश कुमार 151 गाड्यांच्या ताफ्यासह लग्नस्थळी पोहोचला.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अनंत सिंह यांनीही लग्नात थाटात प्रवेश केला. समर्थकांनी त्यांच्या एसयूव्ही गाडीला घेरलं होतं. त्यावेळी ते गाडीच्या सनरूफमधून बाहेर आले.
"मुलीच्या लग्नात त्यांची एन्ट्री इतकी दिमाखदार होती की, नवरदेवाची एन्ट्रीही तिच्यापुढे फिकी पडावी", असं एनडीटीव्हीने म्हटलं.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, वधूपक्षाने नवरदेवाला 2 कोटी 30 लाख रुपयांची कार, तसेच सोनं आणि चांदी भेट दिली. परंतु, या लग्नासाठी किती खर्च झाला, हे अनंत सिंह यांनी सांगितलेलं नाही.
2024 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचं लग्नही मोठ्या थाटात झालं होतं. परंतु, त्या लग्नाइतका मोठा थाट या लग्नात नव्हता.
परंतु, बिहारमधील या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये दर तीनपैकी 1 व्यक्ती गरीब आहे. अशा राज्यात झालेल्या या खर्चिक लग्नाला 'राजेशाही विवाह' असं म्हटलं जात आहे.
बिहार विधान परिषदेचे सदस्य आणि अनंत सिंह यांचे राजकीय विरोधक नीरज कुमार यांनीही या लग्नासाठी पैसा कुठून आला, याची चौकशी तपास यंत्रणांनी करावी, अशी मागणी केली आहे.

फोटो स्रोत, Ranjita Kumari/BBC
परंतु, या लग्नाबद्दलची चर्चा नवरा-नवरीपेक्षा वधूचे वडील आणि वादग्रस्त राजकारणी अनंत सिंह यांच्यामुळे अधिक होत आहे.
'छोटे सरकार' या नावाने ओळखले जाणारे अनंत सिंह यांना 'बाहुबली' असंही म्हटलं जातं.
बाहुबली म्हणजे मोठा दबदबा असलेला नेता. भारतातील अनेक भागांत स्थानिक पातळीवर प्रभाव आणि ताकद असलेल्या नेत्यांसाठी हा शब्द वापरला जातो.
अनंत सिंह यांच्या सोशल मीडियावरील व्हीडिओंमध्ये ते अनेकवेळा आपल्या मिशांना पीळ देताना दिसतात. मिशांना पीळ देणं हे अभिमान आणि पुरुषत्वाचं प्रतीक मानलं जातं.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, अनंत सिंह 20 ते 25 गाड्यांच्या ताफ्यासह प्रवास करतात. एका स्थानिक पत्रकाराने सांगितलं की, एकदा त्यांच्या घरी कर विभागाचे अधिकारी आले होते. त्यावेळी अनंत सिंह गळ्यात जिवंत साप गुंडाळून त्यांच्यासमोर गेले. त्यामुळे हे अधिकारी तिथून निघून गेले.
अनंत सिंह यांनी 2005 मध्ये पहिल्यांदा मोकामा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. त्यानंतर 2010, 2015, 2020 आणि 2025 मध्येही त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीपूर्वी अनंत सिंह यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात त्यांनी स्वतःचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ता म्हणून केला होता. तसेच आपले व्यवसाय आणि शेतजमीन असल्याची माहितीही दिली होती.
त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली आणि पत्नीची मिळून एकूण संपत्ती 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्यांच्याविरोधात 2 डझनहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहितीही दिली होती. यापैकी काही प्रकरणांमध्ये त्यांच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि दंगल घडवण्यासारखे गंभीर आरोप आहेत.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, अनंत सिंह अनेकवेळा तुरुंगात जाऊन आले आहेत. परंतु, गेल्या 20 वर्षांत ते केवळ 2022 मध्ये आमदार नव्हते. त्यावेळी एका प्रकरणात दोषी ठरवून त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. हे प्रकरण 2019 मधील आहे. त्यावेळी त्यांच्या घरातून एके-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता.
यामुळे बिहार विधानसभेने त्यांचं आमदारपद रद्द केलं. मात्र, जामिनावर बाहेर असताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं. त्यानंतर गेल्या वर्षीची विधानसभा निवडणूक लढवून ते पुन्हा विजयी झाले आणि आमदार म्हणून विधानसभेत परतले.
गेल्या वर्षीच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या एका हत्या प्रकरणातही अनंत सिंह यांचं नाव मुख्य संशयित म्हणून समोर आलं आहे. या प्रकरणी त्यांना 3 महिने तुरुंगात राहावं लागलं होतं.
आता 1 डिसेंबरपर्यंत तुरुंगात हजर होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणार असल्याचं सिंह यांनी मुलाखतींमध्ये म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























