'हे सरकारला 'ब्लँक चेक' मिळण्यासारखं'; जाणून घ्या राहुल गांधी डिलिमिटेशनवर नेमकं काय म्हणाले

फोटो स्रोत, Congress
राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत केंद्र सरकार आणि मतचोरीच्या आपल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेली.
त्यांनी म्हटलं की, लोकसभेतील सदस्यसंख्या 543 वरून 850 करावी, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे आणि यासाठी सरकार महिला आरक्षणाचं कारण देत आहे.
"असं केल्यामुळे सरकारला देशाच्या राजकीय नकाशात मोठे बदल करण्याची संधी मिळेल. जणू कोऱ्या कागदावर आपल्या मनाप्रमाणे चित्र काढता येतं. त्याचप्रमाणे, लोकसभेतील जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यानंतर सरकारला आपल्या मर्जीनुसार राजकीय बदल करता येतील," असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
"त्यांना भारतीय लोकशाहीचा नकाशा आपल्या मनाप्रमाणे बदलण्याची आणि ती उद्ध्वस्त करण्याची संधी मिळेल," असंही त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, YT/Rahut Gandhi
राहुल गांधी पुढे म्हणाले की, या प्रक्रियेत मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवल्या जातील. त्यावेळी सरकार आपल्या सोयीनुसार भाग आणि मतदारांची निवड करू शकेल.
प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा समान प्रमाणात 50 टक्क्यांनी वाढवल्या जातील, असं सांगितलं जात आहे. पण, हा मुद्दा नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
"लोकसभेच्या जागा 850 केल्यानंतर सरकारला ब्लँक चेक मिळेल. त्यानंतर सरकारला लोकशाहीत आपल्या मनाप्रमाणे कोणतेही बदल करता येतील," असा आरोप राहुल गांधींनी केला.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एप्रिलमध्ये सरकारने संसदेत एक प्रस्ताव मांडला होता. त्यात लोकसभेच्या जागांची संख्या वाढवून 850 करण्याची तरतूद होती. मात्र, हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.
End of podcast promotion
ते म्हणाले की, लोकसभेच्या 543 जागा कायम ठेवल्या तरी मतदारसंघांच्या सीमा बदलून राजकीय बदल करता येऊ शकतात. परंतु, जागांची संख्या 850 इतकी वाढवल्यास सरकारला आपल्या मनाप्रमाणे बदल करता येतील.
ते म्हणाले, "जेन झीने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार तुमचं भविष्य उद्ध्वस्त करतील."
"मतदारसंघांची पुनर्रचना करणाऱ्या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडलेले एक निवृत्त न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी निवडलेला तिसरा सदस्य असेल. महत्त्वाचं म्हणजे ज्ञानेश कुमार यांच्यावर आधीपासूनच विविध आरोप होत आहेत," असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केल्यानंतर डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याची चर्चा असताना विरोधकांमध्येच मतभेद उघडपणे समोर आले आहेत. द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्राच्या नव्या मसुद्याला पाठिंबा देऊन इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे.
लोकसभेत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असलेल्या या विधेयकावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) संभाव्य भूमिकेवरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी टीका केली आहे.
डिलिमिटेशनवर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले, "2 जुलै 2023 ला जेव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती. त्यावेळी मी हे बोललो होतो. अर्थात पुढे 3 वर्षे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की, हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं."

फोटो स्रोत, Facebook
ही प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी त्यांची 2 जुलै 2023 ची एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटलं होतं, "आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील 'दिगू टिपणीस' झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला."
"यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं."
"बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे याची खात्री असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?" असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला होता.
इंडिया आघाडीकडून डिलिमिटेशन विधेयकावर या 3 मागण्या, बैठकीत कोण हजर-कोण गैरहजर?
केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (28 नोव्हेंबर) इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत उपस्थित असलेल्या पक्षांनी संसदेत डिलिमिटेशन (मतदारसंघांची पुनर्रचना) विधेयकाला संयुक्तपणे विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी आरोप केला की, हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांना कायमचे सत्तेत राहायचे आहे आणि देशातील लोकशाही संपवायची आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, त्यांचा महिला आरक्षणाला विरोध नाही आणि सध्याच्या लोकसभा जागांच्या आधारावर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाऊ शकते. त्यांचा आक्षेप मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेला आणि लोकसभा जागांच्या प्रस्तावित वाढीला आहे.

फोटो स्रोत, X/@INCIndia
जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हे अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या हिताच्या विरोधात आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीच्या 3 मागण्या स्पष्ट केल्या आहेत.
इंडिया आघाडीच्या 3 मागण्या खालीलप्रमाणे,
इंडिया आघाडीने प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेसंदर्भात केंद्र सरकारकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत.
विरोधी पक्षांनी लोकसभेचे सध्याचे संख्याबळ कायम ठेवण्याची, सध्याच्या जागांच्या आधारावर महिलांना आरक्षण देण्याची आणि पुढील 25 वर्षांसाठी राज्यांमधील जागांचे सध्याचे वाटप कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
बैठकीनंतर काँग्रेसने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून विरोधी पक्षांच्या 3 मागण्या स्पष्ट केल्या.
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सविस्तर चर्चा झाली आणि विरोधी पक्षांचे या मागण्यांवर एकमत झाले आहे.
इंडिया आघाडी बैठकीत कोणते पक्ष सहभागी झाले होते?

फोटो स्रोत, X/@INCIndia
शनिवारी (28 नोव्हेंबर) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार , या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष खर्गे, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) अभिषेक बॅनर्जी, अपक्ष राज्यसभा खासदार कपिल सिबल, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अभय कुमार सिंह आणि मनोज झा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) पी. संतोष कुमार, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (आययूएमएल) ई. टी. मोहम्मद बशीर, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टीचे (आरएसपी) एन. के. प्रेमचंद्रन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, प्रियंका गांधी आणि केसी वेणुगोपाल उपस्थित होते.
त्याच वेळी द्रमुक (डीएमके), आम आदमी पार्टी (आप) आणि बिजू जनता दल (बीजेडी) यांनाही बैठकीत बोलावण्यात आले होते, परंतु या पक्षांनी त्यात सहभाग घेतला नाही.
मात्र, 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारीच (27 नोव्हेंबर) सांगितले होते की, त्यांचा पक्ष दोन्ही सभागृहांमध्ये या विधेयकाला तीव्र विरोध करेल. त्यांनी या विधेयकाला 'भाजप विजय विधेयक' म्हटले.
यामध्ये एससी-एसटीकडे दुर्लक्ष- काँग्रेस
डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी आज इंडिया आघाडीतील संसदीय पक्षनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत म्हटलं, "आमच्या इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी एकत्रितपणे असा निष्कर्ष काढला आहे की, मोदी सरकार आणत असलेलं हे घटनादुरुस्ती विधेयक लोकशाहीसाठी गंभीर धोका आहे. लोकशाही कमकुवत करून संपूर्ण सत्ता स्वतःकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न या विधेयकातून केला जात आहे."
ते पुढे म्हणाले, "यापूर्वी त्यांनी निवडणुकीत '400 पार'चा नारा दिला होता. मात्र तो उद्देश पूर्ण होऊ शकला नाही. आता लोकसभेतील जागांची संख्या 850 पर्यंत वाढवून '800 पार'चा मार्ग मोकळा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सत्तेवर कायम राहण्यासाठी आणि ती अधिकाधिक मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे."

फोटो स्रोत, Getty Images
खरगे पुढं म्हणाले, "याशिवाय अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या हितांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. हा अन्यायच आहे. कोणत्याही राज्यातील एससी आणि एसटींसाठी राखीव जागांची संख्या त्या राज्यातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असायला हवी.
त्यामुळे अनुसूचित जातींसाठी राखीव जागांची संख्या वाढायला हवी. मात्र, प्रस्तावित घटनादुरुस्तीत यासंदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. याशिवाय 2026ची जनगणना जवळ आली आहे, पण त्यावरही सरकार मौन बाळगलंय.
जर नवीन जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारे जागांचं वाटप केलं गेलं, तर वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात एससी आणि एसटी समाजाला अधिक जागांवर हक्क मिळेल. मात्र, या दुरुस्तीच्या तरतुदींवरून असं दिसतं की एससी-एसटी समाजाला त्यांच्या हक्काचा वाटा नाकारण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि सरकारला सोयीस्कर ठरेल तोच अजेंडा पुढे रेटला जात आहे."
विरोधकांची टीका तर काही पक्षांचा अचानक पाठिंबा
डिलिमिटेशन (पुनर्रचना) विधेयकाबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.
समाजवादी पक्ष, पीडीपी आणि आम आदमी पक्ष यांच्यासह अनेक विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, "भाजपसाठी निवडणुका हाच सर्वात महत्त्वाचा विषय आहे, देश नाही. त्यामुळे त्यांना लोकसभा मतदारसंघांच्या सीमांची चिंता आहे, देशाच्या सीमांची नाही."

फोटो स्रोत, Getty Images
मेहबूबा मुफ्ती यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं, "जम्मू-काश्मीरला वारंवार धोकादायक राजकीय प्रयोगांची प्रयोगशाळा बनवलं गेलं आहे." त्यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीरमधील डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तेव्हा देशाच्या इतर भागांनी मौन बाळगलं होतं.
त्या म्हणाल्या, "आज याच धोक्याची सावली देशाच्या उर्वरित भागांवरही आहे." जम्मू-काश्मीरमध्ये आज जो प्रयोग केला जात आहे, तो उद्या संपूर्ण देशात लागू केला जाऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह यांनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना डिलिमिटेशन (पुनर्रचना) विधेयकाला "भाजपला जिंकून आणा विधेयक" असं संबोधलं. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर खरा खेळ सुरू होईल, असं ते म्हणाले.
संजय सिंह यांनी आरोप केला, "भाजपला आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये केलेला प्रयोग संपूर्ण देशात पुन्हा राबवायचा आहे."

फोटो स्रोत, Getty Images
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या विधेयकाचं स्वागत केलं आहे.
त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, "पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने महिला आरक्षणाची अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी हे पाऊल मोठं योगदान देईल."
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी डिलिमिटेशन विधेयकाबाबत बोलताना म्हटलं, "इंडिया आघाडीत ज्या प्रकारे मतभेद उघड झाले आहेत आणि त्यातील काही घटक पक्ष आता आमच्या सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहेत, त्यावरून इंडिया आघाडीत फूट असल्याचं स्पष्ट होतं. माझ्या मते हा एक चांगला प्रस्ताव आहे आणि त्याचा प्रत्येक राज्याला फायदा होईल."
इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत आरजेडीचे खासदार अभय कुमार सिन्हा म्हणाले, "आमच्याकडे अजूनही आवश्यक संख्याबळ आहे. इंडिया आघाडीची बैठक होणार असून त्यामध्ये आम्ही आमची भूमिका ठरवू. भाजपचं राजकारण हे स्पष्टपणे 'फोडा आणि राज्य करा' या धोरणावर आधारित आहे. ते प्रत्येक शक्य मार्गाने आणि साधनांचा वापर करून ही रणनीती राबवत आहेत. देशभरातील आणि जगभरातील लोक हा राजकारणाचा प्रकार पाहत आहेत. त्यांना यश मिळणार नाही. आमच्या पक्षाच्या निर्णयांबाबत आणि इंडिया आघाडीप्रती असलेल्या बांधिलकीबाबत आम्ही पूर्णपणे एकजूट आहोत."
शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी म्हटलं, " इंडिया आघाडीची बैठक ही रणनीती ठरवण्यासाठीची बैठक नाही. झालेल्या नुकसानीवर नियंत्रण मिळवण्याचा तो एक प्रयत्न आहे. शरद पवार साहेबांनाही आता हे समजलं आहे की सर्व राज्यांसाठी 50 टक्के वाढ दिली, तर कोणत्याही राज्यावर अन्याय होत नाही. प्रत्येक राज्याची वाढ होते आणि कोणत्याही राज्याचं नुकसान होत नाही. भारताच्या इतिहासातील हे सर्वात न्याय्य सूत्र आहे.
डिलिमिटेशन विधेयक हे केवळ एनडीएचं विधेयक नाही, तर भारताचं विधेयक आहे. ही घटनात्मक गरज आहे. लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून 850 झाली, तर त्याचा अर्थ मोठ्या भारतासाठी अधिक मोठी संसद असा होतो.
या डिलिमिटेशन प्रक्रियेमुळे दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेल्या महिलांना आरक्षणाची हमी दिली जात आहे."
या विधेयकाचा भाजपाला फायदा होऊ शकतो- दिपके
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेच्या संभाव्य निवडणूक परिणामांबाबत एक पोस्ट केली आहे.
मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल झाल्यास भाजपला नव्या मतांशिवायही जागांचा फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
शनिवारी अभिजीत दिपके यांनी यासंदर्भात एक्सवर एक सविस्तर पोस्ट लिहिली.
त्यांच्या मते, "जर 1,000 मतदारांचा एखादा मतदारसंघ असेल आणि त्या मतदारसंघात भाजपला 400 तर विरोधकांना 600 मतं मिळत असतील, तर ती जागा विरोधक जिंकतील."
"मात्र डिलिमिटेशन (पुनर्रचना) प्रक्रियेनंतर हाच मतदारसंघ 500-500 मतदारांच्या दोन मतदारसंघांत विभागला गेला, तर निकाल बदलू शकतो. पहिल्या मतदारसंघात भाजपला 260 आणि विरोधकांना 240 मतं मिळतील. त्यामुळे भाजप ही जागा जिंकेल. दुसऱ्या मतदारसंघात भाजपला 140 आणि विरोधकांना 360 मतं मिळतील. येथे विरोधक विजयी होतील."

फोटो स्रोत, ANI
अशा प्रकारे ज्या ठिकाणी पूर्वी विरोधकांकडे एक जागा होती, तेथे डिलिमिटेशननंतर भाजप आणि विरोधक या दोघांकडे प्रत्येकी एक जागा जाईल, असं दिपके म्हणतात.
दिपके म्हणाले, "या परिस्थितीत विरोधक आपली सध्याची जागा कायम राखतात. कदाचित त्यामुळेच काही पक्ष डिलिमिटेशनला पाठिंबा देत असावेत. मात्र त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, ज्या भागात भाजपकडे यापूर्वी एकही जागा नव्हती, तिथेही भाजपला एक जागा मिळू शकते."
ते पुढे म्हणाले, "भविष्यात डिलिमिटेशनमुळे भाजपला असाच निवडणुकीचा फायदा होऊ शकतो. मतदार तेच राहतात आणि त्यांच्या मतदानाचा कलही बदलत नाही. पण मतदारसंघांच्या नव्या सीमा निवडणुकीचे निकाल बदलू शकतात."
डिलिमिटेशनला आम्ही पाठिंबा देणार- जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नेत्यांच्या चर्चेनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, ही चर्चा पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत नव्हती, मात्र डिलिमिटेशन ही घटनात्मक गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं होतं.
"डिलिमिटेशन प्रक्रिया ही घटनात्मक गरज आहे. डिलिमिटेशन प्रक्रियेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्ही त्या निर्णयाला पाठिंबा देणार आहोत. डिलिमिटेशनला आम्ही निश्चितपणे समर्थन करू.
आव्हाड यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत
विजय वडेट्टीवार यांची शरद पवारांवर टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
"पवार साहेबांनी या वयात जो निर्णय घेतला आहे, तो पाहून आम्ही आश्चर्यचकित आहोत. त्यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारसरणी पुढे नेण्यासाठी काम केलं आहे. अशा वयात त्यांना बाजूला ठेवणं योग्य नाही, असं आम्हाला वाटलं होतं."
ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनाही तसंच वाटलं. त्यामुळे आमच्याकडे 36 आमदार असतानाही आम्ही त्यांना पाठिंबा दिला. मात्र तो पाठिंबा आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी दिलेला नव्हता. आता आमची चूक आमच्या लक्षात आली आहे."
तसंच त्यांनी आणखी एक गंभीर आरोप करत म्हटलं, "आम्हाला माहिती मिळाली आहे की शरद पवार गटाकडून विरोधी पक्षांच्या बैठकीत कोणीही सहभागी होणार नाही. याचा अर्थ त्यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांच्या यादीत त्यांचंही नाव घेतलं जाईल."
महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही- संजय राऊत
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही शरद पवार गटावर निशाणा साधला.
"शरद पवार गटाला महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देऊ. शरद पवारांना राज्यसभेवर महाविकास आघाडीने निवडून आणलं आहे. अनेकांचा विरोध होता हे सुप्रिया सुळेंना माहिती आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणार असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही."

फोटो स्रोत, UGC
राऊत यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप केले.
"त्यांचे एजंट खासदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी फिरत आहेत. क्रॉस व्होटिंगसाठी 150 कोटी रुपयांचा दर लावण्यात आला आहे. डिलिमिटेशन करण्यासाठी खासदारांची संख्या 860 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे विधेयक राष्ट्रविरोधी आणि लोकशाहीविरोधी आहे. याच्या बाजूने मतदान करणाऱ्यांची इतिहास देशद्रोही म्हणून नोंद घेईल."
आम्ही बैठकीला जाणार होतो-कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "आम्ही आज इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार होतो. मात्र काँग्रेस नेत्यांच्या शरद पवारांवरील बेजाबाबदार वक्तव्यामुळे आम्ही निषेध करत या बैठकीला आज आता उपस्थित राहणार नाही असा निर्णय घेतलाय."
"आमच्याकडे डिलिमिटेशन बिलाचा ड्राफ्ट आलेला आहे त्यानुसार पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा याबाबत आमचे खासदार आणि नेते यावर अभ्यास करत आहेत. त्यावर सोमवारी सर्व खासदार एकत्रित बसून चर्चा करू आणि निर्णय घेऊ. पक्षाचा अधिकृत काहीही निर्णय झालेला नसताना काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः काहीतरी ठरवून टीका करणे हे दुर्दैवी आहे."

फोटो स्रोत, Facebook/Amol Kolhe
केंद्रातील नेत्यांशी चर्चा करून अशा पद्धतीने टीका करणे योग्य आहे का याबाबत काँग्रेस राज्यातील नेत्यांनी विचार करावा अशी विनंती असल्याचंही कोल्हे म्हणाले.
आम्ही बैठकीला उपस्थित राहणार होतो, सुप्रियाताई स्वतः झूम कॉलद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार होत्या. पण त्यापूर्वी अत्यंत बेजबाबदार आणि निषेध करावी अशी वक्तव्य महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी केली तर आम्ही का उपस्थित राहावे? यामुळे आम्ही न उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊतांना शिंदे गटाचं प्रत्युत्तर
शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
"लोकांवर असे आरोप करणं योग्य नाही. मग याचा अर्थ असा घ्यायचा का की पाठिंबा दिल्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावरही 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले जावेत?"
ते पुढे म्हणाले, "तुम्ही याच लोकांसोबत अडीच वर्षे सत्तेत होतात आणि आज तुम्ही त्यांच्यावरच प्रश्न उपस्थित करत आहात."
सरकारच्या मसुद्याला द्रमुकचा पाठिंबा
केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली आज अण्णा अरिवलयम येथे डीएमके खासदारांची बैठक झाली. त्यानंतर डीएमकेने डिलिमिटेशन विधेयकाच्या नव्या मसुद्याला पाठिंबा दर्शवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबत पत्रकारांशी बोलताना डीएमकेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा म्हणाले,
"1971 मध्ये डीएमकेसह सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लोकसभेतील जागांची संख्या निश्चित केली होती. त्यावेळी तामिळनाडूच्या दोन जागा कमी झाल्या होत्या. मात्र, राष्ट्रहित लक्षात घेऊन डीएमकेने तो निर्णय स्वीकारला होता. प्रत्येक राज्याला एक ठरावीक वाटा देण्यात आला आहे आणि त्यात कोणताही बदल होता कामा नये. आता दोन जागा कमी केल्या जाणार नाहीत, उलट अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहेत."
ते पुढे म्हणाले, "गेल्या वेळी पुनर्रचना झाली तेव्हा तामिळनाडूचा वाटा 7.18 टक्के होता. निष्पक्ष डिलिमिटेशनचा अर्थ हा वाटा कायम राखला गेला पाहिजे, असा आहे. काँग्रेससह सर्व पक्षांची हीच मागणी होती. हा आज घेतलेला निर्णय नाही. डीएमके सत्तेत असताना पक्षाने यासंदर्भात एक ऐतिहासिक ठराव मंजूर केला होता, जो भारतासाठी मार्गदर्शक ठरू शकतो."
एमके स्टॅलिन यांच्यासोबतच्या डीएमके खासदारांच्या बैठकीनंतर पक्षाचे खासदार दयानिधी मारन म्हणाले, "आम्ही अनेक वर्षांपासून या परिस्थितीचा सामना करत आहोत. आमच्यासाठी ही काही नवीन गोष्ट नाही. आम्ही नेहमीच न्याय्य डिलिमिटेशनची मागणी केली आहे. संपूर्ण देशात जागांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवली गेली, तर सध्याची परिस्थिती तशीच कायम राहील. कोणत्याही राज्याला असमतोलपणे फायदा किंवा तोटा होणार नाही."
ते पुढे म्हणाले, "आमची मागणी मान्य करण्यात आली आहे. आम्हाला सध्याची स्थिती कायम राहावी असं वाटतं. एकतर डिलिमिटेशन होऊ नये, किंवा ते झालंच तर आमच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे. दक्षिणेकडील राज्यांच्या जागा कमी होता कामा नयेत आणि उत्तरेकडील राज्यांना असमतोलपणे अधिक जागा मिळता कामा नयेत. आज उत्तर प्रदेशालाही 50 टक्के वाढ मिळत आहे, बिहारलाही 50 टक्के वाढ मिळत आहे आणि तामिळनाडूलाही 50 टक्के वाढ मिळत आहे. हीच सध्याची स्थिती कायम ठेवणारी व्यवस्था आहे. यात कोणताही बदल नाही. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबरोबरच पुढील 25 वर्षांसाठी आमच्या हक्कांचं संरक्षण होत असल्याची आम्ही खात्री करत आहोत."
डिलिमिटेशन विधेयकावरून वाढणार राजकीय संघर्ष?
सध्या लोकसभेत एनडीएकडे 319 खासदारांचं पाठबळ असल्याचं मानलं जात आहे. डिलिमिटेशनसारखं घटनादुरुस्तीचं विधेयक मंजूर करण्यासाठी 360 मतांची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर प्रादेशिक पक्षांची भूमिका निर्णायक ठरू शकते.
डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबरच विरोधी आघाडीतील पक्षांमध्येही राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)































