लातूर पॅटर्नची गोष्ट : कोचिंग क्लासेसचं मोठ्या उद्योगात कसं रूपांतर झालं?

शिवराज मोटेगावकर

फोटो स्रोत, SudhakarJoshi/Facebook

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

'शाळेत येताना घड्याळ बघायचं, मात्र घरी परतताना घड्याळ बघायचं नाही म्हणजे लातूर पॅटर्न' - अशी व्याख्या केली होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी.

सुमारे चार दशकांपासून दहावी, बारावी आणि विविध प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशामुळे लातूर चर्चेत येऊ लागलं आणि तिथल्या शिक्षणाला 'लातूर पॅटर्न' असं नाव रूढ झालं.

मात्र, यावेळी, NEET-UG 2026 परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अर्थात सीबीआयनं लातूरमधून दोन व्यक्तींना अटक केली आणि या लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली.

रसायनशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि रेणुकाई करियर सेंटरचे (RCC) संस्थापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे.

लातूरमध्ये नेमकं चालतं तरी काय?

लातूर हे मराठवाड्याचं शैक्षणिक केंद्र आहे, असं म्हणायला हरकत नाही.

लातूर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोली अशा आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षांची तयारी करायला इथे येतात.

लातूरमध्ये अनेक नामांकित शाळा, महाविद्यालयं आणि कोचिंग क्लासेस आहेत.

1982 साली तयार झालेल्या या जिल्ह्यात मागच्या चार दशकांमध्ये कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांचं एक मोठं विश्व तयार झालं आहे. निकालानंतर लातूरच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होते.

लातूरच्या देशिकेंद्र विद्यालय आणि केशवराज विद्यालय या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक मोठी कसरत करताना दिसतात, तर दहावीनंतर राजर्षी शाहू महाविद्यालय आणि दयानंद महाविद्यालयात अकरावीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गुणवत्ता याद्या लावल्या जातात.

ज्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळत नाही, त्यांना विनाअनुदानित तुकड्यांमध्ये अनुदान भरून प्रवेश घ्यावा लागतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, SudhakarJoshi/Facebook

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर NEET आणि JEE या परीक्षांच्या तयारीसाठी प्रवेश घ्यावा लागतो.

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून अनेक संस्था इथे तयार झाल्या.

याचं प्रमाण एवढं आहे की, कधीकाळी उद्योगांसाठी उभारलेल्या एमआयडीसीचा परिसर आता 'ट्युशन एरिया' म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला छोट्या हॉलमध्ये सुरु झालेले क्लासेस कालांतराने मोठमोठ्या गोडाऊन्समध्ये गेले.

संध्याकाळी किंवा सकाळी कोचिंग सुटली की, ट्युशन एरियातल्या रस्त्यांवर पाऊल टाकायला देखील जागा नसते. आणि अशा अवाढव्य गर्दीला सांभाळणारी एक समांतर अर्थव्यवस्थाच लातूरमध्ये निर्माण झाली आहे.

पण लातूरचं हे शैक्षणिक विश्व नेमकं कसं तयार झालं? कधीकाळी विद्यार्थ्यांना हमखास यशाची हमी देणाऱ्या या लातूर पॅटर्नची सुरुवात कशी झाली? आणि आज लातूरची परिस्थिती काय आहे? हे समजून घेण्यासाठी आम्ही इथे शिकवणारे शिक्षक, पालक आणि या बदलांचे साक्षीदार असलेल्या लोकांशी संवाद साधला.

'लातूर पॅटर्नमधून विद्यार्थीच हरवत चाललाय'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मागच्या 30 वर्षांपासून लातूरमध्ये जोशी मॅथ्स क्लासेस चालवणाऱ्या सुधाकर जोशी यांनी सांगितलं की, "लातूर पॅटर्नचं जे स्वरूप आत्ता दिसत आहे, ते तसं कधीच नव्हतं. लातूरमध्ये नेहमीच शाळा आणि महाविद्यालयं खूप महत्त्वाची राहिली आहेत, किंबहुना लातूरच्या देशिकेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक शि. वै. खानापुरे यांच्या प्रयत्नांनीच लातूर पॅटर्नची सुरुवात झाली होती असं म्हणता येईल."

"आता बारावीच्या स्पर्धा परीक्षांसाठी ओळखला जाणारा हा पॅटर्न खरंतर शाळेतून सुरु झाला. आधी देशिकेंद्र विद्यालय, केशवराज विद्यालय आणि बाकीच्या शाळांनी सराव आणि अतिरिक्त अभ्यासाच्या जोरावर लातूर पॅटर्न उभा केला होता."

तर लातूरमध्ये गेली अनेक वर्षे पत्रकारिता करणारे विकास गाढवे सांगतात, "लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला आणि लातूरकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. त्यानंतर शाळांचा हा अभ्यास आणि सरावाचा पॅटर्न दयानंद महाविद्यालय आणि राजर्षी शाहू महाविद्यालय या कॉलेजेसनी राबवला.

"डॉ. जनार्दन वाघमारे, अनिरुद्ध जाधव आणि प्राचार्य पुरोहित या आणि अशा बऱ्याच शिक्षकांनी केलेल्या कष्टामुळे या दोन महाविद्यालयातील विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागले."

सुधाकर जोशी म्हणाले, "पुढे जेव्हा बारावीच्या गुणांवर इंजिनियरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणं बंद झालं आणि या प्रवेशांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) ही परीक्षा घेतली जाऊ लागली. यामुळे हळूहळू कोचिंग क्लास किंवा खासगी शिकवण्याचं महत्त्व वाढू लागलं. त्यावेळी कॉलेज करून उरलेल्या वेळात ज्या विषयाची अडचण आहे केवळ त्याच विषयाचा क्लास लावायचा अशी पद्धत लातूरमध्ये होती. एकाच विषयाचे क्लासेस घेणारे वेगवेगळे शिक्षक आणि क्लास होते. कॉलेज, कोचिंग क्लास आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर लातूरचे निकाल चांगले लागत होते."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, SudhakarJoshi/Facebook

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

सुधाकर जोशी यांनी सांगितलं, "लातूरमध्ये प्रमुख चार ते पाच ठिकाणं आहेत जिथे सर्व विषयांची कोचिंग होते. बाकी पंधरा ते सोळा कोचिंग क्लासेस आहेत. चाळीस ते पंचेचाळीस हजार विद्यार्थी लातूरमध्ये शिक्षण घेतात आणि परीक्षांची तयारी करतात."

"हळूहळू क्लासेसचं स्वरूप बदलू लागलं. नंतर जेव्हा सीईटी आणि जेईई सारख्या परीक्षा आल्या तेव्हा या क्षेत्राचं व्यापारीकरण वेगाने वाढलं. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी NEET सुरु झाली आणि मग 'सगळे विषय एकाच छताखाली' हा पॅटर्न सुरु झाला. मुलांसाठी पण ते सोयीचं झालं. त्यानंतर वैयक्तिक क्लासेसचं प्रमाण थोडं कमी होत गेलं. एका विषयाचे क्लासेस घेणारे शिक्षक मोठ्या अकॅडमींमध्ये जायला लागले. राष्ट्रीय पातळीवरचे ब्रँड लातूरमध्ये यायला लागले," असं जोशी यांनी सांगितलं.

कोचिंग क्लासेसचं मोठ्या उद्योगात कसं रूपांतर झालं?

मागच्या दोन दशकांमध्ये लातूरमधली परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलल्याचं विकास गाढवे म्हणतात. ते पत्रकार आहेत आणि मागच्या पंचवीस वर्षांपासून ते लातूरमध्येच राहतात.

विकास गाढवे म्हणाले, "कोचिंग क्लासेसचा प्रतिसाद वाढला आणि मग नामांकित महाविद्यालयातील काही सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सीईटीचे कोचिंग क्लासेस सुरु केले. अशा महाविद्यालयातून निवृत्त झालेल्या प्राध्यापकाला खासगी कोचिंगमध्ये मागणी वाढली. कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींवर विशिष्ट महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे फोटो वापरले जाऊ लागले. ही अशी महाविद्यालयं होती जी गुणवत्तेसाठी ओळखली जात होती, पालकांचा त्यांच्यावर विश्वास होता. लातूरच्या खासगी क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकांना वार्षिक एक ते दीड कोटीचे पॅकेजेस दिले जाऊ लागले. काही ठराविक संस्था सोडल्या तर इतर ठिकाणी नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि पूर्णवेळ कोचिंग करायची अशी पद्धत लातूरमध्ये सुरु झाली."

"खासगी क्लासेसमध्ये स्पर्धा वाढली आणि यातूनच प्राध्यापकांची पळवापळवी सुरु झाली. हे सगळं एका बाजूला होत असताना लातूरच्या विद्यार्थ्यांचे निकाल चांगले लागत होते. पालकांची स्वप्नं दिवसेंदिवस वाढत होती आणि त्यामुळे लातूरकडे येणाऱ्यांची संख्या वाढतच होती. काही व्यावसायिकांना यातच संधी दिसली आणि त्यांनी राजस्थानच्या कोटा येथून प्राध्यापक आणून स्वतःचे कोचिंग क्लास सुरु केले. कोचिंग व्यवसायात राजकीय मंडळी आणि इतर वर्गांचा हस्तक्षेप वाढला. याचा स्पर्धेतून कोचिंग क्लास चालवणाऱ्या अविनाश चव्हाण यांच्या खुनापर्यंत हे प्रकरण गेलं," असं गाढवे म्हणाले.

अविनाश चव्हाण

फोटो स्रोत, CHANDANUMAR SHARMA/FACEBOOK

फोटो कॅप्शन, लातुरातल्या प्रसिद्ध असलेल्या स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

'NEET मुळे डॉक्टर होणं सामान्यांच्या आवाक्याबाहेर?'

NEET परीक्षेमुळे डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे सामान्य वर्गाच्या आवाक्याबाहेर गेल्याचं डॉ. संजय दाभाडे यांना वाटतं.

NEET परीक्षेबाबत बोलताना ते म्हणाले, "वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सरकारने अखिल भारतीय पातळीवर NEET परीक्षा सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील आणि कमी आर्थिक उत्पन्न गटातील अनेक विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडले. या बदलामुळे परीक्षेच्या तयारीसाठी महागड्या कोचिंग क्लासेसचं महत्त्व वाढलं आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर झाला."

राज्य आणि देशातील अनेक महाविद्यालयांमध्ये या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित झालेली नसल्याचं दाभाडे यांचं मत आहे.

ते म्हणाले, "महाविद्यालयांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि एकूणच शिक्षणव्यवस्थेमध्ये या परीक्षेची तयारी करून घेण्याची आवश्यक क्षमता विकसित झालेली नाही. विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळवून देण्याची जबाबदारी महाविद्यालयांची राहिलेली नाही आणि सरकारनेही यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. या परीक्षेसाठी विशिष्ट तंत्र आणि अभ्यासपद्धती विकसित करावी लागते. त्यासाठी शिक्षक आणि प्राध्यापकांचं प्रशिक्षण गरजेचं आहे. मात्र यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे बोटावर मोजण्याइतकी काही महाविद्यालयं सोडली तर इतर ठिकाणी स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करून घेतली जात नाही."

वैद्यकीय शिक्षणाचे विद्यार्थी

फोटो स्रोत, Bandeep Singh/The The India Today Group via Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

शिक्षणातील खासगीकरणाबाबत बोलताना दाभाडे म्हणाले, "विनाअनुदानित पद्धतीने महाविद्यालयं चालवण्याची जबाबदारी टाकून सरकारने यातून हात काढून घेतल्याचं चित्र दिसतं. दुसरीकडे महाविद्यालयांनीही प्रवेशाच्या नावाखाली या बाजारात उडी घेतली आहे. त्यामुळे नाममात्र प्रवेश घ्यायचा आणि पूर्णवेळ कोचिंग करायचं, असा सल्लाही अनेकदा विद्यार्थ्यांना दिला जातो."

ते पुढे म्हणाले, "आज शिक्षणाचा वाढलेला खर्च पाहता ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि पालकांसमोर डॉक्टर होण्याचं स्वप्न सोडून देण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक तंत्र विकसित झालेलं नाही, आणि महागड्या क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची अनेक पालकांची आर्थिक क्षमता नाही. त्यामुळे मेडिकल आणि इंजिनियरिंग शिक्षणावर हळूहळू उच्च आर्थिक वर्गाचं वर्चस्व वाढत चाललं आहे असं वाटतं."

इंटिग्रेटेड कॉलेजेसचं वाढलेलं प्रमाण

एका प्राध्यापकांनी नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीला सांगितलं की, "मागच्या काही वर्षांमध्ये इंटिग्रेटेड कॉलेजेसचं प्रमाण वाढलं आहे. एखाद्या महाविद्यालयात नावाला प्रवेश घ्यायचा आणि पूर्णवेळ कोचिंग क्लासेसमध्येच अभ्यास करायचा असे प्रकार वाढू लागले आहेत. काही खासगी क्लासेस महाविद्यालयांना विद्यार्थी पुरवण्याचं देखील काम करतात."

इंटिग्रेटेड कॉलेजमुळे बोर्डाच्या परीक्षेत किमान गुण (ग्रुपिंग) मिळवण्यात अडचणी येत असल्याचं सुधाकर जोशी यांनी सांगितलं, "महाविद्यालयाचं महत्त्व कमी झाल्यामुळे बोर्डाचा अभ्यास मागे राहू लागला. केंद्रीय परीक्षांच्या अभ्यासावरचा भर एवढा की बोर्डाच्या परीक्षेत साधं ग्रुपिंग करायला देखील अडचणी येऊ लागल्या आहेत. काही प्रमुख महाविद्यालयं सोडली तर बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयात जातच नाहीत. केवळ प्रॅक्टिकल आणि परीक्षेला जाऊन पूर्णवेळ कोचिंगचा मार्ग निवडला जातो."

'कोचिंग क्लासेसना मिळणाऱ्या चमकदार निकालामागचं गुपित'

दरवर्षी जेईई आणि NEET च्या निकालानंतर लागणारे फलक आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले मार्क्स यामागे देखील एक विशिष्ट कार्यपद्धती असल्याचं सुधाकर जोशी म्हणतात.

ते म्हणाले, "आधी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षकांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असायचं. एखादा विद्यार्थी 50 टक्क्यांचा असेल तर त्याला 60 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जायचे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार त्याची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न केले जायचे पण लॉकडाऊन नंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांचा लातूरकडे मोर्चा वळाला."

"संख्या वाढली आणि एका वर्गात किमान 300 ते 400 विद्यार्थी बसू लागले. त्यामुळे कोचिंग क्लासमध्ये शिकवणारे शिक्षक केवळ 50 हुशार विद्यार्थ्यांवर जास्तीचं लक्ष देऊ लागले. त्यांच्यासाठी वेगळे वर्ग, वेगळे शिक्षक आणि त्यातून मिळणारे चमकदार निकाल\ असं समीकरण होत गेलं. या निकालांकडे बघून पालक आपल्या मुलांना नावाजलेल्या कोचिंग क्लासमध्ये घालायला लागले. लातूरमध्ये एका विद्यार्थ्यांचा किमान वार्षिक खर्च 4 लाख आहे. मग त्यापुढे ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार पॅकेजेस आणि खर्च वाढत जातो," असं जोशी म्हणाले.

एवढा खर्च असूनही पालक लातूरचीच निवड का करतात?

विकास गाढवे म्हणतात, "लातूर पॅटर्नला घोकंपट्टी पॅटर्न असं देखील उपहासाने म्हटलं जायचं. सततचा सराव, पाठांतर यामुळे परीक्षेत तर उत्तम यश मिळतं. पण यातून शिक्षणाचा सर्वंकष परिणाम होत नाही असं काही शिक्षण तज्ज्ञांचं मत होतं. असं असलं तरी पालकांना वाटतं की माझ्या आयुष्यात जे मी करू शकलो नाही ते माझी मुलं करतील आणि म्हणून लातूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कधीच कमी होत नाही."

लातूरच्या ॲलन इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे वडील विवेक टाचले म्हणाले की, "लातूरमध्ये स्पर्धा परीक्षांची उत्तम तयारी करून घेतली जाते. राजस्थानच्या कोटा येथील ॲलन इन्स्टिट्यूट लातूरमध्ये आल्याने आमची सोय झाली आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांच्या तयारीची एक विशिष्ट पद्धत आहे. एका ठराविक आणि चाकोरीबद्ध पद्धतीने तयारी केल्याने विद्यार्थ्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. कोचिंग क्लासेसमध्ये नियमित सराव परीक्षा होते आणि त्या परीक्षांची काठिण्यपातळी जास्त असते. अशा प्रश्नांचा सराव केल्याने मुख्य परीक्षा तुलनेने सोपी जाते असं आम्हाला वाटतं."

लातूरमध्ये कोचिंग क्लासेससाठी लाखो रुपयांचा खर्च होतो. पण काही खासगी कोचिंग क्लासेस त्यांच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कात काही प्रमाणात सूट देतात.

विवेक टाचले म्हणाले की, "आम्ही खूप सकारात्मक आहोत, पण पेपरफुटीचा प्रकार दुर्दैवी आहे. अशा घटनांमुळे कष्ट करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचं नुकसान होतं. पण ही संधी देखील आहे. माझ्या मुलीला अधिक चांगले गुण मिळवण्यासाठी आता अजून एक महिना मिळाला आहे असं मी समजतो."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

पालकांच्या याच विश्वासावर लातूरमध्ये हजारो कोटींची उलाढाल होत असते. आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील शिक्षणाची परिस्थिती, सरकारी शाळांचा दर्जा आणि वाढती स्पर्धा यामध्ये समतोल साधण्याची कसरत पालक करत असतात.

लातूरच्या या शैक्षणिक बाजारात मराठवाडा आणि महाराष्ट्रातील कित्येक गरीब कुटुंबांचं डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण प्रवेश परीक्षा, कोचिंग आणि वाढत्या स्पर्धेच्या या युगात निकालांच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न अजूनही उरतो, तो म्हणजे, 'लातूर पॅटर्नमध्ये केंद्रस्थानी अजूनही विद्यार्थीच आहे का?'

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)