'तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं कधी देतील?', नॉर्वेच्या पत्रकाराला भारतानं दिलं 'हे' उत्तर

फोटो स्रोत, X/@Narendramodi
नॉर्वेमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत एक पत्रकार आणि मंत्रालयाचे प्रवक्ते यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला.
तत्पूर्वी, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांची भेट घेतल्यानंतर, नॉर्वेच्या एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. मात्र, पंतप्रधान मोदी हे उत्तर न देता तिथून निघून गेल्याचे दिसून आलं. या दोन्ही घटनांची आता भारतात मोठी चर्चा होत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्यासह अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या एका पत्रकाराने भारतातील 'मानवाधिकारांचे उल्लंघन' आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 'कठीण प्रश्नांना सामोरे जात नाहीत', याबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला प्रश्न विचारला.
प्रत्युत्तरादाखल, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारताला 'महान देश' आणि 'प्राचीन संस्कृती असलेला देश' असं म्हटलं. तसेच, कोरोना काळात भारताने 'अनेक देशांना लस दिली' आणि अशा अनेक कामांमुळे 'संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास असल्याचं' सांगितलं.
संपूर्ण प्रकरण काय आहे?
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत नॉर्वेच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला, 'भारत आणि नॉर्वे एकमेकांशी मजबूत भागीदारी करत आहेत. पण आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवावा? तुमच्या देशातील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवाल, असं वचन तुम्ही द्याल का? आणि तुमचे पंतप्रधान कठीण प्रश्नांची उत्तरं देण्यास कधी सुरूवात करतील?"
यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल म्हणाले की, आम्ही तुमचा प्रश्न ऐकला आहे आणि त्याचं उत्तर देऊ.
त्यावर त्या पत्रकाराने, मला याचं उत्तर लगेच हवं आहे, असं म्हटलं.
यानंतर त्याच पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) सीबी जॉर्ज यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, "भारत ही अतिशय प्राचीन आणि सुमारे पाच हजार वर्षांची संस्कृती आहे. आम्ही शून्याचा शोध लावला. आम्ही योगाचा शोध लावला."
सीबी जॉर्ज हे सांगत असताना त्या पत्रकाराने त्यांना पुन्हा थांबवत, माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या, असं सांगितलं.
यावर सीबी जॉर्ज म्हणाले, "ही माझी पत्रकार परिषद आहे. तुम्ही प्रश्न विचारला आहे. आता माझं उत्तर ऐकण्याचा संयमही ठेवायला हवा."

फोटो स्रोत, ANI
यानंतर पत्रकार पुन्हा म्हणाल्या की, योगा वगैरे गोष्टी न सांगता माझ्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या.
यावर सीबी जॉर्ज पुन्हा म्हणाले, "मी विश्वासाबद्दलच बोलत आहे. जेव्हा संपूर्ण जग कोरोना महामारीशी झुंज देत होतं, तेव्हा भारताने 150 हून अधिक देशांना लस आणि औषधं दिली. संकटातून बाहेर येण्यास आम्ही जगाला मदत केली. त्यामुळेच जगाने आमच्यावर विश्वास दाखवला. हा खरा विश्वास असतो."
यादरम्यान, मानवाधिकार उल्लंघनाबाबत विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यावं, अशी मागणी त्या पत्रकार वारंवार करत होते.
यावर उत्तर देताना सीबी जॉर्ज यांनी भारतात झालेल्या जी-20 परिषदेचा उल्लेख केला.
ते म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धासारख्या कठीण परिस्थितीतही भारताच्या नेतृत्वाखाली सर्व देश एका व्यासपीठावर आले. भारताने सर्वांना एकत्र आणलं आणि आफ्रिकन युनियनला जी-20चं कायम सदस्यत्व मिळवून देण्यातही यश मिळवलं.
"आफ्रिकन देशांच्या चिंता भारताने जगासमोर मांडल्या. हाच खरा विश्वास असतो," असं ते म्हणाले.
सीबी जॉर्ज उत्तर देत असतानाच संबंधित पत्रकार ही पत्रकार परिषद सोडून निघून गेल्या.
नॉर्वेच्या पत्रकाराचा पंतप्रधान मोंदीना प्रश्न
तत्पूर्वी, नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर, एक नॉर्वेजियन पत्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारताना दिसल्या. परंतु, पंतप्रधान मोदी तिथून निघून जात असल्याचं दिसून आले.
व्हीडिओमध्ये पत्रकार हेले लेंग या, "पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाही?", असं म्हणताना ऐकू येतं.
नंतर हेले लेंग यांनी हा व्हीडिओ शेअर करत लिहिलं की, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. मला त्याची अपेक्षाही नव्हती. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये नॉर्वे पहिल्या स्थानावर आहे, तर भारत 157व्या स्थानावर आहे."

फोटो स्रोत, X/@HelleLyngSvends
यानंतर त्यांच्या या पोस्टला उत्तर देताना नॉर्वेमधील भारतीय दूतावासाने एक्सवर लिहिलं की, दूतावास एक पत्रकार परिषद आयोजित करत आहे आणि त्या तिथे येऊन आपला प्रश्न विचारू शकतात.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या व्हीडिओचा उल्लेख करत पंतप्रधानांवर 'घाबरून तिथून निघून जाण्याचा' आरोप केला.

फोटो स्रोत, Anindito Mukherjee/Bloomberg via Getty Images
ते म्हणाले, "जेव्हा लपवण्यासारखं काही नसतं, तेव्हा घाबरण्याचीही गरज नसते. परंतु, जेव्हा जग एका तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांना काही प्रश्नांपासून घाबरून जाताना पाहतं, तेव्हा भारताच्या प्रतिमेवर त्याचा काय परिणाम होतो?"
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, "प्रिय हेले लेंग, भारतातील विरोधी पक्ष आणि कोट्यवधी भारतीयांच्या वतीने तुमचे आभार. तुम्ही ते केलं, जे आमची माध्यमं अनेकदा करू शकलेली नाहीत - सत्तेला प्रश्न विचारणं आणि जबाबदारीची मागणी करणं. प्रेस ब्रीफिंग असो किंवा प्रेस कॉन्फरन्स, नाव वेगळं असलं तरी ना उत्तरं मिळाली ना सत्य समजलं."
पंतप्रधान नरेंद मोदी हे सध्या पाच देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. यूएई, नेदरलँड्स आणि स्वीडननंतर ते नॉर्वेमध्ये पोहोचले आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन


























