You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या, 'सुनियोजित हत्या' असल्याचा भाजप नेत्याचा आरोप
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांचे खासगी सहायक (पीए) चंद्रनाथ रथ यांची बुधवारी (6 मे) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
बीबीसीचे वार्ताहर दिलनवाज पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना राजधानी कोलकात्याजवळील मध्यमग्राम येथे घडली.
वृत्तसंस्थांनी या घटनेचे व्हीडिओ प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये चंद्रनाथ रथ यांना रुग्णालयात नेतानाची दृश्यं आहेत.
ते ज्या गाडीत प्रवास करत होते, त्या गाडीवर विधानसभा पासचे स्टिकरही लावलेले होते.
भाजपने चंद्रनाथ रथ यांची हत्या 'पूर्वनियोजित कट' असल्याचे म्हटले आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हिंसक घटना घडू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
राज्यात तोडफोड आणि हिंसाचाराच्या अनेक घटना समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यांनी म्हटलं होतं की, तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) लोक आपली ओळख बदलून अशा घटना घडवत आहेत आणि हे सहन केले जाणार नाही.
राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धनाथ गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सुवेंदू अधिकारी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले, "ही एक पूर्वनियोजित हत्या होती. डीजीपींनीही हेच सांगितले आहे. 2-3 दिवसांपूर्वीच रेकी करण्यात आली होती."
हे टीएमसीच्या पंधरा वर्षांच्या 'महाजंगलराज'चे परिणाम असल्याचं अधिकारी यांनी म्हटलं.
सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष रथ यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि दुःखाच्या या काळात त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे.
तृणमूल काँग्रेसने निवेदन प्रसिद्ध करत म्हटले, "मध्यमग्राम येथे चंद्रनाथ रथ यांच्या क्रूर हत्येचा आणि निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात भाजप कार्यकर्त्यांच्या हातून मारल्या गेलेल्या तीन टीएमसी कार्यकर्त्यांच्या हत्येचाही आम्ही निषेध करतो."
टीएमसीने या संपूर्ण प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कोण होते चंद्रनाथ रथ?
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार 41 वर्षांचे चंद्रनाथ रथ हे मूळचे पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते. ते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जायचे आणि राज्याच्या राजकारणात अधिकारी यांच्या उदयाचे श्रेय काही प्रमाणात त्यांनाही दिले जाते.
अधिकारी यांच्या अगदी जवळच्या वर्तुळात असूनही ते अनेकदा पडद्यामागेच राहिले.
राजकीय संघटनात्मक कामात सक्रिय होण्यापूर्वी रथ यांनी रामकृष्ण मिशनमधून शिक्षण पूर्ण केलं आणि जवळपास दोन दशकं भारतीय वायुदलात सेवा बजावली होती.
रथ यांच्या कुटुंबाच्या जवळच्या लोकांनी सांगितले की, विद्यार्थी जीवनात ते रामकृष्ण मिशनच्या विचारसरणीने प्रभावित झाले होते.
वायुदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यानंतर ते हळूहळू राजकीय समन्वय आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये सक्रिय झाले.
अधिकारी कुटुंबाप्रमाणेच, रथ हेही पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते.
परिचितांच्या मते, रथ कुटुंब आणि अधिकारी कुटुंब यांच्यातील संबंध दोन दशकांहून अधिक जुने असून, ते पूर्व मेदिनीपूरमध्ये टीएमसीच्या विस्ताराच्या सुरुवातीच्या काळापासूनचे आहेत.
ते अनेक हाय-व्होल्टेज राजकीय संघर्षादरम्यान भाजपच्या कोअर टीमचाही भाग होते. यामध्ये भाजपच्या भवानीपूर मोहिमेचाही समावेश होता.
भाजप संघटनेतील काही गटांमध्ये अशीही चर्चा होती की, विधानसभा निवडणुकांनंतर अधिकारी यांच्या सरकारमध्ये मोठी भूमिका निभावल्यास रथ यांना महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी दिली जाऊ शकते.
त्यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)