You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
झिंक फॉस्फाईड काय असतं? पायधुनीतील कुटुंबाचा मृत्यू आणि कलिंगडाशी 'असा' आहे संबंध
मुंबईतील पायधुनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हादरले होते. या प्रकरणातील मृत्यू नेमके कसे झाले, याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम कायम होता.
आता या घटनेशी संबंधित फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) चा अहवाल समोर आल्याने तपासाला महत्त्वाचा वैद्यकीय व वैज्ञानिक आधार मिळाला आहे.
FSL च्या अहवालानुसार, मृत व्यक्तींच्या व्हिसेरा नमुन्यांच्या तपासणीत गंभीर बाब उघडकीस आली आहे.
सर्व मृतांच्या यकृत, मूत्रपिंड आणि प्लीहा यांसह पोटातील घटक, पित्त तसेच पोटातील मेदाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड या विषारी रासायनिक संयुगाचे अंश आढळून आले आहेत. तपास अहवालात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
झिंक फॉस्फाइड हे अत्यंत विषारी रसायन असून ते प्रामुख्याने उंदीरनाशक म्हणून वापरले जाते.
मानवी शरीरात गेल्यानंतर हे रसायन गंभीर स्वरूपाचे विषारी परिणाम निर्माण करते. त्यामुळे काही काळातच अवयव निकामी होण्याची शक्यता वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
FSL च्या अहवालानंतर या मृत्यू प्रकरणातील तपासाला नवे वळण मिळाले आहे.
मुंबईतील पायधुनीमध्ये राहणाऱ्या या कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिलच्या रात्रीच्या जेवणानंतर घडली होती. कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
कुटुंबातील सर्वांनी रात्री जेवणानंतर उशिरा कलिंगड खाल्लं होतं. त्यामुळं त्यांना विषबाधा झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता स्थानिक डॉक्टरांनी वर्तवली होती.
झिंक फॉस्फाईड काय असतं?
झिंक फॉस्फाईड (Zinc Phosphide) हे एक अतिशय विषारी रासायनिक संयुग असून ते प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी(रोडंट) मारण्यासाठी वापरलं जातं. हा पदार्थ शेती आणि धान्य साठवणुकीत कीटकनाशक (Rodenticide) म्हणून वापरला जातो.
झिंक फॉस्फाईड हा झिंक (Zn) आणि फॉस्फरस (P) यांपासून बनलेला अजैविक पदार्थ आहे. त्याचा रासायनिक फॉर्म्युला Zn₃P₂ असा असून तो गडद करड्या किंवा काळसर रंगाच्या पूड किंवा कणांच्या स्वरूपात आढळतो.
ते पोटात गेल्यावर काय होतं?
तज्ज्ञांच्या मते, झिंक फॉस्फाईड पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया करतं आणि त्यातून फॉस्फिन नावाचा अत्यंत विषारी वायू तयार होतो. हा वायू शरीरातील पेशींना ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया थांबवतो. त्यामुळे हृदय, फुफ्फुसं आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
झिंक फॉस्फाईडचा वापर प्रामुख्याने :
- शेतीत पिकांना नुकसान करणाऱ्या उंदीर, घुशी, खारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी
- धान्य साठवण केंद्र, शेतजमीन, बागा आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागा
- बहुतेक वेळा हा पदार्थ धान्य किंवा खाद्यात मिसळून वापरला जातो.
झिंक फॉस्फाईड चुकून गिळल्यास किंवा फॉस्फिन वायू श्वासात गेल्यास प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे अनेक देशांत या रसायनाचा वापर कडक नियम आणि नियंत्रणाखाली केला जातो आणि तो सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज उपलब्ध नसतो.
डॉक्टर काय सांगतात?
झिंक फॉस्फाईडचा वापर कशात होतो? शरीराला ते कसं घातक असतं? यासंदर्भात मुंबईतील डॉ. भूषण रोकडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "झिंक फॉस्फाईड हे एक अत्यंत विषारी रासायनिक रसायन (संयुग) आहे.
याचा वापर उंदीर, घुशी आणि इतर किडे मारण्यासाठी "रॅट पॉइझन" म्हणून केला जातो. हे साधारणपणे काळ्या किंवा राखाडी रंगाच्या पावडर स्वरूपात असतं. मात्र त्याचा वापर आणि स्वरूपानुसार काही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये तो बाजारात आढळतो."
याचा वापर कशात होतो, याबद्दल बोलताना डॉ. भूषण रोकडे म्हणाले की, "शेती करताना घुस लागू नये म्हणून उंदीर नियंत्रणासाठी, गोदामे, धान्य साठवण जागा येथे, कीटकनाशक किंवा उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो."
"मानवी शरीराला आणि इतर पाळीव प्राण्यांना हे खूप हानिकारक आहे."
शरीराला ते कसं घातक असतं, यासंदर्भात बोलताना डॉ. रोकडे म्हणाले की, "हे रसायन शरीरात पोटात गेल्यानंतर किंवा ओलाव्याच्या संपर्कात आल्यावर हे रसायन "फॉस्फीन गॅस" तयार करतं, जो अतिशय विषारी असतो.
हा वायू शरीरातील पेशींना ऑक्सिजन वापरण्यापासून रोखतो आणि अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करतो.यामुळे उलट्या होणे, श्वासाला लसणासारखा वास येणे, छातीत घट्टपणा जाणवणे, धाप लागणे, शॉक बसणे. अगदी कमी प्रमाणातही हे प्राणघातक ठरू शकते."
"यासाठी कोणतेही ठराविक प्रतिविष (अँटिडोट) उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करून केवळ आवश्यक ते सहाय्यक उपचार (सपोर्टिव्ह ट्रीटमेंट) दिले जातात. हे रसायन लहान मुलांपासून आणि अन्नपदार्थांपासून दूर ठेवावे. चुकून गिळल्यास किंवा विषबाधेची शंका आल्यास उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. अशावेळी तातडीने जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे," असंही डॉ. रोकडे म्हणाले.
फॉरेन्सिक रिपोर्टमधून काय समोर आलं?
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालासंदर्भात FSL चे संचालक डॉ . विजय ठाकरे यांच्याशी बीबीसी मराठीनं संवाद साधला.
डॉ. ठाकरे म्हणाले की, "पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात आम्ही फॉरेन्सिक सायन्स लॅब अहवाल पोलिसांकडे आज सुपूर्द केला आहे."
"अहवालानुसार, मृतांच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये म्हणजेच यकृत (लिव्हर), मूत्रपिंड (किडनी), प्लीहा (स्प्लीन) नमुन्यांमध्ये तसेच पोटातील पदार्थ, पित्त (बाइल) आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आले आहे. कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे."
याबद्दल मुंबईतील झोन-1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनीही याबाबत माहिती दिली. ते,"फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडून प्राप्त झालेल्या अहवालात सर्व मृत व्यक्तींच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि प्लीहा तसेच पोटातील घटक, पित्त आणि पोटातील मेदाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे."
प्रवीण मुंडे यांनी पुढे सांगितलं की, "तपासादरम्यान घेतलेल्या कलिंगडाच्या नमुन्यातही झिंक फॉस्फाइड आढळले आहे. मात्र, तपासासाठी पाठवण्यात आलेल्या इतर कोणत्याही अन्नपदार्थांच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आलेले नाही."
फॉरेन्सिक डॉक्टरांशी सल्लामसलत करून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहितीही प्रवीण मुंडे यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)