दुर्मीळ घटना, 12 वर्षे अपत्यासाठी वाट पाहिलेल्या महिलेनं एकाचवेळी दिला 5 बाळांना जन्म

    • Author, मायकेल टेफेरी
    • Role, बीबीसी आफ्रिका
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

इथिओपियातील एका महिलेच्या आयुष्यात 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आनंदाचा क्षण आला आहे. या महिलेने एकाचवेळी 5 बाळांना जन्म दिला आहे.

इथिओपियातील हरारी भागातील एक महिला मागील 12 वर्षांपासून अपत्यासाठी प्रयत्न करत होती. अखेर या महिलेनं 5 अपत्यांना (क्विंटुप्लेट्स) एकाचवेळी जन्म दिला आहे. ही एक अत्यंत दुर्मीळ अशी गर्भधारणा आहे.

या महिलेचं नाव बेद्रिया अडेम असं आहे. 'एकाचवेळी 5 मुलं' झाल्यामुळे मी आणि माझे पती 'खूप आनंदी' आहोत, असं त्या म्हणाल्या.

35 वर्षीय बेद्रिया यांनी हिवोत फाना स्पेशलाइज्ड हॉस्पिटलमध्ये 4 मुले आणि एका मुलीला जन्म दिला आहे. पाचही बाळांची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

"मी माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. इतकी वर्षे मी 'दुःख आणि नैराश्यात' होते, पण अखेर माझी प्रार्थना पूर्ण झाली," असं त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या.

आयव्हीएफ नाही, तर नैसर्गिक गर्भधारणा

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मोहम्मद नूर अब्दुलाही यांनी सांगितलं की, आई आणि पाचही मुलं डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. या बाळांचं वजन 1.3 ते 1.4 किलो दरम्यान आहे.

ते बीबीसीशी बोलताना म्हणाले की, 1 किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या नवजात बालकांच्या जगण्याची आणि निरोगी वाढ होण्याची शक्यता जास्त असते.

डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं की, रुग्णालयात आयव्हीएफची सुविधा उपलब्ध नाही. बेद्रिया यांना आयव्हीएफसारख्या (इन विट्रो फर्टिलायझेशन) उपचारांशिवाय नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली होती.

आयव्हीएफ उपचारामध्ये जर एकापेक्षा जास्त गर्भ गर्भाशयात ठेवले गेले, तर जुळी किंवा आणखी जास्त अपत्ये होण्याची शक्यता वाढते.

नैसर्गिकरित्या एकाचवेळी 5 अपत्ये होण्याची शक्यता खूपच कमी असते. साधारण 5 कोटी 50 लाखांमध्ये 1 असं प्रमाण असतं.

मानसिक त्रासाची 12 वर्षे

5 मे रोजी सायंकाळी सिझेरियन पद्धतीने बाळांचा जन्म झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं.

गर्भधारणेदरम्यान बेद्रिया यांना नियमित वैद्यकीय सेवा मिळत होती. एकापेक्षा जास्त अपत्ये असल्याचं त्यांना आधीच सांगण्यात आलं होतं.

या संपूर्ण काळात त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळाली होती, असं डॉ. मोहम्मद यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टरांनी बेद्रिया यांच्या 'उत्साहाचं'ही वर्णन केलं.

बेद्रिया म्हणाल्या की, सुरुवातीला मला 4 अपत्ये होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु प्रसूतीवेळी त्यांनी आणखी एका बाळाला जन्म दिला.

"मी फक्त एका अपत्यासाठी प्रार्थना केली होती, पण अल्लाहने मला 5 अपत्ये दिली," असं त्या म्हणाल्या.

या क्षणासाठी 'अनेक वर्षे प्रतीक्षा' करावी लागली, असंही त्यांनी नमूद केलं.

पहिल्यांदाच आई झालेल्या बेद्रिया यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीला दुसऱ्या लग्नातून एक अपत्य झालं आहे आणि ते त्यांच्यासोबतच राहतात.

त्या म्हणाल्या, "माझे पती मला म्हणायचे की, आधीच एक मूल (दुसऱ्या पत्नीपासूनचं अपत्य) आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. पण आतून मी खूप दुःखी होते. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचले होते, कारण गावातील लोक मला अपत्य न होण्यावरून प्रश्न उपस्थित करत होते."

"भूतकाळात मी जे सहन केलं, ते आता एखाद्या दूरच्या स्वप्नासारखं वाटतं आणि ते आठवायलाही मला आवडत नाही," असं त्यांनी म्हटलं.

त्या म्हणाल्या, "मी 12 वर्षे दुःखात घालवली, स्वतःला लपवून ठेवलं आणि सतत मुलांसाठी प्रार्थना केली- अखेर अल्लाहने माझी प्रार्थना ऐकली."

"मी उपजिविकेसाठी शेती करते आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा याचा मी अद्याप विचार केलेला नाही. पण मला विश्वास आहे की, अल्लाह मदत करेल आणि समाज तसेच सरकारकडूनही मला आधार मिळेल," असं त्यांनी म्हटलं.

या 5 बाळांची नावे नईफ, अम्मार, मुंझीर, नझिरा आणि अन्सार अशी आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)