You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकाच ठिकाणी करायच्या काम, हातावर टॅटूही सारखेच; नंतर समोर आलं धक्कादायक वास्तव
- Author, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
- वाचन वेळ: 6 मिनिटे
ज्युलिया टिनेट्टी आणि कॅसँड्रा मॅडिसन यांच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य होतं. एकाच बारमध्ये एकत्र काम करताना त्यांची मैत्रीही अगदी घट्ट झाली होती. पण त्या दोघींमध्ये प्रत्यक्षात किती जवळचं नातं आहे, हे त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं.
टिनेट्टी आणि मॅडिसन या दोघीही अमेरिकेतील कनेक्टिकटमध्ये 1990 च्या दशकात वाढल्या. लहानपणी त्या दोघी अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर राहत होत्या. तरीही त्यांची ओळख नव्हती. विशेष म्हणजे, दोघींनाही दत्तक घेतलं गेलं होतं.
लहानपणी मॅडिसनला तिच्या जन्मदात्या आईबद्दल नेहमीच उत्सुकता होती. एक दिवस तिला भेटावं, अशी तिची इच्छा होती. आपलं हास्य किंवा डोळे आईसारखे आहेत का, हा देखील ती विचार करत असत.
तिला जन्म देणारं कुटुंब कॅरिबियनमधील डॉमिनिकन रिपब्लिकमधील आहे, एवढंच तिला माहिती होतं.
"आमची खूपच गरीब परिस्थिती होती. त्यामुळे माझा सांभाळ करणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी मला दत्तक दिलं," असं मॅडिसन सांगते.
तरुणपणी मॅडिसनने जन्मदात्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिच्याकडे जन्मदाखला नव्हता. तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
दोघींमधलं टॅटूचं साम्य
19 वर्षांची असताना मॅडिसनने तिच्या हातावर डॉमिनिकन रिपब्लिकच्या ध्वजाचा टॅटू काढून घेतला. आपल्या मूळ ओळखीची (वारशाची) आठवण कायम राहावी, म्हणून तिने हा टॅटू काढला होता. "डॉमिनिकन असणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे," असं ती सांगते.
पाच वर्षांनंतर मॅडिसन एका बारमध्ये वेट्रेस म्हणून काम करू लागली. तिथे तिची सहकारी टिनेट्टीशी ओळख झाली. टिनेट्टीने मॅडिसनच्या हातावरचा डॉमिनिकन रिपब्लिकचा ध्वज असलेला टॅटू पाहिला.
विशेष म्हणजे टिनेट्टीकडेही डॉमिनिकन रिपब्लिकचा टॅटू होता, फक्त तिचा टॅटू पाठीवर होता. ती 22 वर्षांची असताना तिने हा टॅटू काढला होता, कारण ज्या ठिकाणी तिचा जन्म झाला होता, त्या जागेची आठवण कायम राहावी अशी तिचीही इच्छा होती.
टिनेट्टी आणि मॅडिसनला लवकरच समजलं की, त्या दोघींनाही दत्तक घेतलं गेलं होतं.
"मी तिला सांगितलं, 'हो, मला तिथून दत्तक घेतलं गेलं आहे," टिनेट्टी सांगते.
"त्यावर ती म्हणाली, 'थांब, मलाही तिथूनच दत्तक घेतलं गेलं आहे.' हे ऐकून मीच थक्क झाले."
गमतीने सांगू लागल्या 'आम्ही बहिणी आहोत'.
यानंतर त्यांनी लोकांना विचारायला सुरुवात केली, "आम्ही दोघी सारख्या दिसतो का?" त्यावर अनेक जण म्हणायचे, "हो, तुम्ही दोघी खूप सारख्या दिसता."
टिनेट्टी सांगते की, काही दिवसांनी त्या दोघी गमतीने लोकांना आम्ही बहिणी आहोत असं सांगू लागल्या.
मॅडिसनने तर दोघींनी एक सारखे कपडे घालूया, म्हणजे आणखी सारख्या दिसू, असंही सुचवलं होतं.
सुरुवातीला हे सगळं केवळ गमतीत चाललं होतं. पण एक वेळ अशी आली की, कदाचित आपलं काही नातं असू शकतं, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे त्यांनी दत्तक घेण्याची कागदपत्रं तपासायचं ठरवलं.
पण त्या कागदांमध्ये त्या दोघी बहिणी असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. कागदांनुसार त्यांचा जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झाला होता आणि त्यांच्या जन्मदात्या आईंची आडनावंही वेगळी आढळून आली होती.
जेनेटिक टेस्टिंग किटमुळे मिळाला चुलत भाऊ
काही काळानंतर दोघींनाही नवीन नोकऱ्या मिळाल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेल्या. टिनेट्टी कनेक्टिकटमध्येच राहिली, तर मॅडिसन व्हर्जिनिया राज्यात गेली.
दोघींचा संपर्क कायम होता, पण अंतर वाढल्यामुळे त्यांच्यात आधीसारखी जवळीकता राहिली नाही.
काही वर्षांनी ख्रिसमसला मॅडिसनला एक जेनेटिक टेस्टिंग किट भेट मिळालं. त्या चाचणीमुळे तिला तिचा एक चुलत भाऊ सापडला. त्याने तिला सांगितलं की, तिच्या जन्मदात्या आईचं 2015 मध्ये निधन झालं होतं.
ही बातमी मॅडिसनसाठी धक्कादायक होती. पण त्या चुलत भावाने तिला तिच्या कुटुंबातील अनेक सदस्यांशी संपर्क करून दिला, त्यात तिचे जन्मदाते वडीलही होते.
मॅडिसनच्या चुलत भावाने तिला सांगितलं की, ती लहान असताना तिच्या आई-वडिलांची परिस्थिती खूपच बेताची होती.
मॅडिसनने तिचे जन्मदाता वडील अॅड्रियानो लुना कोलाडो यांच्याशी फोनवर बोलण्याची व्यवस्था केली. त्यावेळी त्यांनी मॅडिसनला तिला दत्तक देताना त्यांची काय परिस्थिती होती, याबद्दल सांगितलं.
गरिबीमुळे दिलं दत्तक
कुटुंब इतकं गरीब होतं की त्यांना जमिनीवर झोपावं लागायचं, अशी माहिती त्यांनी मॅडिसनला दिली.
मॅडिसनची आई गर्भवती असताना तिचा मोठा भाऊ खूप आजारी होता. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती सांभाळण्यासाठी मॅडिसनला दत्तक देणंच योग्य ठरेल, असा निर्णय तिच्या वडिलांनी घेतला.
लवकरच मॅडिसनने डॉमिनिकन रिपब्लिकला जाण्याची तयारी सुरू केली. विमानतळावर तिचं संपूर्ण कुटुंब तिची वाट पाहत उभं होतं. सर्वांनी तिचा चेहरा असलेल्या फोटोचे टी-शर्ट घातले होते. मॅडिसन वडिलांना पाहताच त्यांना मिठी मारली. दोघेही भावूक होऊन रडू लागले.
हा प्रवास मॅडिसनसाठी खूप खास होता. पण ती घरी परत आल्यानंतर या प्रकरणाला आणखी एक वेगळं वळण मिळालं. मॉली नावाच्या एका महिलेने तिच्याशी संपर्क साधला.
मॉली ही टिनेट्टीची लहानपणापासूनची जिवलग मैत्रीण होती. त्यांच्या आई-वडिलांनी अमेरिकेतून डॉमिनिकन रिपब्लिकला एकत्र जाऊन मुलींना दत्तक घेतलं होतं.
पुन्हा मिळालं नवं वळण
मॉलीला वाटत होतं की, ती मॅडिसनची सख्खी बहीण आहे, कारण दोघींच्या जन्म दाखल्यावर आईचं नाव एकच होतं. परंतु डीएनए चाचणीत समोर आलं की, त्या बहिणी नसून दूरच्या नात्यातील चुलत बहिणी आहेत. तसेच, जन्म दाखल्यावरचं आईचं नावही चुकीचं होतं.
मॉलीकडे मॅडिसनच्या जन्मदात्या आईचा एक फोटो होता. तिच्या मते, त्या फोटोतील महिला टिनेट्टीसारखीच दिसत होती. त्यामुळे मॉलीने ठामपणे सांगितलं की, मॅडिसन आणि टिनेट्टी या सख्ख्या बहिणी आहेत.
मॅडिसनने तिच्या जन्मदाता वडिलांना व्हीडिओ कॉल केला आणि त्यांनी आणखी एखादं बाळ दत्तक दिलं होतं का?, असा प्रश्न केला.
मॅडिसन सांगते, "हे विचारताच त्यांचा चेहरा एकदम बदलला. मग ते म्हणाले, 'हो, आम्ही आणखी एक बाळ दत्तक दिलं होतं.' हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला आणि मी, 'अरे देवा! तुम्ही मला हे कधीच सांगितलं नाहीत.' असं त्यांनी म्हटलं."
ही नवीन माहिती समोर आल्यानंतर मॅडिसनला वेळ वाया घालवायचा नव्हता. तिने लगेच आणखी एक जेनेटिक टेस्टिंग किट घेतलं आणि बर्फवृष्टी सुरू असतानाही तब्बल 8 तासांचा प्रवास करून ती टिनेट्टी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचली.
सर्वांची झाली पुन्हा भेट
टेस्टचा निकाल यायला अडीच आठवडे लागले. हा काळ दोघींसाठी खूपच तणावाचा आणि त्रासदायक असा होता. नक्की त्या टेस्टमधून काय बाहेर येईल या विचारामुळे दोघींचं कामातही लक्ष लागत नव्हतं.
अखेर टेस्टचा निकाल आला. टिनेट्टीने मेसेज उघडला आणि त्यात स्पष्ट झालं की, ती आणि मॅडिसन या सख्ख्या बहिणी आहेत.
टिनेट्टी म्हणते, "हे खरंच अविश्वसनीय होतं. आम्ही सख्ख्या बहिणी आहोत याची इतकी वर्षे आम्हालाच माहिती नव्हती."
हे समजल्यावर मॅडिसन भावूक होऊन रडू लागली. तिने ही बातमी त्यांच्या वडिलांना सांगितली. ते खूप आनंदी झाले आणि शक्य तितक्या लवकर टिनेट्टीला भेटायची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर दोघा बहिणींनी एकत्र डॉमिनिकन रिपब्लिकला जाण्याचा निर्णय घेतला.
त्या दोघी डॉमिनिकन रिपब्लिकला पोहोचल्या तेव्हा पुन्हा एकदा संपूर्ण कुटुंब त्यांची वाट पाहत उभं होतं. पण यावेळी सर्वांनी दोन्ही बहिणींचे फोटो असलेले टी-शर्ट घातले होते.
त्यांच्या वडिलांनी पुढे येत टिनेट्टीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, "मी हिजा" म्हणजे माझी मुलगी.
बहिणी म्हणून एकत्र केलेला पहिला प्रवास आनंद, संगीत आणि नृत्याने भरलेला होता. कोलाडो म्हणतात की, आपल्या मुलींची पुन्हा भेट होणं हे देवाने दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट आहे.
"मी खूप आनंदी आहे, खरंच खूप आनंदी आहे. त्या प्रत्येक वेळी मला भेटायला येतात, तेव्हा माझं मन आनंदाने भरून जातं. आम्ही त्यांचं अत्यंत प्रेमाने स्वागत करतो, जसं सर्व कुटुंबांनी करायला हवं," असं ते म्हणाले.
"ही खूप सुंदर गोष्ट आहे. प्रत्येकाला अशी कथा सांगायला मिळत नाही."
(बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसवरील आउटलुक कार्यक्रमाच्या एका भागावर आधारित)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)