You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांच्या पाया पडले ते माखनलाल सरकार नेमके कोण आहेत?
- Author, प्रभाकर मणी तिवारी
- Role, बीबीसीसाठी
- वाचन वेळ: 3 मिनिटे
कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भाजपच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीची देशभर चर्चा सुरू झाली आहे.
शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी एका ज्येष्ठ व्यक्तीला आधी मिठी मारली आणि शाल पांघरून त्यांना सन्मानित केलं.
त्यानंतर त्यांनी वाकून त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करून आशीर्वादही घेतला.
ती व्यक्ती म्हणजे माखनलाल सरकार. पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.
1952 मध्ये डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या ऐतिहासिक काश्मीर दौऱ्यात ते त्यांच्यासोबत गेले होते. ते दीर्घ काळापासून राष्ट्रवादी आंदोलनाशी जोडलेले आहेत. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे.
1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर बंगालमध्ये पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ते संघटनेच्या सिलीगुडी जिल्हा शाखेचे संस्थापक अध्यक्ष होते.
सिलीगुडीमध्ये काम करताना त्यांनी पश्चिम दिनाजपूर, दार्जिलिंग आणि जलपाईगुडी जिल्ह्यांत संघटनेचे संयोजक म्हणून काम केलं होतं. अवघ्या एका वर्षात त्यांनी तब्बल 10 हजार नवीन सदस्य जोडले होते.
बंगालमध्ये संघ किंवा भाजपचे अस्तित्व जवळपास नव्हते तेव्हापासून माखनलाल सरकार संघटनेसाठी काम करत आहेत.
बंगालमधील भाजपच्या संघर्षाचे साक्षीदार
प्रदेश भाजप अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर सिलीगुडीतील माखनलाल सरकार यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला होता.
माखनलाल सरकार यांचं वय सध्या 98 वर्षे इतकं आहे.
सिलीगुडीतील भाजप नेते तरुण मंडल म्हणतात की, "माखनलाल सरकार हे 1980 च्या दशकापासून बंगालमधील संघटनेच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी या भागात संघटना मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केलं आहे."
बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर ते चर्चेमध्ये आले होते.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सिलीगुडीमध्ये गोहत्या बंद केल्याचा दावा केला होता.
बंगालमध्ये भाजपच्या या विजयामुळे तुम्हाला किती आनंद झाला, असा प्रश्न सरकार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मी खूप आनंदी आहे. आयुष्यभर केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळालं आहे."
त्यांच्या म्हणण्यानुसार, सिलीगुडी मतदारसंघातून शंकर घोष यांना उमेदवारी देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता.
"जर मी ते काम केलं नसतं तर सिलीगुडीमध्ये भाजपला विजय शक्य झाला नसता," असं ते म्हणाले होते.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सरकार
शनिवारी (9 मे) रोजी सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्याच्या उपस्थितीत बांगला भाषेत शपथ घेतली.
त्यांच्याबरोबर दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, खुदीराम टुडू आणि निशीथ प्रमाणिक यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यातील भाजपचे हे पहिले सरकार आहे.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत सुवेंदू अधिकारी यांची भाजप विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली.
त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा केला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार सत्तेवर आलं आहे.
4 मे रोजी लागलेल्या निकालात भाजपला 293 पैकी 207 जागांवर विजय मिळाला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)