'मी माझे उपोषण सुरूच ठेवणार'; 23 व्या दिवशी सोनम वांगचूक यांची घोषणा

सोनम वांगचुक

फोटो स्रोत, Vipin Kumar/Hindustan Times via Getty Images

Published
वाचन वेळ: 14 मिनिटे

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वातील जंतरमंतरवरील आंदोलनाचा आज महत्त्वाचा आणि निर्णायक दिवस आहे. सीजेपीच्या संसद मोर्चाला देशभरातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

दिल्लीच्या केरळ भवन परिसरातून येथे माध्यमांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले, "पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांवर लाठीमार केला आहे. या सरकारमुळे 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे. तरीही त्यांचं मन भरलेलं नाही, सरकारची इच्छा आहे की आणखी मुलांनी आत्महत्या करावी."

कॉक्रोच जनता पार्टीने दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके, सौरभ दास, आशुतोष रांका आणि गीतांजली मॅडम (सोनम सरांची पत्नी) जंतर मंतरवर अजूनही धरणे आंदोलन करत आहेत. ते सध्या केरळ हाऊससमोर आहेत. हे शांततापूर्ण आंदोलन संपणार नाही.

सोनम वांगचूक म्हणाले, "शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागले जात आहे, ते पाहून मी माझे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा मला इथे रुग्णालयात त्यांना भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवेन."

"मला आशा आहे की, त्याआधीच सरकार शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल. चिथावणी मिळूनही तरुणांनी ज्या प्रकारे शांतता राखली आहे, त्याने मी भारावून गेलो आहे. मी सरकार आणि पोलीस दलाला आवाहन करतो की, विद्यार्थ्यांना आज किंवा उद्या संसदेसमोर आपली गाऱ्हाणी मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा."

"मला खात्री आहे की, हे तरुण आंदोलक उद्याही तसाच संयम आणि सहनशीलता दाखवतील, जसा संयम त्यांनी आतापर्यंत दाखवला आहे", असंही त्यांनी नमूद केलं.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हे सरकार असत्य, हिंसेचा पुरस्कार करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करून म्हटलं, "पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वात 'तरुण-विरोधी' पंतप्रधान आहेत. दिल्लीच्या रस्त्यावर आलेले तरुण हे स्वतःचे हक्क मागत आहेत, ते गुन्हेगार नाहीत. तरुणांचा आदर करणारी, निष्पक्ष आणि व्यवस्थित चालणारी शिक्षणव्यवस्था हा या तरुणाईचा अधिकार आहे. ते जे करत आहेत त्यामध्ये काहीही चुकीचं नाही."

"विद्यार्थ्यांवर अश्रूधूर सोडणं, त्यांच्यावर लाठीमार करणं हे लोकशाहीविरोधी कृत्य आहे. हा भारताचा मार्ग नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. पंतप्रधान मोदींनी त्या स्वीकारून त्यावर काहीतरी केलं पाहिजे," असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे.

फोटो स्रोत, CJP/Rahul Gandhi

राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील टीका केली आहे.

ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षण व्यवस्थेचा ताबा मिळवला आहे. देशातल्या सगळ्या शिक्षण संस्था केवळ एकाच संघटनेतर्फे चालवल्या जात आहेत. याचा सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे. आम्ही मागच्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर बोलत आहोत. ही एक अत्यंत मूलभूत समस्या आहे. भाजप आणि मोदींचा फक्त 'असत्य' आणि 'हिंसेवर' विश्वास आहे.

152 प्रश्नपत्रिका फुटल्या. 7.5 कोटी विद्यार्थी त्रस्त आहेत आणि एकाही गुन्हेगाराला शिक्षा झालेली नाही. शिक्षा कोणाला झाली? कष्टकरी तरुणांना.

जेव्हा या मुलांनी शिक्षणाबद्दल रास्त प्रश्न विचारले तेव्हा त्याला उत्तर म्हणून सरकारने लाठीचार्ज आणि अटक केली. प्रश्नपत्रिका फोडणारे मोकळे फिरत आहेत आणि महत्त्वाचे मुद्दे मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर ओढून मारहाण केली जाते."

अभिजीत दिपके

फोटो स्रोत, CJP

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आधी दिली. मात्र, काही वेळात त्यांनी दिपके पोलिसांच्या ताब्यात किंवा अटकेत नसल्याचं नमूद केलं.

यावेळी दिपके ज्या केरळ भवन परिसरात होते तिथे मोठी गर्दी जमा झाल्याचंही सौरभ दास यांनी सांगितलं.

सौरभ दास यांनी सुरुवातीला पोस्ट केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी एक्सवर प्रत्युत्तर देताना म्हटलं की,

'अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणाऱ्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे असून अभिजीत मंचावर उपस्थित आहेत."

सध्या नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. मोबाईल कॉल्स सुरू असले तरी त्या परिसरातील इंटरनेट बंद असल्यामुळे अपडेट्स येण्यात उशीर होतो आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी गीतांजली यांच्यावर हल्ला झाल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, 'दिल्ली पोलिसांनी गीतांजली अंगमो यांचे केस ओढून त्यांच्यावर हल्ला केला आहे. एका 12 वर्षांच्या लहान मुलीचं डोकं फुटलं असून इतर 40-50 लोकांची डोकी फुटली आहेत."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

दरम्यान, सौरभ दास यांनी आधी दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र काही वेळातच त्यांनी पुन्हा पोस्ट करत दिपके पोलिसांच्या ताब्यात नसल्याचं नमूद केलं.

सौरभ दास यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं, "आम्ही सर्व खासदारांना विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याचं आवाहन करतो. सर्व खासदारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे यावं. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर पोलीस क्रूर कारवाई करत आहेत. पोलीस आंदोलकांना मारहाण करत आहेत."

संसद परिसरातील सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अशा पोजिशन्स घेतल्या आहेत.

फोटो स्रोत, X/Cockroachisback

फोटो कॅप्शन, संसद परिसरातील सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना रोखण्यासाठी अशा पोजिशन्स घेतल्या आहेत.

दरम्यान 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आपलं उपोषण समाप्त केलं होतं.

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढण्याच्या घोषणा केली होती. संसदेजवळ असलेल्या शास्त्री भवनाजवळ निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स खात्यावरून संसदेच्या परिसरातील एक व्हीडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये संसदेची दारं बंद करण्यात आली असून तिथे तैनात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांनी 'फायरिंग पोजिशन्स' घेतल्याचा आरोप सीजेपीने केला आहे.

या पोस्टमध्ये सीजेपीने म्हटलं, "कृपया आपल्याच देशातील तरुणांवर गोळ्या झाडू नका. त्यांच्या मागण्या अवास्तव नाहीत. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी घ्यावी अशी मागणी हे तरुण करत आहेत.'

जंतर मंतर

फोटो स्रोत, BBC/Seraj Ali

तसेच, जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचं एएनआय वृत्तसंस्थेच्या दृश्यांमध्ये दिसून आलं आहे.

दरम्यान, सरकारनं चर्चेसाठी संपर्क साधल्याचं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.

'सीजेपी'चे (CJP) संस्थापक दिपके यांनी बीबीसीला सांगितलं आहे की, सरकारनं चर्चेसाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. वांगचुक यांना पुन्हा आंदोलनस्थळी आणलं जावं, अशी मागणी केल्याचं दिपके यांनी सांगितलं आहे.

पण, सरकारने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी नुकतंच ट्वीट करत म्हटलं, "सकाळचे 11:52 वाजले आहेत. 'कॉकरोच जनता पार्टी'च्या वतीने आशुतोष रांका आणि मी जे.पी. नड्डा यांना भेटायला निघालो आहोत. सरकारकडून सकाळीच चर्चेसाठी संपर्क साधण्यात आला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. तरुण मोठ्या संख्येने एकत्र जमले आहेत."

'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आपलं उपोषण समाप्त केलं तो क्षण

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी आपलं उपोषण समाप्त केलं तो क्षण

'2 तासांच्या प्रतीक्षेनंतर नड्डा यांनी घेतली 10 मिनिटांची भेट'

कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने नड्डा यांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती दास यांनी यापूर्वी एक्सवरील पोस्टमधून दिली होती.

सौरभ दास आणि जे. पी. नड्डा

फोटो स्रोत, ANI

भेटीनंतर दास यांनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत या चर्चेची माहिती दिली.

ते म्हणाले, "2 तासांहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर मी आणि आशुतोष रांका यांनी जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. सुमारे 10 मिनिटे चर्चा झाली. आम्ही आमच्या मागण्यांचे लेखी निवेदन त्यांच्याकडे सादर केले आहे."

"या मागण्यांवर अंतर्गत पातळीवर चर्चा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले असून प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांना ताब्यात घेतले जात असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत," अशी माहिती त्यांनी दिली.

मोर्चास सुरुवात

सध्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी मोर्चाचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली आहे.

हा मोर्चा आता पोलिसांच्या सुरक्षा घेऱ्याबाहेर पसरू लागला आहे.

गर्दीचा प्रचंड ओघ रोखताना पोलिसांची दमछाक होत आहे आणि काही ठिकाणी किरकोळ झटापटीच्या घटनाही घडल्या आहेत.

सीजेपी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि इतर आयोजकांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले असले, तरी निदर्शकांचे छोटे गट अरुंद गल्ल्यांमधून पर्यायी मार्गांचा वापर करून संसदेच्या दिशेने पुढे सरकत आहेत.

तरीही, बहुसंख्य लोक जंतर-मंतर परिसरातील रस्त्यांवरच दाटीवाटीने उभे आहेत. तिथे गर्दी इतकी वाढली आहे की, आता त्या ठिकाणाहून बाहेर पडणेही कठीण झाले आहे.

मोर्चा सुरू असतानाच, पोलीस आणि स्वयंसेवक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत.

यापूर्वी, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा आणि बॅरिकेड्सवरून उडी न मारण्याचा सल्ला दिला होता.

जंतर-मंतर इथे CJP च्या निषेध मोर्चासाठी जमलेले आंदोलक आणि RPF जवान यांच्यात गोंधळ पहायला मिळाला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी RPF जवान व पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त आंदोलकांनी 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचे प्रचंड बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्यांना रोखून धरत होते. तणाव वाढला आणि पोलिसांच्या विशेष तुकड्यांनी आंदोलकांना मागे रेटलं. यात अनेक आंदोलक बेशुद्ध पडले. त्यांना रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात आलं आहे.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज; संसद परिसरात तणावाचं वातावरण

फोटो स्रोत, ANI

या मोर्चादरम्यान दिल्लीतील अनेक ठिकाणी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वृत्तसंस्था पीटीआयने एक व्हिडिओ जारी करून दावा केला आहे की, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

पीटीआयने (PTI) शेअर केलेल्या एका व्हीडिओमध्ये, मेट्रो स्टेशनच्या आत सीजेपी (CJP) आंदोलक दिसून येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या इतर व्हीडिओमध्ये हे आंदोलक घोषणा देतानाही ऐकू येत आहेत.

दरम्यान, CJP ने जनपथ मेट्रो स्टेशनजवळील काही छायाचित्रे आपल्या अधिकृत 'एक्स' हँडलवरून शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्येही मोठ्या संख्येने निदर्शक दिसून येत आहेत.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) आपल्या अधिकृत 'एक्स' (X) हँडलवरून माहिती दिली की, राजीव चौक, जनपथ आणि पटेल चौक यांसह अनेक मेट्रो स्थानकांवर याचा परिणाम झाला आहे.

अभिजीत दिपकेचे वडील काय म्हणाले?

अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके या संसद मोर्चाविषयी म्हणाले की, "मोर्चा लोकशाही मार्गाने जाणार आहे. हे सर्व विद्यार्थी आहेत. मोठे कलाकार आहेत आणि लोकशाहीचा सन्मान करणारे लोक आहेत."

पोलिसांच्या भूमिकेविषयी बोलताना ते म्हणाले की, "पोलिसांनी अडेलतट्टू भूमिका घ्यायला नको पाहिजे. कारण, प्रत्येकाला हक्क मागायचा अधिकार आहे. शेवटी, हे सरकारही जनतेतूनच निवडून आलंय. जनतेतून आलेल्या सरकारनं जनतेचं ऐकायला पाहिजे."

अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके

फोटो स्रोत, Kiran Sakle/BBC Marathi

फोटो कॅप्शन, अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके

अभिजीत दिपके यांना असलेला मायग्रेनचा त्रास आणि त्यांच्या उपोषणाबाबत एक पालक म्हणून काय वाटतं, असं विचारलं असता ते म्हणाले की, "त्यानं उपोषण वगैरे कधी केलेलं नाही. तो अधिक वेळ उपाशी राहिला की त्याला चक्कर येते. त्यानं आपली काळजी घ्यावी, असं वाटतं."

सरकारला केलेल्या मागणीविषयी म्हटलं की, "त्याने पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी आता दोन दिवसांपूर्वी केली आहे. तत्पूर्वी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि कुणीतरी जबाबदारी घ्यावी, इतकंच म्हणणं होतं."

या आंदोलनावर होणाऱ्या टीकेविषयी ते म्हणाले की, "हे राजकीय आंदोलन नाहीच आहे. यापूर्वी भरपूर मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मग हे लोक आताच असं का बोलत आहेत? यापूर्वी, लाल बहादूर शास्त्रींचंही राजीनाम्याचं मोठं उदाहरण आहे. महाराष्ट्रातही आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यात काय चूक आहे?

वांगचूक यांनी टिश्यू पेपरवर लिहिले पत्र

संसद परिसरात तणावाचं वातावरण आहे. तत्पूर्वी, कालच (19 जुलै) दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी करत इशारा दिला आहे.

निवेदनात म्हटलं आहे की, "आम्ही स्पष्टपणे कळवू इच्छितो की, 20 जुलैला कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर काढण्यात येणाऱ्या कोणत्याही निषेध मोर्चासाठी कोणतीही परवानगी मागितली गेलेली नाही किंवा देण्यात आलेली नाही."

दुसऱ्या बाजूला, सोनम वांगचुक यांनी टिश्यू पेपरवर लिहिलेलं एक पत्र सकाळी सहा वाजता त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

त्यात त्यांनी तीन अटींवर उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

सध्या जंतर-मंतरवर समर्थकांची गर्दी आहे. काल रात्रीही बऱ्याच मोठ्या संख्येनं समर्थक जंतर-मंतरवर हजर होते.

सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी आपण गांधीवादी आहोत आणि हा संसद मार्च शांततेतच पार पाडायचा आहे, असं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

या आंदोलनाच्या ठिकाणी विरोधी पक्षांचे अनेक नेतेही उपस्थित आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह, मनीष सिसोदिया व आतिशी यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या आंदोलनाच्या ठिकाणी विरोधी पक्षांचे अनेक नेतेही उपस्थित आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह, मनीष सिसोदिया व आतिशी यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे, अभिजीत दिपके यांनी असा दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला एक ट्रक उभा केला आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी कोणत्याही प्रकारची हिंसक किंवा ताब्यात घेण्याची कारवाई केली नसल्याचा दावा एका ट्विटद्वारे केला आहे.

सध्या जंतर-मंतर या ठिकाणी हजारो आंदोलक जमले आहेत आणि काही वेळापूर्वीच 'सीजेपी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी सांगितलंय की, संसदेच्या दिशेनं काढला जाणारा मोर्चा लवकरच सुरू होईल. परिसरात शेकडो पोलीस कर्मचारी तैनात आहेत.

या आंदोलनाच्या ठिकाणी विरोधी पक्षांचे अनेक नेतेही उपस्थित आहेत. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा आणि आम आदमी पक्षाचे संजय सिंह, मनीष सिसोदिया व आतिशी यांचा समावेश आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमीही इथे उपस्थित आहेत.

आंदोलनाचे आयोजक लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. विशेषतः 'प्रक्षोभक कृती' किंवा चिथावणीखोर परिस्थिती निर्माण झाल्यासही संयम बाळगण्यास सांगितलं जात आहे.

"पोलिसांनी अडवल्यास बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करू नका, तर केवळ रस्त्यावर खाली बसा आणि वाट पहा," असं दिपके यांनी जमावाला सांगितलं आहे.

मोठा फौजफाटा तैनात; मेट्रो स्टेशन्स बंद

'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) संसदेकडे जाणाऱ्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, पोलीस बदरपूर सीमेवर तपासणी करत आहेत, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

शिवाय, कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर 'सेंट्रल सेक्रेटरीएट' मेट्रो स्टेशन जनतेसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (DMRC) ट्विट केले आहे की, "सुरक्षेच्या कारणास्तव, जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही मेट्रो स्टेशन्स पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत."

दरम्यान, सफदरजंग हॉस्पिटलने सकाळी दहा वाजता सोनम वांगचुक यांचं मेडिकल बुलेटीन जाहीर केलं आहे.

सफदरजंग हॉस्पिटलने सकाळी दहा वाजता मेडिकल बुलेटीन जाहीर केलं आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सफदरजंग हॉस्पिटलने सकाळी दहा वाजता मेडिकल बुलेटीन जाहीर केलं आहे.

त्यानुसार, सोनम वांगचुक यांच्यावर VMMC आणि सफदरजंग रुग्णालयात सर्वसमावेशक वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या बुलेटीनमध्ये लिहिलंय की, "त्यांची महत्त्वाची शारीरिक लक्षणं स्थिर आहेत. रक्ताशी संबंधित घटकांकडे बारकाईनं वैद्यकीय लक्ष देणं आवश्यक आहे. वांगचुक हे तज्ज्ञ पथकाच्या सततच्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

VMMC आणि सफदरजंग रुग्णालय तसेच एम्स, नवी दिल्लीमधील उपचार करणाऱ्या पथकांच्या वैद्यकीय मूल्यांकनानुसार, संभाव्य गुंतागुंत वेळीच लक्षात येण्यासाठी आणि त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी वैद्यकीय उपचार व अखंड वैद्यकीय देखरेख सुरू ठेवणं आवश्यक आहे. त्यांना आवश्यक असलेले सर्व वैद्यकीय उपचार दिले जात आहेत आणि तज्ज्ञांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे.

AISAच्या विद्यार्थ्यांचं उपोषण 23दिवसांनंतर समाप्त

'ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन'च्या (AISA) नेहा, आमीन आणि मनीष या तीन सदस्यांनी सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतर इथे सुरू असलेलं त्यांचं 23 दिवसांचं उपोषण मागे घेतलेलं आहे.

विविध सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर, त्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

'आयसा'ने (AISA) दिलेल्या माहितीनुसार, खासदार मनोज झा, राजाराम सिंग आणि अमरा राम यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ उपोषण संपवण्यास मदत करण्यासाठी तिथे पोहोचलं. याव्यतिरिक्त, योगेंद्र यादव, वकील प्रशांत भूषण, प्राध्यापक अतुल सूद, अभिनेते प्रकाश राज आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनीही विद्यार्थ्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं.

AISAच्या विद्यार्थ्यांचं उपोषण 23दिवसांनंतर समाप्त

फोटो स्रोत, AISA

प्रतिनिधीमंडळाशी चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. खासदार मनोज झा यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला अनेक मुद्द्यांवर प्रतिसाद देणं भाग पडलं आहे.

अभिनेत्री शबाना आझमी म्हणाल्या की, "जरी नवीन पिढीसाठी अधिक चांगला मार्ग तयार करण्यात आपली पिढी कदाचित पूर्णपणे यशस्वी झाली नसली, तरी विद्यार्थ्यांच्या संघर्षाने पुढची दिशा दाखवून दिली आहे."

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचं उपोषण 23 दिवसांनंतर समाप्त; मोठा फौजफाटा तैनात, मेट्रो स्टेशन्स बंद

फोटो स्रोत, AISA

'आयसा'च्या (AISA) मते, 23 दिवसांच्या उपोषणादरम्यान त्या तीन विद्यार्थ्यांचे 12 टक्क्यांहून अधिक वजन कमी झालं. तसेच, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला.

विद्यार्थी संघटनेने जाहीर केलं आहे की, संसद अधिवेशनादरम्यान 'आयसा' (AISA) धर्मेंद्र प्रधान, एनटीए (NTA) आणि नवीन शैक्षणिक धोरण 2020 यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर महिनाभर चालणारी मोहीम राबवेल. जंतरमंतर येथे झालेल्या उपोषणादरम्यान मांडलेल्या मागण्यांना ही मोहीम पुढे नेईल, असं संघटनेचं म्हणणं आहे.

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचं उपोषण 23 दिवसांनंतर समाप्त; मोठा फौजफाटा तैनात, मेट्रो स्टेशन्स बंद

फोटो स्रोत, AISA

'पोलिसांकडून जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला एक ट्रक आधीच तैनात' - दिपके

CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी दावा केला आहे की, "दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवर दगडांनी भरलेला एक ट्रक आधीच तैनात केला आहे."

दिपके यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, "दिल्ली पोलिसांना लाज वाटली पाहिजे! जंतर-मंतरवर आधीच दगड भरलेला ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच 'गोदी मीडिया' अशा बातम्या चालवेल की, शांततापूर्ण आंदोलन बदनाम करण्यासाठी आंदोलकांनीच त्या व्हॅनची तोडफोड केली."

दिपके यांनी लिहिलंय की, "पोलीस अधिकारी काय करत आहेत? CJP च्या शांततापूर्ण निदर्शकांवर दगडफेक करवून घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे का? आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, हे अधिकारी काहीतरी अत्यंत घातकी कट रचत आहेत. ते गुंडांना निदर्शनांमध्ये व्यत्यय आणू देतील आणि त्यानंतर त्याचे खापर शांततापूर्ण निदर्शकांवरच फोडतील."

'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसदेकडे नियोजित असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांच्या तैनातीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, 'कॉकरोच जनता पार्टी'च्या संसदेकडे नियोजित असलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांच्या तैनातीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही याबाबत भाष्य केलंय.

त्यांनी म्हटलंय की, "ही बाब खरोखरच अत्यंत गंभीर आहे. जंतरमंतरजवळ दगडानी भरलेला ट्रक उभा राहण्याचं काहीच कारण नाही. पोलिसांची परवानगी असल्याशिवाय असं घडूच शकत नाही. जर आंदोलकांवर दगडफेक झाली, तर पोलीस आणि सरकार थेट जबाबदार असतील. याचे पडसाद इतके तीव्र उमटतील की हे सरकार टिकू शकणार नाही."

'...तर वांगचुक उपोषण सोडतील.'

सोनम वांगचुक यांनी एक पत्र सकाळी सहा वाजता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे.

त्यात त्यांनी तीन अटींवर उपोषण सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यात ते म्हणतात की, "प्रिय मित्र आणि समर्थकांनो, तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं आहे की मी माझं उपोषण कधी संपवणार आहे? समर्थकांना यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, मी 20 जुलै रोजी माझे उपोषण संपवेन. जर,

  • शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांची (उदा. पेपरफुटी इत्यादी) जबाबदारी सरकारने स्वीकारली तर; किंवा...
  • मी आणि CJP चं नेतृत्व संसदेच्या दारापर्यंत पोहोचलो आणि तिथे सन्माननीय खासदार व विविध पक्षांच्या नेत्यांनी मला आणि सीजेपीच्या नेतृत्वाला आश्वासन दिलं की ते आता हा मुद्दा संसदेत मांडतील; किंवा...
  • जर माझी प्रकृती किंवा इतर कारणांमुळे हे शक्य झालं नाही, तर विविध पक्षांचे सन्माननीय खासदार आणि नेते या रुग्णालयात येऊन वरीलप्रमाणे आश्वासन देतील."
सोनम वांगचुक यांनी एक पत्र सकाळी सहा वाजता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे.

फोटो स्रोत, Instagram/wangchuksworld

फोटो कॅप्शन, सोनम वांगचुक यांनी एक पत्र सकाळी सहा वाजता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रसिद्ध केलं आहे.

हे पत्र कधी आणि कुठून लिहण्यात आलं आहे, याबाबत माहिती देणारी एक ओळही सर्वांत शेवटी नमूद आहे.

ती अशी की, "सफदरजंग रुग्णालयातील त्या बेकायदेशीर स्थानबद्धतेतून, जिथे माझ्या हालचालींवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि सर्व प्रकारच्या संवादावर निर्बंध घालण्यात आले आहेत."

एका टिश्यू पेपरवर हे पत्र लिहून पाठवण्यात आल्याचं दिसत आहे.

शिवाय, काल रात्री उशीरा जंतरमंतर इथे सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी म्हटलंय की, "जर राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन सोनम यांची भेट घेतली आणि संसदेच्या अधिवेशनात शिक्षणाबाबतच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले, तर ते उद्या आपले उपोषण मागे घेतील."

पोलिसांनी काय म्हटलंय?

एका बाजूला, कॉक्रोच जनता पार्टीनं संसद मार्चमध्ये काय करावं आणि काय करू नये, याबाबतच्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत दुसऱ्या बाजूला, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

या निवेदनात पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. काल निवेदन जाहीर करत पोलिसांनी म्हटलंय की, "नवी दिल्ली जिल्ह्यात बीएनएसएसच्या कलम 163 (पूर्वीचे सीआरपीसी कलम 144) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यानुसार जंतर-मंतर येथील निर्धारित निषेध स्थळावर पूर्वपरवानगी घेऊन केल्या जाणाऱ्या निदर्शनांशिवाय इतर ठिकाणी निषेध मोर्चे, मिरवणुका, आंदोलन आणि 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचे एकत्र जमणे यावर बंदी आहे," असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

"20 जुलैपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असल्याने सार्वजनिक सुरक्षितता, संरक्षित व्यक्तींची सुरक्षा आणि महत्त्वपूर्ण सरकारी आस्थापनांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

फोटो स्रोत, X/@DelhiPolice

फोटो कॅप्शन, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नसल्याचं निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

कारवाईचा इशारा देताना दिल्ली पोलीस म्हणाले, "या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर बीएनसचे कलम 223 आणि कायद्यातील इतर लागू तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल."

"सर्व नागरिकांनी कायद्याचा आदर करावा, कोणत्याही अनधिकृत जमावात किंवा मोर्चामध्ये सहभागी होणं टाळावं आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करावं," असं आवाहनही दिल्ली पोलिसांनी केलं.

'सर्वांनी 2 गोष्टी लक्षात ठेवा'

संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे.

त्या म्हणाल्या, "मी सर्वांना 2 गोष्टी लक्षात ठेवण्याचे आवाहन करते. पहिली गोष्ट म्हणजे हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण राहील याची आपण खात्री करूया. दुसरी गोष्ट मोर्चात व्यत्यय आणण्याचा किंवा चिथावणी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही समाजकंटकांपासून सावध राहा."

संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी आंदोलकांना आवाहन केलं आहे.

"जंतर-मंतरवर गेल्या 22 दिवसांमध्ये तरुणांनी हे दाखवून दिले आहे की, ते आपल्या मागण्या शांततापूर्ण मार्गाने मांडू शकतात," असंही गीतांजली यांनी नमूद केलं.

दरम्यान, 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांचं उपोषण या रविवारी (19 जुलै) दुसऱ्या दिवशीही सुरू राहिलं. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

गीतांजली अंगमो यांनी यापूर्वी सांगितलं होतं की, त्या त्यांचे पती सोनम वांगचूक यांच्या वैद्यकीय उपचारांच्या संदर्भात उच्च न्यायालयात गेल्या आहेत.

यादरम्यान, उपोषण करणं किती कठीण असतं, याची जाणीव आपल्याला आता झाली असल्याचं अभिजीत दिपके यांनी नमूद केलं आहे. तसेच, उपोषण करणाऱ्या इतरांबद्दलही त्यांनी आदर व्यक्त केलाय.

अभिजीत दिपके म्हणाले की, "आज माझ्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे काम किती कठीण आहे, याची मला आता जाणीव झाली आहे. सोनम सर आणि इथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना मी सलाम करतो. उद्या होणाऱ्या पदयात्रेसाठी मी माझी ऊर्जा राखून ठेवत आहे."

यापूर्वी सोनम वांगचूक दिल्लीतील जंतरमंतर इथे उपोषण करत होते. परंतु, शनिवारी सकाळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं. त्यानंतर, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)