शस्त्रक्रियेसाठी 13 वर्षांची प्रतीक्षा आणि एम्स येथे मृत्यू, तन्वीच्या कुटुंबाने कोणते आरोप केले?

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, कोटा, राजस्थान
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"दिवस, महिने, वर्षं सरली पण माझ्या बाळाचं ऑपरेशन होऊ शकलं नाही. 31 ऑगस्टला रात्री साडेतीन वाजता माझ्या डोळ्यांसमोर माझ्या मुलीने अखेरचा श्वास घेतला."
15 वर्षांच्या तन्वीचा दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) मृत्यू झाला. तिच्या हृदयात छिद्र होते. तिच्या आई-वडिलांचा आरोप आहे की AIIMS ने 13 वर्षांतही त्यांच्या मुलीचे ऑपरेशन केले नाही. त्यांना सतत तारखा दिल्या गेल्या.
त्यांचा आरोप आहे की 2012 पासून AIIMS मध्ये त्यांच्या मुलीवर उपचार सुरू होते. अनेक वेळा रुग्णालयाने शस्त्रक्रियेचे आश्वासन दिले, एकदा तर पैसेही जमा करुन घेतले आणि नंतर सर्जरी पुढे ढकलली.
दिल्ली AIIMS ने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत रुग्णालयाने चौकशी समिती स्थापन केली आहे.
त्याच वेळी एम्सने असे देखील म्हटले की "पेशन्ट तन्वीच्या अनेकवेळा गंभीर चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला होता की सर्जरी शक्य नाही. त्यामुळे त्यांना वैद्यकीय व्यवस्थापन आणि रेग्युलर फॉलोअपचा सल्ला देण्यात आला होता."
तन्वीचे वडील मुकेश कुमार यांच्याशी बीबीसी हिंदीने चर्चा केली.
ते सांगतात की "एम्स ऑपरेशनसाठी हो देखील म्हणत होते त्यामुळे आम्ही त्यांच्या भरवशावर राहिलो."
एम्स व्यतिरिक्त इतर ठिकाणी मुलीच्या उपचाराचा प्रयत्न केला नाही का, असे विचारल्यावर मुकेश कुमार यांनी सांगितले की "2013 मध्ये आम्ही दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात तन्वीला दाखवले होते. त्यांनी तीन ऑपरेशन्स आणि खूप खर्च सांगितला. त्यामुळे आम्ही एम्सवर अवलंबून राहिलो."
त्यांचे म्हणणे आहे की या सगळ्या त्रासाला कंटाळून आम्ही 2016 मध्ये प्रधानमंत्री कार्यालयाला तक्रार देखील पाठवली आणि मुलीची सर्जरी करुन देण्यात यावी अशी विनंती देखील केली होती.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना देखील आम्ही मेल केला होता पण आमच्या हाती निराशाच लागली.
मुकेश यांनी सांगितले की लवकरच ते एम्सविरोधात केस करणार आहेत.
तन्वी दोन वर्षांची होती तेव्हापासून सुरू होते तिचे एम्समध्ये उपचार
तन्वीचे कुटुंब राजस्थानातील कोटा शहरातील गुमानपुरा इथे राहते. वडील मुकेश कुमार परियानी आणि आई भाविका परियानी हे आपल्या मुलीचा उपचार दिल्लीतील एम्स येथे करत होते.
मुकेश हे एका कपड्याच्या दुकानात सेल्समन आहेत आणि भाविका या होममेकर आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. तन्वी ही धाकटी होती, तर मोठा मुलगा जयपूरच्या कॉलेजमध्ये बीटेक शिकत आहे.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
भाविका यांना अश्रू अनावर होत आहेत आणि सतत आपल्या मुलीची आठवण येत आहे.
तन्वीची आई ज्या खोलीत आमच्याशी बोलत होत्या त्याच ठिकाणी पाठीमागे तन्वीचा स्टडी टेबल आहे. समोरच्या भिंतीवर लिहिलेले होते की, "I can and I will". ( मी करू शकते आणि मी करेनच)

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
मुकेश सांगतात की तन्वी जेव्हा दोन वर्षांची होती जेव्हा तिची प्रकृती बिघडली होती. 15 ऑगस्ट 2012 ला त्यांनी तन्वीची तपासणी केली होती त्यात त्यांना हे समजले की तिच्या हृदयात छिद्र आहे.
मुलीवर चांगले उपचार व्हावे यासाठी स्थानिक डॉक्टरांनी त्यांना एम्स येथे जाण्याचा सल्ला दिला.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
मुकेश सांगतात "मी पहिल्यांदा 2012 मध्ये तिला घेऊन दिल्लीत एम्सला गेलो होतो. मग तिथे उपचार चालू राहिले. 2013 मध्ये तपासण्या झाल्या आणि 2014 मध्ये सर्जरी करण्याबद्दल बोलणं झालं. आम्ही पैसे देखील जमा केले. नंतर पुढील तपासण्या देखील झाल्या मग ही सर्जरी टाळण्यात आली."
एम्समध्ये सव्वा लाख रूपये भरण्यात आल्याची पावती देखील मुकेश यांनी दाखवली.
मुकेश दावा करतात की "पुन्हा 2015 मध्ये 2 सप्टेंबर रोजी ऑपरेशनची तारीख देण्यात आले. मी जेव्हा मुलीला ऑपरेशनसाठी घेऊन गेलो तेव्हा पुन्हा ऑपरेशन टाळण्यात आले. मग पुन्हा तन्वीला 16 डिसेंबर रोजी दाखल करुन घेण्यात आले आणि पुन्हा ऑपरेशन टळले."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
2012 पासून आतापर्यंत एम्समधील उपचारांची कागदपत्रं, ऑपरेशनसाठी जमा करुन घेण्यात आलेल्या सव्वा लाख रुपयांची पावती, या सारखी अनेक कागदपत्रं ते दाखवतात आणि म्हणतात की "आम्ही खूप तक्रारी केल्या पण त्याची कुठे दखलच घेतली नाही."
मुकेश सांगतात की त्यांना या वर्षी (2026) मध्ये वारंवार ऑपरेशनची तारीख देण्यात आली पण मुलीचं ऑपरेशन करण्यात आलं नाही.
तन्वीच्या आई भाविका सांगतात की रुग्णालयात दाखल केल्यानंतर तन्वीची प्रकृती ठीक होती परंतु अचानक हे झालं. ( तिचा मृत्यू झाला)
एम्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात तन्वीच्या मृत्यूचे कारण, हायपोक्सिक स्पेलनंतर कार्डिअॅक अरेस्ट होने असे सांगितले आहे. याचा अर्थ असतो की शरीरात ऑक्सिजनची गंभीररीत्या कमतरता भासल्यामुळे हृदयाची गती थांबली.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
भाविका सांगतात की, "मी एका आशेने गेले होते की तिथे चांगले डॉक्टर्स आहे पण पाहा आमच्यासोबत काय झालं, आमच्या हाती निराशाच लागली."
मुकेश सांगतात की तन्वीच्या मृत्यूनंतर त्यांनी 112 नंबर वर पोलिसांकडे तक्रार केली.
ते सांगतात, "त्याच वेळी मी आणि माझी पत्नी रुग्णालयात होतो. आम्ही घाबरलो होतो. मला माझ्या मुलीचे पार्थिव शरीर घ्यायचे होते. म्हणून तिचे पोस्टमार्टम करून घेऊन आम्ही तिचे पार्थिव शरीर घेऊन आलो. माझा दिल्ली एम्सवर बिल्कुल विश्वास नाहीये."
ते सांगतात की आम्हाला तेव्हा एफआयआर करण्याचा वेळ देखील नाही मिळाला आणि पण आता ते एफआयर करणार आहेत.
मुकेश आणि त्यांच्या पत्नी सांगतात की "आता आमची मुलगी तर काही परत येऊ शकत नाही पण दोषींना शिक्षा मात्र मिळाली पाहिजे. आमच्या मुलीचा मृत्यू नाही झाला तर तिची हत्या झाली आहे. दोषींना शिक्षा मिळाल्यावरच आम्हाला न्याय मिळेल."
एम्सने आता चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, त्याबाबत मुकेश सांगतात की "हा फक्त सारवासारव करण्याचा प्रकार आहे, कमिटी बनवून काही देखील होत नाही."
"जर उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी करण्यात आली तर अनेक गोष्टी समोर येऊ शकतात," असं त्यांना वाटतं.
दिल्ली एम्सने काय म्हटले?
एम्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, "प्रकृती बिघडल्यानंतर 24 ऑगस्ट रोजी तन्वीला एम्समध्ये दाखल करण्यात आले. यावेळी हार्ट-लंग ट्रान्सप्लँट करण्याच्या शक्यतेची तपासणी करण्यात येत होती. आणि 31 ऑगस्ट-1 सप्टेंबरच्या रात्री अंदाजे तीन वाजेच्या सुमारास तिची प्रकृती खूप गंभीर झाली. 1 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता तिला मृत घोषित करण्यात आले.
निवेदनात सांगण्यात आले की तन्वीला रात्री अचानक खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यानंतर तिला गंभीर स्वरूपाचे सायनोसिस (शरीरात ऑक्सिजनच्या कमतरेमुळे त्वचा निळी पडणे) झाले आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन अंदाजे 48 टक्क्यावर राहिले.
ऑक्सिजन सपोर्ट दिल्यानंतर देखील गंभीर स्वरूपाचा हायपॉक्सिक स्पेल कायम राहिला ज्यामुळे हृदयाची गती थांबली.
निवेदनात म्हटले आहे की सातत्याने रेससिटेशन (पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न) प्रयत्न करण्याच्या नंतरही मुलीची स्थिती अत्यंत गंभीर राहिली आणि तिला पहाटे पाच वाजता मृत घोषित करण्यात आले.
एम्सने हे देखील सांगितले की तन्वीला पहिल्यांदा 10 ऑक्टोबर 2012 रोजी एम्सच्या कार्डिओलॉजी ओपीडीत उपचारासाठी घेऊन येण्यात आले होते.
तपासणीत हे कळले व्हीएसडी ( हृदयात छिद्र) सोबतच तिला पल्मोनरी एट्रिशिया देखील आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2013 मध्ये तन्वीची हार्ट सर्जरी करण्याच्या शक्यतेबाबतचे विस्तृत मूल्यांकन करण्यात आले. ज्यात सीटी एंजिओग्राफी, कार्डिअॅक कॅथीटेरा एजिशेन सारख्या चाचण्या देखील होत्या.
एम्सनुसार, तन्वीच्या हृदयाची गुंतागुंतीची रचना आणि आजाराचे गांभीर्य पाहता, नंतर 2017 मध्ये केलेल्या मूल्यांकनावरुन असा निष्कर्ष काढण्यात आला की यावेळी सुधारात्मक सर्जरी करणे शक्य नाही."
"तिला (तन्वीला) नियमित फॉलोअप आणि औषधींसह उपचाराचा सल्ला देण्यात आला."
निवेदनात म्हटले आहे की त्यानंतर देखील रुग्णाचे कुटुंबीय आमच्या संपर्कात राहिले आणि त्यांनी पुन्हा सर्जरीशी संबंधित सल्ला मागितला. गेल्या वर्षी कार्डिओथोरेसिक आणि वॅस्कुलर सर्जरी विभागप्रमुखांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यांनी देखील मेडिकल मॅनेजमेंटचाच सल्ला दिला.
एम्सने पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समिती बनवली आहे. जी मेडिकल रेकॉर्ड, उपचाराची पूर्ण टाइमलाइन आणि मृत्यूशी निगडित परिस्थितींबाबतचे मूल्यांकन करणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























