You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हंता व्हायरस कोव्हिडसारखा पसरू शकतो का? संसर्ग आणि धोक्याबाबत WHO ने दिली महत्त्वाची माहिती
- Author, मिशेल रॉबर्ट्स
- Role, डिजिटल हेल्थ एडिटर
- वाचन वेळ: 4 मिनिटे
जगभरातून आलेल्या प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका क्रूझ जहाजावर हंता व्हायरसचा उद्रेक झाला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून संबंधित अधिकारी यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
अर्जेंटिनातून साधारण एक महिन्यापूर्वी निघालेल्या या जहाजावर किंवा जहाजातून प्रवास करून गेल्यानंतर आतापर्यंत 3 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
जहाजावरून आणखी 4 जणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
ज्या लोकांचा या विषाणूशी (व्हायरस) संपर्क झाला असण्याची शक्यता आहे आणि जे आधीच विमानाने आपल्या देशात परतले आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम (ऑपरेशन) सुरू करण्यात आली आहे.
यात ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स, अमेरिका आणि स्वित्झर्लंडसह अनेक देशांतील प्रवाशांचा समावेश आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सर्वसामान्य लोकांना या आजाराचा धोका कमी आहे. मग अशा परिस्थितीत आपण किती काळजी घ्यावी?
'कोव्हिडसारखा आजार नाही'
गुरुवारी (7 मे) दिलेल्या एका अपडेटमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितलं की, हा आजार काही साथीच्या रोगाची सुरुवात नाही.
त्या म्हणाल्या, "हा कोव्हिड किंवा इन्फ्लूएन्झा नाही. तो खूप वेगळ्या पद्धतीने पसरतो."
गोवरसारख्या आजारांप्रमाणे, जे खूप लवकर (संसर्गजन्य) आणि सहज पसरतात, तसं हंता व्हायरसचा अँडीज प्रकार इतका संसर्गजन्य नाही. त्यामुळे तो तितक्या सहज पद्धतीने पसरत नाही.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होऊ शकतो, पण जगभरात याच्या संक्रमणाचा धोका अजूनही कमीच आहे.
ताज्या अपडेटनुसार, जहाजावर असलेल्यांमध्ये आतापर्यंत 8 प्रकरणं आढळून आली आहेत. त्यात 3 जणांना आजाराची खात्री झाली आहे आणि 5 जणांमध्ये संशयित लक्षणं दिसत आहेत.
या आजाराचा नेमका उद्रेक कसा झाला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
उंदरांपासून पसरतो व्हायरस
हंता व्हायरस साधारणपणे उंदरांपासून पसरतो. उंदरांच्या मूत्र, विष्ठा किंवा लाळेमध्ये असलेले विषाणू हवेत मिसळतात आणि ती हवा श्वासातून घेतल्यास माणसाला याचा संसर्ग होऊ शकतो.
हे क्रूझ जहाज दुर्गम वन्यजीव असलेल्या भागांमध्ये फिरत होते. त्यामुळे एखाद्या प्रवाशाचा तिथेच किंवा जहाजात चढण्यापूर्वीच या विषाणूशी संपर्क आला असण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांनी यापूर्वीच्या काही प्रादुर्भावांमध्ये पाहिलं आहे की, अँडीज प्रकारचा हंता व्हायरस अतिशय जवळच्या संपर्कातून माणसाकडून माणसाला पसरू शकतो.
त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांना असं वाटतं की, एमव्ही होंडियस या जहाजावरील काही संसर्ग एक व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेला असावा.
लक्झरी क्रूझ जहाजांमध्येही राहण्याची जागा तुलनेने छोटी आणि मर्यादित असते. लोक एकाच केबिनमध्ये राहतात आणि जेवणासाठी सामायिक जागा वापरतात. अशा ठिकाणी संसर्ग लवकर पसरू शकतो.
जे लोक खूप वेळ एकमेकांच्या अगदी जवळ राहतात, त्यांच्याकडून या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
या तीन मृत्यूंमध्ये एका डच महिलेचाही समावेश आहे. ती 24 एप्रिल रोजी एमव्ही होंडियस जहाज सेंट हेलेना बेटावर थांबले असताना जहाज सोडून गेली होती.
ती पतीसोबत एकाच केबिनमध्ये राहत होती. त्यांचा 11 एप्रिलला जहाजावरच मृत्यू झाला होता. मात्र, तिच्या पतीला हंता व्हायरस झाला होता की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या (यूकेएचएसए) म्हणण्यानुसार, हंता व्हायरस बाहेरच्या जगात सामान्य संपर्कातून पसरत नाही.
म्हणजेच रस्त्यावर फिरताना, दुकानात, ऑफिसमध्ये किंवा शाळेत असताना हा आजार इतरांना सहजपणे होत नाही.
लोकांवर लक्ष, ट्रेसिंगही सुरू
या विषाणूचा संपर्क झाल्यानंतर लक्षणं साधारणपणे 2 ते 4 आठवड्यांनी दिसू लागतात. परंतु, काही वेळा ती एक महिन्यापेक्षा उशिराही दिसू शकतात.
जहाजावर, हॉस्पिटलमध्ये किंवा प्रवाशांनी घेतलेल्या कोणत्याही विमान प्रवासात ज्यांना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, अशा 'लोकांवर' लक्ष ठेवण्यात येणार आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी प्रा. रॉबिन मे यांनी बीबीसीला सांगितलं की, संपर्क शोधण्याचं (ट्रेसिंग) काम 'खूप मोठं आणि कठीण' आहे. हे काम 'अजून बराच काळ सुरू ठेवावं लागणार आहे', असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रा. मे यांनी सांगितलं की, या क्रूझ जहाजाशी थेट संबंध नसलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी "या आजाराचा धोका जवळजवळ नाहीच म्हणजे नगण्य आहे."
अँडीज प्रकारच्या हंता व्हायरसची लागण झालेल्या लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात.
त्यात ताप, थकवा, अंगदुखी, श्वास लागणं, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या किंवा अतिसार देखील होऊ शकतो.
ठरावीक उपचार नाहीत
या आजाराची तपासणी करण्यासाठी चाचण्या उपलब्ध आहेत. परंतु, यावर खास अशी एक ठराविक उपचार पद्धती नाही. तरीही, लवकर रुग्णालयात उपचार मिळाल्यास बरे होण्याची शक्यता वाढते. उपचार हे दिसणाऱ्या लक्षणांनुसार केले जातात.
यूकेएचएसएमधील संसर्गजन्य आजारांच्या उपसंचालिका डॉ. मीरा चंद म्हणाल्या की, "सर्वसामान्य लोकांना या आजाराचा धोका अजूनही खूप कमी आहे, त्यामुळे घाबरू नये, असा विश्वास लोकांना देणं गरजेचं आहे."
"हा आजार पुढे इतरांमध्ये पसरू नये, यासाठी जहाजाशी किंवा हंता व्हायरस रुग्णांशी संपर्क आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन त्यांची माहिती घेतली जात आहे."
एमव्ही होंडियस हे जहाज केप व्हर्दे जवळ 3 दिवस थांबल्यानंतर आता स्पेनच्या कॅनरी बेटांकडे निघालं आहे. केप व्हर्दे हा पश्चिम आफ्रिकेजवळील बेटांचा समूह आहे.
उर्वरित प्रवासी आणि कर्मचारी त्यांच्या-त्यांच्या देशात विमानाने परत पाठवण्याचे नियोजन आहे.
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी जहाजाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.
प्रवासी जहाजावरच वेगळं राहत आहेत आणि नियोजित स्थलांतराआधी तज्ज्ञांकडून जहाजाची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे.
जहाजावर अजूनही उपस्थित असलेल्या कोणालाही आजाराची लक्षणं दिसत नसल्याचे ओशनवाइड एक्सिपडिशन्सने गुरुवारी सांगितलं.
कंपनीने सांगितलं की, 24 एप्रिलला जहाज सेंट हेलेना बेटावर थांबलं तेव्हा 30 प्रवाशांनी, ज्यात 7 ब्रिटनचे नागरिक होते, जहाज सोडलं. या सर्वांशी नंतर संपर्क साधण्यात आला आहे.
यूकेएचएसएने सांगितलं की, सेंट हेलेना येथे जहाज सोडून गेलेले दोन ब्रिटिश नागरिक जोहान्सबर्गहून घरी परतले होते.
जेव्हा त्यांना या प्रकरणांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आता ते यूकेमध्ये स्वतःहून वेगळं राहत आहेत. त्यांना सध्या कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
सेंट हेलेना येथे जहाज सोडून गेलेले इतर पाच ब्रिटिश नागरिक अजून यूकेमध्ये परतलेले नाहीत, असं यूकेएचएसएने नंतर सांगितलं आहे.
अमेरिकेत, जॉर्जिया आणि अॅरिझोना येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, जहाजातून उतरून परत आलेल्या तीन प्रवाशांवर ते लक्ष ठेवून आहेत. सध्या या तिघांनाही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)