'लिंगाचा कॅन्सर झाल्याचं कळलं, माझ्या लिंगाचा 30 टक्के भाग काढून टाकावा लागला, पण...'

    • Author, कॅथरिन लिस्ट
    • Role, बीबीसी स्कॉटलंड
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

(या लेखात शस्त्रक्रियेचं तपशीलवार, स्पष्ट वर्णन आहे.)

ॲलेस्टेयर मन्रो यांना त्यांच्या लिंगावरची एक छोटी गाठ, मोठी होत चालल्याचं लक्षात आलं. त्यावेळेस ही काहीतरी गंभीर समस्या आहे, असा संशय त्यांना आला.

त्यांनी जवळपास 6 आठवडे डॉक्टरकडे जाण्याचं टाळलं. मात्र नंतर ते डॉक्टरकडे जाताच, डॉक्टरनं त्यांना सांगितलं की हा कर्करोग असण्याची शक्यता आहे.

"हे एक धाडसी विधान होतं. ते ऐकून मला धक्का बसला. डॉक्टर याबद्दल 100 टक्के खात्रीनं सांगू शकले नाहीत. मात्र त्यांना वाटलं की हा कर्करोग आहे," असं 49 वर्षांचे ॲलेस्टेयर म्हणाले.

"एक आठवड्यानं रायगमोर इथल्या एका मूत्रविकारतज्ज्ञांनी देखील हेच सांगितलं. त्यानंतर फक्त बायोप्सी करण्याचाच प्रश्न राहिला होता," असं ॲलेस्टेयर पुढे म्हणाले.

कर्करोग झाल्याचा धक्का

ॲलेस्टेयर हे इनवरनेस इथले सिव्हिल इंजिनिअर आहेत. ती गाठ पहिल्यांदा लक्षात आल्यानंतर तीन महिन्यांनी ॲलेस्टेयर यांना लिंगाचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. हा एक दुर्मिळ आजार आहे. स्कॉटलंडमध्ये तो वर्षाला फक्त 80 - 90 पुरुषांनाच होतो, तर संपूर्ण युकेमध्ये तो वर्षाला जवळपास 700 पुरुषांना होतो.

"त्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. मात्र तो कर्करोगच असल्याची मला खात्री होती," असं ॲलेस्टेयर बीबीसीला म्हणाले.

"या प्रकारच्या कर्करोगाबद्दल त्यापूर्वी मी कधीही ऐकलं नव्हतं. त्यानंतर गोष्टी खूपच वेगानं घडल्या," असं ॲलेस्टेयर पुढे म्हणाले.

त्यांचं सीटी स्कॅन करण्यात आलं. त्यातून तो कर्करोग पसरत असल्याचं स्पष्ट झालं.

7 तास चालली शस्त्रक्रिया आणि बीबीसीनं केलं चित्रीकरण

मग ॲलेस्टेयर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे बीबीसीच्या टीमनं या शस्त्रक्रियेचं चित्रीकरण केलं. ते 'सर्जन्स: ॲट द एज ऑफ लाईफ' या कार्यक्रमाच्या बुधवारच्या भागात दाखवलं जाईल.

या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये ट्युमर किंवा गाठ काढण्यात आली आणि ॲलेस्टेयर यांच्या लिंगाचा 30 टक्के भाग काढून टाकण्यात आला. ही शस्त्रक्रिया 7 तास चालली.

हा कर्करोग ॲलेस्टेयर यांच्या जांघेतील लिम्फ नोड्स म्हणजे लहान आकाराच्या ऊतींच्या गोळ्यांमध्ये पसरला होता. त्यामुळे ते देखील काढून टाकावे लागले. या प्रक्रियेत ॲलेस्टेयर यांच्या लिंगाची पुनर्रचना करावी लागली. त्यासाठी त्यांच्या मांडीवरील त्वचेचा वापर करण्यात आला म्हणजे मांडीवरील त्वचेचं रोपण करण्यात आलं.

ॲलेस्टेयर मूळचे किंग्युसीचे आहेत. सहा आठवड्यांनी त्यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया साडेतीन तास चालली. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर असं आढळून आलं होतं की गाठीचा छोटासा भाग अजूनही शरीरात शिल्लक आहे, त्यामुळे ही दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली.

हा कर्करोग ॲलेस्टेयर यांच्या ओटीपोटी किंवा कंबरे खालच्या भागात पसरण्याची 50 टक्के शक्यता होती.

'कर्करोगातून मुक्त, मात्र सेक्स करता येत नाही'

"जोपर्यंत ते तुमच्या शरीरात आत जात नाहीत, तोपर्यंत तो कर्करोग आहे की नाही, हे ते सांगू शकत नाहीत. ते प्रत्यक्षात कर्करोगाच्या गाठी कापून काढतात आणि नंतर लगेच त्यांची तपासणी करतात. एकप्रकारे ते तुमच्या शरीरात खोदकामच करत असतात," असं ॲलेस्टेयर म्हणाले.

"जोपर्यंत त्यांना कर्करोगाचा शेवट सापडत नाही, तोपर्यंत ते असं करत राहतात. हे ऐकायला अतिशय प्राचीन काळातील वाटतं. मात्र ते हीच गोष्ट करतात. हे खरोखरंच खूप आश्चर्यकारक आहे," असं ते पुढे म्हणाले.

मग ॲलेस्टेयर यांच्यावर एक महिना रेडिओथेरेपीचे उपचार करण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते कर्करोगमुक्त झाल्याचं सांगण्यात आलं.

ते सध्या सेक्स करू शकत नाहीत किंवा व्यवस्थित लघवी करू शकत नाहीत. शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरेपी यांच्या गुंतागुंतीतून त्यांना लिम्फेडेमा झाल्यामुळे त्यांना सध्या तसं करता येत नाही. यामुळे त्वचेवर सूज येते.

ॲलेस्टेयर यांच्या या स्थितीत सुधारणा होण्यासाठी त्यांच्यावर जवळपास वर्षभरात प्लास्टिक सर्जरी करण्यात येण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांच्या आत हा कर्करोग पुन्हा होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता

आपल्याला कर्करोग झाला आहे, हे आपल्या कुटुंबातील सदस्यांना सांगणं ॲलेस्टेयर यांना कठीण गेलं. विशेषकरून कर्करोगाच्या या प्रकाराबद्दल अनेक जणांना माहीत नसतं, त्यामुळे ॲलेस्टेयर यांना ते कठीण गेलं.

मात्र त्याचबरोबर त्यांना कुटुंबीयांना हे देखील सांगावं लागलं की त्यांच्यावरील शस्त्रक्रियेचं चित्रीकरण बीबीसीच्या एका माहितीपटांच्या मालिकेसाठी केलं जात होतं.

"हे करण्यामागचा उद्देश पुरुषांमधील कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा आहे," असं ते म्हणाले.

"जर एखादी अशी व्यक्ती असेल, जिच्या लिंगामध्ये काहीतरी समस्या निर्माण झाली असेल, मात्र त्यांना डॉक्टरकडे जाण्याची लाज वाटत असेल. अशावेळी जर त्यांनी हा कार्यक्रम पाहिला आणि ठरवलं की 'मी डॉक्टरकडे गेलं पाहिजे, तर तोच यामागचा मुख्य उद्देश आहे," असं ते म्हणाले.

"ते लक्षात येणं खूप कठीण आहे. त्याची खूप कमी लक्षणं दिसतात. यात तुमच्या लिंगावर फक्त एक छोटासा डाग असू शकतो," असं ते म्हणाले.

"जर कोणाला गाठ आढळली किंवा लिंग ताठर होण्यामध्ये समस्या असेल, तर लगेच तपासणी करून घेतली पाहिजे," असं ते पुढे म्हणाले.

ॲलेस्टेयर यांच्या बाबतीत ही गाठ लिंगाच्या टोकावर होती. त्या गाठीमुळे त्यांना वेदना होत नव्हती. मात्र तिचा आकार वाढत गेला. एका टप्प्यावर त्यांना त्यात रक्त आढळलं.

'डॉ. शुक्ला यांनी माझा जीव वाचवला'

ॲलेस्टेयर यांच्यावर कन्सल्टंट युरोलॉजिकल सर्जन सी जे शुक्ला यांनी एडिनबर्गच्या वेस्टर्न जनरल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया केली.

पुरुषांवरील अत्यंत दुर्मिळ कर्करोगांवर उपचार करता येतील, अशा स्कॉटलंडमधील फक्त दोन केंद्रांपैकी हे एक केंद्र आहे.

या कार्यक्रमाचे प्रसारण बीबीसी स्कॉटलंडवर 11 मे रोजी होणार आहे. ॲलेस्टेयर यांनी या कार्यक्रमाची झलक आधीच पाहिली आहे.

"खरं सांगायचं तर, मला ते खूपच भयंकर वाटलं, हे मी कबूल करतो. या कार्यक्रमात तुम्हाला दिसतं की मला खूप जास्त रक्तस्राव होतो. मी जेव्हा ते पाहिलं, तेव्हा मी म्हणालो, 'मला याबद्दल कोणीच सांगितलं नव्हतं'," असं ते म्हणाले.

"मात्र माझ्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणाले की यात विशेष असं काही नाही. असं नेहमीच घडतं," असं ते पुढे म्हणाले.

ॲलेस्टेयर साडेपाच महिन्यांपासून कामावर परतले आहेत. या भयानक (रक्त दाखवणाऱ्या) दृश्यांनंतरदेखील, त्यांनी मान्य केलं की जेव्हा हा कार्यक्रम प्रसारित होईल, तेव्हा ते कदाचित त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया पुन्हा पाहतील.

"एडिनबर्गच्या वेस्टर्न जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी तसंच जिल्हा परिचारिकांचे मी आभार मानतो," असं ॲलेस्टेयर म्हणाले.

"माझ्यावर जे उपचार करण्यात आले, ते अविश्वसनीय स्वरूपाचे होते. मला त्यात काहीही चुकीचं किंवा कोणतीही उणीव दिसून आली नाही. मी नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस)चा अत्यंत आभारी आहे," असं ते म्हणतात.

"डॉ. शुक्ला यांनी माझा जीव वाचवला," असं ॲलेस्टेयर कृतज्ञतेनं म्हणतात.

'अतिशय खासगी स्वरुपाची बाब'

डॉ. शुक्ला 14 वर्षांपासून कन्सल्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणाले की युकेमध्ये लिंगाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण स्कॉटलंडमध्ये आढळतात.

"असा अंदाज आहे की 2030 ते 2040 दशकापर्यंत या कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं मोठी वाढ होत जाईल. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपण सज्ज राहणं आवश्यक आहे," असं डॉ. शुक्ला म्हणाले.

"डॉक्टरकडे येण्यापूर्वी, रुग्णांनी दोन ते तीन महिने हा आजार अंगावरच काढलेला असणं, ही बाब आमच्यासाठी नेहमीचीच झाली आहे," असं ते पुढे म्हणाले.

अनेक रुग्णांनी लिंगाच्या कर्करोगाबद्दल आधी कधीच ऐकलेलं नसतं. अगदी प्रोस्टेट कॅन्सर, ज्याबद्दल बरीच जागरुकता आहे, त्याच्याबाबतीत देखील लाज वाटत असल्यामुळे पुरुष, वैद्यकीय उपचार घेण्यास किंवा डॉक्टरकडे जाण्यास संकोच करतात, असं डॉ. शुक्ला म्हणाले.

अनेक सामान्य डॉक्टर या आजाराचं निदान चुकून यीस्ट इन्फेक्शन थ्रश म्हणजे बुरशीजन्य संसर्ग असंदेखील करू शकतात. तसंच काही आठवडे उपचार घेतल्यानंतर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं.

अगदी त्यावेळेस देखील, रुग्णांना सुरुवातीला स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं. त्यानंतरच त्यांना एखाद्या स्पेशलिस्ट सेंटर म्हणजे तज्ज्ञांद्वारे उपचार दिल्या जाणाऱ्या केंद्रात दाखल केलं जातं.

"याबाबतीत पुरुषांनी लगेच पावलं उचलणं महत्त्वाचं आहे," असं शुक्ला म्हणाले.

"यासंदर्भात, प्रश्न असा आहे की युकेच्या इतर भागांपेक्षा आमच्या भागात (स्कॉटलंड) याचं प्रमाण अधिक का आहे?" असं ते म्हणाले.

धूम्रपान, लठ्ठपणा, स्वच्छतेचा अभाव आणि ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही)चा (लैंगिक संबंधांमधून होणारा) संसर्ग, ही यामागची कारणं किंवा घटक आहेत. यातील अनेक घटकांचा संबंध सामाजिक उपेक्षेशी जोडला जाऊ शकतो, असं ते म्हणाले.

मात्र, ते म्हणाले की, एखाद्याचं वय किंवा सामाजिक पार्श्वभूमी काहीही असली, तरीदेखील कोणालाही हा आजार होऊ शकतो. त्यांना वाटतं की हा आजार झालेल्या रुग्णांना मानसिक आधाराची आवश्यकता आहे, तसंच स्कॉटलंडमध्ये त्यांच्यासाठी अधिक नर्सची आवश्यकता आहे.

टीव्ही मालिकेत दिसण्याची शुक्ला यांची ही पहिलीच वेळ आहे.

"माझ्या बाबतीत सांगायचं, तर स्वत:ची कहाणी सांगण्यात तयार होतील असे काही रुग्ण मिळतात का हे पाहणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं, हीच यामागची प्रेरणा होती. ही अतिशय वैयक्तिक स्वरुपाची बाब असून देखील ॲलेस्टेयर यांनी त्यांची कहाणी जगासमोर मांडण्याचं धाडस दाखवलं आहे," असं शुक्ला म्हणाले.

"इतर पुरुषांना त्यापासून फायदा मिळावा हा त्यांची कहाणी दाखवण्यामागचा उद्देश आहे," असं ते म्हणाले.

('सर्जन्स: ॲट द एज ऑफ लाईफ' हा कार्यक्रम बुधवारी रात्री 9 वाजता 'बीबीसी टू' वर प्रसारित होईल. तर 'बीबीसी स्कॉटलंड'वर तो सोमवारी, 11 मे ला रात्री 9 वाजता प्रसारित होईल. तसंच 'बीबीसी आयप्लेयर'वर पाहण्यासाठी तो गुरुवारी, 6 मे ला सकाळी 6 वाजल्यापासून उपलब्ध होईल.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)