बॉल टेम्परिंग वाद : चेंडूशी छेडछाड करण्याच्या पद्धती, ज्यामुळे गोलंदाजाला 'असा' होतो फायदा

पॅट कमिन्स, ख्वाजा उस्मान आणि डेवीड वॉर्नर.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. त्यात त्यानं बॉल टेम्परिंग संदर्भात एक धक्कादायक दावा केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील पॅट कमिन्ससह ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला सँडपेपरनं चेंडू खराब करण्याच्या योजनेबाबत माहिती होती, असं ख्वाजानं म्हटलं आहे.

त्यामुळं याची जबाबदारीही संघानं घ्यायला हवी होती, असं त्यानं म्हटलं आहे.

मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं माजी सहकारी उस्मान ख्वाजाच्या या वादासंदर्भात केलेल्या दाव्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

ख्वाजाचे हे दावे 'शंभर टक्के खोटे' आणि 'मूर्खपणाचे' असल्याचं कमिन्सनं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियन संघ 2018 मध्ये केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना खेळत होता. त्यादरम्यान, स्टिव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांनी चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता.

त्यासाठी तिन्ही खेळाडूंना शिक्षाही झाली होती.

बॉल टेम्परिंग नेमकं कसं केलं जातं? गोलंदाजाला त्यामुळं काय फायदा होतो?

कमिन्स आणि ख्वाजा यांनी एकत्र 56 कसोटी सामने खेळले आहेत. ख्वाजानं जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

पण क्रिकेटच्या चेंडूशी छेडछाड करण्याचा नेमका फायदा काय? क्रिकेट विश्लेषक सायमन ह्यूजेस यांनी यापूर्वी बीबीसी स्पोर्ट्सशी झालेल्या संभाषणात याबाबत माहिती दिली होती.

रिव्हर्स स्विंग म्हणजे काय?

स्विंगचे दोन प्रकार आहेत. पारंपरिक स्विंगमध्ये, गोलंदाज चेंडूच्या चकचकीत बाजूचा वापर करून चेंडू अशा प्रकारे फेकतो की तो एका बाजूला फिरतो किंवा वळतो.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा 'कुकबुरा चेंडू'ची चकाकी बऱ्याचदा जास्त काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत, गोलंदाज 'रिव्हर्स स्विंग' करण्याचा प्रयत्न करतात.

रिव्हर्स स्विंग करण्यासाठी, चेंडूची एक बाजू जास्तीत जास्त खडबडीत झालेली असणे गरजेचे असते. तसंच ती बाजू पूर्णपणे कोरडी ठेवणेही गरजेचे असते.

यामुळे चेंडूच्या खडबडीत बाजूभोवतीच्या हवेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळं, चेंडू त्याच्या नैसर्गिक प्रवाह किंवा झोक असलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जातो. म्हणूनच याला 'रिव्हर्स स्विंग' असे म्हणतात.

ग्राफिक्स

चेंडू उलट्या दिशेने कसा फिरतो?

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू इम्रान खान हे क्रिकेट विश्लेषक सायमन ह्यूजेस यांना चेंडूशी छेडछाड कशी केली जाते हे दाखवणारे पहिले क्रिकेटपटू होते. त्यांनी एकदा नेट प्रॅक्टिस दरम्यान चेंडूशी छेडछाड कशी होते हे दाखवलं होतं.

त्यांनी प्रशिक्षकाच्या बॅगमधून एक जुना चेंडू काढला. त्यामंतर चेंडूच्या खडबडीत बाजूची क्वार्टर सीम थोडी वर उचलली. (क्वार्टर सीम म्हणजे मुख्य शिलाईच्या बाजुला असलेला भाग) त्यानंतर तो चांगलाच फिरायला लागला.

कधीकधी सामन्यात चेंडू अजिबात स्विंग होत नसायचे. त्यावेळी सायमन ह्यूजेस यांनीही हा प्रयोग करून पाहिला. अर्थातच, हे खेळाच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. पण तसं करूनही काहीच घडलं नाही, काही घडलं असेल तरी त्याचा फायदा घेण्याचा कौशल्य आपल्याकडं नव्हतं असं ह्युजेस सांगतात.

ग्राफिक्स

चेंडू नैसर्गिकरित्या खडबडीत होतो का?

चामडे असलेल्या भागावर पडण्यासाठी चेंडू क्रॉस सीम टाकणे किंव सीमारेषेवरून टप्पे खात जाईल असा फेकणे असे प्रकार केले तरी, चेंडूची ठरावीकच बाजू खडबडीत होईल याची हमी नसते.

त्यामुळं गोलंदाज आणि इतर खेळाडूंना बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करण्याचा मोह होतो.

त्यात मुद्दाम चेंडूवर पाय ठेवणं, कुणाला कळू नये अशा प्रकारे चेंडू नखांनी खरवडणे, बाटलीच्या झाकणाने घासणे, सँडपेपरच्या द्वारे घासणे अशा पद्धती वापरल्या जातात. एकदा तर यासाठी चाकूचाही वापर झाला होता.

बॉल टेम्परिंग नेमकं कसं केलं जातं? गोलंदाजाला त्यामुळं काय फायदा होतो?

विकेटची अत्यंत गरज असेल आणि छेंडूशा छेडछाड करायची असेल तर त्याचा सर्वोत्तम आणि नियमात बसणारा मार्ग म्हणजे, संघातील सर्वात खराब फिरकी गोलंदाजाला गोलंदाजी देणं हा असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

कमकुवत फिरकी गोलंदाजाला एखाद्या फलंदाजानं सिमेंटच्या स्टँडवर दोन-चार षटकार मारले, तर चेंडूचा पृष्ठभाग खराब होऊ शकतो आणि तेच वेगवान गोलंदाजांना हवं असतं. पण अर्थात चेंडू मैदानाबाहेरही जायला नको.

आधीच खडबडीत असलेल्या चेंडूशी छेडछाड झाल्याचं कसं ओळखायचं?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जुन्या चेंडूच्या मदतीनं रिव्हर्स स्विंग मिळवण्याचं महत्त्व 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात वाढत गेलं. त्यावेळी काही गोलंदाज हाताच्या किंवा अंगठ्याच्या नखांनी चेंडूची खडबडीत बाजू खरवडण्यात किंवा आधीच खडबडीत असलेला भाग आणखी खराब करण्यात जणू पारंगत झाले.

पण हे लक्षात येईपर्यंत नैसर्गिकरित्या खराब झालेला चेंडूचा भाग आणि मुद्दाम केलेली छेडछाड यात फरक ओळखणं जवळपास अशक्यच होतं.

2006 मध्ये ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पाकिस्ताननं वापरलेल्या चेंडूची सायमन यांनी पाहणी केली. पंचांनीही चेंडूची तपासणी करून तो छेडछाड केलेला असल्याचं जाहीर केलं. या वादामुळं अखेर तो कसोटी सामना रद्द करण्यात आला.

सायमन यांनी पाकिस्तानी गोलंदाजांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. चेंडूशी छेडछाड झाली हे मानण्याचं काहीही कारण नसल्याचं ते म्हणाले होते.

ओव्हल मैदानाचा पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळे चेंडूवर त्याचे ओरखडे किंवा खुणा झालेल्या असू शकतात का हे निश्चितपणे सांगणं शक्य नव्हतं. तसंच, संशयास्पद कृत्य करताना कॅमेऱ्यात कोणी कैदही झालं नव्हतं, असं सायमन म्हणाले.

बॉल टेम्परिंग यशस्वी ठरतं का?

एखाद्या टेपच्या तुकड्यावर माती घेऊन ती कुणाला न कळता चेंडूला घासल्यानं चेंडूच्या वेगावर किंवा स्विंगवर खूप काही परिणाम होईल, असं समजणं किंवा त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. ते पाहता, हा धोका पत्करणं अजिबात योग्य नव्हते.

बॉल टेम्परिंग नेमकं कसं केलं जातं? गोलंदाजाला त्यामुळं काय फायदा होतो?
फोटो कॅप्शन, उस्मान ख्वाजाचे पुस्तक.

सायमन यांच्या मते, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भ्रम झाला होता. सध्याच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पकडलं न जाता कोणतंही कृत्य करून निसटणं जवळजवळ अशक्य आहे.

तुमच्यावर जवळपास 30 कॅमेरे लक्ष ठेवून असतात. शिवाय अंपायर नियमितपणे चेंडू तपासतात.

क्रिकेटमध्ये नेहमीच अनियमितता राहिली आहे. पण खेळाडूंचं चांगले वर्तन आणि एकमेकांचा आदर हे या खेळाचे एक प्रमुख वैशिष्ट्यही राहिलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)