पुण्याच्या एअर होस्टेसची गोंदियाच्या जंगलात हत्या, 13 लाखांची सुपारी आणि जीपीएस ट्रॅकिंग; नेमकं काय घडलं?

मृत एअर होस्टेस महिला वर्षा तुरकर
फोटो कॅप्शन, मृत एअर होस्टेस वर्षा तुरकर
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात बोंडराणी इथल्या जंगलात पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकर यांचा मृतदेह आढळला होता.

जंगलात चाकूनं वार करून तिची 14 नोव्हेंबरला हत्या करण्यात आली. ज्या मित्रासोबत फिरायला गेली त्यानेच हत्या केल्याचा आरोप कुटुंबानं केला होता.

पण, आता पाच दिवसानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

गोंदिया पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा तुरकरचे माहेर बालाघाट इथल्या खैरलांजी तालुक्यातले आहे.

ती लग्नानंतर पुण्याला राहत असून ती एअर होस्टेस म्हणून काम करायची. दिवाळीमध्ये माहेरी आल्यानंतर ती 14 नोव्हेंबरला गोंदिया येथील तिचा मित्र नितेश अग्रवालसोबत तिरोडा इथं गेली होती. तिथून परत येत असताना बोंडराणीच्या जंगलात दोघेही थांबले.

तिथेच सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्तीनं येऊन तिच्या पोटावर आणि पाठीवर चाकूनं वार करून हत्या केल्याची माहिती नितेश अग्रवालनं पोलिसांना दिली होती.

पण, चाकूहल्ल्यात ती ठार झाली आणि नितेश अग्रवालला काहीच झालं नव्हतं. त्यामुळे नितेश अग्रवालबद्दल संशय निर्माण झाला. वर्षाच्या कुटुंबीयांनी सुद्धा नितेश अग्रवालनं पैशांसाठी हत्या केल्याचा आरोप केला होता.

पुण्याच्या एअर होस्टेसची गोंदियात हत्या
फोटो कॅप्शन, (प्रातिनिधिक छायाचित्र)

"नितेश अग्रवाल यांचे आमच्या घरी चांगले संबंध होते. त्याच्यासोबत माझी मुलगी गेली होती. त्यानं फोन करून सांगितलं की वर्षावर चाकूहल्ला झाला, असं वर्षाची आई प्रमिला सांगतात.

त्यानंतर हॉस्पिटलला आणल्याचं त्यानंच सांगितलं. आम्हाला पूर्ण शंका आहे की माझ्या मुलीच्या हत्येत त्याचाच हात आहे. माझ्या मुलीनं नागपूरचा फ्लॅट विकल्यानंतर त्याला धंदा करण्यासाठी 60 लाख रुपये दिले होते. तिनं एक दोनवेळा परतही मागितले. त्यावरूनच तिला मारलं", असा आरोप प्रमिला यांनी केला आहे.

सुरुवातीला चोरांनी हल्ला केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. पण, कुटुंबीयांचं म्हणणं आहे की चोरांनी हल्ला केला असता तर वर्षाच्या अंगावरील सोनं-दागिने घेऊन गेले असते. पण, तिच्या अंगावर सगळे दागिने तसेच होते. ही लुटमार नसून ही हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांचा आहे.

नितेश अग्रवालच्या पत्नीनं 13 लाख रुपयांत दिली हत्येची सुपारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यांनी गोंदियापासून तिरोड्याच्या जंगलापर्यंत आणि तिथपासून बालाघाटपर्यंत सगळे सीसीटीव्ही तपासले.

त्यामध्ये तीन संशयित दुचाकीवरून वर्षाचा मित्र नितेशचा पाठलाग करताना दिसले. एका सीसीटीव्हीत एका आरोपीचा चेहरा दिसल्यानं पोलिसांनी इमरान करीम शेखला ताब्यात घेतलं. त्याची विचारपूस केली असता त्यानं हत्येची कबुली दिली.

नितेश अग्रवाल आणि मृत महिला वर्षा तुरकरचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे नितेशची पत्नी मोना अग्रवाल त्रस्त होती. तिनं घराशेजारी राहणाऱ्या कुणाल कुंभलकरला सोबत घेऊन वर्षाला जीवे ठार मारण्याचा कट रचला.

यानंतर कुणालने सराईत गुन्हेगार शाहरूख पठाण याच्याशी संपर्क साधून 13 लाख रुपयात वर्षाला जीवे ठार मारण्याची सुपारी दिली. त्यानंतर शाहरूखनं इमरानं शेख, नायलान शेख आणि क्रिश राऊत या तिघांवर वर्षाला जीवे मारण्याची जबाबदारी सोपवली.

पुण्याच्या एअर होस्टेसची गोंदियात हत्या
फोटो कॅप्शन, (प्रातिनिधिक छायाचित्र)
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नितेश अग्रवाल बालाघाटला गेला की वर्षाला भेटायचा. वर्षा दिवाळीसाठी घरी आली आहे याची माहिती सुद्धा नितेशची पत्नी मोना अग्रवालला होती. त्याचाच फायदा घेत तिनं तिन्ही हल्लेखोरांना नितेशच्या गाडीचा पाठलाग करायला सांगितला.

नितेशच्या गाडीमध्ये गुगल मॅपचं लॉग इन त्याची पत्नी मोनाच्या आयडीवरून होतं. त्यामुळे त्याच्या गाडीचं जीपीएस लोकेशन तिला ट्रॅक करता येत होतं. त्याचाच फायदा घेत तिनं हल्लेखोरांना गाडीचा पाठलाग करत जंगलात पाठवलं. त्यानंतर तिन्ही आरोपींनी वर्षाला जंगलात चाकूनं हल्ला करून ठार केलं.

पोलिसांनी चाकूनं वार करणारे तीन आरोप, सोबत खुनाचा कट रचणारे नितेश अग्रवालची पत्नी मोना अग्रवाल आणि तिचा शेजारी कुणाल कुंभलकर यांना ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना दिली.

नितेश अग्रवालने पैशांसाठी वर्षाची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी त्यांचे बँक ट्रेल तपासले असता व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. आता त्या पैशांमुळे खून केला की यामागे प्रेमसंबंध हेच कारण होतं, यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचाही तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, आम्ही आरोपींच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, होऊ शकला नाही. त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आल्यास येथे अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)