डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्याचं मोदी सरकारचं स्वप्न यावेळी पूर्ण होणार? काय सांगतं संख्याबळ?

फोटो स्रोत, AFP via Getty Images
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात मोदी सरकार डिलिमिटेशन विधेयक (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा आहे.
परंतु, किरेन रिजिजू यांनी या विशेष अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, हे स्पष्ट केलेलं नाही. त्यांनी 'एक्स'वर दिलेल्या माहितीनुसार, सरकारची 'महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी' हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखी जोर आला आहे.
त्या म्हणाल्या, "देशाच्या हिताचा विषय असेल, तर त्यावर सर्वांचं एकमत होऊ शकतं." पण, "आम्हाला अद्याप याबद्दल काहीही माहिती नाही. आधी विधेयक तर येऊ द्या," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नवीन विधेयक मांडलं जाण्याच्या वृत्तामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएकडे दोन तृतीयांश बहुमत आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे. कारण याच वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या मतदानात दोन तृतीयांश बहुमत नसल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांच्या माहितीनुसार, लोकसभेचं कामकाज 30 नोव्हेंबरला, तर राज्यसभेचं कामकाज 2 डिसेंबरला होणार आहे. हे विशेष अधिवेशन 3 डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दावा केला आहे की, अजेंडा जाहीर झाला नसला, तरी 'या विशेष अधिवेशनात डीलिमिटेशन विधेयक मांडलं जाईल.'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर 'संसद चोरी'चा आरोप केला आहे. त्यांनी 'एक्स'वर लिहिलं, "त्यांचं डीलिमिटेशन विधेयक म्हणजे संसद चोरीचा एक प्रकारच असेल, यात शंका नाही. आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही."
एप्रिलमध्ये काय घडलं होतं?
महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी (डीलिमिटेशन) संबंधित 131 वी घटनादुरुस्ती करण्यासाठीचं विधेयक 17 एप्रिल 2026 रोजी लोकसभेत मंजूर होऊ शकलं नव्हतं.
महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्यातील दुरुस्ती आणि डीलिमिटेशनशी संबंधित विधेयकांवर मतदान झालं, तेव्हा 298 खासदारांनी या विधेयकांच्या बाजूने, तर 230 खासदारांनी विरोधात मतदान केलं. 11 खासदार अनुपस्थित होते.
घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत किमान दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असतं. गेल्या एप्रिलमध्ये लोकसभेत 528 सदस्य होते. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी 352 मतांची गरज होती. परंतु, विधेयकाला आवश्यक मतांपेक्षा 54 मतं कमी पडली होती.

फोटो स्रोत, ANI
यानंतर सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित इतर 2 विधेयकंही पुढे नेली नाहीत.
मात्र, यावेळी मोदी सरकार हे विधेयक नव्याने पुन्हा संसदेत मांडू शकतं आणि ते मंजूर करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारला दोन तृतीयांश बहुमत मिळण्याची आशा आहे. याचं कारण म्हणजे, यापूर्वी इंडिया आघाडीचा भाग असलेल्या डीएमकेने या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या लोकसभेतील सध्याच्या सुमारे 7.2 टक्के जागा कायम राहतील, याची हमी डीएमकेला हवी आहे.
सध्याचं संख्याबळ काय सांगतं?
सध्या लोकसभेमध्ये एकूण 540 खासदार आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश बहुमतासाठी 360 मतांची गरज आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या होत्या.
परंतु, तृणमूल काँग्रेसच्या 20 बंडखोर खासदारांनी पक्षापासून वेगळं होऊन एनडीएला पाठिंबा जाहीर केल्याने हे संख्याबळ बदललं आहे.
याच वर्षी जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गट आधीपासूनच एनडीएचा घटक पक्ष आहे. त्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या वाढून 319 इतकी झाली होती.
मागील वेळी डीएमकेने डिलिमिटेशन विधेयकाला विरोध केला होता. परंतु, यावेळी त्यांनी पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.
शुक्रवारी (27 नोव्हेंबर) डीएमकेचे प्रवक्ते टीकेएस एलंगोवन यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, "नवीन विधेयक आम्हाला मान्य असेल, तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, पण आधी विधेयक तर येऊ द्या."
लोकसभेत डीएमकेचे 22 खासदार आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने डीएमकेची साथ सोडली. त्यामुळे डीएमकेही इंडिया आघाडीतून बाहेर पडली.

फोटो स्रोत, ANI
End of podcast promotion
'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, डीएमकेच्या एका नेत्याने सांगितलं की, केंद्र सरकारने पक्षाशी संपर्क साधला होता. तामिळनाडूच्या लोकसभेतील सध्याच्या 7.2 टक्के जागा कायम राहतील, अशी हमी मिळाल्यास डीएमके मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला पाठिंबा देऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. परंतु, शुक्रवारी (27 नोव्हेंबर) त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. लोकसभेत या पक्षाचे 8 खासदार आहेत.
सुप्रिया सुळे यांनी गेल्या बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, "विरोधकांनी यापूर्वीही अनेक मुद्द्यांना पाठिंबा दिला आहे. पहलगामचा मुद्दा, जीएसटी विधेयक आणि महिला आरक्षणाचं विधेयक यांसारख्या विषयांना आम्ही एकमताने पाठिंबा दिला होता. देशाच्या हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे."
लोकसभेमध्ये हे विधेयक मंजूर झालं, तर ते राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेत एकूण 245 सदस्य असून, त्यापैकी 142 खासदार एनडीएचे आहेत. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी 161 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला आणखी 19 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
राज्यसभेत डीएमकेचे 8, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरद पवार गट) 1 खासदार आहे. प्रादेशिक पक्षांसह एनडीएबाहेरील पक्षांचे सुमारे 100 खासदार आहेत. या खासदारांचा पाठिंबा मिळवून आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश येईल, असा भाजपला विश्वास आहे.
स्टॅलिन काय म्हणाले?
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते एमके स्टॅलिन म्हणाले की, मतदारसंघ पुनर्रचनेचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात, याबाबत आवाज उठवणारा डीएमके हा भारतातील पहिला पक्ष होता.
त्यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये लिहिलं की, निष्पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी देशातील प्रमुख नेत्यांना एकत्र आणणारी पहिली बैठकही चेन्नईतच झाली होती.

फोटो स्रोत, @mkstalin
तामिळनाडू विधानसभेत मंजूर झालेला ठराव आणि निष्पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेसाठी संयुक्त कृती समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावांनुसार आमच्या 2 स्पष्ट मागण्या होत्या-
"जर लोकसभेतील जागांची संख्या वाढवली, तर कोणत्याही परिस्थितीत तामिळनाडूचा सध्याचा 7.18 टक्के वाटा कमी होता कामा नये."
"आणि, 1971 च्या जनगणनेनुसार निश्चित केलेलं आणि राज्यांमधील लोकसभेतील प्रतिनिधित्वाचं सध्याचं प्रमाण पुढील 25 वर्षेही कायम ठेवलं पाहिजे."
स्टॅलिन यांनी लिहिलं, "डीएमके आजही या दोन्ही मागण्यांवर ठाम आहे आणि यापुढेही ठाम राहील. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रसारमाध्यमांमधून केल्या जाणाऱ्या चर्चा आणि विश्वासघात करणाऱ्यांची विधानं यामुळे आमच्या भूमिकेवर कोणताही परिणाम होणार नाही."
विरोधकांनी काय म्हटलं?
विरोधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डीलिमिटेशन विधेयकावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून सरकारला इशाराही दिला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, संसदेचं विशेष अधिवेशन महिला आरक्षणासाठी बोलावलेलं नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. कारण महिला आरक्षणाचा कायदा आधीच मंजूर झाला आहे.
जयराम रमेश यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं, "लोकांचा आवाज दाबण्यासाठी मतदारसंघांची मनमानी पद्धतीने पुनर्रचना करणं, हा या विशेष अधिवेशनाचा खरा उद्देश आहे."
"मतदारसंघांच्या सीमा ठरवण्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार आहे?" असा प्रश्न त्यांनी विचारला.
कॉकरोच जनता पार्टीचे आशुतोष रांका म्हणाले की, 30 नोव्हेंबरला होणाऱ्या संसदेच्या कामकाजाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असेल.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी डीलिमिटेशन विधेयकाला मोदी सरकारची सर्वात मोठी चूक म्हटलं आहे.
त्यांनी 'एक्स'वर लिहिलं, "डीलिमिटेशन ही भाजपच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक ठरेल."

राष्ट्रीय जनता दलाचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते मनोज झा यांनी डीलिमिटेशनच्या नावाखाली राजकीय पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी 'एक्स'वर लिहिलं, "प्रस्तावित डीलिमिटेशनची प्रक्रिया केवळ जागांची संख्या वाढवण्यापुरती मर्यादित नाही, हे स्पष्ट झालं पाहिजे. राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या सीमा बदलल्या जातील, ही त्याहून मोठी चिंता आहे."
"घटनात्मक तत्त्वं आणि लोकशाहीतील निष्पक्षतेचा विचार न करता राजकीय पक्षपातातून ही प्रक्रिया राबवली गेली, तर लोकशाहीतील लोकांचं प्रतिनिधित्व, केंद्र आणि राज्यांमधील समतोल आणि देशाच्या एकतेला मोठा धक्का बसू शकतो, नुकसान होऊ शकतं."
ममता बॅनर्जी गटाच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी 'एक्स'वर लिहिलं, "नरेंद्र मोदी सरकार डीलिमिटेशन विधेयक आणत आहे. या विधेयकाच्या माध्यमातून भाजपला आपल्या निवडणुकीच्या फायद्यासाठी सर्व मतदारसंघांची नव्याने आखणी करण्याची संधी देण्यासारखं आहे. मात्र, हे सर्व 'महिला शक्ती' आणि 'महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी' केलं जात असल्याचा दावा सरकार करत आहे."
त्यांनी लिहिलं, "मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक म्हणजे सत्तेवर निर्लज्जपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण, हा प्रयत्न महिलांच्या आडून केला जात आहे. या विधेयकातून भाजपचा लोकशाहीबद्दलचा अनादर तर दिसून येतोच, पण महिलांबद्दलची तुच्छतेची आणि अपमानास्पद वागणूकही दिसते."
राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी 'एक्स' वर आपला एक लेख शेअर करताना लिहिलं, "एप्रिलमध्ये भाजपचा पहिला प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला होता. आता सत्ताधारी पक्षाच्या दुसऱ्या योजनेला म्हणजेच 'प्लॅन बी'ला सामोरं जाण्याची तयारी विरोधकांना करावी लागेल. या योजनेनुसार, राज्याच्या लोकसभेतील जागांची टक्केवारी बदलली जाणार नाही. परंतु, मतदारसंघांची नव्याने अशी रचना केली जाईल की, त्याचा भाजपला दीर्घकाळ निवडणुकीत फायदा मिळत राहील."
आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये डीलिमिटेशन केल्यानंतर सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत मोठा फायदा झाल्याचं या पूर्वी दिसून आलं आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला निवडणुकीत फायदा व्हावा, यासाठी मतदारसंघांच्या सीमा जाणीवपूर्वक बदलण्याच्या प्रक्रियेला 'गेरिमँडरिंग' म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























