'कॅन्सरने मला बदलून टाकलं'; प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी सांगितला अनुभव
![[ कॅप्शन: 'हील' या माहितीपटात प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी आपले अनुभव मनमोकळेपणाने मांडले आहेत.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/8a2c/live/78d9acb0-e946-11f1-a094-5fdc692f3e33.jpg.webp)
फोटो स्रोत, Punit Paranjpe / AFP via Getty Images
- Author, शॉन कॉफलान
- Role, रॉयल संवाददाता, बीबीसी न्यूज
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
कॅन्सर एखाद्या व्यक्तीला आतून कसं बदलून टाकतो, यावर प्रिन्सेस ऑफ वेल्स कॅथरीन यांनी बीबीसीच्या आगामी 'हील' (Heal) या माहितीपटात अनुभव सांगितला.
"कॅन्सर तुमच्या शरीराला बदलून टाकतो. शारीरिकदृष्ट्या तुमच्यात बदल होतातच. पण कॅन्सरचं निदान झाल्यावर तुमच्यात आतून जो बदल होतो त्याची एक खूप वेगळी बाजू असते," असं कॅथरीन यांनी यात म्हटलं आहे.
बीबीसी वनवर 29 नोव्हेंबरला प्रसारित होणाऱ्या या माहितीपटात कॅथरीन त्यांना झालेला कॅन्सर हा आजार आणि त्यातून सावरण्याचे अनुभव मांडताना दिसतील.
"बरं होण्याची प्रक्रिया हा एक प्रवास आहे," असं त्या म्हणतात.
या माहितीपटात वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी पूर्ण केलेल्या 'थ्री पीक्स चॅलेंज'चे काही नवे व्हीडिओ देखील पाहायला मिळतील.
या चॅलेंजमध्ये इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील सर्वात उंच शिखरं अवघ्या एका दिवसात सर करायची असतात.
"आयुष्यातील कठीण प्रसंगांचं ओझं एकट्याने पेलण्यासाठी आपण बनलेलो नाही, हे अगदी स्पष्ट आहे," असं त्या म्हणतात.
त्यांच्या या संवादाच्या पार्श्वभूमीवर इतर कॅन्सर रुग्णांची दृश्यंही दाखवली आहेत. यासोबतच प्रिन्सेस कॅथरीन प्रिन्स विल्यम आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना मिठी मारताना दिसत आहेत.
"बऱ्याचदा वेदना सहन केल्यानंतर, या वेदनेपलीकडे एक खूप सुंदर जग दडलेलं आहे, याची आपल्याला जाणीव होते," असं त्या म्हणतात.
कॅन्सर या आजाराच्या या अनुभवानं आपल्यात एक नवा बदल घडवून आणला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
![[ कॅप्शन: डॉक्युमेंट्री रिलीज होण्यापूर्वी केन्सिंग्टन पॅलेसने कॅथरीन यांचा 'थ्री पीक्स चॅलेंज' करतानाचा एक फोटो शेअर केला आहे.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/ef92/live/8c1c8d60-e946-11f1-99b6-a35a62fa4264.jpg.webp)
फोटो स्रोत, Matt Porteous/Kensington Palace
End of podcast promotion
कॅथरीन यांना नेमका कोणता कॅन्सर झाला होता याचा खुलासा त्यांनी कधीही केलेला नाही.
पण मार्च 2024 मध्ये त्यांनी कॅन्सरचं निदान झाल्याचं आणि त्यावर केमोथेरपी सुरू असल्याची माहिती दिली होती.
जानेवारी 2025 मध्ये त्यांनी त्यांचा कॅन्सर नियंत्रणात असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी हळूहळू शाही जबाबदाऱ्या पुन्हा सांभाळायला सुरुवात केली.
आजारपणानंतर आयुष्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला आहे, याबद्दल त्या नेहमीच बोलत असतात.
फक्त शारीरिकदृष्ट्या बरं होणं पुरेसं नसतं, तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
उपचारांनंतरच्या काळात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट दिवसांबद्दलही कॅथरीन यांनी अनुभव शेअर केले आहेत.
आजारातून बरं झाल्यावर रुग्ण लगेच पूर्वीसारखे होतात, हा लोकांचा गैरसमज त्यांना दूर करायचा होता.
कर्स्टी यंग यांच्या निवेदनातून साकारलेली ही डॉक्युमेंट्री या संपूर्ण प्रवासातील आतापर्यंतचे सर्वात सखोल आणि खासगी अनुभव समोर आणेल, असं म्हटलं जात आहे.
असा गंभीर आजार एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतो, हे कॅथरीन यांनी स्वतः यात सांगितलं आहे.
या आजारातून सावरण्याचा मार्ग त्यांना कसा सापडला, हेही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्या पुन्हा एकदा आपल्या सामाजिक संस्थांचं काम करू लागल्या आहेत.
उपचारानंतरच्या पहिल्या परदेश दौऱ्यावर भारतात आल्या
प्रिन्सेस कॅथरीन या नुकत्याच प्रिन्स विल्यम यांच्यासोबत 'अर्थशॉट प्राईझ' सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भारतात आल्या होत्या.
कॅन्सरच्या उपचारांनंतर शाही जबाबदाऱ्यांच्या निमित्ताने दोघांनी एकत्र केलेला हा पहिलाच परदेश दौरा होता.
या माहितीपटाच्या फिल्म क्रू टीममध्ये सिनेमॅटोग्राफी दिग्दर्शक म्हणून विल वॉर (Will Warr) यांचाही समावेश होता.
त्यांनी यापूर्वीही कॅथरीन आणि त्यांच्या कुटुंबासोबत काम केलं आहे. कॅथरीन यांच्या वाढदिवसानिमित्त जारी करण्यात आलेल्या एका व्हीडिओ संदेशात त्यांच्या फोटोंचा वापर करण्यात आला होता.
याशिवाय, एका ख्रिसमस कार्डवरही त्यांनी काढलेले फोटो वापरले गेले होते, त्यात प्रिन्सेस, प्रिन्स विल्यम आणि त्यांची मुलं होती.
![[ caption - विल्यम यांच्या 'अर्थशॉट पुरस्कार' सोहळ्यासाठी कॅथरीन मुंबईत आल्या होत्या.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/c98c/live/9f0e8ef0-e946-11f1-99b6-a35a62fa4264.jpg.webp)
फोटो स्रोत, EPA/Shutterstock
सप्टेंबर 2024 मध्ये कॅथरीन यांची केमोथेरपी पूर्ण झाल्याची घोषणा करणारा खासगी व्हीडिओ संदेशही याच फिल्म निर्मात्याने तयार केला होता.
त्या संदेशात कॅथरीन म्हणाल्या होत्या, "अंधारानंतर प्रकाश येऊ शकतो."
बीबीसीच्या मुख्य कंटेंट अधिकारी केट फिलिप्स म्हणाल्या की, 30 मिनिटांचा हा माहितीपट बीबीसीच्या प्रेक्षकांना भावेल आणि आपल्या आरोग्याशी संबंधित आव्हानांचा सामना करणाऱ्या लोकांनाही यातून दिलासा आणि आधार मिळेल, अशी आशा आहे.
कॅथरीन यांच्यावर 'द रॉयल मार्सडेन' रुग्णालयात उपचार झाले होते.
हा माहितीपट इतर देशांमध्येही प्रसारित केला जाणार आहे. याच्या वितरणातून मिळणारा निधी 'द रॉयल मार्सडेन कॅन्सर चॅरिटी'ला दिला जाईल.
लंडनच्या या रुग्णालयात जेव्हा कॅन्सर रुग्णांचे उपचार पूर्ण होतात तेव्हा ते प्रतिकात्मक रूपात एक घंटा वाजवतात.
कॅथरीन आपले भाऊ जेम्स मिडलटन यांच्याशी बोलताना म्हणतात, "मी ती घंटा वाजवली नव्हती."
यावर जेम्स म्हणतात, "कदाचित हा प्रवासच तुझ्यासाठी ती घंटा वाजवण्यासारखा आहे."
ते 'थ्री पीक्स चॅलेंज' पूर्ण करण्याकडे आणि कॅथरीन यांच्या आजारातून सावरण्याच्या प्रवासावर आधारित या माहितीपटाकडे इशारा करत होते.
हा माहितीपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही दाखवला जाईल. अमेरिकेत तो 30 नोव्हेंबरला एनबीसी युनिव्हर्सलवर प्रसारित होईल. ऑस्ट्रेलियात 1 डिसेंबरला चॅनल 9 वर तो दाखवला जाईल, तर कॅनडामध्ये 7 डिसेंबरला सीटीव्ही (CTV) आणि नूवोवर (Noovo) याचं प्रसारण होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






























