'वयाच्या 23 व्या वर्षी कळलं की मी जगातील कोणत्याही देशाची नागरिक नाही'; राजकोटच्या डॉलीसोबत नक्की काय घडलं?

फोटो स्रोत, BIPIN TANKARIA
- Author, गोपाल कटेशिया
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
राजकोटमधील एका रुग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षीय डॉली बारई हिचं लग्न खिलन वडालिया नावाच्या तरुणाशी झालं. खिलन हा कॅनडातील कॅलगरी शहरात काम करतो.
लग्नसमारंभ आणि सोहळे संपल्यावर, वडालिया कुटुंबानं डॉलीला तिच्या पतीसोबत कॅनडाला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर असं काही घडलं की त्यांनाही मोठा धक्का बसला.
त्यांना कळलं की, डॉली ही जगातील कोणत्याही देशाची नागरिक नव्हती.
त्यामुळे, डॉलीचं नवऱ्यासोबत कॅनडाला जाण्याचं नियोजन धुळीला मिळालं.
तिनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधला. सरकारी अधिकाऱ्यांसमोर तिनं जोरदार युक्तिवाद केला की, ती जन्मानंतर 25 दिवसांची असल्यापासून राजकोटमध्ये राहिलेली आहे, राजकोटमध्येच शिकलेली आहे आणि राजकोटमध्येच तिनं काम केलेलं आहे, आणि म्हणूनच ती भारताची नागरिक आहे.
डॉलीचा जन्म आफ्रिकेतील मोझांबिक देशात झाला होता. पण ती जेव्हा 25 दिवसांची होती तेव्हा ती आई-वडिलांसोबत भारतात आली होती. तेव्हापासून ती भारतातच होती.
अधिकाऱ्यांनी विविध कायद्यांचा हवाला देत डॉली वडालिया यांचं म्हणणं स्वीकारलं नाही. त्यामुळे त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. पण त्यांना न्यायालयाकडूनही कोणताही दिलासा मिळाला नाही.
या सगळ्यात लग्नाला तीन वर्षे उलटून गेली. कुटुंबातही या कारणावरून तणावाचं वातावरण होतं. एकीकडे, पत्नीला राजकोटमध्ये आणि पतीला कॅनडामध्ये, अशा जगाच्या दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये राहावं लागत होते. आता लग्नाला तीन वर्षे झाली असून ते दोघेही 26 वर्षांचे आहेत.
आता तिच्याकडे भारतीय पासपोर्ट आला असून लवकरच कॅनडाचा व्हिसा मिळेल अशी तिला आशा आहे. तिचा इथवरचा प्रवास देखील खडतर होता. या काळात नेमकं काय घडलं हे डॉलीने बीबीसी गुजरातीला सांगितले.
बराई कुटुंबानं रातोरात मोझांबिक देश का सोडला?
बीबीसीशी बोलताना डॉली वडालिया सांगतात की, त्यांचे वडील केतन बराई हे 1995 मध्ये आफ्रिकेच्या पूर्व भागातील मोझांबिक या देशात व्यवसाय करण्यासाठी गेले होते. त्यांचे काही कुटुंबीय आधीच तिथं स्थायिक झालं होतं.
डॉलीच्या वडिलांनी मोझांबिकमधील झाई-झाई या किनारपट्टीच्या शहरात एक किराणा दुकान उघडलं.
नंतर, त्यांची पत्नी आरती बराई यादेखील मोझाबिंकला गेल्या. तिथे फेब्रुवारी 2000 मध्ये या दांपत्याला एक मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी डॉली ठेवलं.

फोटो स्रोत, BIPIN TANKARIA
End of podcast promotion
आईवडिलांनी मोझांबिक सरकारकडून डॉलीचा जन्म दाखलाही मिळवला.
डॉली वडालिया सांगतात, "पण, माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी मोझांबिकमध्ये चक्रीवादळ आलं. त्यामुळे झाई-झाईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि भयंकर पूर आला. माझ्या आई-वडिलांनी उभारलेलं सर्व काही या चक्रीवादळानं उद्ध्वस्त केलं."
अठरा दिवसांनंतर आम्हाला पूरग्रस्त भागातून वाचवण्यात आलं. पुरात सर्वस्व गमावल्यामुळे माझ्या आई-वडिलांनी मला राजकोटला परत आणलं.
डॉलीच्या जन्मानंतर काही दिवसांतच झाई-झाईवर नैसर्गिक आपत्ती कोसळली आणि केतनभाई व आरतीबेन यांना मोझांबिक सरकार किंवा भारत सरकारकडून डॉलीसाठी पासपोर्ट मिळवता आला नाही.
कुटुंबाचं म्हणणं आहे की, त्यावेळी मोझांबिकमधील भारतीय वाणिज्य दूतावासानं जारी केलेल्या आपत्कालीन प्रमाणपत्राच्या आधारे त्या दांपत्याला त्यांच्या मुलीसह मोझांबिक सोडून भारतात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती.
त्या आपत्कालीन प्रमाणपत्राच्या आधारे, बराई दांपत्य 14 मार्च 2000 रोजी आपली नवजात कन्या डॉली हिच्यासह भारतात परतलं.
त्यानंतर, ते मोझांबिकला कधीच परतले नाहीत आणि राजकोटमध्ये स्थायिक झाले.
डॉली शाळेत कशी दाखल झाली?
राजकोटला परत आल्यानंतर आणि त्यांची मुलगी थोडी मोठी झाल्यावर, त्या दांपत्यानं डॉलीला राजकोट शहरातील शाळेत दाखल केलं.
डॉली म्हणते की, "मोझांबिक सरकारनं दिलेलं माझं जन्म प्रमाणपत्र पोर्तुगीज भाषेत होतं. त्या आधारावर मला शाळेत प्रवेश मिळाला आणि शाळेच्या सर्वसाधारण नोंदवहीमध्ये माझ्या नावाची नोंद झाली."
माझे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर, शाळेनं मला शाळा सोडल्याचा दाखला दिला.
त्यात माझा जन्म मोझांबिकमध्ये झाला होता अशीही नोंद होती. त्यामुळे, मला या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या रूपात जन्म नोंदणीचा आणखी एक पुरावा मिळाला.
डॉली सांगते की, तिच्या जन्म दाखल्याच्या आणि शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे तिला महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि तिनं विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर तिनं गृहविज्ञान (अन्न आणि पोषण) मध्ये पदव्युत्तर पदवीदेखील घेतली.
भारत सरकारनं तिला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड देखील जारी केलं.
डॉली सांगते की, तिचं आयुष्य इतर मुली आणि तरुणींप्रमाणे सामान्यपणे चाललं होतं. पण, जेव्हा डॉलीला लग्नानंतर सांगण्यात आलं की, ती जगातील कोणत्याही देशाची नागरिक नाही तेव्हा तिच्या आयुष्यात आनंदाऐवजी भूकंपच आला.
'मला देशच नव्हता'
डॉली सांगते की, आपण भारतीय नागरिक आहोत, या दृढ विश्वासासह ती लहानाची मोठी झाली.
तिचं लग्न जुलै 2023 मध्ये खिलन वडालियासोबत झालं. मूळचा राजकोटचा असलेला खिलन हा कॅनेडियन वर्क परमिटधारक असून देशातील कॅलगरी शहरात काम करतो. लग्नानंतर, कुटुंबानं डॉलीला तिच्या पतीसोबत राहण्यासाठी कॅनडाला पाठवण्याचा निर्णय घेतला.
कोणत्याही देशाची केवळ वैध पासपोर्ट असलेली व्यक्तीच व्हिसासाठी अर्ज करू शकते.
त्यामुळे, डॉलीनं सप्टेंबर 2023 मध्ये भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आणि अहमदाबादमधील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधला.
डॉलीचा भाऊ रोनक वडालिया बीबीसी गुजरातीला सांगतात की, "पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी डॉलीचं जन्म प्रमाणपत्र मागितलं. आम्ही मोझांबिक सरकारनं जारी केलेलं प्रमाणपत्र सादर केलं."
पण पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ते स्वीकारलं नाही आणि आमचा अर्ज अवैध ठरवला. त्यांनी आम्हाला सांगितलं की डॉलीला ती भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध करावं लागेल.
त्यामुळे, डॉलीनं मोझांबिकमधील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांकडून आपलं जन्म प्रमाणपत्र प्रमाणित करून घेतलं आणि ते प्रमाणपत्र तसेच आणखी काही अतिरिक्त कागदपत्रं जोडून मार्च 2025 मध्ये पुन्हा पासपोर्टसाठी अर्ज केला. मात्र, तरीही ती आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकलेली नाहीये, असं सांगून पासपोर्ट कार्यालयानं तो अर्जही फेटाळला.
राजकोटला परतल्यावर, डॉलीनं भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राजकोट जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला. "अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की, भारतीय नागरिक होण्यासाठी मला दुसऱ्या देशाचा पासपोर्ट सादर करावा लागेल आणि त्यानंतरच मला भारतीय नागरिकत्व मिळेल."
आम्ही दिल्लीतील मोझांबिक उच्चायुक्तालयाशी संपर्क साधला.
पण त्यांनी मला सांगितलं की, "मी मोझांबिक देशाची नागरिक नाही."
"तसेही, माझ्याकडे कधीच मोझांबिकचा पासपोर्ट नव्हता. मग, मी काय सादर करू? मला माझा देश नाही. मी अशी विस्थापित व्यक्ती ठरलेली आहे, जी कोणत्याही देशाची नागरिक नाहीये. माझा तणाव वाढला," असे विचार त्यावेळी माझ्या मनात आले असं डॉली सांगते.

फोटो स्रोत, BIPIN TANKARIA
उच्च न्यायालयात धाव घेऊनही दिलासा का नाही?
रोनक वडालिया सांगतात की, जेव्हा डॉली कागदोपत्री निर्वासित झाली, तेव्हा वडालिया आणि बराई कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला.
रोनक वडालिया सांगतात की, "आम्ही सर्वजण गोंधळलेल्या अवस्थेत होतो. आता काय करावं, कुणाला भेटावं आणि कोणत्या प्रमाणपत्रांसाठी कुणाकडे अर्ज करावा, याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. नियम असा आहे की, परदेशात राहणाऱ्या एखाद्या भारतीय महिलेनं तिथं मुलाला जन्म दिल्यास, जर त्या मुलाच्या जन्माची नोंदणी एका वर्षाच्या आत त्या देशातील भारतीय उच्चायुक्तालय किंवा वाणिज्य दूतावासात केली गेली, तर त्या मुलाला भारतीय नागरिकत्व मिळतं."
पण पुरात सर्वस्व गमावल्यानंतर डॉलीचे आई-वडील मोझांबिकला कधीच परत येऊ शकले नाहीत. त्या काळात दळणवळण इतकं सोपं नव्हतं. त्यामुळे, त्यांना दूतावासाला याबद्दल कळवण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता.
जर एखादा परदेशी नागरिक भारतात सलग सात वर्षे वास्तव्य करत असेल, तर भारतीय समाजात एकरूप होण्याच्या प्रक्रियेमुळे तो भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतो.
पण डॉलीसाठी हा मार्गही बंद होता. कारण, तिच्याकडे ती मोझांबिकची नागरिक आहे, याचाही पुरेसा स्पष्ट पुरावा नव्हता.
त्यामुळे, डॉलीनं जुलै 2025 मध्ये गुजरात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. त्यामध्ये तिनं पासपोर्ट कार्यालय आणि राजकोट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरं रद्द करून तिला भारतीय पासपोर्ट मंजूर करावा अशी मागणी केली.
उच्च न्यायालयानं एप्रिल 2026 मध्ये दिलेल्या आपल्या निकालात, डॉलीचा अर्ज फेटाळला आणि असं निरीक्षण नोंदवलं की, भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी तिला आपण भारतीय नागरिक असल्याचं सिद्ध करावे लागेल. जर अनपेक्षित परिस्थितीमुळे मोझांबिकमधील भारतीय वाणिज्य दूतावासात जन्माची नोंदणी होऊ शकली नाही, तर उशिरा नोंदणीसाठी अर्ज स्वीकारण्याचा अधिकार भारत सरकारच्या गृह मंत्रालयानं त्या देशासाठी नियुक्त केलेल्या प्रधान अधिकाऱ्याकडे आहे.

फोटो स्रोत, Parshottam Rupala/FB
दीर्घ संघर्ष अन् पासपोर्ट मिळाला
रोनक वडालिया सांगतात की, "भारतातील विविध सरकारी कार्यालयं आणि न्यायालयांकडून दिलासा न मिळाल्यानं, कुटुंबानं पोरबंदर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रमेश धाडुक आणि राजकोट लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार परसोत्तम रूपाला यांच्याकडे मदत मागितली."
"आम्ही त्यांच्याकडे गेलो. आमची समस्या समजावून सांगितली आणि त्यांचं मार्गदर्शन मागितलं. आम्ही माजी राज्यसभा खासदार रामभाई मोकारिया यांच्याशीही संपर्क साधला. या खासदारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते समजून घेतलं. त्यानंतर, रमेशभाई आणि परसोत्तमभाई यांनी आमच्यासाठी शिफारसपत्रं लिहिली आणि आम्हाला दिल्लीतील केंद्रीय गृह मंत्रालयात पाठवलं."
बीबीसी गुजरातीशी बोलताना, केंद्र सरकारमधील माजी मंत्री परसोतम रुपाला म्हणाले की, "ती मुलगी सध्या कोणत्याही देशाची नागरिक नाही. तिची समस्या रास्त वाटली. त्यामुळे, मी तिचा अर्ज केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला आणि तिला भारतीय नागरिकत्व देण्याची शिफारस केली."

फोटो स्रोत, Vadalia family
रोनक वडालिया सांगतात की, खासदारांच्या शिफारशीनंतर, दिल्लीतील अधिकाऱ्यांनी आम्हाला एक अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला. त्याद्वारे, जरी या प्रक्रियेला विलंब झाला असला तरीही, मोझांबिकमधील भारतीय वाणिज्य दूतावासाकडे डॉलीच्या जन्माची नोंदणी करण्याची विनंती करण्यात आली.
म्हणून, अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार डॉलीनं भारत सरकारकडे अर्ज केला. अखेरीस, विलंब झाला असूनही, परराष्ट्र मंत्रालयानं मोझांबिकमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला डॉलीच्या जन्माची नोंदणी करण्याचे आदेश दिले.

फोटो स्रोत, Vadalia family
रोनक वडालिया सांगतात की, "या आदेशांचं पालन करून, दूतावासानं विलंब माफ केला. डॉलीच्या जन्माची नोंदणी केली आणि आम्हाला एक प्रमाणपत्र दिलं. आम्ही ते प्रमाणपत्र पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर सादर केलं, त्यानंतर त्यांनी डॉलीचा पासपोर्ट अर्ज स्वीकारला."
मग, दिवाळीत सणासुदीच्या काळात, डॉलीला तिच्या फोनवर एक एसएमएस अलर्ट आला की तिचा पासपोर्ट अर्ज मंजूर झाला आहे.
डॉली म्हणते की, "मला एक मेसेज मिळाला की पोस्टमन 11 नोव्हेंबरला माझ्या घरी पासपोर्ट पोहोचवेल. 11 नोव्हेंबरला, मी सकाळपासूनच त्याची वाट पाहू लागले. पासपोर्ट खरंच येईल की नाही याबद्दल मी खूप तणावात होते. कारण, माझे अनेक प्रयत्न अयशस्वी झाले होते."
"अखेरीस, पोस्टमन आमच्या घरी आला आणि त्यानं माझ्या हातात एक पिवळे पाकीट दिले. त्यावर माझा पत्ता होता. जेव्हा मी ते उघडलं, तेव्हा त्यात चक्क माझ्या नावाचा भारतीय पासपोर्ट होता. तो खरोखर माझाच पासपोर्ट आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता."
"त्या पासपोर्टमुळे मी एक देश नसलेली व्यक्ती राहिले नव्हते तर भारतीय नागरिक बनले."
डॉली म्हणते की, तिला कॅनडामध्ये तिच्या पतीकडे जाण्याची तीव्र इच्छा आहे.
ती म्हणते की, "आता पासपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे, आम्ही कॅनेडियन व्हिसा काढण्याची तयारी करत आहोत. आशा आहे की, मी लवकरच माझ्या पतीसोबत राहण्यासाठी कॅनडाला जाऊ शकेन."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)




























