जगभरात घरांचं संकट; स्वतःचं घर सोडाच, भाड्यानं राहण्यासाठीही जागा मिळेना

इमारत
    • Author, लिओनी रॉबर्टसन, कार्ला रोश आणि सारा कूप
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 11 मिनिटे

नायजेरियातील लागोस शहरात जोशुआ आइक एगेसी भाड्याच्या घरात राहत होते. एक दिवस ते घर पाडण्यात येणार असल्याची त्यावर खूण करण्यात आली.

33 वर्षीय जोश एक कलाकार आणि डिझायनर आहेत. त्यांनी त्याच शहरात दुसरं भाड्याचं घर शोधायला सुरुवात केली. पण ते राहत असलेल्या अजा भागात घरांचं भाडं झपाट्याने वाढत होतं. त्याचबरोबर घर शोधणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने घर मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होती.

त्यांना परवडेल अशा भाड्यात दुसरी जागा मिळाली नाही.

अखेर जोश यांनी लागोस राज्यातील तारक्वा बे या बेटावर स्वतःचं घर आणि कामासाठी स्टुडिओ बांधण्याचा निर्णय घेतला. या बेटावर जाण्यासाठी केवळ बोटीचाच वापर करावा लागतो.

आयुष्यभर लागोस शहरात राहिलेले जोश सांगतात, "इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी पैशांत मला जास्त चांगली आणि मोठी जागा मिळाली. लागोसच्या तुलनेनं इथं खर्चही खूप कमी आहे."

घर मिळवण्याच्या या अडचणीचा सामना करणारे जोश एकटेच नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या यूएन-हॅबिटॅट या संस्थेनं एका ताज्या अहवालात याचं वर्णन 'जगभरातील घरांचं संकट' असं केलं आहे.

राहण्याचा खर्च वाढत आहे आणि घरं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे अनेक देशांमध्ये तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. स्पेनमध्ये तर घरांच्या या प्रश्नामुळे 29 नोव्हेंबरला मुदतीपूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ आली.

छोट्या खोलीसाठीही पाचपट जास्त भाडं

लागोस शहरात जोश तीन बेडरूमच्या फ्लॅटसाठी वर्षाला 8 लाख नायरा म्हणजेच सुमारे 55 हजार भारतीय रुपये भाडं देत होते.

परंतु, जेव्हा त्यांनी दुसरं घर शोधायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना समजलं की एजंटची फी आणि इतर खर्च मिळून एका खोलीच्या स्टुडिओ फ्लॅटसाठी जवळपास 40 लाख नायरा (सुमारे 2 लाख 75 रुपये) मोजावे लागतील.

अखेर गेल्या वर्षी त्यांना परवडेल अशी एक जागा 5 वर्षांच्या कराराने भाड्याने मिळाली.

जोश यांचं नवीन घर एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर चर्च आहे.

ते सध्या ही जागा राहण्यायोग्य बनवत आहेत. त्यासाठी ते आधी वापरलेल्या बांधकाम साहित्याचा वापर करत आहेत. हे साहित्य त्यांना बोटीने तिथे आणावं लागतं.

या जागेच्या एका कोपऱ्यात त्यांनी तंबू उभारला आहे. त्यातच ते झोपतात. घरात नळाद्वारे पाणी येत नाही. विजेसाठी ते जनरेटरचा वापर करतात.

जोश आपल्या घरात उभे आहेत. त्यांच्या मागे त्यांचा तंबू दिसत आहे. याच तंबूत ते झोपतात.
फोटो कॅप्शन, जोश आपल्या घरात उभे आहेत. त्यांच्या मागे त्यांचा तंबू दिसत आहे. याच तंबूत ते झोपतात.

छताचं काम पूर्ण करणे, वरच्या मजल्यावर आणखी एक खोली बांधणे, सोलर पॅनेल बसवणे आणि वापरता येईल असं बाथरूम व शौचालय तयार करणे, असं त्यांचं नियोजन आहे.

पण इथं घर बांधणं सोपं नाही.

जोश सांगतात, "पावसामुळे प्रचंड अडचणी येतात. पावसात माझं काही बांधकाम साहित्य खराब झालं आहे. समुद्राकडून येणाऱ्या खाऱ्या पाण्याचाही माझ्या साहित्यावर आणि अवजारांवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना गंज लागत आहे."

"पावसाळ्यात या ठिकाणी खूप डास झाले होते."

उन्हाचाही त्यांना त्रास होतो.

ते सांगतात, "माझ्या घराचं छत अजून पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे उन्हात माझी त्वचा भाजते."

जोश यांना वाटतं की, पुढील 2 ते 3 वर्षांत आणखी लोक लागोस सोडून आसपासच्या भागांत राहायला जातील.

ते सांगतात, "लोक कोणत्याही जागेसाठी मनाला येईल त्या किमती सांगतात. कारण त्यांना माहीत आहे की, लोकांना राहण्यासाठी जागा हवी आहे आणि ते त्यासाठी धडपडत आहेत, त्रस्त आहेत."

आता शहरात राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, असं अहवालानुसार समोर आलं आहे.
फोटो कॅप्शन, आता शहरात राहायला येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे, असं अहवालानुसार समोर आलं आहे.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हाउसिंग फायनान्स आफ्रिका या संस्थेच्या आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत लागोस राज्यातील लेक्की आणि इकेजा या भागांमध्ये घरांचं भाडं 200 टक्क्यांहून अधिक वाढलं आहे.

लागोस राज्याचे उप-गव्हर्नर डॉ. कादरी ओबाफेमी हमझत यांनी नुकताच तरुणांना काही सल्ले दिले होते. त्यांनी तरुणांनी आई-वडिलांसोबत किंवा नातेवाइकांसोबत राहावं, इतरांसोबत मिळून घर भाड्याने घ्यावं किंवा आपल्या कमाईच्या 40 टक्क्यांपेक्षा जास्त पैसे घरभाड्यावर खर्च करू नयेत, असं आवाहन केलं होतं.

या सल्ल्यावर प्रतिक्रिया देताना युवा हक्कांसाठी काम करणारे कार्यकर्ते अदरामोये मायकेल लेनिन म्हणाले, "आज अनेक तरुण आधीपासूनच अशाच प्रकारे राहत आहेत."

लेनिन हे यूथ राइट्स कॅम्पेनचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. ही संघटना घरांच्या प्रश्नासह तरुणांशी संबंधित विविध मुद्द्यांवर काम करते.

त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "नायजेरियात घरांच्या प्रश्नाकडे अनेक वर्षं दुर्लक्ष करण्यात आलं. त्याचाच हा परिणाम आहे."

"या संकटावर मात करण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. सरकारने लोकांसाठी घरं बांधावीत आणि ती परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून द्यावीत," असं त्यांनी म्हटलं.

नायजेरिया सरकारच्या म्हणण्यानुसार, लोकांना घरं उपलब्ध करून देणं ही त्यांची प्राथमिकता आहे.

लागोसहून बीबीसीचे माकुओची ओकाफोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने मागील आठवड्यात लोकांना मालमत्ता गुंतवणूक निधीशी जोडण्यासाठी काही उपाय जाहीर केले. यामुळे नायजेरियातील लोकांना घर खरेदी करणं सोपं होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.

सरकारने असंही सांगितलं आहे की, देशात कमी किमतीत आणि मोठ्या संख्येनं घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

घरांसाठी लोक रस्त्यावर उतरले

जोश यांची कहाणी केवळ लागोसपुरती मर्यादित नाही.

श्रीमंत असो किंवा कमी उत्पन्न असलेले देश, दोन्हीकडे लोकांना राहण्यासाठी घर शोधणं कठीण जात आहे.

अलीकडेच युरोपमधील अनेक देशांमध्ये घरांच्या प्रश्नावर आंदोलनं झाली. घर मिळण्याच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संघटना आणि कामगार संघटना घरभाड्यावर नियंत्रण ठेवण्याची आणि प्रत्येकाला घर मिळण्याची हमी देण्याची मागणी करत आहेत.

फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम, स्पेन, इटली, पोर्तुगाल आणि ग्रीस येथील कार्यकर्ते, संघटना आणि कामगार संघटनांनी 20 ते 22 नोव्हेंबरदरम्यान आंदोलनं केली. यातील काही मागण्या थेट घरांच्या प्रश्नाशी संबंधित होत्या.

स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये 87 वर्षीय मारिकारमेन अबास्कल यांना सप्टेंबरमध्ये घरातून बाहेर काढण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण स्पेनमध्ये आंदोलनं झाली आणि राजकीय वादही निर्माण झाला.

अबास्कल त्या घरात 70 हून अधिक वर्षांपासून राहत होत्या.

त्यांच्या वडिलांनी 1956 मध्ये माद्रिदच्या मध्यवर्ती भागातील रेटिरो परिसरात तो फ्लॅट भाड्याने घेतला होता. आई-वडिलांच्या निधनानंतरही अबास्कल त्याच घरात भाडेकरू म्हणून राहत होत्या. त्यावेळी भाडेवाढीवर मर्यादा होती.

भाडं वाढल्यानंतर सप्टेंबरमध्ये मारिकारमेन अबास्कल यांना माद्रिदमधील त्यांच्या फ्लॅटमधून काढण्यात आलं होतं.
फोटो कॅप्शन, भाडं वाढल्यानंतर सप्टेंबरमध्ये मारिकारमेन अबास्कल यांना माद्रिदमधील त्यांच्या फ्लॅटमधून काढण्यात आलं होतं.

2018 मध्ये आर्बाजेस्टियन नावाच्या एका छोट्या गुंतवणूक कंपनीने हा फ्लॅट खरेदी केला.

यानंतर कंपनीने फ्लॅटचं मासिक भाडं 500 युरोवरून वाढवून थेट 2650 युरो केलं. म्हणजेच भारतीय रुपयांत मासिक भाडं सुमारे 50 हजारावरून थेट 2 लाख 70 हजार इतकं केलं.

नंतर कंपनीने भाडं कमी करून 1650 युरो (सुमारे 1 लाख 68 हजार रुपये) करण्याची तयारी दर्शवली. पण तरीही हे भाडं अबास्कल यांना दरमहा मिळणाऱ्या पेन्शनपेक्षा 300 युरोंनी (सुमारे 30 हजार 500 रुपये) जास्त होतं.

याच दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यामुळे त्यांना या करारावर सही करता आली नाही.

7 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं. काही आंदोलकांचं म्हणणं होतं की, घरातून बाहेर काढल्यामुळे त्यांचा अकाली मृत्यू झाला.

प्रॉपर्टीची माहिती देणाऱ्या आयडियलिस्टा या वेबसाइटनुसार, गेल्या 10 वर्षांत माद्रिदमधील घरांचं भाडं दुपटीपेक्षा जास्त वाढलं आहे.

स्पेनच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, माद्रिदमध्ये 2024 मध्ये नवीन भाडेकरारांनुसार घरभाड्यात 9.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ 2023 मधील वाढीच्या दुपटीपेक्षाही जास्त होती.

युरोपीय संघाच्या परिषदेनुसार, मागील 10 वर्षांत युरोपीय संघातील घरांच्या किमती सरासरी 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दर 10 पैकी एका व्यक्तीला घरभाडं किंवा गृहकर्जाचा हप्ता वेळेवर भरता येत नाही.

हे आकडे पाहता ही समस्या अनेक ठिकाणी गंभीर असल्याचं दिसून येतं.

दिल्लीतील घरभाडं 20 हजारांवरून 40 हजारांवर

भारतातही अनेक तरुणांना आपल्या उत्पन्नातून घराचा खर्च भागवणं कठीण जात आहे.

प्रियांका दिल्लीमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. त्या सांगतात की, दिल्लीत घर खरेदी करणं त्यांच्या बजेटच्या बाहेर गेलं आहे. त्यामुळे त्या भाड्याच्या घरात राहतात. पण घरभाडंही सातत्याने वाढत चाललं आहे.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "उदाहरणार्थ, दोन बेडरूम असलेल्या ज्या घराचं भाडं आधी 20 हजार रुपये होतं, त्याच घरासाठी आता साधारण 35 ते 40 हजार रुपये भाडं द्यावं लागत आहे."

त्यांच्या मते, मागील काही वर्षांत घरांच्या किमती 'दुप्पट' झाल्या आहेत.

"विशेषतः कोविडनंतर अनेक लोक मोठ्या शहरांमध्ये राहायला येत असल्याचं मी पाहिलं आहे," असं त्या म्हणतात.

भारतातही अनेक तरुणांना आपल्या कमाईतून घराचा खर्च भागवणं कठीण जात आहे.
फोटो कॅप्शन, भारतातही अनेक तरुणांना आपल्या कमाईतून घराचा खर्च भागवणं कठीण जात आहे.

जगभरात घरांची टंचाई का निर्माण झाली आहे?

यूएन-हॅबिटॅटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'वर्ल्ड सिटीज रिपोर्ट 2026' नुसार, जगभरात 110 कोटींहून अधिक लोक झोपडपट्ट्यांमध्ये किंवा वस्त्यांमध्ये राहतात. म्हणजेच जगातील दर आठव्या व्यक्तीला अशा वस्त्यांमध्ये राहावं लागतं.

किमान 340 कोटी लोक अशा घरांमध्ये राहतात, जी राहण्यासाठी योग्य नाहीत.

या अहवालाच्या लेखकांपैकी एक असलेल्या डॉ. परोज बॅनर्जी सांगतात, "घरांचा प्रश्न पूर्वीपासूनच आहे. परंतु, आता जगभरात परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे."

या अहवालानुसार, या संकटामागे कोणतेही एकच कारण नाही. घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि सामान्य लोकांना त्या परवडेनाशा झाल्या आहेत. अनेकांना आपली घरं सोडावी लागत आहेत. झोपडपट्ट्यांची वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारे धोके, या सगळ्यांचाही घरांच्या संकटाशी संबंध आहे.

जगभरात एक साधं घर खरेदी करण्यासाठी आता माणसाला सरासरी 11 वर्षांचं आपलं उत्पन्न खर्च करावं लागतं.

छळ, संघर्ष, हिंसाचार आणि नैसर्गिक आपत्तींमुळे घर सोडून जाणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे.

अनेक विकसनशील भागांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

शहरांमध्ये राहायला येणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापैकी काही जण झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.
फोटो कॅप्शन, शहरांमध्ये राहायला येणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापैकी काही जण झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

यूएन-हॅबिटॅटच्या अहवालानुसार, जगभरात लोकसंख्येच्या तुलनेत घरांची संख्या जास्त वेगाने वाढली आहे. परंतु, ही वाढ सर्वच ठिकाणी सारख्या प्रमाणात झालेली नाही.

जगातील अनेक भागांमध्ये गरजेइतकी नवीन घरं बांधली गेली नाहीत.

कुटुंबांचा आकार लहान होत आहे आणि एकटं राहणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे घरांची मागणी वाढली आहे. याशिवाय, अनेक घरं रिकामी आहेत किंवा त्यांचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळेही घरांचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या 'वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट्स 2025' या अहवालानुसार, जगातील 820 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के लोक शहरांमध्ये राहतात.

2050 पर्यंत जगातील लोकसंख्येत होणाऱ्या एकूण वाढीपैकी दोन-तृतीयांश वाढ शहरांमध्ये होईल, असा अंदाज आहे. उरलेल्या एक-तृतीयांश वाढीपैकी बहुतांश वाढ लहान शहरांमध्ये आणि गावांमध्ये होईल.

लोकांना सहसा कामाच्या ठिकाणाजवळ राहायला आवडतं. त्यामुळे शहरांमध्ये घरांची मागणी वाढते आणि जमिनीचे भावही वाढू शकतात.

घर गुंतवणुकीचं साधन कसं बनलं?

यूएन-हॅबिटॅटच्या 2026 च्या अहवालानुसार, श्रीमंत देशांमध्ये 1950 च्या दशकापासून घरांच्या किमतीत झालेल्या वाढीपैकी 80 टक्के वाढ जमिनीचे भाव वाढल्यामुळे झाली असण्याची शक्यता आहे.

या अहवालानुसार, आफ्रिकेतील शहरांमध्येही इतर वस्तू आणि सेवांच्या किमतींच्या तुलनेमध्ये जमिनीचे भाव अधिक वेगाने वाढले आहेत.

जमिनीच्या वाढत्या किमती गुंतवणूकदारांना आकर्षित करतात.

डॉ. बॅनर्जी सांगतात, "जमीन आता नफा कमावण्यासाठी महत्त्वाची संपत्ती बनत चालली आहे."

त्या सांगतात, "सामान्य लोकांना घर परवडेनासं होणं हा या समस्येचा एक भाग आहे. घर ही प्रत्येकाची गरज आहे, हा विचार आता मागे पडत आहे. घरांकडे राहण्याची जागा म्हणून पाहण्याऐवजी, नफा मिळवण्यासाठी खरेदी-विक्री करण्याची वस्तू म्हणून पाहिलं जात आहे."

यूएन-हॅबिटॅटच्या अहवालानुसार, 1980 नंतर बँकांचे नियम शिथिल झाले आणि गुंतवणुकीवरील बंधनं कमी झाली. त्यामुळे घरांकडेही गुंतवणुकीतून पैसे मिळवून देणारी मालमत्ता म्हणून पाहिलं जाऊ लागलं.

सरकारांनीही कमी किमतीची घरं बांधण्याकडे दुर्लक्ष केलं. त्याऐवजी लोकांना घर खरेदी करण्यासाठी अधिकाधिक गृहकर्ज कसं उपलब्ध करून देता येईल, यावर त्यांनी भर दिला.

जागतिक गृहनिर्माण सल्लागार डॉ. ऑर्ना रोझेनफेल्ड यांनी बीबीसीला सांगितलं, "सरकारांनी असं गृहीत धरलं की, बाजारपेठेतून लोकांना घरं मिळतील. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठेत घरं त्यांनाच मिळतात, जे सर्वाधिक किंमत मोजू शकतात."

काही देशांमध्ये मोठ्या गुंतवणूक कंपन्यांकडे मोठ्या संख्येने घरं आहेत.

या गुंतवणूकदारांमध्ये पेन्शन फंडांचाही समावेश असू शकतो. या संस्थांचा उद्देश गुंतवणूकदारांसाठी नफा कमावणं हा असतो. परंतु, त्यांच्या गुंतवणुकीमुळे घरभाडंही वाढू शकतं.

या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. रोजगाराच्या शोधात अधिकाधिक लोक शहरांमध्ये येतात. त्यामुळे जमिनीची उपलब्धता कमी होते आणि तिचे भाव गगनाला भिडतात. त्यानंतर गुंतवणूकदारही अशा ठिकाणी पैसे गुंतवू लागतात. यामुळे घरभाडं वाढू शकतं आणि श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी आणखी वाढू शकते.

घरांचं हे संकट कसं दूर करता येईल?

डॉ. रोझेनफेल्ड यांचं म्हणणं आहे की, अनेक देशांना केंद्र सरकार आणि शहरांमधील संबंधांचा नव्याने विचार करावा लागेल.

त्या सांगतात की, केवळ चर्चा किंवा सल्लामसलत करून हा प्रश्न सुटणार नाही. घरं बांधण्याचा अधिकार, त्यासाठी लागणारा पैसा आणि इतर आवश्यक साधनं कोणाकडे असतील, हेही ठरवावं लागेल.

त्यांच्या मते, अधिक घरं बांधण्याची जबाबदारी स्थानिक सरकारांनी घ्यायला हवी.

झुरिच हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे, तरीही तिथल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील भाडे हे स्वित्झर्लंडमधील सरासरी भाड्यापेक्षा कमी आहे.
फोटो कॅप्शन, झुरिच हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे, तरीही तिथल्या गृहनिर्माण सहकारी संस्थांमधील भाडे हे स्वित्झर्लंडमधील सरासरी भाड्यापेक्षा कमी आहे.

खासगी क्षेत्रात कमी किमतीचं बांधकाम साहित्य आणि कारखान्यात आधीच तयार केलेल्या (प्रीफॅब्रिकेटेड) घरांच्या भागांवर काम सुरू आहे. याचा उद्देश घरे बांधण्याचा खर्च कमी करणे हा आहे.

थ्री-डी प्रिंटिंगच्या मदतीने घरं बांधण्याची पद्धतही आता वापरली जात आहे. यामुळे घर बांधण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी होतो आणि खर्चही कमी होऊ शकतो.

परंतु, सरकारी आणि खासगी घरांव्यतिरिक्त आणखी एक पर्याय आहे. त्याला हाउसिंग को-ऑपरेटिव्ह म्हणजेच सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणतात.

एकत्र येऊन बांधलेली आणि सांभाळलेली घरं

हाउसिंग को-ऑपरेटिव्हमध्ये लोकांचा एक गट एकत्र येऊन घरांची रचना ठरवतो, घरं बांधतो आणि त्यांची मालकीही एकत्र घेतो. त्यानंतर हे सर्वजण त्या घरांमध्ये राहतात.

घर बांधण्याचा खर्च, त्यांची देखभाल आणि घरांशी संबंधित निर्णयही सर्व सदस्य मिळून घेतात.

या सहकारी संस्थांचा जास्त नफा कमावण्याचा उद्देश नसतो. त्यामुळे त्या आपल्या सदस्यांना दीर्घकाळ कमी खर्चात सुरक्षित घरं उपलब्ध करून देऊ शकतात.

स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, सहकारी संस्थांमधील घरांचं भाडं देशातील इतर घरांच्या सरासरी भाड्यापेक्षा साधारण 20 टक्के कमी आहे.

हाउसिंग को-ऑपरेटिव्हची माहिती गोळा करणाऱ्या स्विस को-हाउसिंग या संस्थेनुसार, 2015 ते 2025 या काळात झुरिचमधील घरांचं सरासरी भाडं 25 ते 35 टक्क्यांनी वाढलं.

परंतु, याच काळात सहकारी संस्थांमधील घरांचं भाडं केवळ 5 ते 8 टक्क्यांनी वाढलं.

झुरिच हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. तरीही, तिथल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील घरांचं भाडं स्वित्झर्लंडमधील घरांच्या सरासरी भाड्यापेक्षा कमी आहे.

उरुग्वेमधील घरांचं वेगळं मॉडेल

उरुग्वेमध्ये 1960 च्या दशकापासून सहकारी गृहनिर्माण संस्था सुरू झाल्या. तेव्हापासून त्यांची संख्या वाढत आहे. देशातील 5 टक्के कुटुंबं अशा घरांमध्ये राहतात.

स्वित्झर्लंडमधील ईटीएच झुरिच विद्यापीठात परवडणाऱ्या घरांच्या विषयावर अभ्यास करणाऱ्या डॉ. जेनिफर डूने बॅरेनस्टीन यांनी बीबीसीला सांगितलं, "ही एक अत्यंत सक्रिय आणि महत्त्वाची सामाजिक चळवळ आहे."

त्या म्हणतात, "या सहकारी संस्थांमधील घरं ही बाजारात विकून नफा कमावण्यासाठी बांधलेली नसतात. हीच त्यांची खासियत आहे."

घरांच्या किमती वाढतील आणि त्यातून नफा मिळेल, या अपेक्षेवर चालणाऱ्या बाजारपेठेतील मॉडेलपेक्षा हे वेगळं आहे. या पद्धतीत नफा कमावण्याचा उद्देश नसतो. त्यामुळे या घरांचं भाडं काळानुसार फारसं वाढत नाही, स्थिर राहतं.

त्या म्हणतात, "या घरांची किंमत किती आहे, यापेक्षा ती राहण्यासाठी किती उपयोगी आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे."

उरुग्वेची राजधानी मॉन्टेव्हिडिओ येथे 1972 मध्ये कापड कामगारांच्या संघटनेनं ही सहकारी गृहनिर्माण संस्था सुरू केली. या संस्थेमध्ये एकाच वेळी बांधलेली 30 छोटी घरं आहेत.
फोटो कॅप्शन, उरुग्वेची राजधानी मॉन्टेव्हिडिओ येथे 1972 मध्ये कापड कामगारांच्या संघटनेनं ही सहकारी गृहनिर्माण संस्था सुरू केली. या संस्थेमध्ये एकाच वेळी बांधलेली 30 छोटी घरं आहेत.

परंतु, अशा सहकारी गृहनिर्माण संस्था उभारणं सोपं नसतं.

या संस्थेमधील सदस्यांना स्वतः एकत्र येऊन निधीची व्यवस्था करावी लागते आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे अशा संस्था उभारण्यासाठी बराच वेळ लागतो.

यासाठी लोकांनी एकमेकांना सहकार्य करणं आणि त्यांना तांत्रिक माहिती असणं गरजेचं आहे. या संस्थांची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे अनेकवेळा कायदेशीर सल्ला घ्यावा लागतो. तसेच, वाद झाल्यास ते सोडवण्यासाठीही मदत घ्यावी लागते.

डॉ. बॅरेनस्टीन म्हणतात, "सहकारी गृहनिर्माण संस्था उभ्या राहण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती आणि त्यांना काम करण्यासाठी आवश्यक साधनं मिळणं गरजेचं असतं."

त्यांच्या मते, सरकारने या संस्थांना पैसे आणि जमीन मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. तसेच, या संस्थांना नफा कमावण्यासाठी घरांची खरेदी-विक्री करता येणार नाही, असे नियमही केले पाहिजेत.

त्या म्हणतात, "ही पद्धत स्वीकारणारे आणि ती राबवण्यासाठी प्रयत्न करणारा समाजही तयार होणं गरजेचं आहे."

उरुग्वेची राजधानी मॉन्टेव्हिडिओमध्ये 1972 मध्ये कापड कामगारांच्या संघटनेने अशीच एक सहकारी गृहनिर्माण संस्था उभारली होती. या संस्थेने एकाच वेळी 30 छोटी घरं बांधली आहेत.

खासगी कंपन्या अधिक घरं बांधू शकतात का?

काही अर्थतज्ज्ञांच्या मते, खासगी कंपन्याही लोकांसाठी चांगल्या प्रकारे घरं बांधू शकतात. परंतु, त्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल, त्यांच्यावरील बंधनं कमी करावी लागतील आणि त्यांच्यावर पडणारा खर्चाचा भार कमी करावा लागेल.

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्रा. एडवर्ड ग्लेझर यांनी प्रा. जोसेफ ग्युर्को यांच्यासोबत 2018 मध्ये एक संशोधन केलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं, "अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये घरं बांधण्याबाबत खूप नियम आणि बंधनं असतील, तर तिथल्या घरांच्या किमती वाढतात."

मात्र, लागोसमध्ये स्वतःचं घर बांधणारे जोश या समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात.

ते म्हणतात, "मागितलेली किंमत देऊन घर खरेदी करायला कोणीतरी नेहमीच तयार असतं. त्यामुळे ही अशी समस्या आहे, जी आपण नागरिक एकट्याने सोडवू शकत नाही."

"घराची किंमत योग्य असली पाहिजे. ती ठरवताना घराचं ठिकाण आणि आजूबाजूचा परिसर यांचाही विचार केला पाहिजे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)