वाढवण, गडचिरोली, तारळी प्रकल्पांमुळे चर्चेत आलेलं पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) काय असतं?

वाढवण, गडचिरोली, तारळी प्रकल्पांमुळे चर्चेत आलेलं पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) म्हणजे काय असतं?
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

वाढवणपासून गडचिरोलीपर्यंत आणि कर्जतपासून तारळीपर्यंत... सध्या अनेक प्रकल्पांची चर्चा ऐकायला मिळत आहे.

या प्रकल्पांविषयी बोलताना एका गोष्टीचा उल्लेख वारंवार केला जातो. तो म्हणजे EIA अर्थात Environmental Impact Assessment. त्याला पर्यावरणीय आघात आढावा किंवा पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन म्हणतात.

एखाद्या प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास करून केलेली ही मांडणी असते.

UNEP या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संस्थेच्या मते एखाद्या प्रस्तावित प्रकल्पाचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असतील हे शोधण्यासाठी EIA हे एक महत्त्वाचं टूल आहे.

EIA च्या आधारे एखादा प्रकल्प एखाद्या विशिष्ठ जागी उभारणं योग्य आहे की नाही हे ठरवता येतं तसंच प्रकल्पाचे परिणाम आणि धोके आधीच लक्षात आल्यानं त्यावर उपाययोजना करता येतात. त्यातून पर्यावरणाची हानी टाळता येते.

परवानगी घेणे बंधनकारक

जैवविविधता, हवा, पाणी आणि जमिनीचं नुकसान टाळणे, आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधणे, कमी हानिकारक तंत्रज्ञान किंवा पर्यायी जागांचा विचार करणे ही EIA ची उद्दिष्टं असतात.

भारतात पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत कोणत्याही प्रस्तावित विकास प्रकल्पाचं काम सुरू करण्याआधी पर्यावरणीय परवानगी घेणं बंधनकारक आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ही परवानगी देतं आणि ती द्यायची की नाही, हे तज्ज्ञांची एक समिती म्हणजे एक्सपर्ट अप्रायझल कमिटी ठरवते आणि हे ठरवताना EIA ची भूमिका महत्त्वाची ठरते.

2006 सालच्या EIA अधिसूचनेनुसार विशेषतः खाणकाम, औष्णिक विद्युत केंद्र, धरणे किंवा नदीच्या पात्रातील प्रकल्प, मोठे उद्योग तसंच रस्ते, महमार्ग, पूल, बंदर, विमानतळ अशा पायाभूत सुविधा उभारताना मंजुरी घेण्यापूर्वी EIA करणे आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

तर लहान इमारती आणि बांधकामं, मध्यम उद्योग, छोट्या खाणी यांच्यासाठी राज्यस्तरीय मंजुरी लागते.

या प्रकल्पांसाठी EIA आवश्यक आहे की नाही हे प्रकल्पाचं स्वरुप, आकार आणि क्षमतेनुसार राज्यस्तरीय समिती ठरवते.

EIA आणि पर्यावरण मंजुरीच्या प्रक्रियेतील टप्पे

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

१.⁠ ⁠छाननी (screening) - EIA करताना प्रस्तावित प्रकल्पाचं स्वरूप आकार आणि क्षमतेनुसार राज्य सरकार EIA करणं आवश्यक आहे की नाही, याविषयी निर्णय घेऊ शकते.

२.⁠ ⁠व्याप्ती (Scoping) – प्रकल्पाचे कुठले परिणाम तपासायचे आणि कुठवर हे निश्चित करणे. यालाच Terms of Reference – ToR म्हणजे 'संदर्भाच्या अटी ' निश्चित करणे असंही म्हणतात.

३.⁠ ⁠मूळ माहिती संकलन (Baseline Data collection) – प्रकल्प प्रस्तावित आहे, त्या परिसरातील हवा, पाणी, माती, जैवविविधता, ध्वनीची पातळी अशा गोष्टींची माहिती गोळा करणे.

ही माहिती काही महिन्यांमध्ये जमा केली जाते. तसंच त्या परिसरातल्या आधीच्या काही वर्षांत जमा केलेल्या माहितीचाही यासाठी आधार घेतला जातो.

४.⁠ ⁠प्रभावांचा अंदाज (impact prediction) – प्रकल्पाचे पर्यावरणावर नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम काय असतील याचा शास्त्रीय अंदाज मांडणे

५.⁠ ⁠निवारण आणि पर्यावरणीय व्यवस्थापन आराखडा (Mitigation and EMP) – प्रकल्पाचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय उपाय करायचे याचा आराखडा म्हणजेच Environmental Management Plan तयार करणे

६.⁠ ⁠जनसुनावणी (Public Hearing) - ड्राफ्ट EIA लोकांसमोर मांडणे, प्रकल्पबाधित तसंच स्थानिक नागरीक, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञांच्या हरकती आणि सूचना नोंदवणे

७.⁠ ⁠निर्णय प्रक्रिया (Decision) - तयार EIA आणि जनसुनावणीतील हरकतींची तपासणी करून Expert Appraisal Committee म्हणजे तज्ज्ञांची समिती Environmental Clearance म्हणजे पर्यावरणीय मंजुरी द्यायची की नाही याविषयी अंतिम निर्णय घेते. अनेकदा मंजुरी देताना काही अटी घातल्या जातात.

८.⁠ ⁠देखरेख आणि अनुपालन (Monitoring and Compliance) – प्रकल्पाला मंजुरी मिळाली आणि काम सुरू झाले, तरी अटी आणि शर्तींचं पालन होत आहे की नाही याची नियमित तपासणी केली जाते.

पर्यावरण मंजुरी देताना EIA आणि ती मंजुरी किती काळासाठी वैध आहे, हेही नमूद केलं जातं.

या संदर्भातील तक्रारींचं निराकरण करण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनल म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागता येते.

वाढवण, गडचिरोली, तारळी प्रकल्पांमुळे चर्चेत आलेलं पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (EIA) म्हणजे काय असतं?

पर्यावरण मंजुरी मिळाली नाही, तर प्रकल्प रद्द होऊ शकतो, किंवा प्रकल्पाची जागा आणि आराखड्यात बदल करावे लागतात. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडतो, ही गोष्ट विकासकांसाठी अडथळा ठरते.

त्यामुळे गेल्या तीस वर्षांत काही वेळा हे नियम शिथील करण्याचे प्रयत्नही झाले आहेत.

अलीकडेच प्रकल्पांना मंजुरी मिळण्यातले अडथळे दूर व्हावेत म्हणून केंद्र सरकारनं 2020 साली EIA अधिसूचनेत बदल केले होते.

त्यानुसार काही महत्त्वाच्या प्रकल्पांना पोस्ट फॅक्टो क्लिअरन्स म्हणजे काम सुरू झाल्यानंतर पर्यावरण मंजुरीसाठी अर्ज करण्याची मुभा दिली होती. असा प्रकल्प नुकसानदायक असेल तर दंड भरून काम करण्याची तरतूद ठेवली होती.

मात्र पर्यावरणतज्ज्ञांनी त्याला विरोध केला. वनशक्ती या संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात अपील केलं होतं. त्यावर अंतीम निर्णय देताना जुलै 2026 मध्ये, सर्वोच्च न्यायालयानं सर्व नव्या प्रकल्पांना काम सुरू करण्याआधी पर्यावरणीय मंजुरी आणि EIA बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलं होतं.

मात्र ज्या प्रकल्पांची कामं मंजुरीआधीच सुरू झाली आहेत अशांना ती सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.

EIA आणि पर्यावरणीय मंजुरी ही केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नाही. तर एखाद्या प्रकल्पाच्या बऱ्यावाईट परिणामांचा विचार करण्याची ती संधी असते.

त्यामुळेच या नियमांचं पालन काटेकोरपणे होतंय की नाही, हे पाहात राहायला हवं, असं पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)