You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांचे भाऊ संभाजीराजे, अंगरक्षक जीवा महालेंबद्दल ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
- Author, केतन पुरी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
अभिनेता रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला आणि प्रमुख भूमिका साकारलेला राजा शिवाजी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाला आहे.
या चित्रपटात अफझलाखानाच्या स्वारीचा विषय हाताळला असला, तरी सिनेमा त्यापलिकडे जाऊन इतिहासात घडून गेलेल्या अनेक महत्वाच्या पण तितक्याच अल्पपरिचित असणाऱ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या अनेक घटना, ज्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यायाने दख्खनच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले, काही ऐतिहासिक व्यक्ती ज्यांनी इतिहासात आपले अमूल्य योगदान दिले, या सर्वांचेही चित्रण यात केले आहे.
दख्खनमध्ये एक शाही ज्या एका तहामुळे संपली, त्या माहुलीच्या तहाचा प्रसंग, जावळी, पुरंदरचे युद्ध, प्रतापगडपर्व अशा अनेक महत्वाच्या राजकीय घटनांचेही चित्रीकरण केले आहे.
तसेच चित्रपटामधून लखुजीराजे जाधवराव, जिजाबाई, शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे, कान्होजी नाईक जेधे, संभाजी कावजी कोंढाळकर, जीवा महाले या सर्वांच्या कर्तृत्वाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
या सिनेमात दाखवलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखांबद्दल जाणून घेऊया ऐतिहासिक संदर्भांच्या अनुषंगाने.
लखुजीराजे जाधवराव
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा लखुजीराजे दख्खनमधील मातब्बर सेनानी होते. दख्खनमध्ये तब्बल पंधरा हजारांचे सैन्य घेऊन वावरणाऱ्या लखुजीराजेंचा उल्लेख आपल्याला शाह जहानच्या 'बादशाहनाम्यात' वाचायला मिळतो.
शाह जहानने जेव्हा वडिलांच्या म्हणजे बादशाह जहांगीरच्या विरोधात बंड केले तेव्हा शाह जहानच्या सर्वात विश्वासू मित्रांपैकी एक म्हणून लखुजीराजेंचे नाव मुघलांच्या कागदांमधून वाचावयास मिळते.
लखुजीरावांनी वेळोवेळी स्वतःची योग्यता सिद्ध केली. आपल्या जहागिरीत, 'सिंदखेड राजा' मध्ये लोकोपयोगी वास्तू उभारल्या.
मोती तलाव, चांदणी तलाव, पुतळा बारव, बाळ समुद्र यांसारखे पाणीसाठे निर्माण केले. बखरींमध्ये आलेल्या वर्णनात मोती तलावाच्या निर्मितीमध्ये जाधवरावांना तब्बल 6 लाख रुपये खर्च आलेला होता.
लखुजीराव आणि त्यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांना चार मुलांच्या पाठीवर एक मुलगी झाली, त्याच 'माँसाहेब जिजाऊ'.
मुलीचा जन्म झाला म्हणून लखुजीराजेंनी हत्तीवरून साखर वाटली. आपल्या मुलीला राजकारणाचे धडे दिले. शिक्षकांच्या नेमणुका करून त्यांना शिक्षण दिले.
तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक यांसारखे लष्करी प्रशिक्षण दिले. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे दोन मातब्बर छत्रपती घडवले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी केवळ लखुजीराजे एकमेव मराठा सेनानी आहेत, ज्यांचे अस्सल चित्र तत्कालीन कलाकारांनी रेखाटले आहे.
त्यांच्या पराक्रमाचा मत्सर करणाऱ्या अनेक व्यक्ती निजाम दरबारी होत्या, त्यातीलच एक हमीदखान. बुरहान निजामशाहचे कान भरून त्याने निजामाला लखुजीराजेंच्या विरोधात भडकावले.
लखुजीराजे आपल्याला डोईजड होतील या भीतीने निजामाने भर दरबारात लखुजीराजे, त्यांचे दोन पुत्र अचलोजी आणि राघोजी व त्यांचे नातू यशवंत यांची हत्या केली.
सिंदखेड राजा येथे असणारी लखुजीराजेंची समाधी ही आजवर पाहण्यात आलेली सर्वात भव्य समाधी आहे.
शहाजी महाराज आणि संभाजी महाराज
छत्रपती शिवरायांचे वडील शहाजी महाराजांचा इतिहासही गौरवशाली आहे. आदिलशाही, निजामशाही, मुघल एवढेच नाही तर सातासमुद्रापार असणाऱ्या पोर्तुगीजांनाही त्यांच्या पराक्रमाचा दरारा माहीत होता.
गोव्याचा व्हाइसरॉय कौंद द वेरिअस याच्या पत्रामध्ये पोर्तुगालच्या राजाने शहाजी महाराजांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निजामाच्या कालखंडात त्यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास 20 लाखांच्या आसपास होते.
निजाम मूर्तजाला मांडीवर बसवून त्यांनी नव्या निजामशाहीची स्थापना केली. या निजामशाहीला शाहजहान आणि मुहम्मद आदिलशाह, दोघांनीही मान्यता दिली. पण दख्खनेतील आदिलशाहला सोबत घेत शहाजीराजेंनी मुघलांच्या विरोधात बलाढ्य लढा उभारला.
याच युद्धात, जुन्नर परिसरात अवघ्या नऊ-दहा वर्षांच्या संभाजीराजेंनी शाहिस्तेखानाला हरवले होते. शहाजीराजेंची ताकद मोडून काढायला शाहजहान दक्खनेत उतरला. मुस्तफाखानाच्या मदतीने त्याने मुहम्मद आदिलशाहला आपल्या बाजूला वळवले.
माहुली किल्ल्याच्या वेढ्यात शहाजी महाराजांना शरणागती घेण्यास भाग पाडले. त्यानंतर केवळ शाह जहानच्या अटीमुळे शहाजी महाराजांना महाराष्ट्र सोडून बंगरुळास जावे लागले. त्यांचे राहणीमान अगदी राजाप्रमाणे होते.
सरलष्कर, महाराज, फर्जंद अशा अनेक पदव्या शहाजी महाराजांना देण्यात आल्या होत्या. जयराम पिंडेसारखे तब्बल 30 पेक्षा जास्त कवी त्यांच्या दरबारात सेवा करत होते.
याच जयरामने त्याच्या 'राधामाधवविलास चंपू' काव्यात संभाजीराजेंचा उल्लेख 'योवराज्याभिषेकपवित्रगात्रो राजपुत्र' या शब्दात केला आहे.
संभाजीराजेंचे पुत्र उमाजीराजे यांचा अखेरपर्यंत शिवछत्रपतींनी सांभाळ केला. राज्याभिषेकानंतर कर्नाटकात काढलेल्या स्वारीत उमाजीराजे सहभागी असल्याचे उल्लेख वाचावयास मिळतात. आज या संभाजीराजेंचे वंशज जिंतीला राहतात.
संभाजीराजेंचा उल्लेख शिवभारतात 'महाबाहू' या शब्दात केला आहे. बंगरूळ आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाची व्यवस्था शहाजी महाराजांच्या वतीने संभाजीराजे पाहत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना पुणे जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी शहाजी महाराजांनी नियुक्त केले तेव्हा राजमुद्रा, झेंडा, महत्त्वाचे सरदार आणि अष्टप्रधान मंडळ सोबत देऊ केले होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी शहाजी महाराजांनी तब्बल सहा-सात महिने स्वतंत्र राहून आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांच्या विरोधात संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला होता.
दुर्दैवाने महाराष्ट्रातून त्यांना म्हणावी तशी साथ मिळाली नाही, म्हणून त्यांचे प्रयत्न फसले. पण त्यांनी शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच त्यांचा उल्लेख स्वराज्यसंकल्पक असा करण्यात येतो.
राजमाता जिजाऊंनी पुण्यात राहणाऱ्या लोकांना धीर दिला, स्वतः दरबार भरवला, न्यायनिवाडे केले. पुणे शहर वसवण्यात जिजाऊंचेच योगदान होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती सोन्याचा नांगर देत शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेतृत्व त्यांनी उभे केले.
कर्तुत्ववान वडील आणि मुत्सद्दी, विवेकी आईच्या मार्गदर्शनात वाढलेल्या शिवछत्रपतींनी स्वराज्याची निर्मिती करत महाराष्ट्रावर संस्कार केले.
कान्होजी जेधे-नाईक
मावळातील मातब्बर देशमुख शहाजी महाराजांशी प्रामाणिक होते, एकनिष्ठ होते. ही देशमुख मंडळी शहाजी महाराजांच्या आदेशाने शिवाजी महाराजांच्या पाठीशी स्वराज्याच्या सुरुवातीच्या संग्रामात उभी राहिली. त्यातीलच एक दैदीप्यमान मातब्बर नाव म्हणजे 'कान्होजी नाईक-जेधे'.
शहाजी महाराजांना मुस्तफाखान, अफजल खान, बाजी घोरपडे यांनी दग्याने अटक केली तेव्हा त्यांच्यासोबत कान्होजी जेधे यांनाही अटक करण्यात आली होती. नंतर, शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून कान्होजी जेधे शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यात राहिले.
अफजल खान जेव्हा स्वराज्यावर चालून आला, तेव्हा कान्होजी जेधे यांनी मावळातील मराठ्यांची ताकद शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभी केली. कान्होजी जेधेंच्या घराण्याने कायम स्वराज्यासाठी रक्त सांडले.
कान्होजींच्या मुलाने, बाजी जेधे याने पुरंदरच्या लढाईत स्वराज्याचा भगवा संरक्षित करण्यासाठी जीवाची बाजी लावली. यामुळेच शिवाजी महाराजांनी त्यांना 'सर्जेराव' असा किताब दिला होता.
नागोजी जेधे या तरुण मराठ्याने कोप्पळच्या लढाईत आपले प्राण अर्पण केले होते. अफजलखानासोबत झालेल्या झगड्यात जेध्यांनी केलेला पराक्रम डोळ्यासमोर ठेवून शिवछत्रपतींनी त्यांचा गौरव केला होता.
पंताजी गोपीनाथ बोकील
जेधे शकावली ही जेध्यांनी इतिहासाला दिलेली अनोखी देण आहे. याच जेधे शकावलीमध्ये शिवछत्रपती आणि अफजलखानाच्या भेटीदरम्यान शिवरायांचे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील यांचे नाव आढळून येते.
'राजश्री पंताजी गोपनाथ यास अफजलखानाकडे हेजबीस पाठविले आणि प्रतापगडाखाली भेटी घ्यावी यैसी बोली केली.'
या शब्दांत पंताजींची भूमिका स्पष्ट केली आहे. सभासद बखर, एक्क्याण्णव कलमी बखरीतही त्यांचे उल्लेख वाचावयास मिळतात.
जीवा महाले
शिवछत्रपती आणि अफजलखान भेटीसंबंधीत अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून 'शिवभारत' अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहे.
या संस्कृत काव्यग्रंथाच्या एकविसाव्या अध्यायात जिवा महालेंचा उल्लेख वाचावयास मिळतो. शिवछत्रपतींनी या भेटीसमयी दहा अंगरक्षक सोबत घेतले होते.
याच अध्यायाच्या 70-73 श्लोकामध्ये या अंगरक्षकांची नावे दिसतात : संभाजी कावजी, काताजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सूर्याजी काकडे, जीवा महाले, विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्दी इब्राहिम.
यातीलच जीवा महाले यांनी खानाच्या पट्टेकरी बडा सय्यदचा हात आपल्या हातातील पट्ट्याने कापून धडावेगळा केला होता.
त्यांचे मूळ गाव वाईजवळ कोंडवली हे होते. शिवछत्रपतींचा आणि जीवा महालेंचा संबंध नक्की कधीपासून आला, याविषयी निश्चित उल्लेख आपल्याला आढळत नाही.
सभासद बखर, 91 कलमी बखर, शिवभारत या सर्व महत्वाच्या साधनांमध्ये जिवा महालेंचे उल्लेख आढळून येतात.
शिवछत्रपतींच्या नातवांनी, थोरल्या शाहू महाराजांनी जिवा महालेंच्या वंशजांना इनाम दिलं. त्या इनामाच्या सनदेमध्ये जिवा महालेंचा उल्लेख 'पुरातन येकनिष्ठ सेवक' असा केलेला आढळतो.
शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेली विलक्षण गोष्ट म्हणजे अफजलखान प्रकरण. शिवरायांनी प्रतापगड पायथ्याला अफजलखानाचा वध केला आणि भारताच्या इतिहासाला कलाटनी मिळाली.
या अफजलखानाने शहाजी महाराजांच्या हातापायात दग्याने बेड्या घातल्या होत्या, थोरले बंधू संभाजीराजेंची कनकगिरीच्या वेढ्यात हत्या केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैयक्तीत आयुष्यात या खानाने जखमा दिलेल्या होत्या. त्यामुळे खानाची मोहीम शिवछत्रपतींसाठी अतिशय महत्त्वाची होती.
या खानाची कबर मराठ्यांनीच प्रतापगडाच्या पायथ्याला उभारली. पण, खानाने स्वतःच्या कबरीचे बांधकाम जिवंत असतानाच करून ठेवले होते. विजापूरजवळ खानाने आपल्या कबरीसाठी भव्य वास्तू उभारली होती. त्याच्या दुर्दैवाने त्याला तिथे दफन करण्यात आले नाही.
याच खानाने आपल्या 63 बायकांना मारून टाकले होते. इसवी सन १६७३ साली फ्रेंच प्रवासी एबे कॅरे हा विजापूर प्रांतात फेरफटका मारत असताना त्याने खानाच्या बायकांच्या कबरी उभारतानाचे दृश्य पाहिले होते.
या कबरीचा दगड घडवणाऱ्या कारागिरांनी त्याला तशी माहिती दिल्याचे त्याने नमूद करून ठेवले आहे.
खान वाईचा सुभेदार होता. त्याने 1656-57 साली कान्होजी जेधे यांना पत्र लिहून 'शिवाजी महाराजांच्या विरोधात जावं, जावळीचा मुलूख जिंकावा आणि स्वतःच्या ताब्यात ठेवावा. आदिलशाहीसोबत एकनिष्ठ राहून जावळी सांभाळावी.' असे सांगितले होते.
अर्थात, कान्होजी जेधे यांनी या पत्राला केराची टोपली दाखवली, तो भाग वेगळा.
इ.स. 1656-57 साली औरंगजेबाने आदिलशाही विरोधात मोहीम काढली. पण वारसायुद्धाच्या प्रसंगामुळे त्याला उत्तरेत जावे लागले.
जाताजाता त्याने आदिलशाहला सांगितले,'सिवाचा बंदोबस्त करा' आणि त्याने केलेल्या आदेशानुसार शिवरायांवर अफजलखानाला नामजाद करण्यात आले.
'शिवभारता'त अफजलच्या पत्राचा हवाला देत लिहिलं आहे, 'सिंहगड आणि लोहगड हे प्रबळ किल्ले त्याचबरोबर पुरंदर आणि चाकण, निरा आणि भीमा यांच्या दरम्यान असलेला भाग महाबळाढ्य अशा दिल्लीच्या बादशाहला देऊन टाक आणि चंद्ररावापासून जबरदस्तीने हिसकावून घेतलेली जावळी अलीशाह (अली आदिलशाह) ला देऊन टाक.'
अर्थात, शिवरायांनी अफजलला एक इंच जमीन जिंकू दिली नाहीच, उलट पन्हाळ्यापर्यंतचा मुलूख आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला.
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर या सर्व महत्वाच्या घटनांची उजळणी झाली. याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
संदर्भ :
- शिवभारत, कवींद्र परमानंद
- सभासद बखर, कृष्णाजी अनंत सभासद
- राजा शिवछत्रपती, खंड १ (भाग १), गजानन भास्कर मेहेंदळे
- छत्रपती शिवाजी, सेतू माधवराव पगडी
- बादशाहनामा, अब्दुल हमीद लाहोरी
- संभाजीराजे भोसले, वा. सी. बेंद्रे
- फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती, सुरेंद्रनाथ सेन (अनु. रोहित पवार)
- जेधे शकावली
- पोर्तुगीज-मराठे संबंध, स. शं. देसाई
- राधामाधवविलास चंपू
(या लेखाचे लेखक इतिहासाचे अभ्यासक आणि 'राजा शिवाजी' चित्रपटाचे संशोधन सल्लागार आहेत. )
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)