You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NEET पेपरफुटीचा सुगावा कसा लागला? NTA महासंचालकांनी सांगितली संपूर्ण कहाणी
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच आता एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही परीक्षा पुढे कधी होणार याबाबतच्या तारखा स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहेत.
या प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याला केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."
"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं.
NTA च्या महासंचालकांनी काय सांगितलं?
एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीटच्या पेपर लीकबाबत माहिती कशी मिळाली, याबद्दल माहिती दिली.
एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी मंगळवारी (12 मे) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, नीटची परीक्षा 3 मे रोजी अत्यंत सुरळीत पद्धतीने पार पडली होती. मात्र, 7 मेच्या रात्री त्यांना एका व्हिसलब्लोअरकडून याबद्दल माहिती मिळाली.
ते म्हणाले, "त्या व्हिसलब्लोअरने सांगितले की परीक्षा होण्यापूर्वी त्यांना वॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये काही प्रश्न होते, ते प्रत्यक्ष परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांशी जुळत होते."
3 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी देशभरात 5432 परीक्षाकेंद्र होती, तर भारताबाहेर 14 केंद्रं तयार करण्यात आली होती.
ते पुढे म्हणाले, "परीक्षेपूर्वी मिळालेल्या प्रत्येक माहितीची आम्ही तपासणी केली होती आणि त्यावर कारवाईही केली होती. अनेक लोक बनावट पेपर विकण्याचा प्रयत्न करत होते. अशा 120 टेलिग्राम चॅनेल्स बंद करण्यात आले होते."
"7 मेच्या रात्री मिळालेल्या मेसेजनंतर आम्ही दोन गोष्टींची चौकशी केली. पहिली म्हणजे त्या पीडीएफमध्ये असलेले प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले गेले होते काआणि दुसरी म्हणजे ही पीडीएफ 3 मेपूर्वीच कुणाच्या तरी हातात पडलेली होती का?"
"ही चौकशी आम्ही कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडून करून घेतली असता असे आढळून आले की परीक्षेत विचारले गेलेले काही प्रश्न त्या पीडीएफमध्येही होते. तसेच पोलिसांच्या तपासात असेही स्पष्ट झाले की 2 मे रोजी ही पीडीएफ काही लोकांच्या मोबाईलमध्ये आधीच होती."
अभिषेक सिंह यांनी सांगितले, "प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी आम्ही पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे."
तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं आहे.
नाशिक ते हरियाणा कनेक्शन
या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधून एका 30 वर्षिय संशयिताला ताब्यात घेतले आहे.
NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मंगळवारी सायंकाळी नाशिक पोलिसांनी आरोपीला CBI च्या ताब्यात दिलं. CBI चं पथक त्याला घेऊन रवाना झालं असून बुधवारी सकाळी त्याला दिल्लीला नेलं जाईल.
पहिला प्रश्नपत्रिकेचा संच इथूनच एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात आपल्या मुलाचा या प्रकरणाशी संबंध नाही. तो निर्दोष सुटेल असं संशयिताच्या वडिलांनी म्हटलं आहे.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार "प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली होती. नाशिकमधून लीक झालेला हा प्रश्नपत्रिकेचा संच हरियाणात पोहोचला.
नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, "देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी एक संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं.
"राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं. तो सीहोर येथील सत्यसाई युनिव्हर्सिटीत BAMS च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता."
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला.
पोलिसांनी सांगितलं की, "आमच्याकडे नाव होतं, पण पत्ता आणि इतर माहिती नव्हती. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला.
"त्याने कपडे बदलले होते आणि मुंडण केलं होतं. तो देवदर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली."
त्याने पेहराव बदलला असला तरी त्याला ओळखून पोलिसांनी संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेतले.
CBI च्या स्पेशल टास्क फोर्सचं एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी नाशिककडे रवाना झालं आहे.
या प्रकरणात आपला मुलगा निर्दोष आहे असं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे.
"गेल्या सहा महिन्यापासून तो नाशिकमध्ये BAMS ची प्रॅक्टिस करत आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध नसेल.
"त्याचे या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी," अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)