You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NEET : 'शुभम खैरनार डॉक्टर नाही', कथित पेपरफुटी प्रकरणातील संशयिताबाबत कुलगुरूंनी काय माहिती दिली?
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
NEET परीक्षेमधील अनियमितता आणि कथित पेपरफुटीशी संबंधित प्रकरणात सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीबीआयनं काही संशयितांना अटक केली आहे.
या प्रकरणात नाशिकमधून शुभम खैरनार नावाच्या 30 वर्षीय संशयिताला सीबीआयने अटक केली आहे.
शुभम खैरनार हा नाशिकमध्ये एका परिसरातील इमारतीत SR एज्युकेशन कन्सल्टन्सी या नावाने व्यवसाय करत होता.
बीबीसी मराठीने संबंधित कार्यालयाला भेट दिली असता, त्याच्या कार्यालयाच्या बोर्डवर 'डॉ. शुभम खैरनार' असा उल्लेख करण्यात आला आहे.
याआधी, पोलिसांनी माहिती दिली होती तेव्हा त्यांनी हा संशयित सीहोर येथील विद्यापीठात BAMS चा विद्यार्थी आहे असे सांगितले होते तर संशयिताच्या वडिलांनी असा दावा केला होता की 'शुभम हा मेडिकल तृतीय वर्षाचा विद्यार्थी असून तो नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो.'
दरम्यान, हा संशयित खरंच बीएएमसचा विद्यार्थी आहे का किंवा ज्या प्रमाणे त्याने आपल्या बोर्डवर 'डॉक्टर' असा उल्लेख केला आहे, त्याची पडताळणी बीबीसी मराठीने केली.
'शुभमने महाविद्यालयात प्रवेश घेतला होता पण त्याने कोणत्याही वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला नव्हता,' अशी माहिती सीहोरच्या सत्य साई विद्यापीठाच्या प्रशासनाने बीबीसी मराठीला दिली.
बीबीसी मराठीने सीहोर येथील श्री सत्य साई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड मेडिकल सायन्सचे कुलगुरू डॉ. मुकेश तिवारी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला.
डॉ. मुकेश तिवारी यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "शुभम खैरनारने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आमच्या विद्यापीठात बीएएमएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, प्रवेश प्रक्रियेसाठी आणि काही कागदपत्रं जमा करण्यासाठी अशा फक्त दोनच वेळा तो महाविद्यालयात आला. त्यानंतर त्याने एकदाही कॉलेजला हजेरी लावलेली नाही. आम्ही त्याच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नव्हता."
डॉ. तिवारी पुढे म्हणाले, "त्याने या अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष सुरुवातही केलेली नव्हती. त्यामुळे आमच्या महाविद्यालयाच्या पदवीच्या आधारे तो स्वतःला 'डॉक्टर' म्हणवत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. माध्यमांमध्ये तो आमच्या विद्यापीठात अंतिम वर्षाला शिकत असल्याच्या ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्या देखील चुकीच्या आहेत. या प्रकरणाच्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत," असंही डॉ. मुकेश तिवारी यांनी म्हटलं.
बीबीसी मराठीने शुभमचे वडील मधुकर खैरनार यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद आला.
मधुकर खैरनार यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं होतं की, "माझ्या मुलाचा या प्रकरणाशी काहीही सबंध नाही आणि त्याची निर्दोष सुटका होईल. तो काय करतोय याची मला कल्पना नव्हती. तो म्हणायचा की मी शिकत आहे आणि माझी प्रॅक्टिस आणि काऊन्सिलिंग सुरू आहे."
बीबीसी मराठी खैरनार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर बातमीत अपडेट केली जाईल.
आरोपी कसा ताब्यात आला? - पोलिसांनी दिली माहिती
या प्रकरणात पोलिसांनी नाशिकमधून 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतले आणि नंतर सीबीआयकडे सोपवले. तो पोलिसांच्या कसा ताब्यात आला याची माहिती नाशिक पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती.
मंगळवारी (12 मे) सायंकाळी नाशिक पोलिसांनी शुभमला CBI च्या ताब्यात दिलं. CBI च्या पथकाने त्याला दिल्लीला नेले.
NEET परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, त्या आधारावर कारवाई झाल्याचे त्यांनी सांगितले होते.
पहिला प्रश्नपत्रिकेचा संच इथूनच एका टेलिग्राम ग्रुपवर पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर तिची पहिली कॉपी नाशिकमधून समोर आली होती. नाशिकमधून लीक झालेला हा प्रश्नपत्रिकेचा संच हरियाणात पोहोचला.
नाशिक पोलिसांच्या माहितीनुसार, देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यापैकी शुभम खैरनारला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं
राजस्थान पोलिसांनी जी माहिती दिली होती त्या आधारावर नाशिक पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला असे पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते की, "आमच्याकडे नाव होतं, पण पत्ता आणि इतर माहिती नव्हती. काही तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला.
"त्याने कपडे बदलले होते आणि मुंडण केलं होतं. तो देवदर्शनासाठी जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याची चौकशी करण्यात आली."
"त्याने पेहराव बदलला असला तरी त्याला ओळखून पोलिसांनी संशयिताला नाशिकमधून ताब्यात घेतले," असे पोलिसांनी सांगितले होते.
ज्या वेळी, शुभमला ताब्यात घेण्याची बातमी समोर आली तेव्हा माध्यमांनी शुभमचे वडील मधुकर खैरनार यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, 'या प्रकरणात आपला मुलगा निर्दोष आहे.'
"त्याचे या प्रकरणात नाव येत असेल तर त्याची चौकशी व्हावी," अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी यावेळी दिली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)