अमेरिकेचा इराणवर पुन्हा बॉम्बहल्ला, ट्रम्प यांनी सांगितलं कारण

फोटो स्रोत, U.S. Central Command/Getty Images
इराणच्या लष्करी ठिकाणांवर बॉम्बहल्ले केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने अमेरिकन जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.
परंतु, आधी इराणच्या एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला होता, त्यामुळेच क्षेपणास्त्रं डागण्यात आल्याचं इराणने म्हटलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 मे रोजी सायंकाळी इराणबरोबरचा संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, असं म्हटलं होतं.
युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) एका निवेदनात सांगितलं, "जेव्हा अमेरिकन नौदलाची गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ओमानच्या आखाताकडे जात होती, तेव्हा इराणकडून झालेले हल्ले रोखण्यात आले आणि स्वतःच्या बचावासाठी अमेरिकन सैन्याने त्यांना प्रत्युत्तर दिलं."
अमेरिकन जहाजं या भागातून जात असताना इराणच्या सैन्याने क्षेपणास्त्रं, ड्रोन आणि लहान बोटींच्या मदतीने हल्ला केला, असं निवेदनात पुढे म्हटलं आहे.
'अमेरिकेनं शस्त्रसंधीचं उल्लंघन' केल्याचा इराणचा आरोप
दुसरीकडे, इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने अमेरिकेवर 'शस्त्रसंधीचे उल्लंघन' केल्याचा आरोप केला आहे.
अमेरिकेने होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात असलेल्या एका इराणी तेल टँकरवर हल्ला केला, असं इराणची सरकारी प्रसारण संस्था आयआरआयबीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटलं.
इराणने सांगितलं की, त्यांच्या सशस्त्र दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या सैन्य जहाजांवर हल्ला केला आणि त्यांचं मोठं नुकसान केलं.
इराणच्या नौदलानं सांगितलं की, त्यांनी 'तीव्र स्फोटक शस्त्रांनी' प्रत्युत्तर दिलं आणि त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार यामुळे 'अमेरिकेचं मोठं नुकसान झालं' आहे.
तसेच 'घुसखोरी करणारी शत्रूची जहाजं वेगाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून निघून गेली', असंही त्यांनी म्हटलं.
इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
दरम्यान, अमेरिका इराणसोबत चर्चा करत आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 मे रोजी सायंकाळी (भारतीय वेळेनुसार शुक्रवार पहाटे) पत्रकारांना सांगितलं.
अमेरिका आणि इराणमध्ये गोळीबार सुरू असूनही शस्त्रसंधी अजूनही लागू आहे, असं ते म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले, "तुम्ही कदाचित ऐकलं असेल की, आम्ही आज खूप धोकादायक परिस्थितीत सुमारे 3 डिस्ट्रॉयर पुढे पाठवले. आम्ही शत्रूचं मोठं नुकसान केलं आहे."
अमेरिका 'कोणत्याही परिस्थितीत' इराणला अण्वस्त्रं बाळगू देणार नाही आणि इराण यासाठी सहमत झाला आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
"आता पाहूयात, ते यावर सही करायला तयार आहेत की नाही," असंही त्यांनी नमूद केलं.
ट्रम्प यांनी इशारा देत म्हटलं, "चर्चा चांगली चालू आहे, पण जर करारावर सही झाली नाही, तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल, हे त्यांना समजून घ्यावं लागेल."
"मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांना या कराराची जास्त गरज आहे," असंही ते म्हणाले.
शांतता करार धोक्यात आहे का?
अमेरिकेनं पुन्हा सांगितलं की, ते 'तणाव वाढवू इच्छित नाहीत, पण ते पूर्णपणे तयार आणि सज्ज आहेत'. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या एका बाजूला इराण आहे, तर दुसऱ्या बाजूला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) आहे.
ट्रम्प प्रशासनाने गेल्या महिन्यात (एप्रिल) होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणी बंदरांवर नाकेबंदी सुरू केली होती. इराणच्या सैन्याने इराणच्या किनाऱ्याकडे जाणारी जहाजे थांबवू किंवा परत पाठवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचललं होतं.
इराणवर दबाव आणता यावा यासाठी त्यांना तेल निर्यातीमधून मिळणारा नफा कमी करायचा आहे, असं अमेरिकेचं म्हणणं आहे.
फेब्रुवारीच्या शेवटी संघर्ष सुरू झाल्यापासून अनेक इराणी जहाजांना ताब्यात घेतलं आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे.
7 एप्रिल रोजी शस्त्रसंधीच्या आवाहनानंतर अशा प्रकारच्या चकमकी होण्याची ही पहिलीच घटना नाही.
अमेरिकन सेंट्रल कमांडने सांगितलं की, काही अमेरिकन डिस्ट्रॉयर (विध्वंसक जहाज) 'प्रोजेक्ट फ्रीडम' अंतर्गत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेले. या मोहिमेचा उद्देश सागरी व्यापाराचे मार्ग खुले ठेवणे हा होता.
त्यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या नौदलाची दोन डिस्ट्रॉयर जहाजं- यूएसएस ट्रक्सटन आणि यूएसएस मेसन यांनी समन्वित हल्ला सहन करूनही पर्शियन आखातात प्रवेश केला. या हल्ल्यांमध्ये छोट्या इराणी बोटी, क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता.

फोटो स्रोत, EPA/Shutterstock
अमेरिकन सैन्याने सांगितलं की, त्यांच्या कोणत्याही जहाजाचं नुकसान झालेलं नाही. त्यांनी 6 लहान इराणी बोटी नष्ट केल्या आणि काही क्रूझ क्षेपणास्त्रं व ड्रोन पाडले.
पण दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी जाहीर केलं की, 'प्रोजेक्ट फ्रीडम' काही काळासाठी थांबवण्यात येईल, कारण इराणसोबतच्या कराराबाबत 'चांगली प्रगती झाली आहे'.
या दोन्ही देशांमधील प्रस्तावित कराराचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. परंतु, अमेरिकेचा नवीन प्रस्ताव तपासला जात असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.
तत्पूर्वी इराणने म्हटलं होतं की, ते या भागातील अमेरिकन जहाजांना लक्ष्य करतील आणि त्यांना जाण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या युद्धनौकांवर गोळीबारही केला होता.
जी जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करताना त्यांच्या अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गाचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर 'निर्णायक कारवाई' केली जाईल, असा इशारा इराणी लष्काराने दिला आहे.
नंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिलं की, इराणी हल्लेखोरांचं 'मोठं नुकसान' झालं आणि त्यांच्या अनेक लहान बोटी पूर्णपणे नष्ट करण्यात झाल्या.
त्यांनी लिहिलं, "आमच्या डिस्ट्रॉयर जहाजांवर क्षेपणास्त्रं डागण्यात आले, पण ते सहज पाडण्यात आले. ड्रोनही आले, पण त्यांना हवेतच नष्ट करण्यात आलं."
इराणविरुद्धची अमेरिकन नाकेबंदी सुरूच राहील आणि ज्यांच्यावर हल्ला झाला ते 3 डिस्ट्रॉयर पुन्हा अमेरिकन जहाजांच्या 'वॉल ऑफ स्टील'मध्ये सहभागी होतील, असंही त्यांनी सांगितलं.
अमेरिका-इराण तणाव कमी होणार? 14 कलमी कराराची चर्चा, ट्रम्प काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, इराणबरोबर सुरू असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 मे रोजी सायंकाळी केला होता.
होर्मुझची सामुद्रधुनी आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जॉर्जियाच्या गव्हर्नर पदाचे रिपब्लिकन उमेदवार बर्ट जोन्स यांच्या प्रचारसभेत ट्रम्प बोलत होते.
ते म्हणाले, "आम्ही हे अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी करत आहोत. इराणला अण्वस्त्रं तयार करू देता येणार नाही. बहुतांश लोकांना माहीत आहे की, आम्ही योग्य निर्णय घेत आहोत आणि हा संघर्ष लवकरच संपेल."
सीएनएनच्या वृत्तानुसार, इराण आज (7 मे) मध्यस्थांच्या मार्फत अमेरिकेच्या प्रस्तावावर आपलं उत्तर देणार आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई म्हणाले की, आम्ही अमेरिकेच्या या प्रस्तावावरील आमचं मत पाकिस्तानी मध्यस्थांच्या मार्फत शेअर करू.
सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, अमेरिका आणि इराण दोघेही संघर्ष थांबवण्यासाठी कराराच्या दिशेने पुढे जात आहेत. परंतु, अमेरिकेकडून आलेल्या प्रस्तावावर अजून विचार सुरू आहे, असं इराणने सांगितलं.
इराण अमेरिकेच्या प्रस्तावावर विचार करतोय; पाकिस्तानने काय म्हटलं?
संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे इराणने म्हटलं आहे. माध्यमांत आलेल्या काही वृत्तांनुसार, दोन्ही देश लवकरच कराराच्या जवळ पोहोचू शकतात.
अमेरिकेतील न्यूज आऊटलेट ॲक्सियोसच्या वृत्तानुसार, इराणसोबत लवकरच 14 मुद्द्यांवर आधारित करार होऊ शकतो, अशी व्हाईट हाऊसला आशा आहे.
पाकिस्तानची भूमिका असेल?
अमेरिकेच्या प्रस्तावाबाबतचं आमचं मत आम्ही पाकिस्तानी मध्यस्थांशी शेअर करू, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं.
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसहाक डार यांनी दिली.
अमेरिकेने मागील 24 तासांत इराणबरोबर खूप चांगली चर्चा केली आहे आणि लवकरच एक करार होऊ शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
ॲक्सियोसच्या वृत्तानुसार, या करारात इराणचा आण्विक कार्यक्रम थांबवणे, निर्बंध हटवणे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचा समावेश आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात 28 फेब्रुवारीपासून संघर्ष सुरू झाला होता. परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून शस्त्रसंधी लागू आहे. हा संघर्ष कायमचा थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीची म्हणून भूमिका बजावत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























